Site icon InMarathi

गावसकर, सचिन आणि विराट – “किलर इन्स्टींक्ट” गमावलेले विरोधक : भाऊ तोरसेकर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – भाऊ तोरसेकर 

१९७०-८० च्या सुमारास आमची पिढी कॉलेजच्या तरूण वयातली होती आणि सुनिल गावस्करच्या फ़लंदाजीने भारतीय क्रिकेटला बहर आलेला तो काळ होता. आपल्या पहिल्याच क्रिकेट दौर्‍यात सुनील वेस्ट इंडीजला गेला होता आणि कप्तानही नवखा अजित वाडेकर होता.

पहिला कसोटी सामना सुनील खेळू शकला नाही आणि दुसर्‍या सामन्यापासून त्याने वेस्ट इंडीजच्या खतरनाक वेगवान गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली. चार सामन्यात त्याने जमवलेल्या ७७४ धावा अजूनही पक्क्या स्मरणात राहिल्या आहेत.

वयानुसार सुनिल निवृत्त झाला आणि नंतर आलेला सचिनही बाजूला झालाय. आज विराटचा जमाना आहे. त्यांचेही आम्हाला कौतुक आहे. पण सुनिल विसरता येत नाही आणि सचिन विराटच्या गुणगानाची तितकी ओढ नाही.

 

 

सुनिल सोबतच आमचे क्रिकेटप्रेम जवळपास अस्तंगत होत गेले. अशा कालखंडात प्रथमच भारतीय क्रिकेटशौकीनांना भारताने सतत जिंकावे असे वाटू लागले होते. एखाद्या सामन्यात गैरलागू खेळून कोणी बाद झाला, मग शिव्याशाप देण्याचाही प्रघात पडत गेला.

तेव्हाचा भारतीय संघ आजच्या इतका विविधतापुर्ण नव्हता किंवा क्रिकेटही काही मोठ्या महानगरापुरते मर्यादित होते, झारखंडातला धोनी वा अन्य कुठल्या तालुक्याच्या गावातून आलेला खेळाडू कसोटी क्रिकेटचे स्वप्नही बघू शकत नव्हता.

फ़ार कशाला एक मोसम असा होता, की जवळपास सहासात खेळाडू मुंबईचेच असत. मात्र त्यामुळे भारताचा संघ परिपुर्ण नव्हता आणि तेव्हा बहुतांशी पराभव पत्करणार्‍या भारतीय संघाविषयी सुनिल गावस्करने व्यक्त केलेली एक प्रतिक्रीया आठवणीत राहून गेलेली आहे.

वेस्ट इंडीज, इंग्लंड वा ऑस्ट्रेलिया असे संघ सतत का विजय मिळवतात व भारत पराभूत का रहातो; त्याचे इतके नेमके विश्लेषण कुणाही क्रीडा समालोचकाने केलेले असे्ल तर माझ्या वाचनात आले नव्हते. काय म्हणाला होता सुनिल गावस्कर?

 

 

या बलाढ्य क्रिकेट संघांपाशी जी व्यावसायिकता आहे आणि किलर इन्स्टींक्ट आहे, त्याचा अभाव भारताला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही, असेच त्याचे म्हणणे होते. ही किलर इन्स्टींक्ट काय भानगड असते? तर दयामाया न दाखवता झुंजण्याची मानसिकता. आपल्याला जिंकायचे आहे बस्स!

मग त्या जिंकण्यासाठी लागेल ती मेहनत करायची, झुंज द्यायची आणि अखेरच्या क्षणापर्यंत जिद्द सोडायची नाही, अशी जी सांघिक धारणा असते, त्याला किलर इन्स्टींक्ट म्हणतात. त्यात खुलाशाला वा युक्तीवादाला स्थान नसते. विजय आणि पराभव स्पष्ट असतात. त्यात कुठे नैतिक विजय वा पराभव नसतात.

