' परमाणु : भारताच्या अण्वस्त्रसज्जतेच्या मोहिमेची सफर घडवणारा रोमांचकारी अनुभव – InMarathi

परमाणु : भारताच्या अण्वस्त्रसज्जतेच्या मोहिमेची सफर घडवणारा रोमांचकारी अनुभव

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

११ मे १९९८. राजस्थानच्या पोखरण वाळवंटात त्या दिवशी अत्यंत थंड वारे वाहत होते. रणरणत्या उन्हात थंडगार लाटांनी सगळीकडे एक थंडीचा रसिला माहौल बनवला होता. त्याचवेळी काही ट्रक आणि बुलडोझर असल्या शांत आणि थंडगार वातावरणात वेगाने एका विवक्षित ठिकाणी खोदल्या गेलेल्या विहीरीजवळ जावू लागले. वातावरणातल्या शांततेला तडा गेला आणि चित्रविचित्र यंत्राचा खडखडाट सुरु झाला. लवकरच त्या विहिरी वाळूंच्या लोटाने बुजवून टाकण्यात आल्या.

इतकेच नव्हे तर विहिरींच्या वर सुद्धा वाळूंचे छोटे असे पर्वत बनवले गेले. त्या वाळूच्या ढिगातून मनगटा एव्हड्या तारा बाहेर आलेल्या होत्या. त्या कशाच्या होत्या याचा अंदाज दूरवर पोखरणवर नजर लावून बसलेल्या अमेरिकेच्या उपग्रहाला येणार तोवर इशारे दिले गेले, काउंट डाऊन सुरु झालं.

पोखरण पासून दूर देशाच्या राजधानी मध्ये भारताच्या पंतप्रधाना बरोबर अमेरिकेचे diplomats चिंतन बैठकीत मग्न होते तोवर पोखरणच्या वाळवंटात सुमारे तीनच्या सुमारास एका प्रचंड स्फोटाचा आवाज ऐकू आला.

 

pokhran-inmarathi
defencelover.in

महाकाय आकाराचा धुराचा लोट आकाशापर्यंत वर उफाळला ज्याच्याकडे नजर लावून बघणं देखील शक्य होत नव्हतं. स्फोट झाल्याच्या सुरक्षित अंतरावर एक सैनिकी वेषातली तुकडी कंट्रोल रूम मध्ये बसून स्फोटाचा अंदाज घेत होती. त्या तुकडी मधील एक माणूस जोरात आपली मुठ त्वेषाने हवेत उचलून ओरडला “catch us if you can”! ( शक्य असेल तर पकडून दाखवा आम्हाला) त्याच्या या वाक्यावर बाकीच्या लोकांनी जोरजोरात हसून त्याला प्रतिसाद दिला. त्यांचं मिशन पुर्णपणे यशस्वी झालेलं होत.

भारताने ११ मे १९९८ ला तीन अणुबॉम्बचे परीक्षण पोखरणच्या वाळवंटात केले. त्याच्यानंतर २ दिवसांनी अजून तशाच प्रकारच्या २ चाचण्या घेण्यात आल्या.

३ दिवसाच्या आत ऑपरेशन शक्ती या नावाने केल्या गेलेल्या केलेल्या ५ ही चाचण्या सफल राहिल्या. या चाचण्या झाल्यानंतर संपूर्ण देशात उल्हासाचे वातावरण होते. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पत्रकार परिषद घेवून त्यामध्ये भारत हा आता अणुशक्ती संपन्न देश आहे अशी घोषणा देखील केली होती. त्यावेळी अशा प्रकारची यशस्वी चाचणी करणारा भारत हा जगातील ६ वा देश बनला होता.

 

nuclearweaponarchive.org

या चाचण्या करण्यापूर्वी भारताने NPT (Non Proliferation treaty) च्या आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या नव्हत्या. NPT चा करार हा अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रांस, चीन या पाच देशात झालेला होता यानुसार अणुबॉम्ब च्या प्रसाराला खीळ घालण्यासाठी या कराराची निर्मिती करण्यात आलेली होती. भारताने या चाचण्या घेतल्यानंतर जगभरात भारताचा डंका वाजला.

