अविश्रांत मेहनत घेऊन ‘मानवनिर्मित जंगल’ उभं करणाऱ्या भारताच्या ‘फॉरेस्ट मॅन’ची कथा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
पाच दशकांपूर्वी एक नवयुवक हजारो झाडं पुरात वाहून गेलेली पाहून उद्विग्न झाला. उन्हामध्ये रापुन, सावली नावालाही नसताना “नयी धरती फिर बनेगी” वाक्यावर विश्वास ठेवून, त्याने जंगलसंपत्ती पूर्णपणे नष्ट झालेली असताना आसाममधील मजुली बेटांवर बांबूची झाडे लावण्यापासून सुरुवात केली.
गेल्या बावन्न वर्षांत त्याने जवळपास १४०० एकऱ जमिनीवर एकट्याने जीवापाड मेहनत करून जंगल उभे केले आहे.
ही कहाणी आहे आसाममधील जादव मोलाई पायेंग यांची. आज त्यांनी निर्माण केलेलं हे जंगल ‘मोलाई’ जंगल म्हणून ओळखलं जातं.
मिशिंग जमातीत जन्मलेले जादव पायेंग हे मूळचे जोरहाट (आसाम) येथील रहिवासी. ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी असलेल्या भोगदाई नदीच्या काठावर त्यांचे गाव. याच परिसरात मजुली नावाचे बेट आहे. नदीमधील बेटांमध्ये हे मोठे बेट मानले जाते. १९६५ मध्ये या भागात मोठा पूर आला. बेटावरची जंगलसंपदा वाहून गेली.
जोरहाटच्या परिसरात असलेली सगळी झाडे पुरात नष्ट झाली. त्यानंतर जादव गावाजवळच्या दुसऱ्या बेटावर पोचले. तिथेही सगळे वाहून गेले होते.
हा पूर आला तेव्हा पयंग १६ वर्षांचे होते. गावंच्या गावं उध्वस्त झाली होती. पयंग यांनी पाहिले की जंगल आणि नदी किनारच्या प्रदेशात येणाऱ्या प्रवासी पक्ष्यांची संख्या अचानक कमी झाली होती. घराच्या आसपास दिसणारे सापही दिसेनासे झाले होते. यामुळे ते खूप अस्वस्थ झाले होते.
ते सांगतात, “जेव्हा मी मोठ्या माणसांना विचारलं की जसे साप मरायला लागलेत तसेच आपण पण मरायला लागलो तर आपण काय करायचं ? काही मोठी माणसं माझं बोलणं हसण्यावारी न्यायची. पण मला माझ्या अस्तित्वाची सुद्धा खात्री वाटत नव्हती.”
गाव ओसाड झाल्याचे पाहून त्यांना खूप दुःख झाले. त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. गावातल्या मोठ्या माणसांनी सांगितलं की, जंगल पुरात नष्ट झाल्याने आणि वृक्षतोडीमुळे प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा निवारा नष्ट झालाय.
प्राणी पक्षी जिवंत रहायला हवे असतील तर त्यांचं जंगल त्यांना परत मिळायला हवं. जादव यांना एका ज्येष्ठाने सल्ला दिला की जमीन ओसाड झाल्यामुळे प्राणीपक्ष्यांसाठी काहीच करता येणार नाही, तुला जमले तर झाडे लाव.
याच वाक्यातून जादव पायेंग यांनी ठरविले, आपण नष्ट झालेली झाडे पुन्हा उभी करायची. वरकरणी हे सोपे वाटत असले, तरी झाडे लावणे हे अशक्यप्राय आव्हान होते. तेही वाळवंटात.
परंतु प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर जादव यांची ध्येयपूर्तीकडे वाटचाल सुरू झाली. बांबूची झाडे लावून त्यांनी मजुली बेटावर वृक्षारोपणाची सुरुवात केली.
