हे आहेत जगातले सर्वात भयानक आणि धोकादायक ‘जागृत’ ज्वालामुखी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
ज्वालामुखी हे रामायणातील त्या कुंभकर्णाप्रमाणे आहेत, जो जोवर झोपला आहे तोवर सर्व शांत आहे, पण एकदा का तो जागा झाला तर सगळीकडे हाहाकार माजेल.
जगात अनेक असे ज्वालामुखी आहेत, जे जर कधी जागृत झाले किंवा त्यांतून उद्रेक झाला तर त्यापासून पृथ्वीला कोणीही वाचवू शकणार नाही.
ज्वालामुखी उद्रेकाचे उदाहरण म्हणजे ग्वाटेमाला येथे झालेला ज्वालामुखी विस्फोट. ह्या घटनेत ७५ लोकांचा मृत्यू झाला होता २०० हून जास्त लोक बेपत्ता होते. ह्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जवळपास १७ लाख लोक प्रभावित झाले होते.
आज आपण अश्याच काही सर्वात धोकादायक, भयानक ज्वालामुखींबाबत जाणून घेणार आहोत. पण त्याआधी ज्वालामुखी काय असतात ते बघूया.
ज्वालामुखी हे पृथ्वीच्या पृष्ठभागाला पडलेली भेग किंवा नळीसारखे भोक असते ज्यामधून पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील तप्त शिलारस ज्याला मॅग्मा असे म्हणतात, तसेच उष्ण वायू, राख इत्यादी बाहेर पडतात.
सर्वसामान्य ज्वालामुखी क्रियेत मध्यवर्ती नळीच्या वाटे तप्त शिलारस बाहेर येऊन नळीभोवती लाव्हा आणि राख यांची रास साचते व शंकूच्या आकाराचा उंचवटा तयार होत जातो, ज्याला आपण ज्वालामुखी पर्वत म्हणतो.
पोपोकटेपेटल मैक्सिको :
हा ज्वालामुखी जगातील सर्वात सक्रीय ज्वालामुखींपैकी एक आहे, ह्याची उंची ५, ४५२ मीटर एवढी आहे. हा सर्वात सक्रीय ज्वालामुखींमध्ये येत असल्याने ह्याची नेहमीच पाहणी केली जाते.
हा ज्वालामुखी मेक्सिको शहराच्या दक्षिणपूर्व दिशेने ७० किलोमीटरच्या अंतरावर आहे.
जर ह्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर ह्यामुळे २.५ कोटी लोक प्रभावित होऊ शकतात. हा ज्वालामुखी १९९४ साली सक्रीय झाला, ह्यातून राख आणि लावा निघत असतो.
२०१६ साली ह्या ज्वालामुखीतून राखेचा धुवा तीन किलोमीटर उंच उठला होता. तेव्हा प्यूएबला राज्यात अलर्ट जारी करण्यात आले होते.
कोलिमा ज्वालामुखी, मेक्सिको :
हा ज्वालामुखी मेक्सिकोतील सर्वात सक्रीय ज्वालामुखी मानल्या जातो. गेल्या काही वर्षांत ह्या ज्वालामुखीतून वेळोवेळी राख आणि धूर निघताना बघितले गेले आहे.
ह्या ज्वालामुखीची उंची ३,२८० मीटर एवढी आहे.
हा ज्वालामुखी जलिस्को आणि कोलिमा ह्यांच्या सीमेवर आहे. २०१५ आणि २०१६ साल ह्यातून निघणाऱ्या राखेच्या उद्रेकामुळे जवळपासच्या परिसरातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते.
तुरीआल्बा ज्वालामुखी, कोस्टा रिका :
हा ज्वालामुखी कोस्टा रिकाच्या मधोमध आहे. कॅलीफोर्नियाच्या सॅन जोस शहरासून अवघ्या ६० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या ह्या ज्वालामुखीत २०१६ च्या सप्टेंबर महिन्यात एक भानायक स्फोट झाला, ज्यानंतर जवळपासच्या परिसरावर राखेचे ढग दाटून आले होते.
हा स्फोट ह्या ज्वालामुखीचा आजवरचा सर्वात भयानक स्फोट मानला जातो.
तेव्हापासून ह्या ज्वालामुखीतून निरंतर धूर, राख आणि गरम पदार्थांचे उत्सर्जन सुरूच आहे.
