Site icon InMarathi

तथाकथित ‘कर्जमाफी’, मिडीयाचं असत्य आणि काळजीत टाकणारी वास्तविकता

sbi-malya-marathipizza

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

स्टेट बँक ऑफ इंडियाने ७२०० कोटी रूपयांचे कर्ज “माफ केले” आहे अशी बातमी आली आणि त्यावरून देशभर धुराला उडाला. वास्तविक, SBI ने कर्ज ‘माफ’ नसून “बुडीत खात्यात” टाकले आहेत. हे स्पष्टीकरण खुद्द वित्तमंत्री अरूण जेटलीजींनी दिलं आहे. तेव्हापासून अनेक अर्थशास्त्रच्या जाणकारांकडून अनेक वेबसाईट इ ठिकाणी Write off (बुडीत खात्यात टाकणे) करणे आणि Waive off (माफ करणे) करणे ह्यावर बरंच लिहिलं गेलंय. ह्या संपूर्ण लिखाणाचा रोख एकच आहे – बुडीत खात्यात टाकणे म्हणजे माफ करणे नाही. बँका असं नेहेमी करतच असतात. त्यात चूक किंवा फारसं वेगळं असं काही नाही! ह्याची दुसरी बाजू समजून घेण्याआधी आपण Write off आणि waive off चा फरक समजून घेऊ या.

ज्या कर्जांची सहज वसुली होत नाहीये, त्यांच्यावर अनेक कडक पर्याय वापरून वसुली करण्याचे प्रयत्न सर्वच बँका करीत असतात. संपत्ती हस्तगत करणे, त्याचा लिलाव करणे हे त्यातील ठळक उपाय आहेत. परंतु बऱ्याचदा, हे उपाय योजून देखील वसुली होत नाही. अश्यावेळी बँकेच्या अकाऊंट मधे “येणं आहे” अश्या column मधे हे पैसे वर्षानुवर्ष पडून रहातात.

ह्याचा अर्थ असा की एवढी मोठी रक्कम probable profit (भविष्यात होऊ शकणारा नफा) म्हणून गृहीत धरली जाते – पण वास्तविकता अशी असते की ही रक्कम येण्याची शक्यता फारशी नसते. त्यामुळे बँकेला आपल्या नफ्याचा नक्की अंदाज येत नाही. शिवाय बुडालेले कर्ज म्हणजे तोटाच असतो – हा तोटा जर स्पष्टपणे दाखवला तर बँकेला होणाऱ्या वार्षिक नफ्यातून तो वजा होतो व संभाव्य नफ्यावर लागणारा कर देखील कमी होतो.

अश्या अनेक कारणांमुळे अशी कर्ज बुडीत खात्यात टाकली जातात.

SBI ने असे ७२०० कोटी रुपयांचे कर्ज बुडीत खात्यात सरकवले आहे. ह्यात, विजय मल्याचे कर्ज १२०० कोटींचे आहे.

 

 

इथे सर्वांचं विश्लेषण थांबत आहे. परंतु अनेकांच्या हे लक्षात येत नाहीये की SBI ने कर्ज बुडीत खात्यात टाकणे, हा विषय Written off आणि waived off मधीक टेक्निकल फरकापुरता मर्यादित नाही. मिडीया एकीकडे असत्य ओरडतीये हे एक टोक आहे आणि ह्या उलट ‘काहीच घडलं नाही, ही तर फक्त अकाउंट्स मधली अपडेट्स आहेत’ असं जे म्हणताहेत त्यांचं दुसरं टोक आहे.

सत्य दोन्ही बाजूंच्या मध्ये कुठेतरी आहे – आणि ते चिंताजनक आहे.

बेसिकली, तब्बल ७२०० करोडचं कर्ज बुडीत खात्यात टाकलं आहे. “हा केवळ अकौंटिंग फरक आहे, वसुलीचे प्रयत्न थांबणार नाहीयेत”, असं म्हणून थांबता येतं का? खुद्द SBI चे लोक म्हणतात की बुडीत खात्यात टाकणे म्हणजे – वसुलीची आशा सोडणे – असं असतं. इथे खरी वेदना आहे.

अर्थ असा आहे की – तुम्ही प्रयत्न कराल लाख, पण आशा सोडली आहे. म्हणजे आजपर्यंत जंग जंग पछाडलं पण उपयोग झाला नाही. शेवटी हिशेबातून ते काढून टाकले. म्हणजे ७२०० कोटी रूपये गेल्यात जमा आहेत.

आज, देशातील काळा पैसा मिटावा/कमी व्हावा म्हणून सरकारने घेतलेल्या निर्णयाची फळं सर्व जनता भोगत आहे. निर्णय अर्थातच चांगला आहे. परतू त्याचा त्रास जनतेला होत आहेच ना? SBI च्या बाहेरच कितीतरी मोठी रांग आहेच ना?

 

म्हणजे देशातील स्वच्छतेच्या निर्णयापोटी जनता त्रास सहन करत असताना, ह्याच वेळी, यंत्रणेतील त्रुटींमुळे मल्यासारखे अब्जाधीश कर्ज बुडीत खात्यात ढकलत आहेत…हे चिंताजनक आहे.

इथे मुद्दा “आजच्या” write off नसून…इतके दिवस जे होत होतं, ते कसं चुकीचं होतं आणि ते दुरूस्त होणार की नाही – हा आहे.

“अश्या” लोकांना “इतके” पैसे दिले जातातच कसे?

ते बुडीत खात्यात जाण्याची वेळ येणार हे आधी कळू नये का?

सामान्य, छोट्या बिझनेसमनला कर्ज मिळताना होणाऱ्या अडचणी, द्यावी लागणारी हमी – मोठ्यांच्या बाबतीत अदृश्य होतात का?

कर्ज देताना बँकांची रिस्क असतेच. नुकसानाची शक्यता असतेच, पण किती मोठी? ७२०० कोटी एवढी मोठी रिस्क आपल्या देशाला परवडणारी आहे का?

शेतकरी, लघु उद्योजक इत्यादींच्या बाबतीत जेवढे कडक नियम पाळले जातात, तसे धनाढ्यांच्या बाबतीत का नाही?

वरील प्रश्न काळजीत टाकणारी वास्तविकता दर्शवितात. SBI चूकलीच आहे. आजच्या बुडीत खात्यातील एन्ट्रीत नव्हे, तर ही अशी वेळ आणण्यात. आणि SBI हे फक्त दार्शनिक आहे. चुकतीये ती अक्खी यंत्रणा. तिचा धिक्कार व्हायला हवाच. ह्या विषयावर बोललं जायला हवं. पण तसं घडत नाहीये.

दुर्दैवाने सरकारचे विरोधक, आपली माध्यमे हा गंभीर प्रसंग राजकीय टीकेची संधी म्हणून उचलत आहेत आणि त्या टीकेला उत्तर देण्याच्या नादात, सरकार समरर्थक valid प्रश्नानाही मूर्खात काढत आहेत. ह्यांच्यासाठी सत्तेत कोणता पक्ष आहे, हे अधिक महत्वाचं आहे. देशात सुधारणा होणं दुय्यम.

सुरूवातीलाच म्हटल्या प्रमाणे – Written off आणि waived off मधीक टेक्निकल फरकापुरता हा विषय नाही. हा flawed system चा विषय आहे. त्यावर आपलं लक्ष जाणं अत्यंत आवश्यक आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version