Site icon InMarathi

औरंगजेब…देश तुझं बलिदान विसरणार नाही…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

काश्मिर खोऱ्यातल्या सालीना गावच्या औरंगजेबनं लिहायला भाग पाडलं. खरं तर औरंगजेब हे नाव उच्चारलं तरी आपलं रक्त सळसळतं. पण आज याच नावानं मनात काहूर माजलंय. औरंगजेब या जवानाचं अपहरण करुन त्याचे हाल हाल करुन मारण्यात आलं. ज्या काश्मीर खोऱ्यात असिफाला न्याय देण्यापेक्षा बलात्कारांच्या समर्थनार्थ मोर्चे निघत होते, त्याच खोऱ्यात असे हजारो औरंगजेब नक्कीच असतील जे देशाच्या रक्षणासाठी जीव ओवाळून टाकत आहेत.

 

 

अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या दहशतवादविरोधी पथकात औरंगजेब होता. औरंगजेबचं घराणंच भारतभूमीला अर्पण आहे. वडिल भारतीय लष्करातून निवृत्त. भाऊ आजही भारतीय लष्करात. 2000 मध्ये सख्ख्या काकांची हत्या करण्यात आली. औरंगजेबच्या बलिदानानं एकीकडे इस्लामिक दहशतवादाचं करायचं काय ही भावना आहे.

पण त्याहून अधिक वाईट वाटतंय ते या देशासाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या मुस्लिमांबद्दल…!

काय वाटत असेल त्यांना जेव्हा त्यांना त्यांच्या धर्मावरुन डिवचलं जात असेल? ‘गायगुंडां’चा हैदोस पाहून त्यांना काय वाटत असेल ? देशात काही विशिष्ट हिंदू संघटना विखार पसरवत असताना त्यांच्या मनात काय भावना येत असेल?

हो, हेही मान्य की काश्मिरात भारतीय जवानांवर दगडफेक करणारी पाकिस्तानप्रेमी टोळकी आहेत पण त्याच काश्मिरात दहशतवाद्यांची नांगी ठेचणारे कित्येक हजारो औरंगजेबही आहेत. हे आपण विसरणार आहोत का?

या औरंगजेबांचं बलिदान आपण नाकारणार आहोत का?

या भूमीसाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या, या देशावर-मातीवर प्रेम करणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या मनात जर असुरक्षिततेची भावना निर्माण झाली तर त्याला जबाबदार कोण?

मुस्लिमांसोबत झालेला अन्याय विसरुन जेव्हा औरंगजेबसारखे तरुण हातात दगड घेण्याऐवजी भारतमातेसाठी शस्त्रं घेतात तेव्हा साहजिकच त्याचं कौतुक झालंच पाहिजे. मूळात ते काहीतरी वेगळं करत आहेत अशी भावना त्यांच्यात नसते. जी भावना सामान्य हिंदू तरुणाच्या मनात असते तीच त्यांच्याही मनात असते.

मातृभूमीचं रक्षण हे आपलं कर्तव्यच आहे आणि त्यात आपण काही वेगळं करत नाहीयोत ही भावनाच असते. जवानाला कुठं आलाय जात अन् धर्म ?

पण खोऱ्यातलं वातावरण वेगळं आहे. जिथं ‘तुम इंडियासे आये हो क्या ?’ असं विचारलं जातं तिथे मातृभूमीसाठी शहीद झालेला ‘औरंगजेब’ नक्कीच आश्वासक वाटतो.

ज्यांना “ह्या” औरंगरंजेबाबद्दल फारसं माहीत नाही – त्यांच्यासाठी –

एक होता औरंगजेब…!

 

लेखक अनिकेत पेंडसे, साम टीव्हीवर स्पेशल रिपोर्ट सादर करताना

औरंगजेब हा पूँछ सेक्टरच्या सालीना गावचा रहिवासी. त्याचे वडिल भारतीय लष्करात होते. त्याचे काकाही लष्करात होते. दहशतवाद्यांशी लढताना त्याचे काका 2000 मध्ये शहीद झाले होते. औरंगजेबचा एक भाऊही लष्करात आहे. इतर 4 भाऊ शिक्षण घेत आहे. जम्मू-काश्मीर लाईट इंफ्रांटीचा तो भाग होता आणि 44 राष्ट्रीय रायफल्समध्ये त्याची पोस्टिंग होती. 44 राष्ट्रीय रायफल्सचा औरंगजेब रायफलर होता. दहशतवादविरोधी पथकाचाही सदस्य होता. अनेक दहशतवाद्यांच्या खात्मा करणाऱ्या ऑपरेशन्सचा तो भाग होता.

काय झालं होतं ‘त्या दिवशी’ ?

14 जूनला ईदसाठी सुट्टी घेऊन औरंगजेब घरी जात असताना अतिरेक्यांनी त्यांचं अपहरण केलं. पुलवामाच्या कालम्पोरामधून औरंगजेबचं अपहरण करण्यात आलं. त्याचे हाल हाल केले आणि त्याची हत्या करण्यात आली. कालम्पोरापासून 10 किलोमीटर दूर गुस्सू गावात त्याचं शव मिळालं. त्याच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. डोक्यात आणि मानेत गोळ्या मारण्यात आल्या होत्या.

का मारलं औरंगजेबला ?

औरंगजेबची हत्या ही पूर्वनियोजित होती. या हत्येमागे आयएसआयचा हात होता, असं मानलं जातंय. हिजबुल कमांडर समीर टायगर, सद्दाम पद्दार, वसीम शहा अशा कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या पथकाचा औरंगजेब भाग होता. त्यामुळंच टेररिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या तो रडारवर होता. भारतीय सैन्यातील काश्मिरी मुस्लिमांमध्ये भीती निर्माण व्हावी, काश्मीरी मुस्लिमांनी सैन्यात वा पोलिसात दाखल होऊ नये, त्यांच्यात दहशत आणि भारतीय सैन्याविषयी चीड निर्माण व्हावी या उद्देशानंच औरंगजेबची हत्या करण्यात आल्याचं बोललं जातंय.

ह्याच विषयावर साम टीव्हीवरील स्पेशल रिपोर्ट बघण्यासारखा आहे :

 

 

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version