समोरच्याला नेस्तनाबुत करण्याची ओढ आणि आपण विजयी होण्याची झिंग, ही खरी चेतना असते आणि तिथेच भारतीय संघ तोकडा पडत होता. त्यात तथ्य होते.

भयकारी वाटणार्‍या वेस्ट इंडीजच्या खतरनाक गोलंदाजावर कोवळा सुनिल तुटून पडला आणि त्या तुफ़ानाला त्याने नामोहरम केलेले होते. जेव्हा गावस्करने २९ शतके पुर्ण केल्याचा विक्रम साजरा केला, तेव्हा इंडिया टुडे नावाच्या पाक्षिकाने विशेषांक काढला होता.

 

 

त्यात सुनिलविषयी वेस्ट इंडीजचा गॉर्डन ग्रिनिच म्हणाला होता, मी स्लीपमध्ये उभा असतो आणि आराम करतो. कारण गावस्कर खेळताना तिथे चुकूनही झेल येण्याची शक्यता नसते.

तर आणखी एक त्यांचाच वेगवान गोलंदाजाने मारलेला टोमणा आठवतो. अकरा हजार धावा आणि एकही धाव भारतीय गोलंदाजीच्या विरोधातली नाही, हा खरा विक्रम आहे. मुद्दा इतकाच, की सुनिलमधली किलर इन्स्टींक्ट तेव्हाच्या भारतीय संघात क्वचितच आढळायची आणि आजचा भारतीय संघ त्याच धारणेने कायम भारावलेला असतो. जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यातली प्रेरणा आहे. म्हणून सचिन-विराट मागल्या दोन दशकात देशाचे हिरो होऊन राहिलेत. मग आम्ही काय पराभूत मनोवृत्तीचे होतो?

 

 

मला तेव्हाचा काळ आठवतो. अजून मुंबईत वा देशाच्या मोठ्या महानगरातही टेलिव्हीजन पोहोचला नव्हता, की दुरदर्शनचे जाळे उभे राहिलेले नव्हते. आमची किकेटची भुक आकाशवाणीच्या समालोचनावर भागवावी लागत होती आणि मोठ्या शहरात जागोजागी लोक कानाला ट्रांझीस्टर लावून फ़िरताना दिसायचे. ठराविक जागी रेडिओ मोठ्याने लावून लोकांना कॉमेन्ट्री ऐकायची सुविधा मंडळे उपलब्ध करून देत असत.

त्यांचे काही उत्साही कार्यकर्ते येणार्‍याजाणार्‍याला स्कोर कळावा, म्हणून उंचावर एक फ़ळा लावून खडूने धावफ़लक हलता ठेवायचे. अशा काळात भारतीय संघाची रचना ठरलेली असायची. त्यात पहिले सहासात फ़लंदाज असायचे आणि अखेरचे चारजण निव्वळ गोलंदाज असायचे. यष्टीरक्षकही फ़लंदाज म्हणून निवड व्हायची.

अशा काळात एखादा सामना अब्रुचे धिंडवडे काढणारा असायचा, की पहिले चारपाच भारतीय फ़लंदाज ४०-५० धावातच गारद होऊन जायचे.

मग आता धावसंख्या कशी व कोण वाढवणार ही भ्रांत पडायची. आमच्यासारखे क्रिकेटप्रेमी मग आपलीच अब्रु पणाला लागल्यासारखे खुळे युक्तीवाद करायचो. बिशन बेदी, इरापल्ली प्रसन्ना, चंद्रशेखर, वेंकटराघवन असे गोलंदाज कुठल्या तरी आधीच्या सामन्यात ५०-८० धावा करून गेल्याच्या आठवणी जाग्या व्हायच्या.

अजून पाच गडी आहेत आणि त्यातले हे शेपूट शेदोनशे धावांची भर घालू शकते, असे युक्तीवाद आम्ही करीत असायचो. कारण आपला भारतीय संघ पराभवाच्या छायेत असल्याचे स्पष्ट दिसत असूनही, ते मान्य करण्यास आमच्या भावना राजी नसायच्या.

