आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक : दत्ता जोशी, मुक्त पत्रकार, औरंगाबाद.
===
मागील काही महिन्यांपासून पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याबद्दल बरेच काही घडले. पण आज दि. 10 मे 2018 पर्यंत मी या विषयावर काहीही लिहिलेले नव्हते. एक तर मी व्यक्तिशः त्यांना ओळखत नाही.
मी त्यांच्या कंपनीकडून कधीही कसलीही खरेदी केलेली नाही किंवा त्यांच्या कुठल्याही संस्थेत मी गुंतवणूक केलेली नाही. त्यामुळे त्यांचा व्यवहार कसा आहे या विषयी माझ्याकडे फर्स्ट हँड म्हणता येईल अशी कुठलीही माहिती नाही.
अशा अनभिज्ञतेमुळे त्या विषयावर मी काही लिहावे, असे मला वाटले नाही. वरवरचे लिहून काहीतरी सनसनाटी माजवायची हा माझा स्वभाव नाही.
मला यात जात, धर्म, बिझनेसमधील शत्रुत्व, त्यांच्याकडून दुखावलेल्यांनी उगवलेला सूड वगैरेंपैकी कुठलाही मुद्दा उपस्थित करायचा नाही. इथे मी फक्त कायदा आणि आंत्रप्रिन्योरशिप अर्थात उद्योजकता या दोनच मुद्द्यांवर चर्चा करणार आहे.
आज मला काही लिहावेसे वाटते आहे. त्याची दोन कारणे आहेत. पहिले कारण, अर्थातच डीएसके आणि त्यांच्या पत्नीचा ‘हाती पाटी घेतलेला’, गुन्ह्याची कलमे लिहिलेला व्हायरल झालेला फोटो.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
आणि दुसरे… याच संदर्भात मराठवाड्यातील उद्योग जगतात प्रतिष्ठेच्या पदार कार्यरत दोन आंत्रप्रिन्योर्सनी या बाबत मांडलेली भूमिका, त्यांच्याशी झालेली माझी चर्चा आणि हा दृष्टीकोन समाजापर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा आग्रह.
ते आहेत ‘चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर’चे विद्यमान अध्यक्ष श्री. प्रसाद कोकीळ आणि पूर्व अध्यक्ष श्री. सुनील रायठठ्ठा.
नव्या पिढीतील उद्योजकता विकासाच्या प्रक्रियेत त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे.
–
- परदेशात अब्जावधी कमावत असूनही भारतीयांना नोकरी देणारा ‘दिलदार मनाचा माणूस’!
- मृत्यूला हसत हसत आलिंगन देणा-या महाराष्ट्राच्या या सुपुत्राला सलाम!
–
उद्योजकतेतील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जोखीम उचलण्याचा असतो. डी. एस. कुलकर्णी यांनी एकेकाळी त्याच पुण्यात दुकानाच्या पाट्या पुसल्या, टेलिफोन यंंत्रांची नीगा राखली. आपल्या कर्तृत्वाने ते उभे राहिले. त्यासाठी त्यांनी त्यांची व्यावसायिक कौशल्ये वापरली.
प्रारंभापासून गतवर्षीपर्यंत त्यांचा आलेख सतत चढता होता, हे सगळ्यांनाच मान्य असावे. फरक पडला तो विशेषत्वाने नोटाबंदीनंतर. नोटाबंदीनंतर रोखीतील बाजार पूर्णपणे कोलमडला. जमिनीचे व्यवहार रसातळाला गेले.
जागांच्या किमती खाली आल्या आणि त्यात असंख्य बांधकाम व्यावसायिकांना फटके बसले.
कुलकर्णी यांना बसलेला फटका थोडा मोठा असावा, किंवा त्यात ते इतरांपेक्षा अधिक उघडे पडले असावेत. कारण जवळवळ सर्व बांधकाम व्यावसायिकांना नोटाबंदीचा फटका बसलेला आहेच.
उद्योगाच्या क्षेत्रात चढउतार येत असतात. यशस्वीपणे वाटचाल सुरू असेल तर ती महत्वाकांक्षा गणली जाते आणि उतरता आलेख सुरू झाला की तो हव्यास बनतो. हे मराठी मानसिकतेचे दुर्दैवी वैशिष्ट्य आहे. ही मानसिकता उद्योजकतेला प्रोत्साहन न देता खच्चीकरण करणारी आहे.
हे चुकीचे आहे.
व्यवसायात निर्णय चुकीचे ठरू शकतात. तपासायचेच असतील तर त्या मागचे उद्देश तपासायचे असतात.
डीएसके यांनी त्यांचे व्यवहार किती स्वस्त किंवा महाग केले, त्यांनी ग्राहकांची फसवणूक केली का, दिलेले शब्द पाळले की नाही हा सारा कायदेशीर तपासाचा आणि कारवाईचा विषय आहे. ते जिथे चुकले असतील तिथे कायद्याप्रमाणे कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे.
पण त्याच वेळी त्यांना त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली गेली पाहिजे.