ग्लैरस, कोलंबिया :
ग्लैरस ज्वालामुखी हा कोलंबियातील सर्वात सक्रीय ज्वालामुखी मानला जातो. हा ज्वालामुखी नरीनो येथे आहे.
१९९३ साली झालेल्या एका हलक्या स्वरूपाच्या स्फोटात वैज्ञानिकांच्या एका समूहासोबत काही पर्यटकांनाही आपला जीव गमवावा लागला होता. हे सगळेजण ज्वालामुखीच्या क्रेटरच्या आत होते.
गेल्या काही वर्षांत देखील ह्यात लहान-मोठे स्फोट होत आले आहेत.
नेवादो देल रुईज, कोलंबिया :
हा कोलंबियाचा दुसरा सर्वात सक्रीय ज्वालामुखी आहे. कोलंबियाच्या वैज्ञानिकांनुसार, हा ज्वालामुखी निरंतर सक्रीय राहतो आणि राखेचे उत्सर्जन करत असतो.
ह्या ज्वालामुखीची उंची ५,३६४ मीटर एवढी आहे आणि हा ज्वालामुखी कोलंबियाच्या कॉफी क्षेत्रात आहे.
१९८५ साली ह्या ज्वालामुखीत झालेल्या एका स्फोटात २५ हजाराहून जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. हा इतिहासातील सर्वात भयानक ज्वालामुखी स्फोट होता.
कोटोपाक्सी, इक्वाडोर:
कोटोपाक्सी हा ज्वालामुखी इक्वाडोर देशाची राजधानी क्विटो पासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर आहे. ह्या ज्वालामुखीत सर्वात भयानकस्फोट हा १८८७ साली झाला होता.
तर २०१५ साली ह्यातून राखेचा धूर उठू लागला होता. ज्यानंतर देशात अलर्ट जारी करण्यात आला होता. ह्यानंतर ह्या ज्वालामुखीवर नेहमी लक्ष ठेवण्यात आलं.
तुनगुराहुआ, इक्वाडोर :
हा ज्वालामुखी ५,०१९ मीटर उंच आहे आणि हा देखील क्विटो शहराच्या दक्षिण दिशेला १८० किलोमीटरच्या अंतरावर आहे. हा १९९९ सालापासून सक्रीय झाला होता.
उबिनस, पेरू :
हा ज्वालामुखी पेरू येथील सर्वात सक्रीय ज्वालामुखींपैकी एक आहे. ह्यावर देखील निरंतर लक्ष ठेवले जाते. २००६ ते २००९ दरम्यान ह्या ज्वालामुखीत अधिक सक्रियतेची नोंद करण्यात आली होती.
तेव्हा ह्यातून राखेचे ढग उठू लागले होते. तसेच त्यातून निघणारा विषारी वायू परिसरातील हवेत पसरला होता. ह्या ज्वालामुखीजवळ १० लाखाहून जास्त लोक राहतात, तसेच ह्याच्या आजूबाजूला अनेक इमारती देखील आहेत.
विलरिका, चिली :
चिलीमध्ये जवळपास ९५ सक्रीय ज्वालामुखी आहेत. त्यापैकी विलरिका हा ज्वालामुखी १८४७ मीटर उंच आहे. ९५ पैकी हा ज्वालामुखी सर्वात सक्रीय ज्वालामुखी मानला जातो. हा ज्वालामुखी तेथील पर्यटन स्थळांच्या जवळपास असल्याने हे क्षेत्र नेहेमी निरीक्षणाखाली असते.
ह्या ज्वालामुखीमध्ये २०१५ साली उद्रेक झाला होता. ज्यानंतर हवेत १००० मीटर उंच लावा उसळला होता. ह्यावेळी ह्याचा आसपासचा परिसर रिकामा करण्यात आला होता.
कलब्यूको, चिली :
चिली येथील कलब्यूको हा ज्वालामुखी देखील सक्रीय ज्वालामुखींपैकी एक आहे. २०१५ साली ह्या ज्वालामुखीमध्ये स्फोट झाला होता. हे अगदी अचानकपणे घडून आल्याने येथील सरकारनेरेड अलर्ट जारी केला होता.
ज्यानंतर चार हजाराहून जास्त लोकांना तो परिसर सोडावा लागला होता.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.