 

gaonconnection.com

 

अर्थात आमच्या तशा खुळ्या युक्तीवादाने कधी ते सामने भारतीय संघ जिंकू शकला नाही, की त्या गोलंदाज क्रिकेटपटूंनी तितका चमत्कार घडवला नाही. पण म्हणून अशा नंतरच्या सामन्यामध्ये आमचे युक्तीवाद संपले नाहीत, की आमचे क्रिकेटप्रेम आम्हाला सत्त्य बघू देत नव्हते.

त्या काळात वेस्ट इंडीजच्या दौर्‍यात एका सामन्यात भारताने विजय मिळवला आणि उरलेले सामने अनिर्णित ठेवण्यात यश मिळवल्याने ती मालिका भारताने जिंकली होती. त्याचीच पुनरावृती मग इंग्लंडच्या दौर्‍यावर गेलेल्या भारतीय संघाने केली. परदेशी जाऊन मालिका जिंकण्याची परंपरा तिथून सुरू झाली.

पण प्रत्यक्षात भारतीय संघ तितका मजबूत वा अजिंक्य झालेला नव्हता. पण आमची भाषा व खेळाडूंचे नखरे आसमानाला भिडलेले होते. इंदूर वा तसाच कुठल्या शहरात त्या भारतीय पराक्रमाचा विजयस्तंभही उभारला गेला होता. मात्र ते यश फ़सवे किंवा तांत्रिक होते. आमचे युक्तीवादही दिखावू होते.

आज ह्या जुन्या आठवणी जाग्या होत आहेत, कारण त्याचेच प्रतिबिंब प्रचलित राजकारणात व त्यावरील समालोचनात पडू लागले आहे. कर्नाटकात भाजपाला सत्ता संपादन करता आली नाही वा कॉग्रेसच्या हातून सत्ता गेली, तरी त्यातला विजय शोधण्याचे युक्तीवाद मला त्याच काळाचे स्मरण करून देत आहेत.

प्रामुख्याने कुमारस्वामी यांच्या शपथविधीला जमलेले तमाम विरोधी पक्षाचे नेते व त्यांनी उंचावलेले हात बघून, समालोचकाच्या भूमिकेतील माध्यमांना आलेला आवेश थक्क करून सोडणारा आहे.

 

 

त्यातले युक्तीवाद प्रसन्नानेही एकदा पन्नास ठोकल्यात वा बेदीही ७०-८० धावा करू शकतो, असेच नाहीत काय? म्हणून मग त्यावर गावस्करने केलेले भाष्य आठवले. मुद्दा अशा एकाद्या शतकाचा नाही की एखाद दुसर्‍या निसटत्या विजयाचा नसतो. तर जिंकण्याची इर्षा व झगडण्याची जिद्द, कुठल्याही संघाला पराक्रमाकडे घेऊन जात असते. पराभवावर मलमपट्टी करीत साजरे होणारे विजयाचे सोहळे किलर इन्स्टींक्टची ग्वाही देणारे नसतात.

आज मोदी विरोधात एकवटलेल्या विरोधकांमध्ये त्याच एका भूमिकेचा दुष्काळ आहे. आपण का हरलो याची फ़िकीर नसून डकवर्थ लूइस नियमाने सत्ता मिळवल्याचा आनंद अजिंक्य असल्याचा पुरावा होऊ शकत नाही.

मोदींनी बहूमताच्या वेळी ३१ टक्केच मते मिळवली होती. विरोधक एकमेकांच्या विरोधात असल्याचा मोदींना लाभ मिळाला. मतविभागणी टाळली तर मोदी भाजपाला इतक्या जागा मिळू शकत नाहीत. अशा सर्व गोष्टी शक्यतांच्या आहेत. पण त्या शक्यता व्यवहारात आणण्यासाठी जी इर्षा किंवा जिद्द पाहिजे त्याचे काय? त्यालाच तर किलर इन्स्टींक्ट म्हणतात. गुजरातमध्ये जागा कमी झाल्याच्या रडगाण्यात शोकात सहभागी होण्यापेक्षा अमित शहा आपली फ़ौज घेऊन त्रिपुरात दाखल होतात आणि मार्क्सवादी वा कॉग्रेस गुजरातच्या नैतिक विजयाचे सोहळे साजरे करीत बसतात. हा लक्षणिय फ़रक दोन बाजूंमध्ये आहे.

