आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
इसवी सन १९५३ मध्ये एडमंड हिलरी आणि टेनझिंग नॉर्गे यांनी इतिहास रचला आणि शेरपा समूह पहिल्यांदा उजेडात आला.
एडमंड हिलरी यांच्याबरोबर माऊंट एव्हरेस्टवर पाय ठेवणारी दुसरी व्यक्ती टेनझिंग नॉर्गे ही शेरपा समूहातील व्यक्ती होती. त्यांनी जगातील सर्वोच्च हिमालय पर्वताच्या सर्वोच्च शिखरावर प्रथम पाय ठेवला.
तेव्हापासून ते आजवर ४००० हून अधिक लोकांनी माऊंट एव्हरेस्ट सर केला आहे आणि यातल्या प्रत्येक गिर्यारोहकाच्या उपयोगी पडलेली ती इथली शेरपा जमात.
शेरपा हा हिमालयाचा समानार्थी शब्द वाटावा इतकं त्यांचं नातं गहिरं आहे. हिमालय म्हणजे शेरपा आणि शेरपा म्हणजे हिमालय इतके ते एकमेकांमध्ये मिसळून गेलेत.
गिर्यारोहण ही सुरुवातीला त्यांची गरज होती. १९०७ साली प्रथम पाश्चात्य गिर्यारोहकांनी शेरपांना आपले सामान वाहून नेण्यास सांगितले. हळूहळू तो त्यांचा व्यवसाय बनत गेला.
गिर्यारोहकांचे पथदर्शक म्हणून गिर्यारोहण हा त्यांच्या आयुष्याचा आज एक अविभाज्य भाग बनलाय. गिर्यारोहण हे त्यांच्या नसानसांत भिनलंय आणि म्हणूनच त्यांचं शरीर हे इतक्या उंचीवरच्या खडतर जीवनासाठी तयार झालंय.
==
हे ही वाचा : जगभरात फक्त हिमालयात मिळणाऱ्या या औषधाची किंमत सोन्यापेक्षा जास्त आहे!
==
हिमालयाच्या सफरीवर जाताय ? हे शेरपा जागोजागी तुमच्या उपयोगी पडतील. कोण्या देवदूतासारखे तुम्हाला मदत करतील.
खडतर वाटेवर मार्गदर्शन करतील, तुमच्या जेवणाची सोय करतील, तुमचा रोप योग्य जागी रोवून तुम्हाला शिखर चढायला मदत करतील, इतकंच नाही तर तुमचं अवजड सामानही वाहून नेतील. थोडक्यात सांगायचं तर हे तुमचे लोकल टुरिस्ट गाईड बनतील.
शेरपा… पूर्व नेपाळमधली एक जमात. त्यांची पाळेमुळे इसवी सन १६व्या शतकात अस्तित्त्वात असलेल्या निंजमा संस्कृतीमध्ये आढळतात.
शेरपा लोकांच्या सांगण्यानुसार, शेरपा समूह हा हजार एक वर्षांपूर्वी पूर्व तिबेटच्या खाम या प्रदेशातून विस्थापित झालेला आहे.
मात्र अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, शेरपा ही पूर्व तिबेटमधील एक भटकी जमात होती जी तिथे कैक वर्षांपूर्वी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने साधारण बाराव्या ते पंधराव्या शतकाच्या दरम्यान स्थलांतरित झाली.
ते टिंगरीच्या आसपासच्या भागात स्थलांतरित झाले मात्र तिथल्या स्थानिक लोकांसोबतच्या भांडणामुळे त्यांना नवीन जागेचा शोध घ्यावा लागला. त्यामुळे ते हिमालय ओलांडून आले आणि उत्तर-पूर्व नेपाळमध्ये स्थायिक झाले.
त्यांच्यापैकी काही लोक हे भारतातील सिक्कीम आणि चीनमधील तिबेटमध्ये देखील राहतात. त्यांचा एक छोटा समूह उत्तर अमेरिकेतही आढळतो.
शेरपा हा शब्द तिबेटी भाषेतून घेण्यात आला आहे. शर+पा अशी याची फोड. याचा अर्थ पूर्वेकडचे लोक किंवा पूर्वनिवासी. शेरपा समूह हा शार्वा या नावाने सुद्धा ओळखला जातो. यातील पुरुषांना शेरपा तर बायकांना शेर्पानी असे म्हटले जाते.
