Site icon InMarathi

जेव्हा एका मुस्लिम सेनापतीने वाचवला महाराणा प्रतापांचा जीव

pratap-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

राजस्थानची भूमी ही कायम वीरांची आणि महापुरुषांची भूमी म्हणून ओळखली जाते. त्याच वीरांपैकी एक महावीर म्हणजे महाराणा प्रताप.

१५७६ मध्ये हल्दीघाटीमध्ये महाराणा प्रताप आणि अकबरामध्ये असे युद्ध झाले होते, जे संपूर्ण जगासाठी आजही आदर्श आहे. महाराणा प्रताप यांनी सर्वात शक्तीशाली अशा मुघल बादशाह अकबराच्या ८५००० सैनिकांच्या विशाल सैन्या समोर आपल्या केवळ २०००० सैनिक आणि तोकड्या शस्त्रास्त्रांच्या आधारे अनेक वर्षे संघर्ष केला.

सलग ३० वर्षांच्या प्रयत्नांनंतरही अकबराला महाराणा प्रताप यांना बंदी बनवता आले नाही. एवढेच नाही तर, महाराणा प्रताप यांच्या मृत्यूची बातमी ऐकूण अकबर अक्षरशः रडला होता.

महाराणा प्रताप यांच्या युद्ध नीतीचे सर्वांनाच कौतुक वाटायचे. सगळीकडे त्यांच्या स्तुतीचे पोवाडे गायले जायचे. त्यामुळेच या योद्ध्याचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा अकबरालाही अश्रू आवरता आले नाही.

महाराणा प्रताप हे एवढे उदार राजा होते की, युद्धात राणींना बंदी बनवल्यानंतर अत्यंत सन्मानाने ते त्यांना परत देखील पाठवायचे.

ते एक उत्कृष्ट राजे होते, त्यासोबतच ते त्यांच्या सैन्याची प्रेरणा देखील होते. कुठल्याही परिस्थितीत त्यांनी कधीही शत्रूसमोर हत्यारे टाकली नाहीत, पराजय स्वीकारली नाही. वेळप्रसंगी जंगलात कंद मुळे खात सुद्धा त्यांनी युद्ध सुरू ठेवले.

 

zeenews.india.com

आज आपण पाहणार आहोत अकबराविरुद्ध महाराणा प्रतापांच्या बाजूने युद्ध लढणाऱ्या हकीम खाँ सूर याची रोमांचकारक, चित्तथरारक गोष्ट. महाराणा उदय सिंह यांच्या शासनकाळात कर्बला योद्ध्यांच्या वंशजांपैकी एक हकीम खां सूर मेवाड त्याच्या राज्यात आला.

हकीम खाँ सूर म्हणजे तो, ज्याच्याशिवाय हल्दी घाटीची लढाईची गोष्ट अपूर्ण आहे. हकीम या युद्धात महाराणा प्रतापांसोबत उभा राहिला. एवढंच नाही तर त्याने महाराणा प्रताप यांच्या सेनेला कित्येक डावपेच ही शिकवले.

१५७६ च्या हल्दी घाटीच्या लढाईत त्याने स्वतः मुस्लिम असून सुद्धा आपल्या राष्ट्राचे स्वातंत्र्य आणि विश्वास अबाधित राखण्यासाठी मुघलांविरुद्ध म्हणजेच पर्यायाने स्वतःच्या भाऊबंदांविरुद्ध लढा दिला होता.

अशा प्रकारे मेवाडचे स्वातंत्र्य आणि सन्मान कायम राखण्यासाठी चालू असलेल्या लढाईत त्याने स्वतःच्या प्राणांची आहुती दिली होती. हल्दीघाटीचे युद्ध चुकीच्या पद्धतीने हिंदू-मुस्लिमांमधील संघर्ष असल्याचे मानले जाते. मात्र वस्तुस्थिती तशी नव्हती.

दोन्हीकडच्या सैन्यात हिंदू मुस्लिम असे दोन्ही सैनिक होते. हाकिम खान सुर ने राणा प्रताप यांच्याकडून युद्ध लढले होते तर अकबर राजाच्या सेनेचे सेनापती जयपुरचे राजा मानसिंह हे राजपूत होते. हकीम खाँ सूर (हा हाकिम सोज खान अफगान या नावाने देखील ओळखला जातो.)