 

 

त्रिपुरा जिंकण्याचा पराक्रम केल्यावरही अमित शहा सोहळे साजरे करण्यापेक्षा कर्नाटकात दाखल होतात आणि व्युहरचनेच्या कामात गढून जातात. त्याचा मागमूस तरी हात उंच करणार्‍या विरोधकांत दिसतो काय?

एखादे राज्य जिंकायचे तर अधिक आमदार हवेत आणि एक आमदार निवडून आणायचा तर प्रत्येक मतदान केंद्रात आपले कार्यकर्ते तैनात असले पाहिजेत. अशी संघटना असेल तरच विजयाची स्वप्ने बघावीत. ही धारणा असलेला माणूस भाजपाच्या अध्यक्षपदी बसलेला आहे.

तर त्याला पराभूत करायला हात उंचावण्याच्या पलिकडे बाकीच्या विरोधी पक्षांची काय तयारी आहे? चार वर्षापुर्वी ज्या ओडीशा बंगालमध्ये भाजपाला अनेक जागी उमेदवार मिळवताना मारामार होती, तिथे आज त्या पक्षाने दुसर्‍या क्रमांकापर्यंत मजल मारली. त्या सरावाकडे डोळेझाक करून कसोटी सामना जिंकता येईल काय?

 

nationaljanmat.com

 

जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांची फ़ौज वस्तीपर्यंत व मतदान केंद्रापर्यंत जाऊन भिडली पाहिजे. याची चिंता सातत्याने करणारा पक्षाध्यक्ष एका लोकप्रिय मोदीला घेऊन इतकी बाजी मारू शकतो. त्याला पराभूत करायला निघालेल्या पक्ष आघाड्यांकडे कोणी सुपरस्टार नाही की सुसज्ज कार्यकर्त्यांची फ़ौज नाही. ही वस्तुस्थिती कधी डोळे उघडून बघायची?

क्रिकेटचा सामना संपल्यावर दुसर्‍या संघातील दोन फ़लंदाजांनी आपली धावांची बेरीज करून आपल्याला सामनावीर घोषित करण्याचा कोर्टात दावा करावा आणि त्याचाच आधार घेऊन सामना जिंकल्याचाही दावा करावा, याला यश मानायचे असेल तर स्वागतच आहे. कारण असेच कोर्टाला वा नियमांना आडोसा बनवून २००२ पासून मोदी विरोधातल्या लढाया लढल्या गेल्या आहेत.

पण परिणाम मोदी पंतप्रधान होण्यापर्यंत गेले आहेत. तो माणूस लोकशाही मार्गाने जिंकला आहे आणि त्याला त्याच मार्गाने पराभूत करता येईल. सुनिल गावस्कर म्हणतो, ती किलर इन्स्टींक्ट अंगी बाणवावी लागेल.

सचिन, द्रविड वा गांगुलीच्या पिढीने ती अंगात आणायचा सराव सुरू केला आणि धोनी विराटने त्याचा कळस गाठला आहे. आजचा भारतीय संघ जगातल्या कुठल्याही देशाच्या विरोधात कायम जिंकताना दिसतो आणि एखादा सामना पराभूत झाला तरी पुन्हा उफ़ाळून उभा रहातो. त्यामागे तीच किलर इन्स्टींक्ट आहे.

जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती शहा मोदी यांनी आत्मसात केली आहे. तर तिचा विरोधक विचारही करायला राजी नाहीत. २०१४ नंतर मोदी लाट ओसरणार अशी गाजरे खात जगलेल्यांना लागोपाठ मोदी-शहांनी विधानसभेत विजय मिळवल्यावर जाग आली. पण त्यांना त्यामागची इच्छाशक्ती बघण्याची गरजही वाटलेली नाही.

