' सौ अमृता फडणवीस वैनी…तुमचा मनुवादी कावा आम्ही ओळखला आहे – InMarathi

सौ अमृता फडणवीस वैनी…तुमचा मनुवादी कावा आम्ही ओळखला आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

एकविसाव्या शतकात भारतासमोर सर्वात मोठं कुठलं संकट असेल तर ते आहे मनुवादाचं. भारतातील समस्त विचारवंत मंडळींना अशी भीती वाटते की काही संघटना, काही मूठभर टोळकी मिळून देशाला अतिशय प्रतिगामी करून टाकणार आहेत.

इतकं प्रतिगामी की स्त्रियांना मोकळा श्वास घेता येणार नाही. त्यांना हवे ते कपडे घालता येणार नाहीत. त्यांना घराबाहेर हवं तेव्हा पडता येणार नाही. नोकरी व्यवसाय करता येणार नाही.

आमचे प्रिय विचारवंत नेहेमी ह्यासाठी मनुस्मृतीस जबाबदार धरतात.

 

manusmruti inmarathi

 

रस्त्यावर जेव्हा एखादी स्त्री सुसाट वेगाने गाडी पुढे दामटते, पुढे जाताना पुरुषांना ओव्हरटेक करते, ते पाहून एखाद्या पुरुषाच्या मनात तीव्र द्वेष निर्माण होतो – तेव्हा त्यास मनुस्मृती जबाबदार असते.

– असं आमचे एक आवडते विचारवंत संधी मिळेल तेव्हा म्हणत असतात. त्यांना विचारावंसं वाटतं की ह्या माणसाने मनूचं नावच तुमच्या सारख्यांच्या तोंडून ऐकलं असणार टीव्ही डिबेट्समध्ये. किंवा वृत्तपत्रीय वैचारिक घुसळणीत. एरवी कोण मनु नि कुठली मनुस्मृती हा प्रश्नदेखील विचारला जात नाही सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात.

पण आमचे हुशार विचारवंत कधी चुकू शकत नाहीत. ईश्वराचे अवतारच जणू – असं म्हटलं असतं – पण त्यांना अश्या उपमा आवडत नाहीत.

ते असो, मुद्दा हा की विचारवंत म्हणताहेत म्हणजे हा मनुवाद खरंच असणार. एवढंच नाही, प्रतिगामी ब्राह्मणवादी संघटना नेहेमीप्रमाणे आपला कावा वापरून जगापासून त्यांच्या चाली लपवून ठेवतील ह्याची पण आम्हाला शंका आहे.

आणि ही शंका नुकतीच खरी ठरली.

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांच्या पत्नी, सौ अमृता फडणवीस (ह्यापुढे फक्त “वैनी”) ह्यांनी आपला मनुवादी कावा वापरून जगासमोर भारत किती पुढारलेला देश आहे हे दाखवण्याचा प्रयत्न नुकताच केला.

निमित्त होतं जागतिक पर्यावरण दिनाचं.

५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.

ह्या दिवशी विविध सामाजिक संघटना पर्यावरणासमोरील संकटांबद्दल चर्चा घडवून आणतात.

अवेअरनेस कॅम्पेन्स चालवतात. अनेक ठिकाणी वृक्षारोपण केलं जातं.

पण महाराष्ट्राच्या पुरोगामी वर्तुळात वेगळीच खळबळ, ह्यावेळी, मनुवादी वैनींनी उडवून दिली.

वैनींनी ह्या ५ जूनला, पुरोगामी वेष परिधान करून फेसबुकवर पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

 

आधीच फडणवीस – त्यात संघी नवरा – त्यात भरीस भर म्हणजे नव्या पेशवाईचा एल्गार : अश्या परिस्थितीत वैनींनी असा पुरोगामी स्त्रीमुक्तीवादी वेष परिधान करणे म्हणजे भयंकरच! शिवाय हा वेष परिधान करून वैनी संदेश कोणता देताहेत? तर पर्यावरण संवर्धनाचा!

दिवाळीत फटाके उडवणाऱ्या आणि होळीत पाण्याची उधळपट्टी करणाऱ्या प्रतिगामी संघटनेच्या सदस्य परिवारात राहून असा संदेश देताच कसा येतो म्हणतो मी?

जोडीला फोटोंमध्ये “हिरवा” रंग उठून दिसतोय. हा तर निव्वळ दांभिकपणा हो. ह्या सर्वांना हिरव्याचं किती वावडं आहे माहिती नाही का?

 

amruta fadnavis environment day inmarathi

 

त्यामुळे, हा असा कावा जेव्हा वैनींनी साधला – तेव्हा समस्त फेसबुकी विश्व पेटून उठलं.

