आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
गेल्या आठवड्यात औरंगाबाद शहरात पेटलेल्या धार्मिक दंगलीच्या नंतर समाजमाध्यमात अनेक उलटसुलट चर्चांना तोंड फुटले होते. दोन्ही बाजूच्या समर्थकांनी आपली बाजू कशी बरोबर आहे हे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला. या दंगलीचे सूत्रधार आणि लाभधारक कोण आहेत याबाबत तपास चालू आहे. त्या पार्श्वभूमीवरच, औरंगाबादमधले मजलिस-इत्तेहादुल-मुस्लिमीन या पक्षाचे आमदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना हे अनावृत्त पत्र लिहिले आहे.
===
आपण अलीकडील तणावग्रस्त वातावरणात आपल्या पत्रकार परिषदांमध्ये , टीव्हीवरील मुलाखतींमध्ये तसेच जाहीर सभांमध्ये आणि पोलीस अधिकारी वर्गासमोर किमान शंभर वेऴा केलेली वक्तव्यं मी व औरंगाबादच्या तमाम नागरिकांनी ऐकली आहेत. आपण या सर्व संदेशात म्हणाला आहात की ,
“मी सर्व हिंदूंचे रक्षण करणार. मी हिंदूंचा नेता आहे. मी हिंदूंचा आमदार होतो, मी हिंदूंचा खासदार आहे. “
आपलं हे मत वाचून व ऐकून एक संवेदनशील मानवतावादी औरंगाबादी नागरिक म्हणून मला खूप वेदना झाल्या खा. खैरे साहेब . मलाही या वेदना झाल्या व औरंगाबादच्या लाखों नागरिकांनाही हे मत बोचलं आहे. आपले हे मत म्हणजे काही गुन्हा नसला तरी आपल्या सकुंचित मनाचा व विचारांचा दर्शक आहे.
खा. खैरेसाहेब ,आपण चूकीचं बोलता आहात.आपण केवऴ हिंदूंचे नव्हे तर या आपल्या सुंदर शहरातील हिंदूंबरोबरच माझ्यासह सर्व मुस्लीम, ख्रिच्चन, दलित , शीख , जैन , पारशी आदि सर्वांचे खासदार आहेत. औरंगाबादच्या आम्हा सर्वांचे आहात. खा. खैरेजी , देशातील १३० कोटी नागरिकांपैकी आपल्यासारख्या फक्त ५४३ नागरिकांना खासदार होण्याची संधी मिऴते व ती वारंवार मिऴालेले भाग्यवान आपण आहात. मग या शहराप्रती व इथल्या सर्व नागरिकांप्रती आपली जबाबदारी आहे. आपण या शहराचे ज्येष्ठ नेते आहात व आपण या शहरातील आम नागरिकांचे नेते आहात. त्यात आपण स्वत:ला एका धर्माच्या व जातीचे नेते समजणे चूक नव्हे काय?
खासदार व लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वांची काऴजी घेणे व संरक्षण करणे हे तुमचे काम आहे, कारण तुम्ही आम्हा सर्वांचे नेते आहात. आपल्या या लाडक्या शहराचे नेते आहात, हे कसे नाकारता?
मा. खैरेसाहेब, आपण हिंदू आहात. आपणाप्रमाणे लाखों लोक हिंदू आहेत व ते एक जीवनशैली म्हणून हिंदू धर्माचे पालन करतात. आपण सामाजिक जीवनात वारंवार हिंदू धर्माचा वारंवार उच्चार केल्याने आपण चांगले हिंदू होत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे आपण आपल्या सर्व रयतेसाठी केलेल्या कार्यानं आपण चांगले हिंदू आहात हे दाखविले पाहिजे, अशी इथल्या नागरिकांची इच्छा आहे.