 

 

लोकसभा संपल्यावर काही महिन्यातच मोदींचे विश्वासू म्हणून अमित शहा पक्षाचे अध्यक्ष झाले. बहूमताने राज्य करणारा पक्ष म्हणून ते आरामात हायकमांड होऊन आज्ञा हुकूम सोडण्याच्या भूमिकेत गेले नाहीत. त्यांनी भाजपाला स्थान नसलेली राज्ये निवडून, तिथे पक्षाच्या विस्ताराचे काम हाती घेतले आणि आसाम, त्रिपुरासारखी राज्य जिंकून घेतली आहेत. बंगाल, केरळ व ओडिशात आपले बस्तान पक्के केले आहे. ही विजयानंतरची इर्षा व काँग्रेस सहीत पराभूत झालेल्या विरोधी पक्षांची मरगळ, यात तुलना होऊ शकते काय?

सहाजिकच मागल्या आठदहा दिवसापासून राष्ट्रीय आघाडी, संयुक्त आघाडी वा पुरोगामी आघाडीच्या वल्गना चालू आहेत, त्यातले युक्तीवाद मला तीनचार दशके मागे घेऊन गेले. तरूणपणीचे खुळे युक्तीवाद आठवले. अखिलेश मायावतींची जोडी दोनशे धावा सहज ठोकणार. ममता काँग्रेस मिळून धावफ़लक पाचशेच्याही पुढे घेऊन जाणार. हे युक्तीवाद वाहिन्यांवर ऐकले आणि मी सुनिल गावस्करच्या जमान्यात गेलो. तो खुळा आशावाद मीसुद्धा दाखवलेला आहे आणि आज तो हास्यास्पद असल्याचेही मान्य करतो.

पण मानवी झुंडी असाच विचार करतात. किंबहूना आवडलेल्या गोष्टीतले सत्य नाकारण्याचाच मानवी झुंडींचा स्वभाव असतो. प्रामुख्याने मोदी विजयाने विचलीत झालेल्या विविध अभिजन समाजघटकात अशा लोकांचा भरणा असल्याने त्यांना तसे युक्तीवाद आज दिलासा देत असतात.

 

 

सर्व पुरोगामी पक्षांनी एकत्र यावे आणि एकदिलाने मोदी भाजपाला पराभूत करावे, जी पुरोगामी विचारवंत व संपादकांची २०१४ पासूनची एकमेव सुप्त इच्छा आहे. तिची नुसती चाहुल लागली तरी त्यांना ते सत्यात अवतरल्यासारखे भासले तर नवल नाही. मग नुसते हात गुंफ़ून वा उंचावून हे विविध नेते उभे राहिले, तरी असे अभ्यासक संपादक खुश होऊन जातात. आनंदोत्सव सुरू करतात.

वयात आलेल्या मुलीला वा प्रामुख्याने दुर्लक्षित राहिलेल्या मुलीला आपण सुंदर आहोत, हे कुणाकडून तरी ऐकायचे असते. ते सत्य असण्याची काडीमात्र गरज नसते.

असे नुसते शब्द तिला हुरळून जायला पुरेसे असतात. कर्नाटकच्या शपथविधी समारंभाने अशाच बुद्दीमान पुरोगामी लोकांना खुश केले आहे. मात्र त्यात किलर इन्स्टींक्टचा पुर्ण अभाव आहे. विषय आपल्या जिंकण्याचा असतो. परिणाम म्हणून प्रतिस्पर्धी पराभूत होत असतो.

इथे कोणालाही जिंकायची इर्षा नसून मोदी भाजपाला पराभूत करण्याच्या कळप भावनेने पछाडलेले आहे. विस्कळीत जमावाला संघटित झुंड सहज पराभूत करते, इतकेही भान नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात.InMarathi.com  त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. |आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version