शेरपा लोकांची संस्कृती ही तिबेटी संस्कृती आहे. त्यांची बोलीभाषा शेर्पा ही सुद्धा तिबेटमध्ये बोलल्या जाणाऱ्या तिबेटन भाषेशी साधर्म्य दाखवणारी आहे.
ही जुन्या तिबेटन भाषेशी ६५% मिळती जुळती आहे. शेर्पा ही मुख्यत्वेकरून बोलीभाषा आहे. ती देवनागरी लिपीत लिहिली जाते. बरेचसे शेरपा हे नेपाळमध्ये वस्ती करून असल्याने ते शेर्पा भाषेच्या जोडीनेच नेपाळीसुद्धा बोलतात.
जे तिबेटमध्ये आहेत आणि तिथल्या बौद्ध स्तूपांमध्ये जातात, ते तिबेटी बोलतात.
शेरपा समूहाची लोकं ही मुख्यत्त्वेकरून बौध्द धर्माचे अनुयायी आहेत. जवळपास ९३% शेरपा जनजातीच्या माणसांचा धर्म बौद्ध आहे. हिंदू आणि ख्रिश्चन हे अल्पसंख्याक आहेत.
असं मानतात की, ते तिबेटच्या खाम प्रदेशातून एका मोठ्या बौद्ध भिक्खूच्या आदेशावरून विस्थापित झाले होते.
तसा त्यांचा मूळ व्यवसाय शेती. शेतीची त्या भागात सुरुवात झाल्यापासून म्हणजे जवळपास एकोणिसाव्या शतकापासून शेरपा समूह हे आयरिश बटाटे, नाचणी, गहू, बार्ली आणि मक्याची शेती करत. त्यांच्या स्वतःच्या घराच्या बगीच्यांमध्ये कित्येक भाज्या उगवत.
इथे आजही बहुतांश शेती पारंपरिक पद्धतीने केली जाते. यात प्राण्यांचा उपयोग होतो. साधी अवजारे वापरली जातात. बैलजोडीने नांगर ओढला करतो. शेरपा समूह हा बौद्ध धर्म पाळणारा असल्याने त्यांच्यापैकी बहुतेकजण मांस खात नाहीत.
त्यामुळे प्राणी इतर कारणांसाठी वापरले जातात. कित्येक गायी-गुरे राखणाऱ्यांकडे लोणी, तूप विक्रीस असते. ते विकून इतर अन्नपदार्थ खरेदी केले जातात. तिबेटन चहा आणि बटर आणि मीठ हे त्यांचे आवडते पेय आहे. बरेचदा पुरुष व्यवसायासाठी घराबाहेर जातात आणि स्त्रिया घराकडे लक्ष देतात.
शेरपा समूहात मातृसत्ताक पध्दती अस्तित्त्वात आहे. या समूहात लग्न ही स्वतःच्या मर्जीने केली जातात. मात्र ही लग्न स्वतःच्या जातीत किंवा समूहात केली जात नाहीत.
त्यांच्यामध्ये खादेऊ आणि खामेदेऊ असे दोन समूह आहेत. खादेऊ म्हणजे उच्च समूह असून खामेदेऊ हा कनिष्ठ समूह आहे. ते एकमेकांशी लग्न करतात.
वरिष्ठ समूहाशी लग्न झाल्यास स्तर उंचावतो तर कनिष्ठ समूहाशी लग्न झाल्यास स्तर खालावतो. मुलाला लग्नापूर्वी मुलीच्या पालकांच्या घरी राहावे लागते. घरच्यांना हे लग्न यशस्वी होऊ शकेल असे वाटले तर लग्न होते.
त्या दोघांना पुरेसा वेळ दिला जातो. त्यानंतर लग्नाची तारीख काढली जाते. या एकंदर प्रक्रियेत वर्षापेक्षा अधिक काळी जाऊ शकतो. इतके करूनही यांच्यात घटस्फोटाचे प्रमाण जवळपास एक तृतीयांश इतके आहे.
==
हे ही वाचा : हिमालयातील या गावाबद्दलच्या काही गोष्टी तुम्हाला कदाचित माहित नसतील! वाचा
==
लग्नात भेटवस्तूंची देवाणघेवाण केली जाते. लग्न नवरा- बायकोच्या कपाळावर buttermark लावून होते. मुलीला लग्नात नवऱ्या मुलाकडून हुंडा दिला जातो.
