आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
शिवाजी महाराजांनी इंग्रजांची इतकी मस्त फसवणूक केलीये! खूप कमी जणांना माहित असलेली ही गोष्ट ह्या लेखात दिलेली आहे. “English Records on Shivaji” मधल्या पत्रांमधून आपल्याला ह्या प्रसंगाचा उल्लेख मिळतो.
महाराजांनी राज्याभिषेकानंतर मुंबईच्या इंग्रजांकडून तांबं विकत घेतलं होतं, नाणी पाडायला किंवा भांडी करायला वगैरे घेतलं असेल.
महाराजांनी इंग्रजांना सांगितलं की, आता इथे म्हणजे रायगडावर इतके रोख पैसे नाहीत. तुम्हाला मी हुंडी (Bill of Exchange) देतो.
तुम्ही ही हुंडी घेऊन गोवळकोंड्याला जा, तिथल्या कुतुबशाहकडून आम्हाला जी खंडणी मिळते त्यातून तुम्हाला हवी असलेली रक्कम तुम्ही तिथे असलेल्या आमच्या माणसाकडून मागून घ्या.
इंग्रजांचा “कुरिअर” गोवळकोंड्याला जात नसे म्हणून त्यांनी तो सुरतेला पाठवला. मग सुरतेचा कुरिअर गेला गोवळकोंड्याला. तिथे खरोखर महाराजांचा माणूस होता.
तिथल्या महाराजांच्या माणसाने सांगितलं की, ह्या हुंडीसाठी पैसे द्यायची authority आमच्याकडे नाही.
ज्यांच्याकडे आहे ते प्रल्हाद निराजी गेलेत रायगडावर. आता तुम्ही एकतर रायगडावर तरी जा नाहीतर ते येईपर्यंत थांबा इथेच.
तो कुरिअर सुरतेला माघारी आला आणि तिथल्या इंग्रजांनी त्याच्या रिपोर्टवर शेरेबाजी केली आणि ते कागदपत्र मुंबईला पाठवले.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
==
हे ही वाचा : श्रीराम ते छत्रपती शिवाजी महाराज : अतिरेकी चिकित्सकांचा सूर्यावर डाग पहाण्याचा छंद
==
ते कागद माघारी आल्यावर इंग्रजांना कळून चुकलं होतं की, आता महाराज आपल्याला भारतभ्रमण करवणार!
त्यामुळे इंग्रजांनी ठरवलं की, आता रायगडावरच जायचं. म्हणून त्यांनी त्यांच्या दुभाष्या असलेल्या नारायण शेणवी याला रायगडावर पाठवलं. नारायण शेणवी जेव्हा रायगडवाडीला आला तेव्हा त्याला कळलं की, महाराज गडावर नाहीत.
म्हणून, चौकशी केल्यावर त्याला कळलं की, महाराज कधी येतील हे काय नक्की कुणालाच माहित नाही. म्हणून त्याने गडावर स्वराज्याचे पंतप्रधान असलेल्या मोरोपंत पिंगळे ह्यांना भेटायचं ठरवलं.
मोरोपंतांनी त्याला चांगलं महिनाभर खालीच थांबवून ठेवलं. खूप काम आहे अशी सबब दिली त्याला. मग एका महिन्याने त्याला रायगडावर बोलावलं.
मग ह्या नारायण शेणव्याने सगळी हकीकत सांगितली आणि म्हणाला की, मला प्रल्हाद निराजींना भेटायचंय म्हणून, मोरोपंत म्हणाले-
“बरोबर आहे तुमचं! निराजी एका बैठकीसाठी इथे आले होते. पण, आता ते परत गेलेत.”
शेणवी म्हणाला-
“आम्ही पुन्हा पुन्हा गोवळकोंड्याला जाणार नाही, तुम्ही मला इथेच पैसे द्या आणि मोकळं करा.”
मोरोपंत म्हणाले-
“अहो, रायगडावर पैसे नाहीत म्हणून तर तुम्हाला सांगितलं ना!”
शेवटी थोड्या वादानंतर मोरोपंत म्हणाले की-
“आम्हाला इंग्रजांशी व्यापारी संबंध ठेवायचे आहेत, म्हणून स्वराज्याचा पंतप्रधान म्हणून मी तुम्हाला एक उपाय सुचवतो – अलिबागला आमचे जे कोठार आहेत तिथे तिथली प्रजा जो आम्हाला कर स्वरूपात नारळ, सुपारी, भात वगैरे देते.
तुम्हाला हव्या असलेल्या पैशाइतकी ती पोती तुम्ही तिथून उचला.”
आता ह्या शेणव्याला असं स्वीकारण्याचा अधिकार नाही. मोरोपंत म्हणाले सावकाश मुंबईला जा आणि तुमच्या वरिष्ठांना विचारून या. तो परत मुंबईला आला. त्याला बघताच तिथल्या अधिकाऱ्याला खात्री झाली की ह्याच्या हाती काहीही लागलेलं नाही.
शेणवी त्या अधिकाऱ्याला म्हणाला की-
अहो महाराज नाहीचेत तिथे आणि पिंगळे म्हणतायेत की भात, सुपारी वगैरे घेऊन जा.
