' कौन कम्बख्त ईव्हीएम हॅक कर सकता है? – InMarathi

कौन कम्बख्त ईव्हीएम हॅक कर सकता है?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

भले भले एक्स्पर्टस सरळ सरधोपट एक वाक्य फेकतात – ईव्हीएम एक मशीन आहे आणि मशीन हॅक होऊ शकते – स्वाभाविकच, तांत्रिक माहिती नसलेले लोक अश्या वाक्यांवर माना डोलावतात आणि गैरसमज पक्के होत जातात.

ईव्हीएम हॅकिंग चा विषय दोन प्रकारे बघायला हवा – तांत्रिक दृष्टीने आणि निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने.

आधी तांत्रिक बघू.

एक साधं स्पष्ट छातीठोकपणे सांगू शकता येणारं सत्य म्हणजे – भारतीय निवडणुकांमध्ये वापरली जाणारी ईव्हीएम “हॅक” होणं अशक्य आहे. अ – श – क्य. IMPOSSIBLE.

कारण “हॅक” होण्यासाठी एखाद्या मशीनला वायर्ड किंवा वायरलेस “नेटवर्क” मध्ये असावं लागतं. जर तुम्ही (पक्षी तुमची मशीन) आणि हॅकर (पक्षी हॅकर ची मशीन) एकाच नेटवर्कद्वारे जोडलेले नसाल तर हॅकर तुमच्या मशीनला आपल्या कंट्रोलमध्ये आणू कसा शकेल? म्हणजेच जी मशीन हॅक करायची आहे, ती वायर्ड किंवा वायरलेस नेटवर्क (लॅन इंटरनेट, वायरलेस इंटरनेट, गेलाबाजार ब्यूटुथ पण पकडून घ्या – अश्या कोणत्याही नेटवर्कमध्ये) मध्ये असावीच लागते.

 

ethical-hacking-inmarathi
indiatoday.in

ईव्हीएम कोणत्याही नेटवर्कशी कोणत्याही प्रकारे जोडलेल्या नसतात. त्यामुळे कर्नाटकातील ईव्हीएम “नागपूर” मध्ये बसलेला कुणी “हॅक” करणं सोडाच – त्याच निवडणूक बूथ मधील त्याच रूम मध्ये त्याच ईव्हीएम च्या बाजूला, अगदी खेटून जरी कुणी उभा राहिला – तरी एखाद्या यंत्रातील एक कोणतं तरी बटन दाबून ईव्हीएम “हॅक” करू शकेल – हे – आधी म्हटलं तसं – अशक्य आहे. (इतर काही देशामध्ये नेटवर्कला जोडलेल्या मशिन्स वापरतात, तिथे हा धोका आहे. आपल्याकडे नाही.)

आता दुरून “हॅक” करणं सोडा, पण ईव्हीएम ताब्यात घेऊन “टॅम्परिंग” तर करता येऊ शकत असेलच, नाही का? म्हणजे एखादी वायर जोडायची – ईव्हीएम चिप मध्ये प्रोग्रॅम/व्हायरस सोडायचा – त्यावर असा कोड लिहायचा की ३ नंबरचं बटन दाबलं गेलं की मत १ ला गेलं पाहिजे – किंवा सगळी मतं नं पाठवता, दर ३ मतांमागे १ मत तिकडे वळवायचं – असा “रिप्रोग्रॅमिंग” चा खेळ खेळून ईव्हीएम पार गंडवून टाकता येईलच…नाही का?

तर – नाही. ना – ही.

कारण ईव्हीएम मध्ये वापरलेल्या चिप्स ROM – म्हणजेच रीड ओन्ली मेमरी चिप्स असतात. त्यांवर एकदा एखादा कोड नोंदवला की तो “मिटवून, त्या जागी नवा कोड” टाकणे – असं काही करता येत नाही. आपण आपला स्मार्टफोन “फॉरमॅट” करून अँड्रॉइडची “फ्रेश कॉपी” टाकतो ना एखाद्या मोबाईल रिपेअरिंग वाल्या कडून? – ते तसं इथे होणं अशक्य असतं. कारण स्मार्टफोन मधल्या चिप वरचा जुना कोड काढून नवा टाकता येतो. ईव्हीएम च्या चिप्समध्ये ते शक्य नाही.

बरं, ईव्हीएम उघडली आणि चिपच बदलून टाकली तर?

 

 

आता हे थियरी मध्ये नक्कीच शक्य आहे. पण प्रॅक्टिकली?

म्हणून आपण दुसऱ्या दृष्टीने – निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने बघू.

ईव्हीएम हस्तगत करून, तिच्यात हवा तो कोड असलेली चिप बसवण्याची “संधी” कधी कधी मिळू शकते ते बघूया. त्या आधी ईव्हीएमचा “प्रवास” कस कसा होतो हे पहा. मटा मध्ये एक सविस्तर लेख आला होता, त्यात हा प्रवास स्पष्ट केला गेला आहे.

“निवडणूक जाहीर झाल्यावर मशीन बनविणाऱ्या कंपनीचे अभियंते सर्व मशीनचे सॉफ्टवेअर तपासून ते योग्य असल्याची खात्री करतात. त्यानंतर सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना निमंत्रित केले जाते. त्यांच्या उपस्थितीत यंत्रांची तपासणी केली जाते. यावेळी यंत्रावर उमेदवाराची यादी नसते. ज्या विविध नंबरवर मतदान केले ते त्याच नंबरवर झाल्याची खातरजमा केली जाते.”

