Site icon InMarathi

अख्तरची बॉलिंग, नर्व्हस झालेला सेहवाग, त्यानंतर जिंकणारा पार्थिव…!

sehwag and parthiv inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“तू इतका धडाकेबाज फलंदाज आहेस, एकदिवसीय क्रिकेट सोबतच कसोटी क्रिकेटकडे गर्दी खेचणाऱ्या काही खेळाडूंमध्ये तू आहेस… तुझ्या या धडाकेबाज खेळामुळे तुला थोडा सबुरीचा सल्ला पण दिला जातो, काय सांगशील तुझ्या खेळायच्या पद्धतीबद्दल?

दुरवरून येणाऱ्या तुझ्या ‘फॅन्स’ना खुश करण्यासाठी तू असा धडाकेबाज खेळतोस का?”

या प्रश्नावर,

“मी फक्त स्वतःला आनंद मिळतो म्हणून खेळतो, त्यातून लोकांचं मनोरंजन होतं ही चांगलीच गोष्ट आहे. मी धडाकेबाज खेळतो म्हणून त्यांना माझा खेळ आवडतो, त्यांना आवडतो म्हणून मी खेळत नाही.

शिवाय माझे फॅन्स बऱ्याचदा मैदानावर पोहचेपर्यंत मी बाद झालेला देखील असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी मी खेळतो असं म्हणणं ठीक होणार नाही.”

असं ‘ऑफ-ड्राईव्ह’ उत्तर देणारा फलंदाज तुम्ही एव्हाना ओळखला देखील असेल…वीरेंद्र सेहवाग!!

 

 

धाकड अशी सर्वसामान्य ओळख असलेला हा फलंदाज देखील ‘घाबरतो’ असं जर कुणी तुम्हाला सांगितलं तर? बसेल विश्वास तुमचा?

पण हा गोलंदाजांचा कर्दनकाळ देखील एका गोलंदाजाला घाबरत होता. याचा एक मजेदार किस्सा आहे…..!

किस्सा आहे चौदा वर्षांपूर्वीचा. २००४ साली भारतीय संघ ५ एकदिवसीय सामने आणि ३ कसोटी सामने अशा पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका ३-२ अशी जिंकून भारतीय संघ कसोटी मालिकेत १-१ अशा बरोबरीवर होता.

हे ही वाचा सचिन तेंडुलकरचा सल्ला नाकारून त्या दिवशी विरूने हा इतिहास रचला!

शेवटचा कसोटी सामना महत्वाचा होता. आधीच्या दोन्ही सामन्यांत दुखापतीमुळे खेळू न शकलेला सौरव गांगुली परत संघात आला होता, त्यामुळे आधीच्या दोन्ही सामन्यात सलामीला आलेल्या आकाश चोप्राला बाकावर बसवण्यात आलं.

आता त्याच्या ठिकाणी सलामीला कोण खेळणार हा प्रश्न उभा राहिला. कर्णधाराला नाव सुचलं ‘पार्थिव पटेल’ जेमतेम सतरा वर्षांचा.

समोर शोएब अख्तर, मोहम्मद सामी, फझल-ए-अकबर सारखे गोलंदाज. त्यातल्या त्यात सामी आणि अख्तर सतत १४० (पेक्षाअधिक)किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करणारे.

पार्थिव पटेलच्या पोटात गोळा आला, पण सांगणार कुणाला? तो थेट गांगुली जवळ गेला आणि आपली अडचण सांगितली…

“मला सलामीला नका पाठवू…अख्तरची गोलंदाजी पाहता माझा निभाव लागेल अस वाटत नाही..”

 

 

तो ही गांगुली होता. त्याने नकार दिला, पण पार्थिवच्या एका अटीला मान्यता दिली.

ती म्हणजे ‘जर भारत नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करणार असेल तर मी सलामीला जाईन, पण जर आधी गोलंदाजी करून झाली असेल तर मी सलामीला जाणार नाही.’

