Site icon InMarathi

मासिक पाळीसाठी गावोगाव भांडत हिंडणाऱ्या एका ग्रामीण योध्याची कथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मासिक पाळी म्हणजे चारचौघात न बोलण्याचा विषय. त्यामुळे पाळीविषयी खुलेआम चर्चाच होत नाही. केमिस्टकडे सॅनिटरी नॅपकिन्स दबक्या आवाजात मागितले जातात.

केमिस्टवालाही ते कागदात गुंडाळून देणार किंवा काळ्या पिशवीत, वस्तू निषिद्ध असल्याची खूण म्हणून. कशाला हवी एवढी लपवा-छपवी? शहरातसुद्धा ही परिस्थिती म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे.

मासिक पाळी सुरू होणं म्हणजे दर महिन्याला महिलांच्या गर्भाशयात पेशी आणि रक्तवाहिन्यांचं एक अस्तर तयार होणं.

आपण सर्वजण जन्माला आलो आहोत ते या अस्तराच्या कृपेमुळेच आणि तरीही त्यालाच आपण अपवित्र, अशुद्ध आणि विटाळ मानतो. नैसर्गिक क्रियेचा आपण एवढा बाऊ का करावा?

ज्या गोष्टीमुळे स्त्रीला मातृत्व लाभलं, त्याच काळात तिला अशी वागणूक का द्यावी? परमेश्वरानंच जग निर्माण केलं असं आपण म्हणतो तर त्याच जगातली इतकी महत्त्वाची बाब त्याने अस्पृश्य ठरवली असं कसं होईल?

देव जर सर्वव्यापी असेल तर त्याला मासिक पाळीच्या काळातील महिलांचा स्पर्श कसा टाळता येऊ शकतो? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि अनुत्तरित राहतात.

 

 

खेडेगावांमध्ये तर याहून भयानक परिस्थिती आहे. आधीच पाळीसंदर्भात बुरसटलेले विचार, त्यात स्वच्छतेचा तर खूप मोठा प्रश्न. मासिक पाळी विषयातलं अज्ञान आणि स्वच्छतेसंदर्भात माहिती नसल्यानं अनेक महिलांना इन्फेक्शन होतं.

अनेक महिलांना योनीमध्ये जंतुसंसर्ग, गर्भाशयाचे आजार होतात. ग्रामीण भागात आजही महिला त्या चार दिवसात कापडच वापरतात. एकच कापड धुवून पुन्हा पुन्हा वापरलं जातं. ते कापड कुठेतरी मग अंधारात किंवा कपड्याच्या आत दडवून ठेवलं जातं.

तेच कापड पुन्हा पुन्हा वापरुन त्यातून महिलांना जंतूसंसर्ग होतो. पण लक्षात कोण घेतो?

पण अशा परिस्थितीत सुद्धा काही माणसं आपल्याला जे योग्य वाटतं ते लोकांच्या मनावर बिंबवायचं काम चोखपणे करत असतात. त्यांच्यातलीच ही एक व्यक्ती म्हणजे खौराही गावचा सरपंच. याने शहरातली माणसं सुद्धा ज्या बाबतीत चाचपडतील असं काम करून दाखवलं आणि बनला खौराही गावाचा पॅडमॅन.

उत्तर प्रदेश सरकारच्या आकडेवारीनुसार देशातील २८ लाख मुली मासिक पाळीच्या दरम्यान शाळेत जाणं सोडून देतात. उत्तर प्रदेशात साठ टक्के मुली मासिक पाळीदरम्यान शाळेत जायचं सोडतात आणि जवळपास १९ लाख मुली अर्ध्यावरच शिक्षण सोडतात.

 

 

हीच गोष्टं जेव्हा उत्तरप्रदेशातील खौराही गावातील ममता आणि प्रमिला आणि त्यांच्यासारख्या खेड्यातील इतर मुलींबद्दल घडली तेव्हा ही गोष्ट गावचे सरपंच हरी प्रसाद यांच्या नजरेत खुपली.

हरी प्रसाद यांना मुलींचं शिक्षण हे मासिक पाळीमुळे किंवा त्याच्याशी जोडलेल्या अंधश्रद्धांमुळे बंद व्हावे हे मान्यच नव्हते. त्यामुळे त्यांनी या समस्येविरुद्ध आपल्या गावात एक मोहीम सुरू केली.

हरी प्रसाद यांचं असं म्हणणं होतं की ज्याला जीवनाचा आधार मानले जाते त्याची मुलींना लाज वाटते ही खूप खेदकारक गोष्ट आहे.

हरी प्रसाद यांनी घरोघरी जाऊन मुलींच्या पालकांना भेटून त्यांचे मासिक पाळीबद्दल असलेले गैरसमज दूर केले आणि त्यांना सांगितले की जर मुलींना आणि महिलांना मासिक पाळीच आली नाही तर कोणाचा जन्मच होणार नाही.

मासिक पाळी ही गर्भधारणेसाठी अत्यंत आवश्यक गोष्टं आहे आणि ही नैसर्गिक गोष्टं आहे. त्यात लाज वाटण्यासारखं किंवा अपराधी वाटण्यासारखं काही नाही.

इतकंच नाही तर त्यांनी मुलींना काउन्सिलिंगनंतर सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून दिले. ते कसे वापरायचे, त्यांची विल्हेवाट कशी लावायची हे सांगितले. काउन्सिलिंगमध्ये मुलींना मासिक पाळीदरम्यान जी स्वच्छता पाळणे गरजेचे असते त्याबद्दल सांगितले गेले.

त्यांच्या या कष्टाचे चीज तेव्हा झाले जेव्हा ते या कामामुळे यूनिसेफच्या प्रोजेक्ट ‘गरिमा’शी जोडले गेले. या प्रकल्पाच्या अंतर्गत मिर्झापूर, जौनपूर आणि सोनभद्र या गावातील बायकांना आणि वयात आलेल्या मुलींना मासिक पाळीबद्दल जागरूक केले गेले. त्यांच्या या क्रियाशील दृष्टिकोनामुळे त्यांना पॅडमॅन या नावाने संबोधले जाऊ लागले.

 

 

यांच्याकडून प्रेरणा घेऊन जर भारतातील सर्व खेड्यापाड्यांतील सरपंच आणि उपसरपंचांनी काम केले तर मासिक पाळीसारख्या सध्या अस्पृश्य मानला जाणाऱ्या विषयाची पुरेशा गांभीर्याने दखल घेतली जाईल आणि तिच्या माथी लागलेला कलंक कायमचा पुसला जाईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version