' आता हरायला उरलंय तरी काय? : कर्नाटक निवडणुक “काँग्रेस पराभवाचं” विश्लेषण – InMarathi

आता हरायला उरलंय तरी काय? : कर्नाटक निवडणुक “काँग्रेस पराभवाचं” विश्लेषण

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आताशा कुठलीही निवडणुक घोषित व्हायची बाकी असते आणि लोक “तिथे काँग्रेस हरणार” ही भविष्यवाणी निवडणुक जाहीर होण्याच्या क्षणापासून करायला सुरुवात करतात. नुसत्या इतक्या भाकितांवर लोक थांबत नाहीत, तर लोक त्याही पुढे जावुन “तिथे भाजपचंच राज्य येईल” अशी भाकीतं बिनदिक्कतपणे करतात.

 

rahul-gandhi-inmarathi03
mahapunjab.com

लोकांचं जावू देत. पण काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते देखील निवडणुक जाहीर झाल्यापासून सुतकी चेहरे पाडुन वावरतात. का? जिंकण्याचा आत्मविश्वास समजु शकतो – पण हरण्याचा इतका आत्मविश्वास कसा असु शकतो? – ह्या प्रश्नाच्या उत्तरातच निवडणुकीचं विश्लेषण दडलंय.

काँग्रेस आणि भाजपचं समोरासमोर युद्ध झालं तर काँग्रेसच्या पराजयवर शिक्का मोर्तब खुद्द काँग्रेस आणि त्याचे नेते हे स्वतःच करतात, भाजप तर निव्वळ विजयाची पताका फडकावते.

आतापर्यंतच्या माझ्या अनेक निवडणुक विश्लेषण पोस्टमध्ये मी “भाजप का जिंकली” चं आकलन होऊ शकणारे मुद्दे मांडले आहेत. मग ते बुथ स्तरावरचं मायक्रो मॅनेजमेंट असेल, प्रयत्नपूर्वक वाढवलेले मतदान असेल की मोदींची जादू जादु ज्याच्यामुळे भाजप हे निवडणुक जिंकण्याचे मशीन झालंय.

पण आज मात्र मी या कुठल्याही मुद्याला स्पर्श करणार नाहीय, आजचं विश्लेषण असेल ते – “काँग्रेस का हरली” ह्यावरचं.

 

 

आजची परिस्थिती काय आहे सांगु, जमिनी हकीकत सांगतो कारण मी जमिनीवर काम करणारा माणुस आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एक भावना आहे की –

कितीही माथाटेकी केली तरी शेवटी अमित शहा तळ ठोकायला येणार, भाजपमध्ये कितीही गटातटाचं राजकारण असलं तरी शहा त्याला टाच लावणार, कमीतकमी कुरकुरी शिवाय उमेदवार निवडले जाणार, बुथ स्तरावरची त्यांची टीम आकडे आणि जमिनी हकीकत ह्यांची सांगड घालणार आणि भाजप निवडणुक जिंकणार.

ही भीतीच आहे ज्यातून ही भावना येते की काही केलं तरी आपण हरणारच आहोत. हीच भावना घात करतेय. सिद्धारामय्या सरकार वाईट होतं का?? मी म्हणेन “नाही. वाईट नव्हतं!”…! पण नेमकं घोडं इथे अडलं की लोकांपर्यंत काँग्रेस पोहचलीच नाही. सिद्धारामय्या सरकारची कामं पोहचली नाहीत. अर्थात त्यांनी “खूप” कामं केलीत ह्यातला प्रकार नाही, पण जी काही केली ती तरी पोहचली का ह्याचं उत्तर नाही असं आहे.

कारण मुळात राहुल असो की सिद्धारामय्या, सगळे मोदींवर टीका करणार, मग काय मोदी ह्या फूलटॉस वर कोट्या करत सिक्स मारणार आणि काँग्रेस त्याच कोट्या मध्ये सव्यपासव्य करत बसणार. मतदारांकडे काय संदेश जातोय? – ह्यांची कामं काय माहिती नाही. हे नुसते मोदी मोदी करणार आणि तिकडे मोदी राज्यमागून राज्य जिंकत चाललेत. गडकरी-गोयल ह्यांनी केलेली विकास कामं दिसताहेत. रस्ते, वीज, गॅस कनेक्शन ह्या लोकांना त्यांच्या डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टी असतात.

