आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
असं म्हणतात की, एखादी गोष्ट मिळवायचीच अशी आपण खूणगाठ बांधली तर ती मिळवणं अशक्य नसतं. गरज असते ती केवळ आत्मविश्वासाची आणि जिद्द अंगी बाणवण्याची. कोणत्याही परिस्थितीत निराश न होण्याची आणि अनुभवातून शिकत पुढे जाण्याची. अशाच जिद्द आणि आत्मविश्वासाचे प्रतीक होते भारतीय जलतरणपटू मिहिर सेन.
मिहीर सेन हे एका कॅलेंडर वर्षात पाच वेगवेगळ्या महाद्वीपांमधील सातासमुद्रांत पोहणारे पाहिले भारतीय होते.
१६ नोव्हेंबर १९३० या दिवशी पश्चिम बंगालमध्ये ब्रिटिशकालीन भारतातील पुरुलिया या ठिकाणी एका ब्राह्मण परिवारात मिहीर सेन यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव डॉ. रमेश सेनगुप्ता असून आईचे नाव लीलावती होते. त्यांचे वडील एक फिजीशिअन होते. त्यांचं सुरुवातीचं जीवन हालअपेष्टांनी भरलेलं होतं. अत्यंत खडतर परिस्थितीतून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यांना इंग्लंडमध्ये वकिली शिकण्याची तीव्र इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी खूप मेहनतसुद्धा घेतली.
अखेर त्यांचे इंग्लंडला वकिलीचा अभ्यास करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. वकिलीचा अभ्यास चालू असताना त्यांनी एका महिला जलतरणपटूबद्दल वाचले जिने इंग्लिश खाडी पोहून पार केली होती. ते वाचून ते अत्यंत प्रभावित झाले आणि त्यांनीही असं काहीतरी वेगळं करण्याचा निश्चय केला आणि इथूनच त्यांचा प्रसिद्ध, यशस्वी आणि सर्वोत्कृष्ट जलतरणपटू बनण्याचा प्रवास सुरु झाला.
मिहिर सेन यांनी आपल्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक संकटावर विजय मिळवला आणि एका कॅलेंडर वर्षात पाचही महाद्वीपांमध्ये पोहण्याचा विक्रम केला.
सातासमुद्रांमध्ये पोहण्याचा त्यांचा मूळ हेतू हा राजकीय होता. भारतीयांनी जर एखादी गोष्टं करायची ठरवली तर देशाची तरुण पिढी काय करू शकते हे त्यांना जगाला दाखवून द्यायचे होते आणि आपल्या देशातील युवकांसाठी एक साहसाचा पायंडा पाडायचा होता. आपण कोणापेक्षा कमी नाही हे त्यांना आपल्या युवकांच्या मनात बिंबवायचे होते.
मिहिर सेन यांनी २७ सप्टेंबर १९५८ रोजी १४ तास आणि ४५ मिनिटे पोहून त्यांनी इंग्लिश खाडी पार केली. इंग्लिश खाडी म्हणजे इंग्लंडचा दक्षिण किनारा व फ्रान्सचा उत्तर किनारा यांमधील अटलांटिकचा भाग.
डोव्हरच्या सामुद्रधुनीने ही खाडी उत्तर समुद्राला जोडली गेली आहे. इंग्लिश खाडी पोहून जाणारे मिहीर सेन हे पहिले भारतीय आणि पहिली आशियाई व्यक्ती होते. त्यांच्या या विक्रमामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. मिहिर यांनी १९५५ मध्ये इंग्लिश खाडी पार करण्याचा पहिला प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांनी पुढील चार वर्षांत खाडी पार करण्याचा आठवेळा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी त्यांना अपयश आले. अखेर सप्टेंबर १९५८ ला नवव्या प्रयत्नांत त्यांनी इंग्लिश खाडी ओलांडली.
‘द टेलीग्राफ’ साठी लिहिलेल्या एक लेखात, मिहिर सेन यांची मुलगी सुप्रिया सेन लिहिते की, इंग्लिश खाडी पार केल्यावर माझ्या वडिलांनी म्हटले होते,
“जेव्हा मला माझ्या पावलांखाली जमिनीची जाणीव झाली तेव्हाची माझ्या मनाची स्थिती मी वर्णनच करू शकणार नाही. माझा कंठ दाटून आला होता. आनंदाश्रू माझ्या गालावर ओघळले होते. फक्त मलाच ठाऊक होतं की माझ्या पायाखाली जमिनीचा स्पर्श होईपर्यंत मी कोणकोणत्या दिव्यांना सामोरा गेलो होतो.”
–
“धरणीमाता मला आजइतकी सुरक्षित, इतकी सुंदर यापूर्वी कधीच वाटली नव्हती. हा किनारा म्हणजे एका यात्रेचा अंत होता… एका लांब पल्ल्याच्या एकट्या माणसाच्या तीर्थयात्रेचा अंत… “
या यशानंतर १९५८ मध्ये ते भारतात परतले. इथे येऊन प्रसारमाध्यमांच्या मदतीने त्यांनी विविध उपक्रम हाती घेतले जेणेकरून सर्व भारतीयांना जलतरण मंडळांचा भाग होण्याची संधी मिळेल. त्यांना संपूर्ण जगाला आणि विशेषकरून युरोपला हे दाखवून द्यायचे होते की भारतीय सक्षम आहेत. यासाठीच त्यांना पोहायचं होतं आणि सातही समुद्र जिंकायचे होते.
