आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
मैत्री या शब्दाची प्रत्येकाची वेगवेगळी व्याख्या असते…अगदी चॉकलेट शेअर करण्यापासून ते थेट आयुष्य शेअर करण्या पर्यंत थबकते, पण भावना एकच, निरपेक्ष!
मैत्री म्हंटलं की आपण भूतकाळाच्या कितीतरी वळणांवर विसावतो, काही ठिकाणी ठसका लागेपर्यंत हसतो आणि काही ठिकाणी अगदी ढसाढसा रडतोही!
मित्र या शब्दाचा नुसता उल्लेख ही नॉस्टॅल्जिक करतो हे मात्र अबाधित सत्य! तुम्ही कितीही प्रॅक्टिकल असा, कितीही रिझर्व्हड असा, जगाच्या दृष्टीने कितीही आतल्या गाठीचे असा… पण एक तरी मित्र नसेल असा एकही माणूस या जगाच्या पाठीवर शोधून सापडणार नाही!
मैत्रीच्या अनेक छटा दाखवणारे कितीतरी चित्रपट बॉलिवूड मध्ये प्रदर्शित झाले आहेत… काही चित्रपट असे असतात ज्यात लीड ऍक्टर व्यतिरिक्त एक कॅरेक्टर असं असतं जे आवर्जून आपलं लक्ष वेधत असतं… त्याचीच एक झलक!
अर्शद वारसी (सर्किट)
अर्शद वारसी हे नाव आलं की त्याचे लीड रोलमधले चित्रपट नंतर आठवतात, पहिले आठवतो तो मुन्ना भाई एमबीबीएस आणि लगे रहो मुन्नाभाई! हा सर्किट (अर्शद वारसी) मुन्नासाठी (संजय दत्त) वाट्टेल ते करतो, अगदी किडनॅपिंग करणे, मुन्नाभाईला ह्यूमन डिसेक्शन शिकता यावं म्हणून एक बाहेरदेशातला जिवंत पर्यटक पोत्यात भरून पकडून आणणे ते गुंड असूनही सभ्य डॉक्टर म्हणून वावरणे, जेल मध्ये जाणे, बारावीची खोटी मार्कशीट तयार करणे इ.इ… चूक बरोबर ही भावना येतंच नाही आपल्या मनात, आपल्याला जाणवते ते मित्रप्रेम आणि त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी!
एका सीन मध्ये हळवेला सर्किट समुद्राकाठी उभा असतो, आपल्या मित्राने आपल्याला कानफाडीत मारल्याने तो मनातून दुखावला असतो, आणि मुन्नाभाईने माफी मागितल्यावर त्याला सहज माफ करतो, हा सीन असंख्य काळजांचे ठाव घेतो, आपल्याही आयुष्यात असं कधी न कधी झालेलं असतंच, त्यामुळे इझिली रिलेट होतं! माफ करता येणं ही एक अत्यंत सुंदर कला आहे हे सर्किट शिकवतो!
कार्तिक आर्यन (सोनू)
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सोनू के टिटू की स्विटी’ मधला हा सोनू (कार्तिक आर्यन), नर्सरीपासून मित्र असलेल्या टिटू (सनी सिंह निज्जर) साठी अत्यंत प्रोटेक्टिव्ह आणि वेळप्रसंगी पझेसिव्ह असतो, टिटू निरागस असल्याने नेहमी रॉन्ग रिलेशनशिप्स मध्ये अडकत असतो आणि मुली त्याच्या साध्या स्वभावाचा गैरफायदा घेत असतात. ह्या सगळ्या प्रकारातून सोनू त्याला वाचवत असतो. मग टिटूच्या आयुष्यात स्वीटी (नुशरत भरुचा) येते आणि टिटूला वाटते की तीच त्याची परफेक्ट लाईफ पार्टनर होऊ शकते, पण इथेच खरी गोम असते, स्वीटी अत्यंत कावेबाज मुलगी असते आणि ती टिटूची इस्टेट मिळवण्यासाठी भोळेपणाचा आव आणत असते, हेच नेमके सोनू हेरतो!