वरून मोदी सतत घसा कोकलून सांगतात की “हे हे आम्ही दिलं!”.

 

narendra-modi-marathipizza
indianexpress.com

तर ह्या सगळ्या ऑरा नंतर राज्यात भाजपनी गाढव उभा केलाय की मनुष्य हे न बघता, त्या मोदी नावाच्या माणसाला आणि केंद्रात त्यांच्या टीमनी लोकांना दिसेल इतक्या केलेल्या कामाला लोक मतं देतात. इतका सरळ आणि सोपी विषय आहे हा.

सामान्य लोकांना impeachment वगैरे ह्या गोष्टींमध्ये रस नसतो. आणि वरून – तुम्ही जिंकला की EVM खरं आणि तुम्ही हरलात की EVM hack हा पोरखेळ काँग्रेस खेळणार असेल तर लोक का म्हणून त्यांना गांभीर्याने घेतील? जोपर्यंत काँग्रेस स्थानिक कार्यकर्ता-नेत्यांना वाव देत नाहीत, आपलं पक्ष संघटन मजबूत करत नाही आणि सगळ्यात महत्वाचं – गांधी घराण्याकडे तारणहार म्हणून बघणं बंद करत नाही तोपर्यंत काँग्रेसचं भविष्य अंधकारमयच असेल.

ह्या निवडणुकांचे पडसाद काय उमटतील?

२०१९ साठी ज्या उत्तरेतील जागा भाजपच्या कमी होणार आहेत त्याची बेगमी कर्नाटकातून पूर्ण होईल.

भाजप आता मोर्चा तामिळनाडू कडे वळवेल. तिथे रजनीकांत आणि भाजप ह्यांच्यामध्ये युती होण्याची शक्यता अधिक बळावेल. त्याचवेळी कमल हासन ह्याचा पक्ष हा तामिळनाडू मधील आप बनण्याच्या मार्गावर लागेल.

येणाऱ्या डिसेंबर मध्ये ज्या ३ राज्यांमध्ये कर्नाटक निवडणुकांचा परिणाम दिसेल. ह्यातील एक राज्य – म्हणजे राजस्थान – काँग्रेस जिंकू शकेल – जर आतापासून सचिन पायलट ह्यांना काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने फ्री हँड दिला तर.

बाकी मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ इथे भाजपला फायदा आहे. अगदी ज्योतिरादित्य ह्यांना काँग्रेस ने मैदानात उतरविले तरीही. केंद्रीय स्तरावर तिसऱ्या आघाडीची शिट्टी परत वाजायला सुरुवात होईल, ममतांची आजची प्रतिक्रिया बोलकी आहे ह्या विषयावर. कारण एव्हाना सगळ्यांनाच माहिती झालंय काँग्रेस ही आता भाकड गाय झालीय. त्यामुळे “तिला पोसण्यापेक्षा तिला आहे त्या परिस्थितीत सोडणं जास्त इष्ट नाही का?” हाच विचार सर्वजण करताहेत.

निवडणुकांच्या आधी जवळजवळ ३ महिने मी कर्नाटकात ठाण मांडून बसलो होतो. (अर्थात माझ्या ऑफिसच्या कामाने!) फारसा प्रवास झाला नव्हता, कार्यकर्त्यांशी बोलणं झालं नव्हतं-  तरी ज्या काही मोजक्या सामान्य लोकांशी रोज बोलणं व्हायचं त्यातून मी एक अंदाज काढला होता की – भाजप नक्कीच प्रथम क्रमांकावर असेल. जमलंच तर काठावरच बहुमत घेईल आणि जेडीएसच्या आधाराशिवाय सत्ता स्थापन करेल.

तो अंदाज आज अचूक ठरलाय ह्याचा आनंद आहे. सगळ्या विजयी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्या पाठिराख्यांचं अभिनंदन. आणि काँग्रेसने ह्यातून धडा शिकून पराभव श्रुंखला तोडावी ह्यासाठी शुभेच्छा.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?