Site icon InMarathi

ठाकरे शहा भेटीमागील खरं वादळ : मुख्यमंत्री बदलाचे ढग दाटले? : जोशींची तासिका

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखक : अनिरुद्ध जोशी

===

काल मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्या बैठकीचे वार्तांकन माध्यमांनी असे काही केले की क्षणभर वाटले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षच मुंबई दौऱ्यावर आहेत. या बैठकीतल्या मेनू कार्डचा हँगओव्हर जर उतरला असेल तर मुद्द्यांवर येऊ. सर्वांनी “संपर्क फॉर समर्थन” या भेटीचे आकलन आपापल्या पद्धतीने केले. बहुतांश जणांचा सूर आगामी युतीबाबत भेट असा होता.

परंतू विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत “मुख्यमंत्री बदल” हा विषय केंद्रस्थानी होता असे समजते.

 

 

राजकारण म्हणजे पुस्तकातला पाठ नसतो की कोणीतरी लिहलं आणि ते वाचून परीक्षा दिली. राजकारण म्हणजे jigsaw puzzle असतं. त्यात प्रत्येक पदर वेगळा असतो तो आपापल्या तर्कानुसार जोडून बघितला तर नेमकी दशा आणि दिशा समजते. पण, आमचे माध्यमकर्मी बांधव त्यांच्याच चष्म्यातून त्यांना हवं तेच बघतात आणि नेमका घोळ तिथंच होतो. अन् मग अमित शहांना शिरा खाऊ घातला जाणार अशा बातम्या आपल्या माथी मारल्या जातात. असो.

मूळ विषयाकडे वळू. कालचा घटनाक्रम सर्वप्रथम विचारात घेऊ.

संध्याकाळी ७.५० वाजता अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच कारमध्ये मातोश्रीवर पोहोचले. दरम्यान शिवसेनेच्या मंत्र्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची उद्धव ठाकरेंकडे तक्रार केल्यामुळे दानवेंना ‘मातोश्री’वर प्रवेश नाकारला गेला असे सेना नेत्यांनीच माध्यमांत सांगितले.

रात्री सव्वा आठच्या सुमारास उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात बैठक सुरू झाली ती साडे नऊच्या सुमारास संपली. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूर ठेवण्यात आलं होतं.

या आधी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना डावलून शिवसेना सुप्रिमो बाळासाहेब ठाकरे आणि भाजपकडून प्रमोद महाजन हे दोघेच वाटाघाटी करताना मातोश्रीने अनुभवलेले आहे, अनेक वर्षांनी याची काल पुनरावृत्ती झाली.

खरं पाणी इथे मुरतंय.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मातोश्रीवर येतात आणि त्या बैठकीत भाजपकडून राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांना दूर ठेवले जाते तर दुसरीकडे स्वतःला शिवसेनेचे सेनापती समजणारे संजय राऊत देखील कोणालाच कुठे दिसले नाहीत यातच सारं काही आलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पावणे चार वर्षांच्या काळात अनेक कठीण गोष्टी भाजपला साध्य करून दिल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका असो किंवा ग्रामपंचायत निवडणूक त्यांनी भाजपला प्रथम स्थान मिळवून दिले. मात्र, यात सतत सेनेची घुसमट वाढत गेली. तसेच मंत्रिमंडळात सध्या प्रत्येक मंत्री फडणवीसांना दबकून आहे.

सुधीर मुनगंटीवार यांचा अपवाद वगळता भाजपच्या कोअर कमिटीमधले प्रत्येकजण अडचणीत आले आणि त्यांना संकटमोचक म्हणून मुख्यमंत्री समोर आले. यातून प्रत्येकाला त्यांच्याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. तसेच दलित, अल्पसंख्यांक समुदायात देवेंद्र यांचा चेहरा घेऊन विधानसभेला सामोरे जाणे भाजपला धोकादायक ठरू शकते.

