Site icon InMarathi

अर्जुन तेंडुलकरची निवड, आणखी एका एकलव्याचा बळी देऊनच झालीये का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

घराणेशाही किंवा वाशीलबाजीवर आपल्याकडे हल्ली विविध स्तरांवर चर्चा होत असते. मग ती घराणेशाही राजकारणातील असो, चित्रपटसृष्टीतील असो अथवा क्रिकेट सारख्या लोकप्रिय खेळातील. राजकारण, चित्रपट आणि क्रिकेट याबद्दल न बोलणारा सामान्य माणूस आपल्याकडे सापडणं थोडं कठीणच. मध्यंतरी कंगना राणावत या अभिनेत्रीने केलेल्या आरोपांमुळे घराणेशाही/नेपोटीझम वर बरीच चर्चा झाली. अशीच काही चर्चा समाजमाध्यमांवर रंगली आहे.

याला कारण ठरली आहे अर्जुन सचिन तेंडूलकर याची एकोणविस वर्षा खलील भारतीय क्रिकेट संघात श्रीलंका दौऱ्यासाठी झालेली निवड.

अर्जुनची निवड झाल्याची बातमी आल्यानंतर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येणे सुरू झाले. फक्त सचिन चा मुलगा आहे म्हणून निवड झाली इथपासून ते काही लोकांना सगळीकडे फक्त नकारात्मकताच दिसते इथपर्यंत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. सचिन चा मुलगा आहे म्हणून निवड झाली असा आरोप करणाऱ्यांकडे तसा काही पुरावा असण्याची शक्यता कमीच आहे.

मुळात पुराव्याशिवाय बोलायची भारतीय प्रवृत्ती आणि त्यात जर वाद विवाद समाज माध्यमांवर चालणार असतील तर पाहायलाच नको.

 

wionews.com

तेंव्हा असे आरोप फार तर तर्काच्या आधारे किंवा आकस बुद्धीतून होत असतात हे लक्षात घेतले पाहिजे. जेंव्हा एखाद्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी बऱ्याच दिव्यांना पार करावं लागतं आणि इच्छूकांची संख्या ही जास्त असते अशा वेळी त्या क्षेत्राबाहेरील आणि त्या क्षेत्रातील लोक यांच्यात एक सततचा संघर्ष चाललेला असतो. तो अशा स्वरूपात बाहेर पडतो. चित्रपट राजकारण क्रिकेट यांच्या बाबतीत घराणेशाहीची चर्चा होत असते त्याच आणखी एक कारण म्हणजे या क्षेत्रांना असणार झगमगाटाच वलय आणि पैसा.

मध्यंतरी १६ वर्षांखालील झोनल क्रिकेट सामन्यांसाठी संघ निवडीची बातमी आली. त्यात अर्जुन तेंडुलकरची निवड झाल्याचे सांगण्यात आले होते.

अर्जुन आणि शालेय स्तरावर वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम करणाऱ्या प्रणव धनावडे यांच्यातील एकाची निवड करायची होती पण निवड समितीने अर्जुनची निवड केली.

इथे काहींनी प्रणवला आधुनिक एकलव्य म्हणून मोकळे झाले कुणी याला सामाजिक संदर्भ लावून पाहिले. परंतु वय आणि स्थानिक संघ अशा काही तांत्रिक बाबींमुळे अर्जुन १६ वर्षाखालील तर प्रणव १९ वर्षाखालील संघात निवडले गेले. शिवाय अर्जुन फलंदाजी आणि गोलंदाजी करणारा खेळाडू असून, प्रणव सलामीचा फलंदाज आणि यष्टीरक्षक आहे. क्रिकेट मध्ये संघ निवडीचे थोडे निकष जरी माहिती असतील तरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, एकाच जागे साठी समान वैशिष्ट्ये असलेले खेळाडूंचा विचार होतो.

लोकेश राहुल आणि हार्दिक पंड्या यांचा एकाच जागेसाठी विचार होत नसतो. पण अशी कोणतीही शहानिशा करण्या आधीच लोक टीका करून मोकळे झाले.

 

scroll.in

एकीकडे घराणेशाहीची ही चर्चा सुरू असताना काही क्रिकेट प्रेमींना वेगळी चिंता सतावते आहे. अर्जुनची सचिनशी होणारी तुलना. या तुलनेचा अर्जुनच्या खेळावर परिणाम तर होणार नाही ना अशी ती चिंता आहे आणि ती रास्त देखील आहे. आपल्यकडे ‘वडीलांपेक्षा मुलगा सवाई असायला हवा’ असा एक विचार जनमानसात रुजलेला दिसून येतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा येते याचंही भान पुष्कळांना उरत नाही. थोड्याफार फरकाने प्रत्येकाला अशा प्रसंगातून जावं लागतं.

कर्तबगार व्यक्तींच्या मुलांची मात्र चर्चा सार्वजनिक व्यासपीठावर होते. प्रत्येक व्यक्ती हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते अन त्याचा कुठेही अनादर नाही झाला पाहिजे हे आपल्यात भिनवायची अजून गरज आहे.

स्थानिक स्तरावर खेळलेल्या सामन्यांमध्ये अर्जुनने अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्याच आधारावर त्याची निवड झाल्याचं सांगण्यात येत आहे. अशा वेळी मिळालेल्या संधीच तो कशाप्रकारे सोन करतो हे पाहणे औत्सुक्याचे असेल. सुनील गावसकर चा मुलगा रोहन याची भारतीय संघात निवड झाली तेंव्हा अशीच टीका झाली होती. त्याचा खेळ सुनील गावसकरच्या बरोबरीचा नव्हता पण म्हणून त्याला खेळण्याचा अधिकारच नाही का?

पुढे खेळात सातत्य टिकवता आलं नाही आणि संघातील जागा दुसऱ्या कुणी गुणवान खेळाडूला मिळाली. एखाद्याचा खेळ ठीक नाही म्हणून त्याला संघात न घेणे वेगळे. तसेच कुणाचा तरी मुलगा आहे म्हणून संघात खेळावला जातोय, पण त्याचा खेळ जेमतेम आहे अशावेळी विरोध केलाही पाहिजे.

 

hindustantimes.com

खेळात सातत्य नसल्याने संघाबाहेर बसल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. बाकी प्रत्येकाचा प्रवास हा वैयक्तिक असतो त्यामुळे कुणाची कुणाशी तुलना करणे निरर्थक आहे. घराणेशाही/वशिलेबाजी च्या पार्श्वभूमीवर एवढेच म्हणता येईल की संघात निवड होणें हा एक टप्पा आहे. झालेली निवड सार्थ ठरवणे यावर अर्जुनच भवितावय अवलंबून आहे, कारण प्रत्यक्ष मैदानावर त्याला स्वतःलाच उतरायचं आहे, तिथे मदतीला सचिन असणार नाही ना आणखी कुणी….शिवाय अपेक्षांचं ओझं.

अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून न जाता त्यावर मात करून उभा राहणारा अवलिया त्याने घरातच पाहिलेला असल्याने, त्याचीही कारकीर्द यशस्वी व्हावी याच शुभेच्छा…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version