Site icon InMarathi

भर दुपारी सूर्य मावळला – ए बी डिव्हीलियर्स निवृत्त झाला! : द्वारकानाथ संझगिरी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

क्रिकेटच्या मैदानात चौफेर फटकेबाजी करत आपल्या फलंदाजीच्या कौशल्याने क्रिकेट रसिकांची मने जिंकणारा दक्षिन्न आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हीलियर्स याने नुकतीच क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून आपण निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. या निर्णय सगळ्या क्रिकेट विश्वासाठी धक्कादायक होता. याचे कारण असे, की एबीची सध्याची फलंदाजी पहिली, तर कोणत्याही वेळी तो थकलेला आहे, त्याची आता निवृत्तीची वेळ जवळ आली आहे असे वाटले नव्हते. एवढेच काय, त्याची खेळतानाची उर्जा आणि चपळाई पाहून तो आणखी बरीच वर्ष याच उर्जेने क्रिकेट खेळू शकेल असे वाटत होते.

पण काल एबीने अचानक निवृत्त होत असल्याची घोषणा केली आणि क्रिकेट रसिकांना कोड्यात टाकले. हा निर्णय अनपेक्षित होता.

 

mg.co.za

त्याहून गंभीर बाब ही, की आपल्या फलंदाजीच्या कौशल्यातून अनेक नवनवीन सुंदर फटक्यांना जन्म देणारा एबी आता आपल्याला थेट पाहायला मिळणार नाही. मैदानाच्या सर्व बाजूंना त्याने लीलया खेळलेले शॉट्स, दिग्गज गोलंदाजांची केलेली धुलाई, हे सगळं आता आपल्याला “लाइव” बघता येणार नाहीये. एबी म्हणजे मैदानावरचं चालतं बोलतं चैतन्य! अस्सल आफ्रिकन खेळाडूला शोभेल अशी त्याची स्टाईल जगभरातल्या प्रेक्षकांना आणि समीक्षकांना मोहवून गेली नसती तरच नवल होते. समीक्षकांनी तर समीक्षण करताना त्याच्या कित्येक खेळ्यांची उदाहरणे दिली आहेत.

एबीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर प्रसिध्द क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट येथे देत आहोत…

===

एबी डिव्हीलियर्स निवृत्त झाला?

फलंदाजीतली आधुनिकता निवृत्त झाली? फलंदाजीचा सुपरमॅन निवृत्त झाला?

खरं सांगतो, माझा माझ्या कानावर विश्वास बसत नाहीए. तो थकलाय म्हणे! हे खरं असेल तर जगात असे काही खेळाडू आहेत त्यांनी हातात काठी घेतली पाहिजे. परवाच आयपीएलमध्ये त्याने सीमारेषेवर एक झेल घेतला. ते पाहून विराट कोहली त्याला ‘स्पायडरमॅन’ म्हणाला म्हणे! टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने उड्या मारणार्‍या स्पायरडरमॅनला अभिमान वाटला असेल! त्याने निवृत्त व्हावं अशा कुठल्याही खाणाखुणा त्याच्या खेळावर दिसत नाहीए. कसोटी असो, वनडे असो, टी-२० असो… त्याची फलंदाजी चिरंतन वसंत ऋतूत आहे असं वाटतं.

त्याचं रनिंग बिटविन द विकेट, त्याचं क्षेत्ररक्षण, त्याचे रिफ्लेक्सेस आणि त्याच्या खेळातलं सातत्य पाहिलं की, या बहरलेल्या वृक्षाचं एकही पान शिशिर ऋतूकडे डोळे लावून आहे असं वाटत नाही.

 

thesouthafrican.com

आणि तरीही त्याला निवृत्त व्हावंसं वाटलं? म्हणजे या सूर्याला मध्यान्हीवर मावळायचंय! असं नेहमी म्हटलं जातं की, खेळाडूने अशावेळी निवृत्त व्हावं जेव्हा सर्वजण ‘का? का?’ असा आश्चर्याने प्रश्न विचारतात. कधी निवृत्त होणार, असा विचारत नाहीत. ठीक आहे. ही आदर्श निवृत्ती झाली. ती भल्याभल्यांना जमत नाही. पण या माणसाने आदर्शाचं थेट एव्हरेस्ट गाठावं?

नाही. अब्राहम बेंजामीन डिव्हीलियर्स, तुम्ही डोळे दिपवणार्‍या दीपमाळेचा फ्यूज अचानक काढलात. ‘थकण्या’ची व्याख्याच बदलून टाकली.

