आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
लेखक : गणेश मतकरी
===
काल रात्री मी भावेश जोशी-सुपरहिरो पाहून बाहेर पडत होतो तेव्हा बाजूने एक सरदार आणि त्याची चौदा पंधरा वर्षांची मुलगी चालत होते.
सरदार म्हणाला ‘सुपरहिरो भावेश जोशी …. भावेश जोशी था या भावेश पटेल?’
मुलगी म्हणाली ‘जोशी’
सरदाराने फार गहन प्रश्नाचं उत्तर अखेर सुटल्यासारखी मान डोलावली आणि म्हणाला ‘पुरी पिक्चर देखी, लेकीन समझमे नही आई.’
मुलगी काहीच बोलली नाही. तिला फिल्म समझमे आली असावी असा अंदाज आहे.
हा माणूस सरदार होता असं म्हणणं हे रेशिअल स्टिरिओटायपिंग नाही, कारण तो खरच सरदार होता. आणि समझमे न येण्याचीही काही ही एक केस नाही. अर्धा डझन रिव्ह्यूंनी सिनेमा, त्याचा नायक, यांच्यावर केलेली टिका, ओस पडलेली थिएटर्स आणि प्रेक्षकांचा एकूण निरुत्साह, यातूनही हेच चित्र समोर येतय. मला वाटतं अलीकडे सर्वात वाईट धंदा करणारे सिनेमे खूपच वाईट तरी असतात किंवा खूपच चांगले तरी.
वाईट सिनेमा आपल्या मरणाने मरतात, पण खूप चांगले सिनेमा मारले जातात ते समजून घेण्याची तयारी न दाखवणाऱ्या प्रेक्षकामुळे आणि स्वत:च्या कक्षांमधे अडकून राहिलेल्या समीक्षकांमुळे.
थोडक्यात आणि अनकाॅम्प्लिकेटेड रितीने सांगायचं तर भावेश जोशी उत्तम सिनेमा आहे. हायली रेकमेन्डेड.
भावेश जोशी ही सुपरहिरो फिल्म आहे, पण ती अधिकत: संकल्पनेच्या पातळीवरुन, सुपरहिरो असण्याचा अर्थ अधिक व्यापक स्वरुपात उलगडून पहाणारी त्यामुळे ज्यांना जानरंचं वावडं आहे, त्यांनी तेवढ्याच कारणाने फिल्म टाळू नये. ॲट द सेम टाईम, प्रत्यक्षात सुपरपाॅवर नसलेला व्हिजिलान्ती प्रकारचा सुपरहिरो, ही काही सुपरहिरो जानरंच्या चहात्यांना नवी गोष्ट नाही.
फॅंटम, झोरो, ते बॅटमॅनपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं क्लासिक सुपरयादीतच सापडतील. Kickass हा ग्राफिक नाॅव्हेलवर आधारीत सिनेमा याच पद्धतीने पण नव्या वातावरणात हिरो काॅन्सेप्टशी खेळणारा होता. भावेश जोशीला किकॲस हे मोठं इन्स्पिरेशन आहे, हे चित्रपटावरुन स्पष्ट आहे. पण तो किकॲसचा रिमेक नाही, किंवा तो मूळ चित्रपटातं अंधानूकरणही करत नाही.
हा चांगला डोळस सिनेमा आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी आणि त्याचे पटकथाकार यांनी हिरो संकल्पनेचा आजचा काळ आणि समाज यांच्याशी जोडून खूप विचार केलाय ज्यातून हा सिनेमा तयार झालाय.
व्हिजुअली चित्रपट डार्क आहे, जे त्याच्या आशयालाही साजेसं आहे. त्यामुळे सिनेमा निओ न्वार वर्गातला आहे असं म्हणणंही योग्य ठरेल. मला त्याचं ओरिजिन स्टोरी म्हणून डेव्हलप होणं आवडलं.
काहींना याचा शेवट ॲब्रप्ट वाटेल, पण मला तो खटकला नाही. इथली नायकाची वाट ही महत्वाची आहे. तो मुक्कामाला पोचणं, याला तितकं महत्व नाही.
आता चित्रपटात काही गोंधळ जरुर आहेत. यातला एक सोपा आणि ऑब्विअस वाटावासा घोळ आहे तो नायकाच्या लुकशी जोडलेला. चित्रपटाच्या एका भागात तो लपूनछपून कारवायांची तयारी करत असताना, आणि तो कोण आहे हे सर्वांना माहीत असतानाही तो आपला चेहरा न लपवता सगळीकडे फिरताना दिसतो. त्याच्या योजनांशी हे विपरीत आहे. तसच त्याचं मार्शल आर्ट्समधे पारंगत होणं आपण चालवून घेऊ, शिवाय त्याचं कम्प्यूटर हॅकींगमधलं स्किलही मान्य करु.
पण कम्प्यूटर्समधे काम करणारा नायक बाईकही तितक्याच हुशारीने डिझाईन करु शकतो हे पटणार नाही. अर्थात यातल्या काही गोष्टी हिरो फाॅर्म्युलाशी जोडून (क्लार्क केन्ट केवळ चष्मा लावून वेगळा मानला जातो, किंवा ब्रूस वेनची तांत्रिक हुशारी दर क्षेत्रात दिसतेच दिसते) माफ करता येतील, पण इथलं वास्तवाशी जोडकाम चांगलं जमलेलं असताना हे पटत नाही.
तरीही अशा काही गोष्टी सोडून देऊन मी चित्रपट चांगला म्हणेन.
अनेकजणांनी हर्षवर्धन कपूरवर टिका केलीय. ती का हे मला कळलं नाही. मी मिर्झ्या पाहिला नव्हता पण इथे मला हा नायक आवडला. त्याचं कॅरेक्टर अन्डरप्लेड असणच आवश्यक आहे, आणि ते तो योग्य रितीने करतो.
भावेशच्या भूमिकेतला प्रियांशू पैयुली, नकारात्मक भूमिकेतला प्रताप फड आणि ग्रे शेड्स आणणारा चिन्मय मांडलेकर, हे लक्षात रहातात.
भावेश जोशीचे शोज काल मराठी सिनेमांचे एरवी कॅन्सल होतात तसे होताना दिसत होते. इतक्या चांगल्या, लोकप्रिय संकल्पना हाताळणाऱ्या आणि महत्वाच्या दिग्दर्शकाच्या फिल्मला एवढा निरुत्साह का हे मला कळण्यापलीकडे आहे.
पहावा की नाही संभ्रमित प्रेक्षकांना हे आवाहन. या वीकेंडला सिनेमा जरुर पहा. तो थिएटर्समधे टिकायला हवा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.