जेव्हा त्यांनी वन विभागाला वृक्षारोपण करण्याबद्दल सांगितले तेव्हा वनविभागाने म्हटले की एवढंच असेल तर त्यांनी स्वतः जाऊन झाडं लावावीत. मग त्यांनी स्वतःच पुढाकार घेण्याचं ठरवलं. सुरुवात करताना पयंग यांनी ब्रह्मपुत्रा नदीच्या तटावरील ओसाड जमिनीची निवड केली आणि तिथे वृक्षारोपण चालू केले.
त्यांचा दिवस पहाटे साडेतीन वाजता सुरू होई. घरातून उठून रोपटे, बिया घेऊन ते निघत. पाच किलोमीटर पायपीट केल्यानंतर नदी लागे. छोट्या होडीतून नदी पार केल्यानंतर पुन्हा काही किलोमीटर चालल्यानंतर झाडे लावण्याची ठरवलेली जागा येई. झपाटून गेल्यागत ते झाडे लावत. दुपारपर्यंत हे काम आटोपले की पूर्वी लावलेल्या झाडांची देखभाल करून घरी परतत. गेली ५० वर्षे या दिनक्रमात खंड नाही.
इतक्या झाडांना पाणी घालणं ही मोठी समस्या होती. नदीतून पाणी आणून प्रत्येक झाडाला घालणं ही सोपी गोष्टं नव्हती. अशा प्रकारे ते एकटे सगळ्या झाडांना पाणी घालू शकत नव्हते. इतक्या मोठ्या क्षेत्रफळावर त्यांनी झाडे लावली होती की हे काम त्याच्या एकट्याच्या आवाक्याबाहेरचं होतं. त्यांनी यावर उपाय म्हणून काय केले?
तर त्यांनी चक्क बांबूची एक चौकट करून प्रत्येक झाडावर उभी केली. त्यावर पाण्याचा घडा ठेवला. ज्याला छोटी छोटी छिद्रं पाडली होती. त्यातून घड्यातून पाणी हळूहळू झाडांवर ठिबकत असे. एकदा भरून ठेवलेला घडा रिकामा व्हायला आठवडा जाई.
एक एकरचे जंगल वसविण्यासाठी जादव यांना तब्बल पाच वर्षे लागली. परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर त्यांनी जमिनीची विभागणी केली आणि वृक्षारोपण सुरू केले. झाडांनी तग धरावा यासाठी ते विशेष काळजी घेत.
काही झाडांना कीड लागल्याचे त्यांना एकदा लक्षात आले. ही कीड काढण्यासाठी औषधी कुठून आणायची? पण एका झाडाचे निरीक्षण करताना त्यांना असे लक्षात आले की विशिष्ट प्रकारच्या मुंग्या ही कीड खाऊन टाकत आहेत.
जादव यांच्या चाणाक्ष नजरेने ते टिपले आणि दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी दोन पिशव्या सोबत बाळगल्या. एका पिशवीत रोपटे, बिया तर दुसऱ्या पिशवीत मुंग्या. ज्या झाडांना कीड लागली आहे त्या झाडांवर मुंग्या सोडण्याचे काम जादव यांनी केले. त्यामुळे बहुतांश झाडे कीडमुक्त झाली.
१९८० मध्ये, जेव्हा गोलाघाट जिल्ह्याच्या वनविभागाने जनकल्याण उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्य जोरहाट जिल्ह्यापासून ५ किमी दूर अरुणा चापोरी प्रदेशातील २०० हेक्टर जमिनीवर सुरू केले तेव्हा पयंग त्यांच्याबरोबर जोडले गेले. पाच वर्षं चालू असलेल्या त्या अभियानात पयंग ने श्रमिकांसारखे कष्ट घेतले.