या समूहात विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्त्वात आहे. त्यामुळे कुटुंबात नवरा-बायको आणि त्यांची अविवाहित अपत्य राहतात. यातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्न झाल्यावर पुरुष त्यांना मूल होईपर्यंत आपल्या स्वतःच्या आईवडिलांच्या घरी राहत नाही. तर तो सासरी राहतो.
इथे स्त्रियांना बहुपतित्वाचा हक्क आहे. एक स्त्री एकापेक्षा अधिक पुरुषांशी लग्न करू शकते आणि तसे करणे हे प्रतिष्ठेचे मानले जाते. मात्र हे खूप कमी स्त्रिया करतात. केलेच तर एका स्त्रीने दोन भावांशी लग्न करण्याचे प्रमाण अधिक असते.
शेरपा समूहात नामकरण विधी महत्त्वाचा आणला जातो. स्थानिक बौद्ध लामा हे मुलाचे नाव ठेवतात. त्यांना जन्म झाल्याचे जन्मवेळेसकट सांगितले जाते. या माहितीच्या आधारे लामा त्या मुलाचे आगर मुलीचे नाव ठरवतात आणि नामकरण विधीची वेळ आणि तारीख ठरवतात. नंतर लामा, शेजारी आणि नातेवाईक यांना गोडाधोडाचे जेवण दिले जाते.
मुलांना बहुतेकदा स्त्रीच वाढवते. कारण घरातील पुरुष बहुतेकदा कामानिमित्त घराबाहेरच असतो.
शेरपा समूहातील लोक काही त्यांचे असे खास सण आवर्जून साजरे करतात.
लोसार हा सण फेब्रुवारी संपताना साजरा केला जातो. तिबेटन कॅलेंडरमधील नवे वर्ष म्हणजे लोसार. तेच शेरपा आपले नववर्ष मानतात. यात पेयपान, नृत्य आणि पारंपारिक गाण्यांचा कार्यक्रम होतो.
डूमजे हा जुलैमध्ये येणारा महत्त्वाचा सण. यांत समृद्धी, उत्तम आरोग्य आणि समूहाचे भले व्हावे यासाठी तिथल्या वेगवेगळ्या देवतांची प्रार्थना केली जाते. जुलैमध्ये हा सण साजरा होतो तोवर शेतीकामदेखील पूर्ण झालेले असते. हा उत्सव सात दिवसांचा असतो. हा पहिल्या फळांचा उत्सव म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे.
चाम हा नृत्य नाट्याचा कार्यक्रम साधारणपणे हिवाळा चालू झाला की असतो. यात मुखवटे घालून नृत्य केले जाते. त्याचप्रमाणे मणी रिमदू हा उत्सव वर्षातून चारदा असतो.
यात बौद्ध भिक्खू हे पारंपरिक रंगीत कपडे घालून , मुखवटे चढवून नृत्य करतात. दुष्ट शक्तींवरचा बौद्ध धर्माचा विजय यात अधोरेखित केला जातो.
==
हे ही वाचा : हिमालयात गेलेल्यांना तिथले महात्मे कधीच का दिसत नाहीत? वाचा, ऐका साधूचंच उत्तर
==
शेरपा समूहाची लोकं ही प्रामुख्याने बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. ते बौद्ध धर्माच्या महायान पंथाचे पालन करतात.
त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे. ते आत्मा नश्वर असल्याचे मानतात. आत्मा पुन्हापुन्हा जन्म घेतो आणि सर्वात शेवटी मुक्त होतो यावर त्यांची श्रद्धा आहे. मोक्ष मिळवायचा असेल तर माणसाने त्याच्या भौतिक गरजांमधून निवृत्त व्हायला हवं असंही ते मानतात. मात्र काही थोडके बौद्ध धर्माव्यतिरिक्त गोष्टींवर विश्वास ठेवतात.
त्यांचा अनेक देवांवर विश्वास असतो. आणि त्यांच्या मते, अनेक शक्ती मनुष्याचं आयुष्य नियंत्रित करत असतात. आणि म्हणून ईश्वर अनेक आहेत.
तर अशी ही शेरपा संस्कृती.. अधिककरून नेपाळमध्ये वसलेली.. पण भारताच्या एका कोपऱ्यातसुद्धा आपल्या अस्तित्त्वाच्या खुणा असलेली… आपल्याशी नातं सांगणारी.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.