खासदार खैरे साहेब, गेल्या आठवड्यात आपल्या शहरात जे काही दुर्देवी ,अभद्र व शांती भंग करणारे घडले त्याला ना तुमचा हिंदू धर्म जबाबदार आहे ना माझा इस्लाम. या धर्मांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. याला जबाबदार आहेत या दोन्ही धर्मातील अपप्रवृत्तीची मुठभर माणसे. या समाजकंटक प्रवृत्तीच्या मोजक्या लोकांना त्यांचा धर्म काय सांगतो व शिकवतो ते कऴालेले नाही. ते आपल्या शहराची व धर्माची बदनामी करीत होते. दु:ख याचे वाटते की, आपणही ते समजून घेतलेली नाही.
कारण खा. खैरेसाहेब , गेल्या आठवडाभरात आपण शहराचे नेते या नात्याने दोन समाजातील तणाव कमी करून आम नागरिकांसाठी लवकरात लवकर शांतता स्थापित करण्यासाठी झटायला हवे होते.
शहर शांत करणे ही आपली लोकप्रतिनिधी या नात्याने पहिली जबाबदारी होती , त्याऐवजी आपण धार्मिक तणाव वाढवण्याचे काम करीत आहात. वातावरण चिघऴविणे व शहराचे देशात नाव ख़राब करणे आपणास शोभत नाही. दंगल करणारे मुठभर एकदोन हजार हिंदू किंवा मुस्लीम असतील पण औरंगाबाद शांत रहावे , हिंदू व मुस्लीमांनी गुण्यागोविंदाने व प्रेमाने रहावे असे वाटणारे लाखों हिंदू व मुस्लीम आहेत हे खरे नव्हे का?
खा. खैरेसाहेब , दोन्ही समाजातील पुढारी वर्गास सोबत घेऊन आपल्या शहरात शांतता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्याची तुमची जबाबदारी होती, कारण शहराचे आपण वर्षानुवर्षे खासदार आहात. त्याऐवजी तुम्ही वातावरण भडकावायचे व दोन्ही जमातीतील तणाव वाढविण्याचे प्रयत्न करीत आहात. शहरातील सर्व धर्मात नागरिकांना शांतता हवी आहे, धार्मिक सामंजस्य हवे आहे. धार्मिक तणाव व दंगल आम जनतेस नको आहे. वीस वर्षापूर्वीचे औरंगाबाद आता राहिलेले नाही, जेव्हा तुम्ही प्रथमच लोकप्रतिनिधी झालात. याची जाणीव आपणास हवी.
औरंगाबादच्या जनतेला आता लक्षात आले आहे की, दंगल आणि धार्मिक तेढ व तणाव काहीही कामाचा नाही. त्यामुऴे सामान्य माणसाची सुरक्षा धोक्यात येते. तोच निरपराध त्याला बऴी पडतो.
या लोकभावनेचा लोकप्रतिनिधी या नात्याने आपण आदर करायला हवा. खा. खैरे साहेब , लोकांना शांतता हवी असताना व शहर शांत व स्थीर होत असताना आपण हे वातावरण कलुषित करणारी भूमिका घेत आहात. आपण पोलीसांची परवानगी नसताना व शहर शांत झाले असताना हिंदू शक्ती मोर्चा काढून ज्या शहराने तुम्हाला एवढा मान सन्मान दिला, नेतृत्व दिले तिथले जनजीवन क्षुद्र राजकीय फायद्यासाठी ख़राब करणे योग्य आहे का?
तुम्ही आम्ही दोघांनीही पक्ष, राजकारण व स्वार्थ यापलिकडे जाऊन आपल्या लाडक्या शहरासाठी व सर्व धर्मीय आम जनतेसाठी काम करायला नको का? जनतेची हीच इच्छा आहे. लोकप्रतिनिधी म्हणून ही इच्छा पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे.
