Site icon InMarathi

भैय्युजी महाराजांबद्दल उथळ पोस्ट करण्याआधी हे वाचा : विश्वंभर चौधरींची अप्रतिम पोस्ट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भय्युजी महाराजांच्या आत्महत्येने अनेकांना विचारात पाडलं आहे. एका अध्यात्मिक व्यक्तीला, जिच्या प्रेरणेने अनेकांना आपल्या जीवनातील समस्यांवर विजय मिळवण्याची शक्ती मिळते, मृत्यूस असं कवटाळावंसं वाटावं हे धक्कादायक आहे. ह्याच कारणामुळे सोशलमिडीयावर अनेकांनी भय्युजी महाराज, अध्यात्मिक लोक, अध्यात्म, समाधी-आत्महत्या इत्यादींवर चर्चा सुरु केली आहे.

काहींनी महाराजांवर खुळचट टिपण्या, शेरेबाजीदेखील केली आहे.

ह्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध विचारवंत, राजकीय विश्लेषक, पर्यावरण व विविध नागरी समस्यांवर कार्य करणारे श्री विश्वंभर चौधरींनी फेसबुकवर एक विचारात पाडणारी पोस्ट लिहिली आहे.

 

श्री विश्वंभर चौधरी

इनमराठी च्या वाचकांसाठी ती पुढे प्रसिद्ध करत आहोत.

===

भैय्यु महाराजांचं कौटुंबिक जीवन, अर्थकारण, धर्मकारण हे सगळं माहित असण्याएवढी माझी त्यांची जवळीक नव्हती. ते संघाशी संबंधित होते की आणखी कोणाशी ते ही मला माहित नाही.

त्यांच्या एकूण पार्श्वभूमीबद्दलही मी फार जाणून नाही. कोणताही दावा मी करणार नाही. त्यांच्या आत्महत्तेची कारणं काळाच्या ओघात लोकांसमोर येतील. त्यावर काही बोलणार नाही.

माझी त्यांची ओळख २०११, फार जुनी नव्हती. तरीही काही निरीक्षणं नोंदवणार आहे.

मला त्यांनी पहिल्यांदा दत्तजयंतीच्या कार्यक्रमाला इंदौरला  केलं तेव्हा मी ते नाकारलं होतं. धार्मिक कार्यक्रमात रस नाही हे स्पष्ट सांगून. भैय्युजी मग स्वतःच माझ्याशी बोलले.

म्हणाले, हा धार्मिक कार्यक्रम नाही. सगळ्या धर्मातील अध्यात्मिक लोक आहेत. सर्वपक्षीय राजकीय नेते आहेत. पत्रकार, समाजसेवक आहेत.

पुण्यातून कोण येतंय असं विचारलं तर म्हणाले बाळासाहेब आंबेडकर, पोपटराव पवार, विजय भटकर. मी येतो म्हणालो.

इंदौरचा कार्यक्रम त्यांनी सांगितलं तसाच होता. धार्मिकतेवर बोलणं नव्हतं, सर्वधर्मीय लोक आपापल्या धर्मातली अध्यात्मिक मांडणी करत होते.

 

livemint.com

मला लोकांनी असं सांगितलं होतं की ते विशिष्ट जातीचे महाराज आहेत पण मला तरी त्यांच्यात कोणताही जातीयवाद कधीच दिसला नाही.

दिल्लीत एक परंपरा आहे. धीरेंद्र ब्रम्हचारी, तांत्रिक चंद्रास्वामी वगैरे. राजकीय कोंडी तर फोडायची असते पण दोन्ही पक्षांच्या मोठ्या नेत्यांना आपापल्या पक्षाचे इगोही सांभाळायचे असतात, आंदोलकांशी थेट न बोलता चर्चा तर सुरू करायची असते तेव्हा हे ‘मध्यस्थ संवादक’ मदतीला घेतले जातात.

