एक बुद्धिबळाचा डाव आणि दारूपासून कायमची सुटका, गावाने लढवली अनोखी शक्कल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
बुद्धिबळ अर्थात Chess हा खेळ तसा जगभर खेळला जातो. या खेळाचे चाहतेही प्रचंड मोठ्या संख्येत आहेत म्हटलं. भारतात बुद्धिबळ मास्टर विश्वनाथ आनंद सारखा विश्वविजेता असून देखील आपल्याकडे या खेळाची म्हणावी तशी क्रेझ नाही.
बुद्धी तल्लख करण्यासाठी आणि मेंदूला व्यायाम देण्यासाठी पूर्वी हा खेळ खेळला जायचा. आजही त्याच कारणाने अनेक जण ‘टाईमपास’ म्हणून बुद्धिबळ खेळतात.
समजा तुम्हाला आम्ही सांगितलं की एक गाव चक्क ‘बुद्धिबळ’ या खेळाचा वापर करून दारूमुक्त झालं तर तुमचा विश्वास बसेल का?
तुम्ही म्हणालं इथे शुद्धीत असणाऱ्याला धड बुद्धिबळ खेळता येत नाही तर तिथे दारू पिऊन टुन्न असणाऱ्या माणसाची काय बिशाद? आणि मुख्य म्हणजे बुद्धिबळ आणि दारूमुक्ती असा संबंध थेट जोडलाच जाऊ शकत नाही असे देखील काही लोक म्हणतील. पण विश्वास ठेवा असं खरंच घडलंय…!
हे अनोखं गाव आहे दक्षिण भारतातील ‘केरळ’ राज्यात…गावाचं नाव आहे ‘मारोत्तीचल’.
या गावातील प्रत्येक माणूस बुद्धिबळ खेळामध्ये पारंगत झाला आहे आणि म्हणूनच या एका सर्वसामान्य गावाची दखल आता संपूर्ण जग घेत आहे.
बुद्धिबळाचा वापर करून गाव दारूमुक्त करून दाखवण्याच्या संकल्पनेमागचा चेहरा आहे “चेस उन्नीकृष्णन” अर्थात “सी. उन्नीकृष्णन” हा ५९ वर्षांचा व्यक्ती..!
काही वर्षांपूर्वी “चेस उन्नीकृष्णन” हा एकच माणूस गावामध्ये होता ज्याला बुद्धिबळ खेळायला यायचे. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी ‘बॉबी फिशर’ या अमेरिकन चेस ग्रँण्डमास्टरचं नाव ऐकलं आणि लोकांच्या तोंडून त्याची होणारी वाहवा पाहून ते बुद्धिबळाकडे वळले.
सर्वप्रथम त्यांनी जवळच्याच गावातून ‘चतुरंगा’ खेळ (प्राचीन भारतीय खेळ जो जवळपास बुद्धिबळासारखाचं खेळला जातो) शिकून घेतला आणि त्यानंतर बुद्धिबळाचे प्रशिक्षण घेतले. बुद्धिबळ हा खेळचं का निवडला याच उत्तर देताना “चेस उन्नीकृष्णन” सांगतात,
“मैदानी खेळाप्रमाणे बुद्धिबळ खेळायला जास्त जागा लागत नाही किंवा जास्त लोकांचीही गरज नसते. तुम्ही जेथे कोठे बुद्धिबळ खेळण्यास बसता, तेव्हा तिचं जागा तुमचं मैदान असते”
१९७०-८० च्या काळात गावातील पुरुषांमध्ये दारूचे व्यसन वाढले होते. गावाची शांती भंग असलेली होत पाहून “चेस उन्नीकृष्णन” यांनी काही सुजाण गावकऱ्यांच्या मदतीने ठोस पाउल उचलण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी “मद्य निरोधना समिती” स्थापन केली.
या समितीद्वारे सर्वप्रथम त्यांनी स्त्रियांना जागृत केले आणि दारूमुक्तीमुळे पुन्हा त्यांचे सुखी जीवन त्यांना परत मिळेल हे पटवून दिले. गावातील अवैध दारू व्यापार रोखण्यासाठी “चेस उन्नीकृष्णन” एक्साईज ऑफिसर्सना त्याची खबर द्यायचे, परंतु एक्साईज ऑफिसर्स येईपर्यंत भरपूर वेळ वाट पहावी लागायची.
हा वाया जाणारा वेळ भरून काढण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम समितीमधल्या सदस्यांना “बुद्धीबळाची” ओळख करून दिली आणि हळूहळू बुद्धीबळाचे वेड संपूर्ण गावात पसरले. तासनतास गावकरी बुद्धिबळ खेळू लागले. याचा परिणाम म्हणून दारूड्यांमध्ये देखील या खेळाचे आकर्षण वाढू लागले.
बुद्धिबळ खेळताना वेळेचे भान राहत नाही, मुळात हेच कारण ठरले की दारू पिणाऱ्यांची सवय हळूहळू मोडू लागली आणि अल्पावधीतच याचा लक्षणीय परिणाम दिसू लागला.
“चेस उन्नीकृष्णन” यांच्याही हा बदल लक्षात आला व त्यांनी अधिक जोरात बुद्धिबळ खेळाचा प्रसार केला. आत ‘मारोत्तीचल’ गावामधील प्रत्येक घरात एक बुद्धिबळ खेळाडू आहे आणि गावातून दारूचा संपूर्णत: नायनाट झाला आहे.
दर रविवारी “चेस उन्नीकृष्णन” यांच्या घरी बुद्धीबळ खेळण्यासाठी मोठी गर्दी जमते. मिळेल त्या ठिकाणी कोपऱ्यात म्हणा किंवा अंगणात म्हणा गावकरी बुद्धीबळ खेळायला बसतात आणि तहानभूक विसरून तासनतास ते एकमेकांचे डाव उलथवण्यात गुंग असतात.
तर अशी आहे ‘मारोत्तीचल’ या गावाची ही प्रेरणादायी गाथा.!!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.