आपले आवडते शहर रस्त्यावरील कचरा व दुर्गंधीने व्यापून गेले असताना, त्यांना प्यायला पाणी मिऴत नसताना, रस्ते व पायाभूत सुविधा नसताना आपण त्यासाठी अहोरात्र काम करायचे सोडून धार्मिक संघर्ष वाढविण्याचे काम करता आहात. दंगलीत प्राण गमावलेल्या निरपराध वृध्द नागरिकाची व हकनाक बऴी पडलेल्या १७ वर्षाच्या कोवऴ्या तरूणाच्या कुटूंबियांच्या भावना तुम्हाला जाणवत नाहीत काय? ज्या गरीबांची घरे ,दुकानें व हातगाड्या दंगलीत जऴून ख़ाक झाल्या त्यांचेसाठी आपणास काहीही करावे वाटत नाही व उलट धार्मिक तणाव बिघडवण्याचे आपण प्रयत्न करीत आहात हे सामान्य नागरिकांना पटलेले नाही खा. खैरेसाहेब!
मी स्वत: लोकप्रतिनिधी या नात्याने या दंगलीत ज्यांची दुकाने व घरे जऴाली त्यातील हिंदू व मुस्लीम या सर्वांची मदत करतो आहे. त्यात गरीब मुस्लीमांसह १८ हिंदूंही आहेत. त्यात मी आपला व तुपला करीत नाही. आपलातुपला करणे ही माणूसकीला काऴीमा फासणारी बाब आहे. मी शाहगंज मशिदीजवऴील हिंदू स्वामींचे दंगलीत जऴालेले आइस्क्रीमचे दुकान पुढाकार घेऊन बांधून देतो आहे. त्या स्वामींना मी जेव्हा म्हणालो की, आपलं आइस्क्रीमचे दुकान पुन्हा उभे राहिले की, उदघाटनाला व आइस्क्रीम खायला मी येईन. माझे हे बोल ऐकून स्वामींच्या चेहरा आनंदानं उजऴून निघाला होता. हा आनंद अनमोल आहे खा. खैरेजी!
असे आपण गुलमंडीवरील जऴालेले औरंगाबाद सिल्कचे मुस्लीम बांधवाचे दुकान पुन्हा उभे करण्याचा पुढाकार घेऊन काम करून दाखवू शकाल का? अशाप्रसंगी जातीधर्माच्या पलीकडं जाण्याची हिंमत लागते. ती तुम्ही दाखवावी खा. खैरेजी !
तुम्ही “हिंदू शक्ती मोर्चा “काढला व त्याची प्रतिक्रिया म्हणून मी “मुस्लीम शक्ती मोर्चा “सहज काढू शकलो असतो, पण मी तो काढला नाही. दंगल घडविणारे समाजकंटक हिंदू असो की मुस्लीम ,त्यांचेवर कड़क कारवाई करावी असे मी पोलीस कमीशनरांना सांगितले आहे आणि तुम्ही फक्त मुस्लीमांनी अटक करा म्हणता आहात. दंगलीत दोन्ही जमातीतील समाजकंटक सहभागी नव्हते काय ? त्या सर्वांवर कारवाई नको का व्हायला ? अजूनही वेऴ गेलेली नाही.
चला लोकप्रतिनिधी म्हणून आपण दोघे पुढाकार घेऊन तुमच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय शांती मार्च काढूया. आपल्या या लाडक्या शहरात पुन्हा दंगल होणार नाही असं वातावरण तयार करूया. शहरातील आम जनतेसाठी कचरामुक्ती, पाणी, रस्ते, शिक्षण व आरोग्य ही अधिक महत्वाची कामं आपण खासदार व आमदार म्हणून करावी असं औरंबादकरांना वाटते आहे. ते काम तुमच्यासोबत करायला मी तयार आहे. तुमच्या प्रतिसादाची वाट पहातो आहे खा. खैरेसाहेब !
:शहराचा एक नागरिक व आमदार,
इम्तियाज़ ज़लील
===
(या पत्राला शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिलेले उत्तर उद्या प्रसिध्द करण्यात येईल)
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.