“आम्ही मनुवादी प्रतिगामी नाही आहोत” असं नाटक जर वैनी वठवणार असतील – तर आम्ही प्रत्युत्तर दिल्याशिवाय रहाणार नाही, असा चंग फेसबुकी पुरोगाम्यांनी बांधला.

मग काय…ठिकठिकाणी वैनींचे फोटो शेअर झाले. त्यावर शेलक्या टिपण्या झाल्या. शारीरिक विनोद, अश्लील टोमणे मारून झाले. इतकंच नाही, पुरोगामी विचारांच्या तरूण शोषित-पीडित-वंचितांनी थेट वैनींच्या फेसबुक पोस्टवरच प्रतिगामित्वाचा एल्गार केला!

निस्ता जाळ. बेक्कार धुराळा.

सगळे पुरोगामी चम्पू गम्पू एकत्र आले. आणि “वैनींनी असे कपडे घालाया नको होते” चा सूर आळवू लागले. पण लक्षात घ्या – हा सूर मनापासून अजिबात नाही बरं का! आम्हाला कुणाच्या पेहरावाबद्दल काहीही आक्षेप नसतो. हा फक्त वैनींनी केलेल्या नाटकाचा प्रतिवाद आहे.

तुम्ही पुरोगामी असल्याचं नाटक केलं तर आम्ही प्रतिगामी असल्याचं नाटक वठवू. ध्यानात ठेवा.

तुमच्या संघटनांत स्त्रिया असतात. मुली असतात. त्या मॉडर्न लाईफस्टाईल जगतात. बॉय-कट करतात, टी-शर्ट जीन्स घालतात. फेसबुकवर फोटो टाकतात – सगळं दिसतं आम्हाला. तुमच्या घरी आम्ही कधी आलो, तर बाया बापड्या अगदी मोकळ्या वातावरणात जगताना, हसताना-खेळताना दिसतात आम्हाला.

इतकंच कशाला – देशाची संरक्षण मंत्री म्हणून एक स्त्री निवडली आहे तुम्ही! स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिली स्त्री डिफेन्स मिनिस्टर!

पण हे सगळं नाटक आहे, हे आम्हाला ठाऊक नाही होय? तुम्ही सगळे प्रतिगामीच! काही मोजकेच मूठभर जी बडबड करतात, त्यावरून अख्खी संघटना कशी आहे हे ठरतं.

संघटना जाऊ द्या – त्या रस्त्यावर ओव्हरटेक करणाऱ्या बाईबद्दल, त्या पुरुषाच्या मनात आलेले विचार आम्हास ठाऊक नाहीत, असं वाटतं का तुम्हाला? आम्हाला सगळं माहिती आहे. विवेकी बुद्धिप्रामाण्यवादी पुरोगामी आहोत आम्ही. आम्हाला सगळं बरोबर कळतं.

म्हणूनच तुम्ही प्रतिगामी आहात हे आम्हास पक्कं ठाऊक आहे.

आणि म्हणूनच आम्ही काल – वैनींचा डाव हाणून पाडला.

गलिच्छ शेरेबाजी केली. अश्लील विनोद केले.

तुमचे पेड ट्रोल्स करतात ना असंच? नेहरू गांधींवर, सोनिया-राहुल जींवर किती घाणेरडे जोक्स करता ना?

मग आम्हीपण तुमच्यासारखेच आहोत – हे सिद्ध केलं आम्ही काल!

विचारवंत, सभ्य, विवेकी पुरोगामी आणि पेड ट्रोल्स एकसारखेच आहेत हे आम्ही काल सिद्ध केलं.

 

Facebook trolls.Inmarathi
focusjunior.it

ह्या पुढे पण करत राहू.

जेव्हा जेव्हा तुम्ही पुरोगामी आहात असं दाखवून द्याल, तेव्हा तेव्हा आम्ही मनुवादाचं भूत उभं करू.

तेव्हा, फडणवीस वैनी, लक्षात ठेवा.

तुमचा मनुवादी कावा आम्ही ओळखला आहे. ह्यावेळी जसा हा कावा हाणून पडला, तसाच ह्यापुढेही हाणून पाडू.

जय विवेकवाद

जय सहिष्णुता

जय पुरोगामीत्व

टीप : सदर लेख उपरोधिक आहे.

 

Facebook trolls.Inmarathi1
kinja-img.com

स्वतःला स्त्रीमुक्तीवादी, पुरोगामी म्हणवणाऱ्या लोकांनीच सौ अमृता फडणवीस ह्यांच्या पेहरावावर खालच्या पातळीवरच्या टिपण्या केल्या – त्याचा खरपूस समाचार सदर लेखात घेण्यात आला आहे. तेव्हा, उपरोध समजला नसल्यास, लेख पुन्हा वाचून बघावा.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?