अभियान संपल्यानंतर जेव्हा इतर सगळे श्रमिक निघून गेले तेव्हा पयंग यांनी तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. तिथे राहून ते झाडांची निगा राखत आणि त्याचबरोबर नवीन झाडेही लावत. याचा परिणाम म्हणून तो प्रदेश आता एक घनदाट जंगलात परावर्तित झालाय.
द फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया
पाहता पाहता झाडे मोठी झाली. आता हे जंगल बंगाल टायगर, गेंडे, गवे, हजारो हरीणं, हत्ती, माकड, ससे, गिधाडे आणि अनेक प्रजातींच्या पक्षी-प्राण्यांचे निवासस्थान झाले आहे. इथे हजारो वृक्ष आहेत. बांबूचं जंगल साधारण ३०० एकर परिसरात पसरलं आहे. १०० हत्तींचा कळप वर्षातले सहा महिने इथे व्यतीत करतो.
पयंग जादव हे आसाममधील मिशिंग या आदिवासी जमातीचे सदस्य आहेत. यांची पत्नी बिनिता या जोरहाटमधीलच रहिवासी. जादव कुटुंबीयांना दोन मुले, एक मुलगी. मुलगी आणि एक मुलगा जादव यांना वृक्षलागवडीत मदत करतात.
पूर्वी हे कुटुंब भोगदाई नदीच्या दुसऱ्या तीरावर असलेल्या जंगलात झोपडीत राहत होते. आता बाकीचे गावात राहतात. त्यांच्या गोठ्यात गायी आणि म्हशी आहेत. त्यांचं दूध हे त्यांच्या कुटुंबियांचं उदरनिर्वाहाचं एकमात्र साधन आहे. पण जादव मात्र जंगलातच बांबूंच्या झाडावर निवारा करून राहतात. पायात चप्पल न घालता जंगल पालथे घालण्यातही इतक्या वर्षांत बदल झालेला नाही
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या पर्यावरण विज्ञान विभाग २२ एप्रिल २०१२ रोजी पयंग यांना त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी गौरविले. जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या उप-कुलपती सुधीर कुमार सोपोरी यांनी जादव पयंग यांना “फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया” या किताबाने सन्मानित केले.
२०१५ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. पद्मश्री पुरस्काराचा बहुमान मिळाल्यानंतर जादव परदेशात ओळखले जाऊ लागले. आखाती देशातील शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला आसाममध्ये आले होते. अमेरिकेतही जादव यांना बोलावले गेले. एप्रिल २०१६ मध्ये त्यांना जर्मनीला बोलावण्यात आले.
ते सांगतात,
“ माझे काही मित्र इंजिनिअर झालेत आणि आता शहरात राहतात. मी सगळं सोडून जंगलालाच माझं घर मानलंय. आजवर मला विविध पुरस्कार मिळाले. तीच माझी खरी मिळकत आहे. मी स्वतःला या जगातील सगळ्यात सुखी व्यक्ती असल्याचे मानतो.”
देशातील प्राथमिक शाळेत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड लावण्याची सक्ती केली, तर आपली नष्ट झालेली संपदा पुन्हा प्राप्त होईल. नई धरती फिर बनेंगी, असा विश्वास जादव व्यक्त करतात.
ते एकटेच लढले आणि जिंकले सुद्धा. जिथे आपण आपल्या वैयक्तिक सुविधांसाठी बेसुमार झाडांची कत्तल करत चाललो आहोत तिथे ते मात्र जगातील सर्व सुखांचा त्याग करत पर्यावरणाच्या जतन आणि संवर्धनासाठी आपले आयुष्य वेचत आहेत.
देशाला आज अशा लोकांची गरज आहे जी आपलं आयुष्य वसुंधरेचं रूप पालटण्यासाठी अर्पण करतील. खरोखर अशा व्यक्ती दीपस्तंभासारख्या असतात. आपल्या कामाने आसमंत उजळून टाकणाऱ्या. त्यांच्याकडून आपणही प्रेरणा घेऊयात. एक तरी झाड लावूयात.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.