 

indiatoday.in

हकीम खाँ सूरी आणि महाराणा प्रतापांनी अकबर आणि राजा मानसिंह यांच्या विरुद्ध हल्दीघाटीमध्ये युद्ध केले. हल्दीघाटीची लढाई ही साम्राज्यवादी आणि विस्तारवादी धोरणाविरुद्ध लढली गेली होती. ही लढाई धार्मिक किंवा सांप्रदायिक नव्हती.

हकीम खाँ राणा प्रताप यांच्या विश्वासू व्यक्तींपैकी एक होते आणि त्यांच्या मदतीमुळेेच महाराणा प्रताप युद्धभूमीवर सुखरूप राहिले. हकीम हे असाधारण वीरता, बहादुरी, त्याग, ईमानदारी, विश्वास आणि आपल्या कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेचं एक अप्रतिम उदाहरण आहे.

महाराणा प्रताप आणि अकबराची सेना यांच्यात जे युद्ध झाले, त्या युद्धात मेवाडच्या सेनापतीचे म्हणजेच हकीम खाँ सूर यांचे शीर धडापासून वेगळे झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.

युद्धात जिथे त्याचं धड पडलं तिथे त्यांची समाधी बनविण्यात आली. असं सांगतात की, शीर धडावेगळे होऊनसुद्धा ते काही काळ त्यांच्या घोड्यावरच योद्ध्यासारखे बसले होते. जिथे त्यांचे धड पडले ती जागा रक्त तलाई, खमनौर गावात आहे.

त्यानंतर महाराणा प्रताप यांनी त्यांच्या हातातून तलवार सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या मुठीतून तलवार सुटली नाही. म्हणून त्यांना त्यांच्या तलवारीसोबत दफन करण्यात आले.

त्यानंतर रक्त तलाईपासून तीन किलोमीटर अंतरावर जिथे त्यांचे शीर घोड्यावरून खाली पडले तिथे देखील त्यांची समाधी बांधण्यात आली आहे.

 

indiaopines.com

त्यांना मुस्लिम संताचा दर्जा देण्यात आला.

इथे हिंदू-मुस्लिम जनसमुदायाचे लोक आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून मागणं मागायला येतात.

हकीम खाँ सूरबद्दल हे ही जाणून घेऊयात :

हकीम खाँ सूर हे अफगाणी मुस्लिम पठाण होते. ते महाराणा प्रतापांच्या तोफखान्याचे प्रमुख होते.

ते त्याआधी आमरचे राजे जयसिंहाचे सेनापती होते. हकीम खाँ शेरशाह सूर राजवटीचे वारसदार होते. मात्र मुघलांनी हकीम खाँ चे साम्राज्य बळकावले.त्यानंतर ते महाराणा प्रतापाच्या सेनेत आपले १५०० सैनिकांना घेऊन सामील झाले.

असं म्हणतात की, हकीम खाँ सूर हे लाहोरी युद्धकालांमध्ये तरबेज होते. त्यांनी मेवाडच्या सैनिकांना सर्वप्रथम शिरस्त्राण घालून लढायला शिकवले.

हल्दी घाटीच्या युद्धात ते अकबराच्या सेनेविरुद्ध महाराणा प्रतापाच्या सैन्याचे सेनापती म्हणून उभे राहिले.

 

freepressjournal.in

अकबराचे सेनापती जयपूरचे राजा मानसिंह होते.

सुरुवातीला डोंगरावर होती हकीम यांची समाधी :

हल्दी घाटीमध्ये कैक वर्षांपूर्वी ही समाधी डोंगरावर होती. तेव्हा रस्ता दोन डोंगरांमधून जात असे. ह्या समाधीला ऐतिहासिक वास्तूचा दर्जा दिला गेला आणि त्या रस्त्याच्या डावीकडील डोंगर खोदून रस्ता बनविण्यात आला. नवीन वळणदार रस्त्यावर त्यांची समाधी त्या रस्त्याच्या सुरुवातीलाच जमिनीलगत आहे.

इथे दरवर्षी या प्रसंगाची आठवण म्हणून समारंभाचे आयोजन केले जाते. हकीम खाँ सूर यांच्या सन्मानार्थ महाराणा मेवाड़ चैरिटेबल फाउंडेशन, उदयपुर द्वारा प्रतिवर्षी एक पुरस्कार राष्ट्रीय एकतेसाठी दिला जातो.

त्यांचे बलिदान धार्मिक आणि सांप्रदायिक विचारांपालिकडे जाऊन चांगल्या विचारांशी एकनिष्ठ असण्याचे आणि मानवी धर्माशी कटिबद्ध असण्याचे महत्त्व अधोरेखित करते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version