या स्फोटांचे एकमेव आश्चर्य हे होते की जगभरातील बारीक सारीक गोष्टीवर नजर ठेवून असणारी अमेरीकेची गुप्तहेर संघटना CIA ला कानोकानी कसलीही खबर लागू न देता ह्या चाचण्या करण्यात आलेल्या होत्या.

स्फोट होण्यापूर्वी CIA संपूर्ण पोखरणच्या वाळवंटावर आपल्या अत्याधुनिक उपग्रहांच्या द्वारे नजर लावून बसलेली असायची. या उपग्रहांच्या नजरेतून सुटून या चाचण्या करण ही अशक्य कोटीतील गोष्ट होती. स्फोट झाल्याच्या दुसऱ्या दिवशी अमेरिकन उपग्रहांनी काढून घेतलेली स्फोटाची छायाचित्रे पाहून अमेरिकन शास्त्रज्ञ विचार करून करून थकले की नक्की अशा कुठल्या मार्गाने आपल्याला चुकवून भारताने हे परीक्षण केले?

५८ सैन्याची रेजिमेंट दिवसरात्र मेहनत करून हे मिशन सिद्धीस नेण्यासाठी झटत होती. या रेजिमेंटचे कमांडंट होते कर्नल गोपाल कौशिक. यांच्या संरक्षणाखालीच भारताने या अणुचाचण्या यशस्वीपणे पार पाडल्या.

या रेजिमेंटवर हे संपूर्ण मिशन गुप्त राखण्याची जबाबदारी दिली गेली होती. ही जबाबदारी या रेजिमेंट ने इतक्या उत्तम रीतीने पार पाडली की भारताची ही यशस्वी अणुचाचणी CIA स्वत:च सगळ्यात मोठ अपयश मानते. अमेरिकेने पोखरण वर नजर ठेवण्यासाठी चार शक्तिशाली उपग्रहा ची अवकाशात स्थापना केली होती आणि तरीही भारतीय वैज्ञानिकानी हा कारनामा करून दाखवला ज्यामुळे अमेरिकेच्या तोंडचे पाणी पळाले.

 

atom-inmarathi
wionews.com

पोखरणवर नजर ठेऊन असलेल्या उपग्रहांबद्दल असं म्हटलं जायचं की जमिनीवर उभ्या असलेल्या भारतीय सैनिकांच्या हातातील घड्याळात दाखवणारी वेळ सुद्धा अचूक टिपण्याची क्षमता त्यांच्या मध्ये होती. पोखरणच्या वाळवंटात असे स्फोट घडवून आणण्यासाठी लागणारी संसाधने खूप कमी होती तरीही भारतीय शास्त्रज्ञानी सुमारे दीड वर्ष पोखरण मध्ये ठाण मांडून ही चाचणी केली.

१९८२, १९९५ आणि १९९७ ला पोखरण च्या वाळवंटात काही छोटे मोठे स्फोट केले गेले होते ज्यावरून अमेरिकेला भारत अशाच कुठल्या तरी मोठ्या मिशन च्या मागे आहे असा अंदाज आलेला होता.

त्याबाबतीत अमेरिकेने इतर देशांची मदत घेवून अशा कुठल्याही चाचण्या न करण्याबाबत भारतावर दबाव ही टाकलेला होता. १९९८ ला चाचणी झाल्यानंतर भारतीय सैन्य प्रमुख जनरल व्हीपी मलिक यांचं स्टेटमेंट आलं. ते बोलले होते, “ वर्षानुवर्षे आमच्या भारतीय जवानांनी तप्त रेतीमध्ये जीवाची पर्वा न करता काम केलेलं आहे परंतु याची कसलीही जाहीर वाच्यता आम्हाला कुठे करता येत नव्हती.” DRDO चे वैज्ञानिक डॉ. एपीजे अब्दुल कलाम, आर. चिदम्बरम, डॉ. अनिल काकोडकर हे या चाचण्यांमागाचे यशस्वी सूत्रधार. त्यांच्याबरोबर BARC , ISRO च्या ८० वैज्ञानिकाची फौज या कामासाठी अहोरात्र झटत होती.

