आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
बॉल पोइंट पेनचा शोध हा विज्ञान जगतात कुठल्या क्रांतीपेक्षा कमी नव्हता.
आज लिहिण्यासाठी आपण ज्या बॉल पेनचा वापर करतो, तो जगातील सर्वाधिक वापरला जाणारा पेन आहे. पण आधीच्या काळी तर शाई किंवा फाउंटन पेन वापरला जायचा.
मग ह्या बॉल पोइंट पेनचा शोध कधी लागला आणि तो कोणी लावला?
तर ह्या बॉल पोइंट पेनचा शोध जवळपास ८ दशकांआधी लागला.
१९३१ साली बॉल पोइंट पेनचा शोध लागला आणि ह्याचे जनक होते लेडिस्लाओ जोस बिरो, ज्यांना “लाजिओ जोसेफ बिरो” ह्या नावाने ओळखले जाते.
ह्यांच्याच नावावर ह्या पेनला “बिरो पेन” असे नाव देण्यात आले होते.
जोस बिरो हे मुळचे हंगेरी च्या बुडापेस्ट शहरातील. १८९९ साली येथेच त्यांचा जन्म झाला.
जोस बिरो हे व्यवसायाने एक पत्रकार, चित्रकार आणि संशोधक होते.
त्याकाळी फाउंटन पेन मोठ्या प्रमाणावर वापरला जायचा. पण ह्या पेनने लिहिताना त्याच्या शाईचे डाग कागदावर लागायचे. ह्यामुळे बिरो ह्यांना लिहिताना अनेक समस्या समोर येत.
बिरो ह्यांना वाटले की, एखादा असा पेन तयार करावा ज्याची शाई लवकरात लवकर सुकेल आणि लिहिताना कागदावर डाग पडणार नाहीत.
बिरो हे पत्रकार आल्याने त्यांच्या लक्षात आले की वर्तमान पत्राची छपाई करताना ज्या शाईचा वापर केला जातो ती लवकर सुकते आणि त्यामुळे कागदावर डाग देखील पडत नाहीत. त्यानंतर त्यांनी एक प्रयोग करायचं ठरवलं.
त्यांनी एका फाउंटन पेन मध्ये वर्तमान पत्राच्या छपाईसाठी वापरण्यात येणारी शाई टाकली. पण हा प्रयोग अयशस्वी ठरला. कारण ती शाई फाउंटन पेनसाठी खूप जाड होती. त्यामुळे ती फाउंटन पेनच्या निब पर्यंत पोहोचायला खूप वेळ लागत होता.
हा प्रयोग अयशस्वी ठरल्या नंतर त्यांनी आणखी एक प्रयोग केला. ह्यावेळी त्यांनी एक निब बनविली आणि त्यावर शाईची एक पातळ लेयर लावली आणि त्यानंतर त्या निब्वर एक बॉल बसवला.
जेव्हाही ह्या निबने कागदावर लिहिल्या जायचे तेव्हा त्या निबमधील बॉल फिरायचा आणि कार्टेज मधून शाई घ्यायचा. ह्या प्रयोगात बिरो बॉल पेन बनविण्यात यशस्वी झाले.
पण त्यानंतर बिरो ह्यांना एक अश्याप्रकारची शाई बनविण्याची कल्पना सुचली जी ह्या पेन करिता योग्य असेल. जोस बिरो ह्यांच्या भावाचे एक मेडिकल शॉप होते. त्याच्या मदतीने बिरो ह्यांनी ह्या पेनासाठी योग्य अशी शाई देखील बनविली.
ह्या यशस्वी शोधानंतर ह्या दोन्ही भावंडांनी १५ जुलै १९३८ साली ह्या पेनला “बिरो” ह्या नावाने पेटंट केले.
१९४० साली हंगेरी वर नाझींनी वर्चस्व स्थापन केलं. त्यामुळे अनेकांना हंगेरी सोडावी लागली. बिरो ह्यांना देखील त्यांचा देश सोडवा लागला आणि येथून ते आर्जेन्टिना येथे पोहोचले.
आर्जेन्टिना येथे देखील त्यांनी त्यांच्या बिरो पेनचा खूप प्रचार केला, ह्याचे फायदे लोकांना सांगितले. ह्याच्या परिणामस्वरूप त्यांना ब्रिटन येथील रॉयल एयर फोर्सकडून आपली पहिली ऑर्डर मिळाली.
ह्या संस्थेला हा पेन अतिशय आवडला. कारण फाउंटन पेनच्या तुलनेत बॉल पेन अधिक चांगले हस्ताक्षर देतो आणि उंचीवर अगदी सहज काम करतो. त्यामुळे ह्या संस्थेने दुसऱ्या महायुद्धा दरम्यान जोस बिरो ह्यांना ३० हजार पेन चा ऑर्डर दिला.
आपल्याकडे जरी ह्याला आपण बॉल पेन म्हणत असलो तरी ब्रिटन, आर्यलंड, ऑस्ट्रेलिया आणि इटली सारख्या देशांत ह्याला बिरो पेन म्हणूनच ओळखतात.
असा हा बिरो पेन आज जगभरातील सर्वात जास्त वापरला जाणारा पेन आहे, तसेच हा पेन इतर पेनच्या तुलनेत अधिक स्वस्त दरात उपलब्ध असल्याने कोणालाही सहज घेणे शक्य आहे.
आपल्याला त्या शाई सोडणाऱ्या आणि किचकट फाउंटन पेनपासून मुक्त करत बॉल पेनचा नजराणा देणाऱ्या त्या जोस बिरो ह्यांचे खूप खूप आभार…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.