त्यावर तो इंग्रज अधिकारी म्हणाला-
अरे हे देतो देतो म्हणतील आणि ऐनवेळी जनतेला सांगतील की, अलिबागला तुम्ही पोती टाकू नका म्हणून! तू एक काम कर आता महाराज रायगडावर पोचलेत असं कळलंय तर तू तिथे जा आणि फक्त महाराजांना भेट.
तुझ्यासोबत इंग्रज अधिकारीही घेऊन जा असं तो म्हणाला. तर शेणवी आणि फ्रांसिस मौलीव्हेरर नावाचा एक इंग्रज हे दोघे रायगडावर जायला निघाले.
महाराज नुकतेच रायगडावर आले होते. कामात होते म्हणून यांना महिना दीडमहिना खालीच थांबवून ठेवलं. वर बोलावल्यावर महाराजांनी त्यांना प्रश्न केला की, काय नक्की ठरलंय तुमचं ते एकदाचं सांगून टाका.
शेणव्याने पैसे मागितल्यावर परत महाराज म्हणाले-
“अहो आमच्याकडे रोख पैसे नाहीत म्हणून तर तुम्हाला गोवळकोंड्याला पाठवलं ना… मी एक उपाय सुचवतो… बरं, एक काम करा तेवढ्या किमतीची चांदी किंवा सोनं तुम्हाला देऊन टाकतो मग .”
==
हे ही वाचा : राजमाता जिजाऊ : शिवबांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून घडविणारी एक धैर्यवान माता
==
“उपाय” म्हटल्यावर शेणव्याच्या पोटात गोळा आला.
आता शेणव्याकडे ऑथॉरिटी नाही म्हणून तो परत मुंबईला आला. त्याकाळचा प्रवास हा घोडा, उंट वगैरे यांवर करावा लागत असे. महाराज त्यांना कसे फिरवतायेत बघा.
त्या शेणव्याला बघताच अधिकाऱ्याला कळलं की, ह्याहीवेळी त्याच्या हाताला काही लागलेलं नाही. ह्या काळात तो मौलीव्हेरर रायगडावर थांबला आणि काही जमतंय का, याचा प्रयत्न करू लागला.
पण त्याला कसलं जमतंय. पंधरा दिवसांनी तो देखील परत आला.
मौलीव्हेररने त्याच्या “tour report” मध्ये लिहून ठेवलंय – “I got nothing but hollow promises” (मला पोकळ आश्वासनांखेरीज काहीही मिळालं नाही)!
तो इंग्रज अधिकारी शेवटी वैतागला आणि शेणवी आणि मौलीव्हेररला म्हणाला की, आता जे मिळतंय ते घेऊन या नाहीतर नंतर काहीच हाती लागणार नाही.
नारायण शेणवी परत रायगडावर जायला निघाला. परत त्याला महाराजांनी महिनाभर पायथ्याशी थांबवून ठेवलं. वर आल्यावर महाराज चढ्या स्वरात म्हणाले – “काही ठरतंय का तुमचं?”
शेणवी म्हणाला की- काहीही द्या महाराज …. काहीही द्या!
महाराज एकदम शांतपणे म्हणाले की,
“तसं नाही, मला कळलं पाहिजे नक्की सोनं पाहिजे की चांदी पाहिजे ते.”
शेणव्याच्या पोटात पुन्हा गोळा आला पण तो म्हणाला- महाराज काहीही द्या.
महाराज मोरोपंतांना म्हणाले की- ‘ह्याला जामदारखान्यात घेऊन जा आणि चांदी देऊन टाका आणि हे सगळं हुंडी वगैरे प्रकरण मिटलं असं लिहून घ्या.’
आता मोरोपंतांनी शेवटची कामगिरी बजावली. ते म्हणाले- “इथे रायगडावर चांदी २८ रुपये प्रति शेर आहे बरं का!”
शेणवी चमकलाच! तो म्हणाला की- “अहो सगळीकडे चांदी २३ रुपये प्रति शेर आहे.”
आता हा भाव जाणून घेण्यासाठी परत मुंबईला जायची हिम्मत शेणव्यात नव्हती. त्याने ती चांदी घेतली.
तो मुंबईला आल्यावर त्या इंग्रज अधिकाऱ्याने ईस्ट इंडिया कंपनीला जो रिपोर्ट लिहिला त्यात त्याने लिहिलंय –
सुमारे दीड वर्ष चाललेल्या ह्या प्रकरणात शिवाजीने २३ रुपये प्रति शेर असलेली चांदी २८ रुपये प्रति शेर विकून हे प्रकरण निकालात काढलं. ह्या सगळ्या व्यवहारात आपल्याला साडे बावीस टक्के तोटा झालेला आहे.
महाराजांच्या आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या स्वराज्याच्या पंतप्रधानाच्या गनिमी काव्याची ही खूप कमी जणांना माहित असलेली गोष्ट. महाराज किती मुत्सद्दी होते हे या गोष्टीवरून लक्षात येतं!
==
हे ही वाचा : “…मग तुम्हीच छत्रपती व्हा!” : छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मण पुजाऱ्यावर खवळतात तेव्हा..
==
(दिवंगत ज्येष्ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांच्या भाषणातून)
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
—
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.