भारताच्या या सुवर्ण कामगिरीचा वेध बॉलीवूड ने “परमाणु” च्या रूपाने रुपेरी पडद्यावर नुकताच आणला आहे. जॉन अब्राहम मुख्य सूत्रधाराच्या भूमिकेत असणारा हा चित्रपट जगाच्या पाटावर भारताने नोंदवलेल्या अविस्मरणीय कामगिरीची मर्यादित स्वरूपातली तरीही रंगतदार अशी झलक दाखवतो.

ज्या कथेमध्ये मुळातच नायक, नायिका, प्रेमकहाणी, डान्सबार, आयटम song, मारामारी, swag, रेसर बाईक्स, कार्स, फॉरीन लोकेशन्स असा कुठलाही मालमसाला दाखवता येणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवून चित्रपट बनवला गेला ही क्रांतीकारी गोष्ट मानावी लागेल. एका IAS Officer ला मुख्य भूमिकेत ठेवणे, IAS officer ने अणु चाचणी करण्याचा सीक्रेट फॉर्म्युला बनवणे त्यानुसार त्याने सर्व लोकांची टीम तयार करणे, त्यांना पोखरण मध्ये आणणे या गोष्टी बाळबोध वाटतात पण तरीही खास बॉलीवूड स्टाईलच्या! चालायचंच.

 

parmanu-inmarathi
timesofindia.indiatimes.com

मुख्य नायक चित्रपटाचा निर्माता आहे म्हटल्यावर त्याला सूट होईल त्याला शोभेल आणि झेपेल अशी स्टोरी लाईन तयार करून ती प्रेझेंट करणे तरीही चित्रपटाच्या कथेचा आत्मा हरवू न देणे, विषयाचं गांभीर्य घालवू न देणे या मुख्य गोष्टी होत्या त्या या चित्रपटाने चांगल्या पार पाडल्या आहेत. १९५८ साली चीन ने आपला अरुणाचल प्रदेश चा भाग आपल्याकडून जवळजवळ हिसकावून घेतला होता. १९६२ साली चीन बरोबरच्या युद्धात आपला दारूण पराभव झाला आणि १९६४ साली चीन ने आपली पहिली अणुचाचणी यशस्वी करून दाखवली. त्यावेळी संसदेत बोलताना

“Atom bomb is an answer to atom bomb”

हे शब्द अटलबिहारी वाजपेयी यांनी बोलुन दाखवले होते जे चित्रपटात सुरुवातीला जॉन अब्राहम बोलून दाखवतो. आता याला योगायोग म्हणा किंवा predeterminism, ज्या नेत्याने १९६४ साली अणुचाचणी करण्याची गरज बोलून दाखवली होती त्याच नेत्याच्या नेतृत्वाखाली १९९८ ला देशाने यशस्वी अशी अणुचाचणी पार पाडली.

जॉनची व्यक्तिरेखा बघताना सतत डॉ. ए पी जे. अब्दुल कलामांची आठवण होत राहते. उत्तरोतर ज्या पद्धतीने त्याने स्वत:ला एक performer म्हणून ज्या प्रकारे develop करत आणलय त्यासाठी त्याचं खास कौतुक.

बोमन इराणी चा sarcastic manner मधला bureaucrat मस्त! दाद देण्यासारखा. अनुजा साठेची जॉनला साथ उत्तम. डायना पेंटीला भाव खावू भूमिका आणि थोड फार फुटेज सोडलं तर बाकी जास्त काम मिळत नाही. चित्रपटात काही ठिकाणचे प्रसंग पाहताना logic बाजूला ठेवावं लागतं पण असे प्रसंग फार कमी वेळा आलेत. मुख्य फोकस सीक्रेट मिशन भोवती ठेवल्याने रेंगाळलेपण आलेलं नाही.