मित्राला स्विटीच्या तावडीतून सोडवण्यासाठी सोनू वाट्टेल ते करतो आणि इथूनच सुरू होतं सोनू आणि स्वीटी चे द्वंद्व! चित्रपटाच्या शेवटी जेव्हा स्विटी सोनूला पुरून उरते तेव्हा हतबल झालेला सोनू टिटूला ऐन वरमाला सोहळ्यात म्हणतो “या ये सच्ची, या मैं झूठा… बात सिर्फ इतनी सी है टिटू, या तो ये, या मैं…” डोळ्यात तरळणारे अश्रू घेऊन तिथून चालता होतो!
आई वारल्यानंतर रडलेला सोनू त्यांनतर कधीच रडला नाही आज त्याच्या डोळ्यात जर पाणी आले आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे हे टिटू ओळखतो आणि स्वीटीसोबत लग्न न करता सोनूच्या मागे निघून जातो आणि आपण हे बघून अत्यंत खुश होतो की ‘दोस्ती और लडकी’ मध्ये दोस्ती जिंकते!
नवाज़ुद्दीन सिद्दीक़ी (चाँद नवाब)
बजरंगी भाईजान चित्रपटात सुरुवातीला नवाज़ुद्दीनची (चाँद नवाब) इमेज एक पाकिस्तानी पत्रकार जो तुटक्या फुटक्या बातम्यांचे फुटेज घेत असतो, अशीच असते! आणि मग जेव्हा त्याला समजते पवन (सलमान खान) एक भारतीय हेर नसून अत्यंत साधा भोळा माणूस आहे जो चुकून भारतात आलेल्या एका अल्पवयीन पाकिस्तानी शाहिदाला(हर्षाली मल्होत्रा) तिच्या देशात सोडायला पाकिस्तानात दाखल झालाय, तेव्हा सुरुवात होते एक अत्यंत निर्लेप, निर्व्याज, निरपेक्ष मैत्रीची…
कसलीच पर्वा न करता चाँद नवाब पवनला त्याचं कार्य सिद्धीस न्यायला मदत करतो अगदी स्वतःच्या मुलुखाच्या विरोधात जाऊन! मिश्किल असलेला चाँद नवाब आपल्या अनेक प्रसंगात हसवतो, आणि तेवढंच हळवं करतो! पवन जेव्हा मायदेशी परत जाणार असतो तेव्हा चाँद नवाब म्हणतो “लौट कर जरूर आना, और इस बार तारों के नीचे से नहीं, विझा का ठप्पा लगवा कर लाना” चाँद नवाब नाव असलेली ही एक अशी मैत्री जी कुठल्याच विझ्याशिवाय कुठे ही येऊ-जाऊ शकते!
लिझा हेडन (विजयालक्ष्मी)
क्विन चित्रपटाचा उत्तरार्धच मुळात दोस्तीने तुडुंब भरला आहे, पण पूर्वार्धात रानीच्या (कंगना रनौट) आयुष्यात असे काही घडते ज्यामुळे तिच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळते, होतं असं की तिचं लग्न विजयसोबत (राजकुमार राव) ठरलेलं असतं, आणि लग्नाच्या ऐन आदल्या दिवशी तो तिच्यासोबत लग्न करण्यास नकार देतो. त्याला अचानक रानी त्याच्या स्टेटसला मॅच न करू शकणारी मुलगी वाटते.
इथे रानी कोसळते. प्रत्येक सर्वसाधारण मुलीसारखे रानीचीही काही खास स्वप्ने असतात त्यातलं एक म्हणजे हनिमूनसाठी पॅरिसला जाणे! आणि एवढं होऊनही ती जाते! बळ एकवटून, एकटीच!
लाक्षणिक अर्थाने बिघडलेल्या विजयालक्ष्मीशी (लिझा हेडन) तिथे तिची भेट होते ! पण, दिसण्या वागण्यावर न जाता जर आपण विजयालक्ष्मीला पारखलं तर दिसते एक कमालीची केअरिंग, प्रेमळ मैत्रीण, जी विजयमध्ये गुंतलेल्या, बिथरलेल्या, हतबल असलेल्या रानीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून उभं रहायला मदत करते, विशेष म्हणजे ती रानीला कधीच स्वतःसारखं वागायला सांगत नाही!
पॅरिसचं वास्तव्य सोडून ऍमस्टरडॅमला जायला निघालेली रानी जेव्हा भावूक होते तेव्हा तिला विजयालक्ष्मी म्हणते “विजय नहीं है तो क्या हुआ? विजयालक्ष्मी तो है!” कमी कपड्यांमधली ही घरंदाज मैत्री, रानीच्या फाटलेल्या हृदयाला आत्मविश्वासाच्या ठिगळांनी जोडते!
