Site icon InMarathi

शेतकरी संपाचं भयाण वास्तव

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

गेली साठ वर्षे तुमचा आमचा बाप रोज थोडं थोडं मारतोय. आता संपाचं हत्यार उपसलं तेव्हा राजकीय दुकान डागडुजी करण्यासाठी दरोडेखोर तथाकथित नेते रस्त्यावर शेतकऱ्यांचा कळवळा घेऊ पाहताहेत.

भावांनो, हा एल्गार केवळ मोदींच्या आणि फडणवीस किंवा भाजपाच्या विरोधात नाहीये.

 

deshdoot.com

गेली साठ वर्षे ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने माझ्या शेतकरी बांधवांना मातीमोल केलं त्याचं पाप आहे. गावागावातील विविध विकास सोसायट्या आघाडीच्या हातात होत्या. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि गावपातळीपासून राज्यपातळी पर्यंत सर्व व्यवस्था ज्यांच्या हातात होती त्यांनी बळीराजाचे शोषण केलं.

पंचायत समित्यात शेततळी योजना आली की ती आपल्या कार्यकर्त्यांना नाहीतर मग आपल्याच घशात घालायची. नवीन बी बियाणं, युरिया आला की आपल्याच मालकीचा करायचा. गावातील विकास सोसायट्यावर सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व मिळवलं आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं.

 

mahamtb.com

तू कुणाचा कार्यकर्ता आहे हे बघून सोसायटीचे कर्ज आणि लाभ देण्याची लाजिरवाणी पद्धत आघाडीने रुजवली. समस्थ कारखानदारी आणि साखरसाम्राट हाताशी धरून जागोजाग शेतकऱ्यांना दुर्लक्षित केलं.

आज शेतकरी संपावर गेला हा रोष त्याच सरकारचा आहे ज्यांनी 60 वर्षे सत्ता उपभोगली पण शेतकऱ्यांना एकही सुखाचा घास घेऊ दिला नाही.

आता शेतकरी कर्जमाफी मागतोय त्यावर अनेकजण म्हणतात शरद पवारांनी कर्जमाफी दिली. सोबत बंधूंनो हेही सांगा किती जिल्हा मध्यवर्ती बँका त्यानंतर सावरल्या? किती शेतकऱ्यांचे कर्ज फिटले? किती शेतकरी समृद्ध झाले? किती जणांना आत्महत्येपासून मुक्ती मिळाली? समोर घोषणा एक करायची आणि मागच्या दारांनी घरं भरून घ्यायची हे ६० वर्षात केलं गेलं.

आजपर्यंत टोमॅटोला भाव नाही म्हणून रानात सडून गेली. कांद्याला भाव नाही म्हणून कांद्याची माती झाली. मिरच्यांची उभी शेती मातीमोल झाली. भेंडी, गवार जनावरांना घालावी लागली. यावेळी बापानं शब्दही उच्चारला नाही म्हणून सरकारही गप्प आणि शोषण सुरूच होतं. आत्ता भाजीपाला, फळे, दूध वाटोळं होतंय म्हणणाऱ्यांनो शेतात ६० वर्षे बाप असा झिजला, मार्केटमध्ये असाच माल टाकून आला, रातरात डोळा लागला नाही. आत्ता तोच माल रस्त्यावर टाकला कारण सरकारला जाग यावी म्हणून.

 

youtube.com

रात्री झोपताना दरवाजा व्यवस्थित बंद करून पैशाची रास लावणाऱ्यांनो एकदा कशाचाही विचार न करता पैशे काळ्या मातीत पुरण्याचं धाडस करा. हाताशी आलेलं पीक पोटच्या वयात आलेल्या पोरींसारखं सांभाळावं लागतं आणि त्यानंतरही हमीभाव मिळत नाही. एकदा विचार करून बघा.

भारतीय जनता पार्टीला गोत्यात आणण्यासाठी हे कारस्थान आहे, अशी नवीन टिमकी सुरू झाली. माझ्या मते भाजपा सरकारने जे ३ वर्षात केले ते ६० वर्षात काँग्रेसने नक्कीच केले नाही मात्र विरोधी पक्षात असताना भाजपा ज्या तोऱ्यात बोलत होती त्या पद्धतीने काम दिसत नाही. शेतकऱ्यांना हवा असलेला मदतीचा हात मिळत नाही, सदाभाऊ त्यासाठी हिजडवाद करत होते त्यात आता ठोस निर्णय घेऊ शकत नाहीत. आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे सहकार आणि सर्वच बुरुज खिळखिळी झाले तेव्हा अच्छे दिन येण्याची वाट शेतकरी पाहताहेत. दिल्लीपासून गल्लीपर्यंत थेट योजना मिळाली पाहिजे हा एक ध्यास आहे.

आज रस्त्यावर न येता शेतकरी अहिंसा मार्गाने संप करताहेत मात्र त्यांच्या आडून राजकीय पोळी भाजली जातीय का हाही सवाल समोर आहे. जर असं काही घडत असेल तर हे भयानक आहे.

बांधवांनो, जनतेने उभारलेला आणि प्रचंड जनमत पाठीशी असणारा हा लढा आहे दरोडेखोरांना याचा फायदा घेऊ देऊ नका. नाही तर मग पुन्हा “सौ चुहे खा कर बिल्ली चली हज” अशी स्थिती व्हायची आणि जनमत ढळणार नाही अशा पद्धतीने आपला लढा सुरू ठेवा. सरकार नक्कीच आपल्याला योग्य तो न्याय देईल अशी अपेक्षा आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version