 

parmanu-story-inmarathi
sites.google.com

चित्रपटाच नावच जेव्हा परमाणु आहे म्हटल्यावर भाषा अत्यंत टेक्निकल, बोजड किंवा क्लिष्ट असणार हे गृहीत धरलं होत तरीही सर्वसामान्य माणसांना चित्रपटाचा इसेन्स लक्षात येईल, विषय समजेल अशा प्रकारचे साधे सुटसुटीत संवाद, राजकीय धोरणाचे एकुणात परिणाम देशाच्या अर्थ आणि सुरक्षा व्यवस्थेवर कसे पडत जातात हे थोडक्यात दाखवण्याचा केलेला प्रयत्न आणि अनेक अडचणींवर मात करून मिशन शेवटपर्यंत कशा रीतीने यशस्वी पार पडले जाते अशी प्रामाणिक कथा बनलेला हा चित्रपट आहे.

चित्रपटात खऱ्याखुऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नेत्यांच्या क्लिप्स वापरल्या आहेत. चित्रपटाच्या पार्श्वभूमीवरवर त्या चपलख बसतात.

CIA चा चीफ जेव्हा पडेल चेहऱ्याने

“आम्हाला भारताच्या या सीक्रेट मिशन ची कसलीही कल्पना आली नाही. आम्ही आमचं अपयश मान्य करतो”

अशा स्वरूपाची जाहीर कबुली देतो, श्री. अटलबिहारी वाजपेयी अत्यंत उत्फुल्ल चेहऱ्याने

“आज ३:४५ च्या सुमारास भारताने पोखरण च्या वाळवंटात तीन अणुचाचण्या यशस्वीपणे पार पाडल्या”

असे सांगतात तेव्हा बॉलीवूड फिक्शन आणि सत्य इतिहास याचं हे बेमालूम मिश्रण मनाला भावण्या इतपत चांगलं बनलेलं असतं.
मला या चित्रपटाच सगळ्यात भावलेलं वैशिष्ट्य म्हणजे ground reality ला हा चित्रपट एक सकारात्मक संदेश देतो. मुळात घडलेली घटना ही सत्य आहे. अभिमानास्पद आहे. ज्या देशात ज्या मातीत जन्मलो त्या मातीच्या लोकांनी मर्यादित तंत्रज्ञान, अत्यंत मर्यादित वेळ आणि आंतरराष्ट्रीय बाजूनी प्रचंड तणाव असताना ही ज्या जीवतोड मेहनतीने हाती घेतलेलं मिशन यशस्वी करून दाखवलं ते पाहत असताना आपण आपल्या मर्यादित परिघात राहून किती क्षुल्लक गोष्टीचे अथवा अपयशाचे भांडवल करत राहतो ही गोष्ट ठळक स्वरुपात जाणवते.

 

parmanu-film-inmarathi
freepressjournal.in

चित्रपट हे समाज परिवर्तनाचं किती मोठ मध्यम बनू शकत ही गोष्ट परमाणु सारखे चित्रपट पुन्हा पुन्हा अधोरेखित करत राहतात. चित्रपटाच्या शेवटी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची तत्कालीन छायाचित्रे पाहताना डोळ्यांच्या कडा ओलावल्या असे अभिप्राय अनेक लोकांनी दिलेले आहेत. हा चित्रपट कदाचित खूप मोठे विक्रमाचे रेकॉर्ड मोडू शकेल का नाही शंका आहे परंतु हर एक भारतीयाला स्वत:च्या गौरवशाली इतिहासाचा हा तुकडा ज्ञात व्हावा, स्मरणात राहावा म्हणून चित्रपटाच्या टीमने जे परिश्रम घेतले आहेत त्याला दाद देण्यासाठी तरी नक्की हा चित्रपट पहिला जावा.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Adv. Anjali Zarkar

Lawyer by profession. belletrist by heart!

anjali-zarkar has 11 posts and counting.See all posts by anjali-zarkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?