आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
इंदोरला संत भय्युजी महाराज यांनी स्वतःला रिव्हॉल्व्हर ने गोळी झाडून आत्महत्या केली. पारिवारिक कलहांमुळे त्यांनी हा मार्ग निवडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
भैय्युजी महाराजांचं मूळ नाव होतं उदयसिंह देशमुख. २९ एप्रिल १९६८ ला मध्य प्रदेशच्या शाजापूर जिल्ह्यातील जमीनदार परिवाराच्या घरी त्यांचा जन्म झाला.
आधी त्यांनी मॉडेल म्हणून ग्लॅमरस जीवन जगलं. सफेद एसयूव्ही मर्सिडीज ही गाडी ते वापरत. अत्यंत वैभवशाली जीवन ते जगत होते. त्यांनि मॉडेल म्हणून सियाराम या प्रसिध्द टेक्सटाइल कंपनीसाठी त्यांनी काम केलं.
ते इतर आध्यात्मिक गुरुपेक्षा वेगळे होते. ते शेतात नांगर चालवत. त्यांना घोडेस्वारी आणि तलवार युद्ध करता येत होतं. मध्य प्रदेशच्या शाजापूर येथे त्यांना दत्तात्रयांची सिद्धी प्राप्त झाली.
पुढे जाऊन महाराष्ट्रात त्यांना राष्ट्रसंत हा दर्जा बहाल करण्यात आला. ते रोज सूर्योपासना करत असत. अनेक तास ते जलसमाधी घेत होते.
भैय्युजी महाराजांचे सासरे महाराष्ट्रात मंत्री होते. त्यांचे विलासराव देशमुख, नितीन गडकरी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, सर्वांसोबत चांगले मैत्रीचे संबंध होते. राजकीय नेत्यांपासून बिझनेस मन सर्वांवर त्यांनी आपली छाप सोडली होती. सर्वांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते.
नरेंद्र मोदींशी देखील भैय्यु महाराजांचे चांगले संबंध होते. नरेंद्र मोदींनी शपथ विधीच्या वेळी त्यांना बोलावले होते व सन्मानीय पाहुण्यांमध्ये ते उपस्थित होते.
पूर्व जेडीयु अध्यक्ष शरद यादव यांनी भैय्यू महाराजांविरुद्ध संसदेत अण्णा हजारेंच्या उपोषणावेळी टीका केली होती. तेव्हा संपूर्ण भारताला शुभ्र वर्णाच्या तलवारबाज आणि घोडेस्वार शूर मराठा अध्यात्मिक गुरुची ओळख झाली. युपीए सरकारच्या मंत्र्याचा सांगण्यावरून सरकार व अण्णा हजारे यांचातील वादात मध्यस्थी करण्यासाठी भैय्यु महाराज उपस्थित होते व बोलणी करत होते.
धर्माच्या मदतीने ते आपले राजकीय हितसंबंध व्यवस्थित जपत होते. त्यांनी त्यांच्या आश्रमाच्या मार्फत अनेक समाजपयोगी कामं केली आहेत. त्यात वेश्याव्यवसाया विरुद्ध दंड त्यांनी थोपटले आहेत.
त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी आजवर ७७०९ मुलींचा विवाह केला आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात त्यांनी शेकडो तलाव निर्माण केले आहेत. त्यांनी १९.३९ लाख वृक्षांची लागवड केली आहे.
लोकांचा लोकशाहीवरील विश्वास जागृत करण्यासाठी संविधानाच्या १५ लाख प्रति त्यांनी लोकांना वाटल्या होत्या. धार्मिक कार्यापेक्षा त्यांचे सामाजिक कार्य जास्त होतं. ते म्हणत धर्माची सेवा व समाजाची सेवा ही एकच आहे.
ते सामाजिक कार्य करत तसेच विविध राजकीय, अराजकीय, धार्मिक, सामाजिक समस्या याविषयावर ब्लॉग लेखन करत असत. स्किझोफ्रेनिया या मानसिक आजारावरही ते अनेक ब्लॉग लेखन करत असत. त्यांच्या मते धार्मिक कार्य करणाऱ्या पुरुषाने माहात्मा होण्याऐवजी स्वयंसेवक होऊन समाज उत्थानासाठी कार्य केलं पाहिजे.
ते म्हणत की मी एकतर माझ्या भक्तांकडून सोने चांदी मागेल नाहीतर त्यांच्याकडे असलेल्या संसाधनांचा वापर त्यांना देशहित व समाजहितासाठी करायला लावेल.
महाराष्ट्र , गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांत भैय्युजी महाराजांचं खूप मोठं प्रस्थ होतं. त्यांचं कार्य सर्वत्र पसरलं होतं. त्यांचे सर्वदूर भक्त होते.
इतर धार्मिक मुनी व संताप्रमाणे त्यांनी कधीच साधनेत वेळ घालवला नाही. त्यांनी त्याऐवजी राजकीय व सामाजिक क्षेत्रात मध्यस्थ म्हणून अनेकवेळा काम केलं आहे. त्यांची लोकप्रियता त्यामुळे सर्वदूर पसरली होती. काँग्रेस व भाजपात सर्वत्र त्यांचे संबंध चांगले असल्यामुळे, चारित्र्य स्वच्छ असल्यामुळे आजवर कोणताही डाग त्यांचा चरित्राला लागला नव्हता.
एक गर्भश्रीमंत मुलगा ते एक आध्यात्मिक गुरू हा त्यांचा प्रवास खूप खडतर होता.
ते असे संत होते ज्यांनी ब्रम्हचार्य नव्हतं स्वीकारलं. त्यांनी २ विवाह केले होते. २०१५ ला त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं. त्यामुळे मुलांच्या काळजीखातर त्यांनी २०१७ ला वयाच्या ४९ व्या वर्षी ग्वाल्हेरच्या डॉ आयुषीसोबत पुनर्विवाह केला.
पुढे मात्र यातून कलह निर्माण होण्यास सुरुवात झाली. या अंतर्गत कौटुंबिक कलहांतुनच त्यांनी शेवटी आपली जीवन यात्रा संपवली. असा अंदाज आहे.
त्यांच्या सामाजिक कार्याला बघून मध्य प्रदेशच्या मुखमंत्र्यांनी त्यांना राज्यमंत्री पद देऊ केलं होतं. पण त्यांनी ते नाकारलं आणि समाज कार्याला स्वतःला वाहून दिलं होतं. पुढे नर्मदा बचावसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीत त्यांना घेण्यात आलं होतं.
भैय्युजी महाराज मागच्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ होते. त्यांचा राजकीय क्षेत्रातील वावर पण कमी झाला होता. अश्यातच त्यांनी केलेली आत्महत्या अनेकांच्या मनाला चटका लावून गेली.
त्यांनी खऱ्या अर्थाने समाज जोडणी व समाज सेवेसाठी कार्य केले. पोथीनिष्ठ न राहता सामाजिक सेवेसाठी स्वतःला वाहून दिलं. मग त्यातुन एक नवं उदाहरण सर्वांसाठी घालून दिलं. अश्या या राष्ट्र संतांचा असा दुर्दैवी अंत नको व्हायला होता, अशी भावना सर्वत्र प्रकट केली जात आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.