Site icon InMarathi

रिअल लाईफ सिंघम ठरलेल्या हिमांशू रॉय यांची शॉकिंग एक्झिट…

himanshu roy featured inmarathi

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखक : समीर गायकवाड

===

मागील दीड वर्षापासून वैद्यकीय रजेवर असलेले महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलिस महासंचालक हिमांशू रॉय यांनी बोन कॅन्सरला कंटाळून आत्महत्या केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते कॅन्सरने त्रस्त होते. रॉय यांनी स्वतःच्या बंदुकीनेच दुपारी दोनच्या सुमारास स्वतःच्या तोंडात गोळी झाडून घेतली.

त्यांनी मुंबईतील मंत्रालयासमोरील सुरुची या शासकीय इमारतीतील निवासस्थानी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झालेय.

 

आजारपणामुळे ते कमालीचे अस्वस्थ होते. त्यांनी महागडे उपचार सुरु केले होते. त्यासाठी त्यांनी अनेकवेळा परदेश वाऱ्याही केल्या. मात्र, ते खूप निराश झाल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचल्याचे सांगण्यात येत आहे.

व्यायामाची प्रचंड आवड असलेले हिमांशू रॉय हे उंचेपुरे आणि धिप्पाड होते. त्यांच्या शरीरयष्टीवर बॉलीवूड स्टार्स देखील फिदा होत असत. चमकोगिरीपासून दूर राहणारे आणि आपल्या कर्तव्यात कदापिही कसूर न करणारे रॉय हे राज्याच्या एटीएस प्रमुखपदावरही कार्यरत होते. देखण्या व्यक्तीमत्वाचे हिमांशू रॉय हे अत्यंत डॅशिंग अधिकारी म्हणून पोलिस दलात आणि संपूर्ण राज्यात परिचित होते.

ते १९८८ च्या बॅचचे अधिकारी होते. अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी अत्यंत चांगल्याप्रकारे तपास पूर्ण करत प्रकरणांचा छडा लावला होता. या प्रकरणांमध्ये प्रामुख्याने ललित मोदी – बेटींग प्रकरण, आयपीएल स्पॉट फिक्सिंग, लैला खान हत्या प्रकरण, पत्रकार जे डे हत्या प्रकरण यासह अनेक एटीएस प्रकरणांमध्ये त्यांनी महत्त्वाची कामगिरी पार पाडली होती.

गेल्या काही काळापासून हाडाच्या कॅन्सरच्या वेदनांनी त्यांना प्रचंड त्रास होत होता, असे त्यांच्या बरोबर असलेले सहकारी सांगत असत. त्यांना भेटायला गेले असता त्यांना वेदना पाहणेही शक्य होत नसल्याचे त्यांचे सहकारी सांगतात. या वेदनांना कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

हिमांशू रॉय आपल्या शेवटच्या काळात अतिशय हतबल झाले होते, असे सांगण्यात येत होते. त्यांनी मोठ्या प्रमाणावर स्टेरॉइड्सचे सेवन केल्यामुळे त्यांच्या शरिरावर त्याचा परिणाम झाला होता, अशीही एक चर्चा आहे आणि त्यात तथ्य असावे कारण अशीच दुर्धर अवस्था अनेक बॉडी बिल्डर्सची झाली असल्याचे या दशकात समोर आलेय.

एका धाडसी पोलिस अधिकारयाचा अशा प्रकारे अंत व्हायला नको होता. स्टेरॉइड्समुळे जर त्यांचा मृत्यू ओढवला असेल तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक विनाशाकडेच घेऊन जातो हे या निमित्ताने पुन्हा अधोरेखित होईल.

अनेक महत्वाच्या गुन्ह्यांची उकल करणारया आणि पोलिस दलात वेगळी प्रतिमा निर्माण करून आपला दबदबा निर्माण करणारया रॉय यांच्यासारख्या अत्युच्च पदावरच्या पोलिस अधिकारयाने केलेल्या आत्महत्येने मुंबई पोलिसांसह राज्यातील तमाम पोलिसांना धक्का बसणार आहे.

आधीच तणावाचे जीवन जगणारया सामान्य पोलिसांचे आत्मबल खच्ची होईल अशी ही घटना सर्वसामान्य नागरिकांनाही चटका लावून जाणारी आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version