Site icon InMarathi

नेहरू, संघ अन राजकारण्यांच्या सर्कशीत जोकर होऊन बसलेले विचारवंत

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

निवडणूक ज्वर देशभरात वाढत जातोय. सर्व पक्षांचा “आवाज” उंचावतोय, गोंगाट निर्माण होत आहे. ह्या गोंगाटात ज्याचा आवाज सर्वोच्च तोच बाजी मारणार असं चित्र असल्याने तीव्रता भेदक होत जाणार हे स्पष्टच आहे. परंतु आधी म्हटल्याप्रमाणे होत असलेला आरडाओरडा (सर्वच बाजूंनी) निव्वळ गोंगाट आहे. त्यात व्हॅलिड ऑर्ग्यूमेंट्स, महत्वाचे मुद्दे दिसत नाहीत. कोणकोणत्या मुद्द्यांवर भर दिला जातो ह्यावरूनच हे स्पष्ट दिसत आहे.

नेहरूंनी यंव केलं अन त्यंव केलं नाही म्हणून रडणारे पंत्रप्रधान. आणि त्यावर संघाने स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नाही हा आक्षेप घेणारे विरोधक. सगळेच धन्य आहेत. आणि म्हणूनच लोकशाहीची प्रमुख ओळख असलेली “निवडणूक” म्हणजे लोकशाहीची सर्वात मोठी थट्टाच होऊन बसली आहे.

 

zeenews.india.com

मोदी नेहरूंचा विषय काढण्यामागे कारण आहे – २०१४ पूर्वी विरोधकाच्या भूमिकेत असलेले पंतप्रधान आज मात्र incumbent आहेत. त्यामुळे गेल्या ४ वर्षांचा हिशेब देण्याऐवजी प्राचीन इतिहासात आम्हाला डुंबत ठेवत आहेत. दुसरीकडे, विरोधी पक्षसुद्धा factual टीका करताना फारशी दिसत नाही.काँग्रेस तर ” ह्या ४ वर्षाचा हिशेब मागण्याची आमची नैतिक बिशाद नाही म्हणून” विरोधासाठी विरोध करत आहे हे स्पष्ट दिसतंय.

पण ही समस्या नाही. पक्षांची आपापले धोरणं आहेतच. पण ह्या सर्कशीत दोन्हीकडील भक्त संप्रदाय स्वतःचा जोकर करून घेतात हे वाईट आहे.

भाजप समर्थक तरी काँग्रेसला व्हॅलिड प्रश्न कुठे विचारतात?! काँग्रेस समर्थक सुद्धा नेहरू-गांधीजी सोडून काय बोलतात? वर्तमानात जगायचं आहे की नाही?

काँग्रेसवर अर्थातच ७० वर्षांत उभ्या केलेल्या समस्यांचं ओझं आहे. बाबूशाही ते घराणेशाही, लाल फितीचा कारभार ते लाल बावट्याचा स्वैराचार, शाळांचं भकासपण ते सरकारी दवाखान्यांचं बकालपण – सगळ्या समस्या काँग्रेसनेच उभ्या केलेल्या आहेत. पण जे आहे ते आहे – ह्यापुढे ही परिस्थिती आम्ही कशी बदलणार आहोत – हे सांगणारा आवाज काँग्रेसकडून का येऊ नये?

काँग्रेसने २०१९ – २४ चं व्हिजन जोरकसपणे समोर ठेवायला हवं, जो कुणी त्यांचा नेता असेल त्याने गरिबी हटाव पासून रोजगार हमी पर्यंतचा आलेख मांडावा आणि तो भविष्यात कसा उंचावर नेता येईल हे स्पष्ट समजावून सांगावं.

 

dnaindia.com

आणि हे काँग्रेस समर्थकांनी घडवून आणायला पाहिजे…देशासाठीच जगताय ना? मग विचारा की आपल्या पक्षाला!

भाजपवर जरी ४ वर्षांच्याच सरकारचं तुलनेने थोड्या काळाचं ओझं असलं, तरी ७० वर्षांतील “शरमेने मान खाली घालावी लागायची” असं वास्तव बदलण्याचं ओझं खुद्द पंतप्रधानच घेऊन चालत होते. आता मात्र मुलाखतीत बोलताना “पूर्वीच्या सरकारशी तुलना करता” आम्ही चांगले आहोत असं लंगडं समर्थन करत आहेत. खोटे, अर्धसत्य आकडे, मार्केटिंगचा भपका, प्रचाराचा धुराळा ह्यातून अस्पष्ट दिसणारी वास्तविकता निवडणुकीच्या काळात उघडी पडणारच. त्यावर काय उत्तर देताहेत सत्ताधारी लोक?

नोटबंदी चा नेमका काय फायदा झाला? मेक इन इंडिया तील भल्या मोठ्या आकड्यांच्या करारांपैकी किती उभे राहिले? सार्वजनिक शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नेमकं कोणतं व्यवस्था परिवर्तन घडवून आणलं आहे? गोरखपूर पुन्हा घडू नये ह्यासाठी देशातील सर्व सरकारी इस्पितळांत कोणती उपाययोजना केली आहे? डीएड-बीएड च्या नेमणुकांमधील भ्रष्टाचार कायमस्वरूपी संपवण्यासाठी काय केलं आहे?

ह्या प्रश्नांवर उत्तर मिळायला पाहिजे भाजपकडून. हे प्रश्न “राष्ट्रवादी” समर्थकांनी विचारायलाच पाहिजेत.

सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं – हे फक्त राजकीय विरोधी पक्षांचं काम नाही. सर्वांचंच काम आहे. त्याचवेळी – निवडणुकीच्या काळात इतर पक्षांनीदेखील केवळ विरोध नं करता आपलं व्हिजन मांडणं अपेक्षित आहे.

 

पण म्हटलं ना…आपल्याकडे राजकीय पक्षांनी लावलेल्या सर्कशीत जोकर ची भूमिका पार पाडणारे “विचारवंत” लोक तयार झालेत. युनिव्हर्सिटीत शिक्षण चांगलं होतंय की नाही – ह्याची कुणाला फिकर पडली नाहीये. फोटो कुणाचा लावायचा – हा महत्वाचा प्रश्न आहे.

“पहिली महिला डॉक्टर” कोण होती – ह्यावर वाद होतात. आहेत त्या सरकारी डॉक्टर्सचे हाल कमी करून एकंदरीत सरकारी आरोग्य सेवा उत्तम करण्याकडे लक्ष नाहीये.

आसिफा साठी बोर्ड घेण्यास तत्पर असणारे आणि त्या प्रकरणात धर्म आणल्यावर चटकन आक्षेप उपस्थित करणारे – “ह्या पुढे काय?” हे विचारत नाहीत. एवढंच नाही – जर कुणी सोल्युशन मांडत असेल तर त्या चर्चांकडे फिरकत सुद्धा नाहीत! निर्लज्ज आहेत की दांभिक? की दोन्ही?

निर्ढावलेले राजकारणी आणि वरपांगी भांडणं करणारे प्रस्थापित “विचारवंत” – हे आमचं वास्तव आहे.

लोकशाहीची सर्कस होणार नाही तर काय?

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version