भैय्युजी त्यात फिट बसत पण तरीही त्यांनी कधीच राजकीय महात्वाकांक्षा ठेवली नाही.

काॅग्रेस, भाजपा, सेना, राष्ट्रवादी, मनसे अशा सगळ्याच पक्षांत ते वजन ठेऊन होते. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या पुढच्या पिढीतले अनेक तरूण नेते त्यांच्या ऐकण्यातले होते.

भैय्युजी अनेकदा वादग्रस्त ठरले. खरे-खोटे आरोप त्यांच्यावर झाले. राजकीय व्यवस्था मात्र त्यांना टाळत नसे.

मागच्या महिन्यात एबीपी माझावरून मी पाच संतांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिल्याबद्दल शिवराजसिंग सरकारवर कठोर टीका केली. भैय्युजींनी मला फोन केला.

म्हणाले दादासाहेब आपला गैरसमज झाला, सरकारनं दिला पण मी नाकारलाय दर्जा. तुमच्याकडे मुद्दाम खुलासा करून ठेवतोय.

 

bhopalsamachar.com

नुकत्याच झालेल्या नर्मदेच्या आंदोलनात ते सरकारकडून मध्यस्थी करत होते. वाटाघाटी फिसकटल्या. सरकारनं ताईंना अटक केली तेव्हा मी बराच कठोर बोललो भैय्युजींशी. पण माणूस मोठा उमदा होता. मनात काही ठेवत नसत.

वर्षभरापूर्वी अचानक फोनवर म्हणाले, ‘खूप बुडालोय आर्थिकदृष्ट्या या समाजसेवेच्या मागे लागून. स्वतःची जमीन विकून टाकली आत्महत्त्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटूंबांसाठी.

जलसंधारणाचे खूप प्रकल्प हाती घेतलेत पण पैशाअभावी काहीच पुढे जात नाही’ आज मनात आलं की नैराश्याचं हेही एक कारण असेल का?

आज आत्महत्त्येची बातमी आली आणि लगेच सोशल मिडीया सुटला. लोका सांगे ब्रह्मज्ञान वगैरे वगैरे!

नका एवढे कठोर होऊ. डोक्यातल्या केमिकल्सच्या उपद्व्यापातून नैराश्य येतं. ते तपासणार्या डाॅक्टरलाही ते येतं आणि अध्यातमिक व्यक्तीलाही येऊ शकतं.

 

realtimes.in

डिप्रेशन हा एक विकार आहे. कोणालाही होऊ शकतो. जन्मभर लोकांना उपदेश केला वगैरे म्हणणं उथळपणा आहे. जीवशास्त्र, मानसशास्त्र करतं त्याचा उलगडा.

थोडी वाट पाहू. आत्महत्त्या का करावी वाटली ते कळेलच तपासातून. तूर्त आपण जजमेंटल नको होऊया, इतकंच.

===

मूळ पोस्ट इथे क्लिक करून वाचू शकता.

===

केवळ भय्यु महाराजच नव्हे, कुणाच्याही आत्महत्येवरून आपण तर्क-कुतर्क चालवणं किती चुकीचं असू शकतं ह्याची कल्पना चौधरी सरांच्या पोस्टवरून येऊ शकते.

आपण आपल्या दृष्टीने, आपल्या मनःस्थितीच्या अनुशंगाने आत्महत्या केलेल्या माणसाची “चिकित्सा” करणं केवळ चूकच नाही तर त्या मर्त्य व्यक्तीवर अन्याय करणारं देखील ठरू शकेल. “आत्महत्या करणं नाजूक मनाचं लक्षण आहे” हे असं बाहेरून म्हणणं वा त्यामागे नक्कीच काही काळंबेरं असेल अशी शंका व्यक्त करणं फारच अयोग्य आहे.

तेव्हा ह्यापुढे आपण सर्वानीच आत्महत्येच्या घटनांवर उथळपणे व्यक्त होणं टाळूया.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version