— प्लिज नोट! — ईव्हीएम अजूनही कंपनीच्याच ताब्यात आहेत. आणि कुठे ही हे कळालं नाहीये की कोणता पक्ष कोणत्या क्रमांकावर आहे — त्यामुळे इथपर्यंत ईव्हीएम “रिग” करणं अशक्य सुद्धा आहे, आणि बिनकामाचं सुद्धा.

 

bhaskar.com

पुढे —

“उमेदवाराची अंतिम यादी निश्चित झाल्यावर झोनल ऑफिसर यंत्रावर मतपत्रिका लावतो. त्यावेळी सर्व मशीन व्यवस्थित काम करत असल्याची खातरजमा जमा करतो व तसे प्रमाणित करतो. नंतर यंत्र ज्या रूममध्ये ठेवली असतात ती रूम सील केली जाते. निवडणुकीच्या आदल्या दिवशी लॉटरी पद्धतीने मतदान केंद्राध्यक्षाला आवश्यक यंत्र नंबर नोंदवून दिली जातात. त्यावेळी मतदान केंद्राध्यक्ष यंत्र व्यवस्थित कार्य करत असल्याची खात्री करून घेतो व तसे प्रमाणित करतो.”

म्हणजे – सील केलेल्या रूममध्ये ईव्हीएम असतात. पण – तिथेसुद्धा काही करून उपयोग नाही – कारण कोणत्या केंद्रात कोणती ईव्हीएम जाणार आहे, हे मतदानाच्या आदल्या दिवशी ठरतं! आता ह्या निवडणूक कर्मचाऱ्यांना फितवलं तर? एकतर हे कर्मचारी अजिबातच तांत्रिक एक्स्पर्टस नसतात. शिवाय केंद्रांवर भरपूर सुरक्षा यंत्रणा असते. तिथे असं काही ऐन वेळी घडवून आणणं प्रॅक्टिकली अशक्य आहे.

पुढे —

“मतदानाच्या आदल्या दिवशी कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना होतात. मतदानाच्या दिवशी मतदान प्रतिनिधींना मतदान सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर मतदान केंद्रावर येण्याचे सूचित केलेले असते. मतदान केंद्राध्यक्ष मतदान प्रतिनिधीना यंत्रामध्ये मते नोंदविलेली नाहीत याची खातरजमा करून देतो. यंत्रावर मतदानाचा डेमो मतदान दाखवून यंत्र व्यवस्थित काम करत असल्याची त्यांची खात्री करून देतो. त्याबद्दल त्यांची सही घेऊन यंत्र मतदानासाठी सील करतो.”

— समजून घ्या — कंट्रोल युनिट वेगळं, बॅलट युनिट वेगळं. कंट्रोल युनिट अधिकाऱ्याकडे असतं. हाच ईव्हीएमचा जो काही “मेंदू” असेल तो असतो. बॅलट युनिट म्हणजे तो कीबोर्ड, ज्यावर बटन दाबून तुम्ही मत देता. त्यामुळे मत द्यायला गेलेला माणूस चटकन काहीतरी करेल…तर ते ही शक्य नाही.

यंत्र खराब होऊ शकतात का? तर हो. अश्या केसेस घडल्या सुद्धा आहेत. आणि त्या मतदान सुरु होण्याच्या आधीच उघड होतात. कारण मतदानाआधी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींसमोर चाचणी केली गेलेली असते.

 

thequint.com

===

तर हे असं आहे.

२०१४ पूर्वी भाजपकडच्या अनेकांनी ईव्हीएम वर आरोप केले होते. आता काँग्रेसकडचे (आणि काही इतर सुद्धा. यू नो हू.) आरोप करत आहेत. हे आरोप २०१४ पूर्वी सुद्धा हास्यास्पद, वरपांगी आणि राजकीय दृष्ट्या प्रेरित होते – आजही हे आरोप तसेच आहेत. उलट आता व्हीव्हीपॅट पावत्यांमुळे आणखी एक पायरी पुढे गेलो आहोत आपण. पुढे कदाचित आणखी सुधारणा होत जातील. त्यामुळे ह्यापुढे सत्तांतर होईल – तेव्हासुद्धा हे आरोप इतकेच नव्हे, ह्यापेक्षा जास्त हास्यास्पद असणार आहेत!

इंदिरा गांधींच्या काळात म्हणे काँग्रेस उमेद्वारासमोर मारलेल्या शिक्क्याची शाई व्यवस्थित उमटत असे. इतरांसमोर मारलेले शिक्के मिटून जात, तिथली शाई उडून जायची. हे आरोप आणि आज ईव्हीएम वर होणारे आरोप – गुणात्मक फरक शून्य आहे.

कोणतीही यंत्रणा १००% निर्दोष नसते. आहे त्याहून अधिक चांगली, कमी दोष असणारी यंत्रणा आत्मसात करत पुढे जायचं असतं. सध्या वापरत आहोत ती यंत्रणा आधीच्या पेक्षा कमी सदोष, अधिक सोपी आहे किंवा नाही – इतकंच बघायला हवं. ईव्हीएम ही बॅलट पेपर पेक्षा कितीतरी जास्त सुरक्षित, कितीतरी अधिक विश्वासार्ह आणि संपूर्ण निवडणूक यंत्रणेवरील ताण खूप कमी करणारी यंत्रणा आहे.

राजकीय हेतू ठेवून निवडणूक प्रक्रिया, निवडणूक आयोग – ह्यांच्याबद्दलच संभ्रम निर्माण केला जाऊ नये. आहेत ते दोष कमी नक्कीच करू – पण शेंडा बुडून नसलेले आरोप करून संपूर्ण प्रक्रियेची विश्वासार्हताच नष्ट करण्याचं पातक आपण करू नये इतकंच वाटतं.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?