यष्टीरक्षक असलेल्या पार्थिवला म्हणायचं होतं, की मी यष्टीरक्षणाने दमून जाईन त्याचा परिणाम फलंदाजीवर होऊ शकतो. गांगुलीने लगेच अट मान्य केली.

भारत नाणेफेक जिंकून खेळपट्टी पाहता गोलंदाजी करायला गेला. पार्थिवला हायस वाटलं. खेळपट्टीच्या मिळणाऱ्या मदतीचा भारतीय गोलंदाजांनी पुरेपूर उपयोग केला.

इरफान-बालाजी-नेहरा या तिकडीने आठ फलंदाजांना माघारी धाडलं. बालाजींने सर्वाधिक ४ बळी घेतले. अशाप्रकारे चहापानापूर्वी पाकिस्तानचा संघ सर्वबाद झाला.

ड्रेसिंग रूमकडे परतत असताना पार्थिवला पाठीमागून एक आवाज आला..

“छोटू तुला सलामीला जायचं आहे”

पार्थिवच्या पोटात पुन्हा गोळा आला…कर्णधाराचं म्हणणं कसं टाळावं हेही कळेना. ते जमणार नव्हतंही. ड्रेसिंगरूम मध्ये सेहवाग फलंदाजीला जाण्याची तयारी करत होता.

 

 

पार्थिवने त्याच्याकडे जाऊन त्यालाही आपली अडचण सांगितली. आपल्या ऐवजी पहिला चेंडू खेळण्याची विनंती केली. सोबतच अख्तर विरोधात सेहवागने जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवावी अशीही विनंती केली.

तोपर्यंत ‘आपण सामन्याच्या पहिल्या चेंडूवर बाद होतो’ त्यामुळे सामन्याचा पहिला चेंडू आपण नाही खेळायचा हे सेहवाग ने ठरवून टाकलं होतं.

दैववादी म्हणा अथवा अंधश्रद्धा म्हणा, पण पहिला चेंडू खेळायला सेहवाग घाबरत होता. बड्या-बड्या गोलंदाजांची पिसे काढणारा सेहवाग ‘पहिल्या चेंडूला’ घाबरत होता.

हे ही वाचा वीरूने ९९ धावांवर षटकार ठोकला; तरीही त्याचं शतक झालं नाही, कारण…

पार्थिवला कळेना, त्याने पुन्हा एकदा सेहवागला विनंती केली. शेवटी सेहवागच तो, त्याने यावेळी होकार दिला. आता पार्थिववर दुहेरी दबाव होता.

एकतर आज तो लवकर बाद झाला असता, तर त्याच्या संघातील जागेवर गदा आली असती. अन दुसरा सेहवाग खरंच पहिल्या चेंडूवर बाद झाला तर? पण तसं काही होणार नाही हे त्याला वाटत होतं.

पहिले षटक टाकायला अख्तर आला… आपल्या दैवावर विश्वास असणारा सेहवाग बिचकतच पहिला चेंडू खेळला आणि यासीर हमीदकडे झेल देऊन बाद झाला.

 

 

भारतीय क्रिकेटच्या नायकांपैकी एक असलेला- जयचा जोडीदार- वीरू…..शोलेचा खलनायक असलेल्या गब्बरचा एक संवाद विसरला….’जो डर गया समझो मर गया’ आणि आपल्या दैवाच्या फेऱ्यात अडकला.

इकडे आता आहे त्या परिस्थितीला तोंड दिलंच पाहिजे म्हणून राहुल द्रविडच्या साथीने पार्थिवने १४१ चेंडूत ६९ धावांची खेळी केली…या खेळीदरम्यान त्याला अख्तरच्या बाऊन्सर्सना तोंड द्यावे लागले.

आधी बिचकत खेळणाऱ्या पार्थिवने द्रविडकडे पाहून आपला खेळ सुधारला. आपल्या भीतीवर मात केली. तर दुसरीकडे सेहवाग आपल्याच भीतीने पराभूत झाला…

===

हे ही वाचा क्रिकेटच्या कित्येक चाहत्यांना कायमस्वरूपी विचारात टाकणारे ५ ऐतिहासिक- वादग्रस्त निर्णय

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version