मिहिर सेन यांची पुढची मोहीम होती, श्रीलंकेतील तलाईमन्नार पासून भारतातील धनुष्कोटी पर्यंतची. ही मोहीम त्यांनी ६ एप्रिल १९६६ ला सुरू करून २५ तास आणि ४४ मिनिटांत पूर्ण केली.
यानंतर मिहिर सेनने २४ ऑगस्ट १९६६ ला ८ तास १ मिनिटांत स्पेन आणि मोरक्को दरम्यान असलेले जिब्राल्टर डार-ई-डेनियल पार केले. जिब्राल्टरची खाडी पोहून पार करणारे मिहिर सेन हे पाहिले आशियाई होते.
१२ सप्टेंबर १९६६ रोजी ते डार्डेनेल्स पोहून गेले. डार्डेनेल्स पार करणारे ते विश्वातील प्रथम व्यक्ती ठरले. डार्डेनेल्स हा प्राकृतिक स्ट्रेट आणि पश्चिमोत्तर तुर्कीमधील आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वपूर्ण जलमार्ग असून यूरोप आणि एशिया यांच्यामधील महाद्वीपीय सीमेचा एक हिस्सा आहे आणि डार्डेनेल्स यूरोपीय तुर्कीपासून एशियाई तुर्की हा प्रदेश वेगळा करते.
यानंतर केवळ नऊ दिवसांनंतर २१ सप्टेंबर ला ते वास्फोरस पोहून गेले.
१९६६ मध्येच मिहिर सेन यांनी पनामा कालव्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचे ७७ किलोमीटरचे अंतर पोहून पार केले. २९ ऑक्टोबर १९६६ रोजी त्यांनी पनामा कालवा पोहायला सुरुवात केली आणि ३१ ऑक्टोबरपर्यंत ३४ तास १५ मिनिटे पाण्यात राहून त्यांनी पनामा कालवा पार केला. पनामा कालवा हा एक मानवनिर्मित जलमार्ग आहे जो पनामामध्ये आहे आणि प्रशांत महासागर आणि कॅरेबियन सागरावरून अटलांटिक महासागराला जोडतो.
१९६६ साली मिहीर सेन हे पोहून प्रत्येक महाद्वीप पार करणारी पहिली व्यक्ती बनले. याच वर्षी त्यांनी अनेक समुद्र पार करून जलतरणातील ५ रेकॉर्डस् केले.
मिहिर सेन यांनी जवळपास ६०० किलोमीटर सागरीक अंतर पोहून पार केले होते. त्यांनी एकाच वर्षात ६ मैल अंतर पोहून जाण्याचा नवीन विक्रम प्रस्थापित केला. पाच महाद्वीपांमधील सातही समुद्र पार करणारे मिहीर सेन हे विश्वातील पहिली व्यक्ती ठरले.
मिहिर सेन यांच्या अशा साहसी कामगिरीमुळे भारत सरकारने १९५९ साली त्यांना ‘पद्मश्री’ प्रदान करून गौरविले आणि १९६७ साली त्यांना ‘पद्मभूषण’ ‘किताब देण्यात आला. याशिवाय ते ‘एक्सप्लोरर्स क्लब ऑफ इंडिया’ चे अध्यक्ष सुद्धा होते. गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांच्या नावाने कित्येक रेकॉर्डस् आहेत. १९६७ मध्ये त्यांना जगातील सातासमुद्रांतील साहसपूर्ण सफरींसाठी बिल्टिज नेहरू ट्रॉफी सुद्धा देण्यात आली.
त्यांनी १९७२ मध्ये एक्सप्लोरर्स क्लबच्या माध्यमातून भारतात बांगलादेशी शरणार्थींना इथे राहायची सोय करून दिली. भारत सरकारच्या आर्थिक मदतीशिवाय, त्यांनी जवळपास ३०० कुटुंबांची सोय केली.
मिहिर सेन यांची शेवटची काही वर्षं कष्टप्रद गेली. त्यांना शेवटच्या काही वर्षांत स्मृतीभ्रंशाने ग्रासले होते. ११ जून, १९९७ रोजी मिहिर सेन यांचा वयाच्या ६७ व्या वर्षी कलकत्त्यामध्ये मृत्यू झाला.
मिहिर सेन हे एक महान भारतीय होते. एक असा माणूस ज्यांनी संकटांशी दोन हात केले, ज्यांनी केवळ स्वतःसाठीच नाही तर देशातील युवकांसाठी मोठी स्वप्नं पहिली आणि अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या. या पडद्याआड गेलेल्या आपल्या देशाच्या नायकाला, त्याच्या जगावेगळ्या देशभक्तीला त्रिवार वंदन.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.