या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बदलाचे ढग दाटले आहेत असे म्हणावे लागेल. यात कदाचित विनोद तावडेंची बंपर लॉटरी लागू शकते.

 

शिवसेनेला स्वतःचे डोके वापरणारा मुख्यमंत्री नकोय आणि त्या निकषात तावडे फिट बसतात. उलटपक्षी तावडे काही प्रमाणात भाजपसाठी खड्डे खोदतील ज्याचा फायदा शिवसेनेला निश्चित होऊ शकतो.

आगामी लोकसभा निवडणुकीत निवडणूकपूर्व युती होणार नाही. मात्र मैत्रीपूर्ण लढतीसारखा नवा प्रयोग केला जाऊ शकतो. ज्यात भाजप आणि सेना एकमेकांना फायदा होईल अशा जागा सोडतील, काही ठिकाणी एकमेकांना पूरक म्हणून कमजोर उमेदवार दिले जातील.

अमित शहा हे टार्गेट मॅन आहेत. त्यांचं आता एकच ध्येय आहे की २०१९ मध्ये सत्ता पुन्हा काबीज करायची.

सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरेंना अमित शहांचा फोन जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंचे बोलणे झाले. यात देवेंद्र यांनी स्पष्ट केले होते की बैठकीत सकारात्मक चर्चा अपेक्षित असेल तर संजय राऊतांना दूर ठेवावे. असे म्हणतात कीआदित्य ठाकरेंनी होकार भरला पण एका अटीवर “केंद्रात तुम्ही पण राज्यात सेना मोठा भाऊ म्हणून पुन्हा आपले स्थान बळकट करेल”.

रोज नवनवीन प्रश्न उपस्थित होतात आणि ते निस्तरता निस्तरता नाकी नऊ येते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःच केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणून जाण्यास इच्छूक आहेत असे म्हणतात. तसेच गृहमंत्री म्हणून त्यांची कामगिरीदेखील सुमार आहे.

केंद्राच्या मर्जीतले चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेले देवेंद्र भंडारा-गोंदिया गमावल्यानंतर थोडेसे डळमळीत अवस्थेत गेले आहेत. युती पार्ट वनमध्ये जसे मनोहर पंतांना हटवून नारायण राणेंना मुख्यमंत्री पद मिळाले तसेच आगामी काळात घडले आणि मुख्यमंत्री बदलले तर आश्चर्य वाटणार नाही.

विराम देता देता…

पूर्वी घोडदळात जो घोडा पळत नाही त्याला पळवीण्याचे काम जी व्यक्ती करत असे तिला “राऊत” म्हणत. जर राऊत बरोबर नसेल तर घोडा ऐनवेळी दगा देत असे. अगदी त्याप्रमाणे शिवसेनेसारखा चलनी घोडा संजय राऊतांनी अक्षरशः बसवला.

संजय राऊतांनी आजवर शिवसेनेचे यथेच्छ नुकसान केले आहे. शिवसेनेत एक व्यक्ती एक पद यासाठी आदित्य ठाकरे आग्रही आहेत. त्यामुळे कदाचित संजय राऊतांची ही राज्यसभा शेवटची ठरू शकते. तसेच संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेस धार्जिणे आहेत अशी चर्चा शिवसैनिकच दबक्या आवाजात करत असतात.

नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत दस्तुरखुद्द उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना “मला जागा जिंकायच्या आहेत तेव्हा निवडणूक प्रक्रियेतून दूर रहा” असे आदेश दिले होते असे म्हणतात. तसेच कालही संजय राऊतांना हेतुपुरस्सर दूर ठेवले गेले.

सध्या उद्धव ठाकरेंच्या जवळ एक राऊतच आहेत. पण ते संजय नसून भरतकुमार राऊत. उद्धव ठाकरेंनीसुद्धा संजय राऊतांना पूर्णपणे दूर ठेऊन भरतकुमार राऊतांचे ऐकणे कधीही शिवसेनेसाठी हितावह असेल.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version