Site icon InMarathi

“मला ताज हॉटेलच्या खिडकीतून इंडिया भारताच्या आवाक्यात येताना दिसतोय”

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

ही आहे बँड स्टँडच्या ताज लँड्स एन्ड च्या एका एगझिक्युटिव्ह रूमची खिडकी.

 

facebook.com

गेले तीन दिवस, रोज किमान ७-८ तास, ह्या खिडकीत बसून होतो. कुकीज-कॅश्यूज-कॅपॅचिनो घेत, समोर बसलेल्या प्रचंड भारी माणसाशी एका संभाव्य प्रोजेक्टबद्दल चर्चा करत होतो. काम मिळेल की नाही कल्पना नाही, मिळालं तर त्या डिटेल्स देईनच. ती एक रोलर कोस्टर राईड असणारे. पण ही खिडकी मात्र कायमची मनात घर करून बसली आहे.

ह्या खिडकीचं कौतुक मुंबई-पुण्यातील लोकांना कळणार नाही. पण आज ह्या खिडकीत कॉन्फिडन्टली बसता येणं – हे माझं खूप मोठं यश मानतो मी.

८० ते ९० च्या दशकात जन्मून, जालन्यात लहानाचा मोठा झालेल्या माझ्यासारख्या मुलांसाठी ccd-mcd पासून थेट ताज हॉटेलपर्यंतचं सगळं सगळं खूप खूप मोठं, भीतीदायक, अंगावर येणारं असतं.

पहिल्यांदा मॉल बघितला ९ वी नंतर. १० वी च्या व्हॅकेशन कोचिंगसाठी पुण्यात गेलो होतो तेव्हा. SGS Pyramid Mall. मॉलमध्ये पाऊल ठेवलं, तेच दबकत, घाबरत. एसीचा थंड झोत असूनही घाम फुटला होता. ग्राऊंड फ्लोअरवरचं फूड कोर्ट आणि त्या भोवती उभे राहिलेले मजले भोवळ आणत होते.

 

franchiseindia.com

सगळीकडे आपल्या कामात दंग असलेले अमेझिंग लोक. हे लोक खरोखर अमेझिंग वाटायचे मला. वाट्टेल तसे कपडे घालून आलेली जोडपी, आपल्याच मस्तीत एकटीच फिरत असलेली म्हातारी…आणि सगळ्यात भारी…मनावर सगळ्यात जास्त ठसलेलं दृश्य –

जबरदस्त attitude असलेला, कॉफीचे घोट पित, हातातलं पुस्तक वाचणारा, सुपर फिट दिसणारा…एक तिशी-पस्तिशीतील तरूण…स्वतंत्र, मुक्त, बेफिकीर.

मॉल मधून बाहेर पडलो तेव्हा भयंकर डिप्रेस झालो होतो. “जगात आपली काहीच लायकी नाही” ह्या भावनेने घट्ट धरून ठेवलं होतं. रडू आवरत होतो. आवंढा गिळत होतो. बाहेर पडताच अगदी विरुद्ध दिशेला एक पुस्तकं विकणारा माणूस दिसला. तिरिमिरीत रस्ता पार केला. एक पुस्तक विकत घेतलं. पुन्हा मॉलमध्ये आलो.

तो तरुण अजूनही तिथेच होता. त्याला बघितलं, तडक कॉफी काऊंटरवर गेलो, हिम्मत करून तोडक्यामोडक्या इंग्लिशमध्ये कॉफीचा रेट विचारला. महिन्याच्या खर्चाचं गणित केलं. कॉफी घेतली आणि कोपऱ्यात जाऊन बसलो.

कॉफी पित पित पुस्तकाची पानं चाळली. किती वेळ बसलो होतो आठवत नाही. पण तो वेळ अजूनही आठवतो. तेव्हा माझ्याच नकळत ठरवलं होतं, त्या तरुणाचा राग येऊ द्यायचा नाही. त्याला आपलं आयडियल करायचं.

बस्स… हे असं व्हायला जमलं पाहिजे. हा आपला रोल मॉडेल. पुढे खूप खूप वर्षांनी पहिल्यांदा ccd त गेलो तेव्हा हेच असंच घडलं. पहिल्यांदा ताजमध्ये गेलो तेव्हा हाच अनुभव.

तो तिशी पस्तिशीतला तरुण पुढे नेहेमी वेगवेगळ्या रुपात दिसत गेला. अजूनही दिसतो. इनस्पायर करतो.

 

pinterest.com

आज मात्र त्या कॉरिडॉरमधून फिरताना दडपण येत नाही. “आपण अशी रूम बुक करायची!” असं आव्हान स्वतःला देत ती रूम, ती खिडकी, तो अनुभव मनात आपोआप साठवला जातो.

मॉलमध्ये मी वाचलेलं पुस्तक, मी जीवनात वाचलेलं पहिलं इंग्लिश पुस्तक होतं – शिव खेराचं You Can Win. पुढे चेतन भगतच्या 5 point someone ने तर इंग्रजीची भीती कायमचीच घालवली. “जालन्याच्या मराठी पोरासाठीसुद्धा इंग्रजी वाचन भयंकर enjoyable अनुभव असू शकतो” ही जाणीव करून दिली. आज लोक जेव्हा यू कॅन विन आणि चेतन भगतची खिल्ली उडवतात तेव्हा मला इंडिया आणि भारतमधली दरी स्पष्ट दिसते.

शिव खेराने खरंच किती जीवन “बदलले” असतील? कदाचित कुणाचेच नाही, किंवा फारच कमी. पण कितीतरी होपलेस जीवन जगणाऱ्यांना, अत्यंत लो सेल्फ इस्टिम असणाऱ्यांना, त्यांच्या लोवेस्ट पॉइंटला “हा एक दिवस” ढकलण्याची शक्ती नक्कीच दिली असणारे.

चेतन भगतचे अगदीच हेच उपकार व्हर्नक्युलर शिक्षण घेतलेल्यांवर झालेत. हाच भारत आहे, जो इंडियावाले खरंच कधीच ओळखू शकणार नाहीत. आणि ही तक्रार अजिबात नाही. राग-द्वेष तर अजिबातच नाही. इंडियाला भारताची ओळख नाही – हा इंडियाचा दोष नाही. इट्स जस्ट व्हॉट इट इज.

पण ही दरी कमी होतीये असं वाटतं अनेकदा. गेले तीन दिवस ह्या खिडकीत बसलो होतो, तेव्हा समोरच्या समुद्राला हात लावता येईल की काय असं वाटत होतं. अगदीच अशक्य नसावं बहुतेक.

इंडिया भारताच्या आवाक्यात येतोय बहुतेक.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version