पण एबीडी, आम्ही तुझे आभारी आहोत. गेल्या दहा वर्षांत तू आम्हाला फलंदाजीच्या एका वेगळ्याच जगात घेऊन गेलास, जिथे कुणीही घेऊन गेलं नव्हतं. मला कधी तरी वाटतं की, विव्ह रिचर्डस् आजच्या काळात खेळला असता तर कदाचित तू जे करतोस ते त्याने करून दाखवलं असतं. पण माझं विव्ह रिचर्डस्च्या फलंदाजीबद्दल उतू जाणार प्रेम हे बोलतंय. फक्त बुद्धी नाही.

या एबीडीने फलंदाजीच्या आकर्षकतेची व्याख्या बदलली. त्याने कोचिंग मॅन्युलच बदललं. एकेकाळी मागे सरकत लेग स्टंपवरचा चेंडू कव्हर्स किंवा एक्स्ट्रा कव्हर्समधून मारणं हे तांत्रिक पाप मानलं जायचं. आता ते पुण्यात जमा होतं. पण या एबीडीने पुण्याची व्याख्याच बदलली.

विकेटकीपरच्या डोक्यावरून रॅम्प शॉट, शॉर्ट फाइन लेगच्या बाजूने पॅडल शॉटस्, रिव्हर्स स्वीप्स आणि पुल्स वगैरे डोळे चोळायला लावणारे उद्योग तो आईच्या पोटातून शिकून आल्यासारखा करायचा. मला संशय वाटतो की, चेंडू आणि त्याची वेगळीच दोस्ती होती. आपण कुठे पडणार हे चेंडू त्याच्या कानात सांगायचा. कारण हे फटके मारताना त्याचं डोकं स्थिर असायचं. तो चेंडूची वाट पाहत तयार असायचा. हे जेव्हा त्याने डेल स्टेनविरुद्ध केलं तेव्हा मी एवढा वेडावलो की, फक्त कपडे फाडले नव्हते. स्टेनने नंतर त्या फटक्यांच्या आठवणीने कपडे फाडले असतील. गंमत म्हणजे, हे सर्व तो दबावाखाली करायचा. बहुधा दबाव हा शब्द त्याला शाळेत शिकवला गेला नव्हता.

 

youtube.com

तो कसोटी सामना खेळताना उत्कृष्ट बचावात्मक तंत्र दाखवायचा. त्याची मूलभूत मूव्हमेंट बॅक अ‍ॅण्ड अ‍ॅक्रॉस होती. पण खेळताना डोकं स्थिर आणि फटका उशिरात उशिरा खेळण्याचं कसब दाखवायचा. उसळणारी खेळपट्टी असो किंवा फिरणारी, त्याचा बचाव अभेद्य होता. नाहीतर उगाच कसोटीत ५०.६५ च्या सरासरीने ८७६५ धावा होत नाहीत. वनडेचा आणि टी-२० चा तो अनभिषिक्त सम्राट होता. वनडेत १०१चा स्ट्राइक रेट आणि ५३.५ ची सरासरी. आयपीएलमध्ये जवळपास चाळीसशी सरासरी आणि दीडशेचा स्ट्राइक रेट आणि हे नव्याने शोधलेले फटके. सम्राटाचं ‘ब्लू ब्लड’ त्याच्या फलंदाजीत होतं.

एका बाजूला हा माणूस वनडेमध्ये विक्रमी ३१ चेंडूंत शतक ठोकतो. (विंडीजविरुद्ध ४४ चेंडूंत १४९ धावा) त्यात ९ चौकार, १६ षटकार आणि दुसर्‍या बाजूला तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२० चेंडूंत ३१ धावा करून सामना वाचवतो. कधी भगतसिंग, कधी साने गुरुजी व्हायची कुवत त्याच्यात होती.

तो क्षेत्ररक्षक म्हणून जागतिक दर्जाचा होता. त्याने यष्टिरक्षक म्हणून सुरुवात केली आणि पुढे तो आऊटफिल्डचा जागतिक दर्जाचा क्षेत्ररक्षक झाला. हे जमणं सोपं नसतं. त्याला माणूस म्हणून मी जवळून पाहू शकलो नाही, पण प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याचं बोलणं शांत, गर्वाचा लवलेशही नसलेलं पण पराभवाची जबाबदारी स्वीकारणारं असायचं. खरं सांगू, त्याच्याबद्दल भूतकाळात लिहिताना हात जड होतोय. मैदानाबाहेर त्याच्याशी यत्किंचितही संबंध नसताना घरातलं माणूस निवृत्त होतेय असं वाटतंय. यातच त्याचा खेळ, त्याचा मैदानावरचा वावर मनाला किती भिडलाय हे जाणवतं.

मित्रा, आयपीएल तर खेळ! रॉयल चॅलेंजर्सला जिंकून द्यायची भीष्मप्रतिज्ञा कर म्हणजे अजून पाच वर्षं आयपीएल आरामात खेळशील. आम्हाला दुसरं काय हवंय!

===

मूळ पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version