मुहम्मद झिशान अयुब (मुरारी) / स्वरा भास्कर (बिंदीया)
रांझणा हा तामिळ चित्रपटसृष्टीतला गुणी अभिनेता धनुषचा बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेला पहिला चित्रपट! अगदी बालपणापासून कुंदनचं (धनुष) झोयावर (सोनम कपूर) एकतर्फी प्रेम असतं! सुरुवातीला आकर्षण म्हणून झोयासुद्धा कुंदनमध्ये गुंतते, पण ते फक्त काही काळापुरती! कुंदन मात्र त्याला प्रेमच समजतो आणि ते टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवतो. मूळचा दाक्षिणात्य असलेला कुंदन वाराणशीत राहत असतो. त्याचे बालमित्र असतात मुरारी (मुहम्मद झिशान अयुब) आणि बिंदीया (स्वरा भास्कर), एकीकडे बिंदीयाचे कुंदनवर एकतर्फी पण मनापासून प्रेम असूनही ती कुंदनला झोया आवडते म्हणून आणि कुंदन म्हणतो म्हणून त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी काहीही करायला तयार असते. एका सीन मध्ये ती कुंदनला म्हणते “व्हिटॅमिन हमसे खाओ, और आशिकी इनसे(झोया) लडाओ” एवढं प्रेम करत असूनही निव्वळ कुंदनसाठी सगळं करणारी बिंदीया खरंतर बालपणी केलेली मैत्री निभावत असते.
एकीकडे बिंदीया तर दुसरीकडे मुरारी, जो वेळप्रसंगी कुंदनची टर ही उडवत असतो, आणि त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असतो. संपूर्ण चित्रपटात मुरारीचे खुमासदार डायलॉग्स आहेत, जे मिश्किल मैत्रीचे प्रतिनिधित्व करत असतात. शेवटच्या सीनमध्ये जेव्हा कुंदन अखेरचे काही श्वास मोजत असतो तेव्हा मुरारी म्हणतो “मर जा बे, पंडित!” मित्राच्या यातना सहन न होणारा मुरारी, रक्त ओकणाऱ्या कुंदनला बघू न शकणारा मुरारी, मित्राला मुक्ती मिळावी म्हणून त्याला ‘मर’ म्हणणारा मुरारी… आयुष्यात दोस्ती निभावणं सोडून काहीही करतांना न दिसणारा मुरारी..
पराकोटीची मैत्री निभावणारे अनेक कॅरेक्टर्स जे आपण चित्रपटात बघत असतो, जसे की… हम्प्टी शर्मा की दुल्हनिया आणि बद्रीनाथ की दुन्हानिया मधला अनुक्रमे पोपलू आणि सोमदेव मिश्रा (साहिल वैद), ये जवानी है दीवानी मधले अवी (आदित्य रॉय कपूर) आणि अदिती (कल्की केकला), काय पो छे मधला ओमी (अमित साध), सुलतान मधला गोविंद (अनंत विधात शर्मा), ओम शांती ओम मधला पप्पू मास्टर(श्रेयस तळपदे), हलचल मधला लकी (अर्शद वारसी), ईश्क विश्क मधला मॅम्बो (विशाल मल्होत्रा), फिलहाल मधली सिया (सुश्मिता सेन), चलो दिल्ली मधला मनू गुप्ता (विनय पाठक), गदर मधला दरमियां सिंग (विवेक शौक), तनु वेड्स मनू मधला पप्पी जी (दीपक डोबरियाल)…
ही यादी वाढतच जाईल पण पूर्ण होणार नाही, मैत्री विषयच एवढा खोल आहे… या फिल्मी दोस्त कॅरेक्टर्ससारखा कोणी न कोणी तुमचा दोस्त नक्की असेल, ज्याने एखादवेळेस भलेही रडवलं असेल पण बहुतांश वेळेस खूप हसवलं असेल, त्या खास दोस्ताला टॅग करा आणि सांगा…
मेरे दिल की ये दुआ है, कभी दूर तू न जाए,
तेरे बिना हो जीना, वो दिन कभी न आए,
तेरे संग जीना यहाँ, तेरे संग मर जाना,
याद करेगी दुनिया, तेरा मेरा अफ़साना…
तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना,
याद करेगी दुनिया, तेरा मेरा अफ़साना…!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.