मला इथे असा मुद्दा मांडायचा आहे, की याच न्यायाने आपण व्हिडिओकॉन ग्रुपचा सुद्धा एकदा विचार करायला हवा. प्रारंभापासून दोन वर्षांपूर्वीपर्यंत उत्तम चालणारा व्हिडिओकॉन ग्रुप त्यांनी तेलव्यवहारांत केलेल्या गुंतवणुकीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कोसळलेल्या तेलाच्या भावांमुळे पूर्णतः कोसळला.
ते तर सुमारे 40 हजार कोटींचे डिफॉल्टर आहेत, असे मानले जाते. राजकुमार धूत किंवा त्यांच्या कुटुंबियांचे अशा स्थितीत काय करायचे?
डी. एस. कुलकर्णी यांचा पाटी हाती घेतलेला फोटो पाहून मला दोन व्यक्ती आठवल्या.
पहिले अर्थातच लालूप्रसाद यादव.
कोट्यवधींच्या गैरव्यवहारात विशेष न्यायालयाने विविध खटल्यांत त्यांना दोषी ठरविलेले आहे. ते शिक्षा भोगत आहेत. पण तरीही त्यांचा असा ‘पाटी हाती घेतलेला’ फोटो कधी कुणी समोर आणला नाही.
दुसरे उदाहरण महाराष्ट्रातील छगन भुजबळ यांचे.
त्यांना भ्रष्टाचार प्रकरणी अटक झाली. त्यांच्यावरील खटला सुरू आहे. त्यांचे दाढी वाढलेले केविलवाणे फोटो समोर आले. पण ‘हाती पाटी घेतलेला’ फोटो कधी बाहेर आला नाही.
कायद्यातील तरतुदींनुसार या दोघांचेही तसे फोटो घेतले गेलेले आहेत.
–
- ‘वेळच नाहीये’ ही तक्रार आहे? ही समस्या सोडवणाऱ्या, यश मिळवून देणाऱ्या भारी टिप्स!
- अवघ्या १९ व्या वर्षी निधड्या छातीने फाशीला सामोरं जाणाऱ्या भारतीय क्रांतिकारकाची कथा
–
ती कायदेशीर प्रक्रिया आहे. पण ती त्या पातळीवरच मर्यादित असायला हवी. त्या फोटोचा वापर प्रतिमा मलीन करण्यासाठी कुणी, का आणि कशासाठी करावा?
निर्णय चुकल्यामुळे एखादा उद्योग रसातळाला जाणे, दिवाळखोरीत निघणे ही नवी बाब नाही. अमेरिकेसारख्या देशात दिवाळखोरीसाठी खास कायदे आहेत. त्यात संबंधित उद्योगाची छाननी होती. वसुलीसाठी हाती असलेल्या सर्व साधनांचा वापर केला जातो. अखेर त्याला दिवाळखोर जाहीर करण्यात येते.
पण त्याला आयुष्यातून उठवले जात नाही. त्याला नव्याने उभे राहण्याची संधी दिली जाते. कायदा आणि समाज त्याच्या पाठीशी उभा राहतो.
मराठी माणसात सुद्धा ही वृत्ती भिनायला हवी.
भारतातील कायदे कदाचित वेगळे असतील. येथे दिवाळखोरीत निघालेल्या व्यक्तीने आयुष्यात पुन्हा उभे राहण्याची हिंमतच करू नये अशा प्रकारची रचना कायद्यात आणि समाजात दिसते.
त्याला आज या क्षणी काही पर्याय नाही. पण जे काही कायद्यान्वये मान्य आहे तेच व्हावयास हवे.
नव्या पिढीसाठी उद्योजकतेची उदाहरणे पुस्तकरूपाने ठेवणार्या माझ्यासारख्या लेखकाला डीएसके यांची अनुचित बदनामी हा उद्योजकतेच्या विकासात असलेला मोठा अडथळा वाटतो.
उद्योगात चुका होऊ शकतात, पण चुकल्यानंतर हा समाज आणि येथील व्यवस्था त्याची अवस्था अशी करणार असेल तर आयुष्यात उद्योजक म्हणून उभा राहू इच्छिणारा तरु़ण चार वेळा विचार करेल.
आणि ‘नोकरी देणारे’ निर्माण झाले नाहीत तर नोकरी करणार्यांची अवस्था काय होईल? त्यांना नोकर्या कुठून मिळतील?
मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो, डी. एस. कुलकर्णी यांच्याबद्दल माझ्या मनात कसलाही नकारात्मक किंवा सकारात्मक पूर्वग्रह नाही.
त्यांची भलावण करण्यासाठी मी हे लिहीत नाही. त्यांच्यावरील आरोपांबाबत मी एक शब्द काढलेला नाही. त्याच्या सत्यासत्याबाबत चर्चा केलेली नाही. त्यांच्यावरील आरोपांना त्यांनी उत्तरे द्यावीत.
जी काही भरपाई त्यांच्याकडून कायद्याने अपेक्षित असेल त्याची पूर्तता त्यांनी करावी. कायद्याने त्यांना दिलेली शिक्षा त्यांनी भोगावी. ती कितीही कठोरात कठोर असेल, त्याला त्यांनी तोंड द्यावे.
बँकांना बुडवून भारताबाहेर गेलेल्यांच्या तुलनेत डी.एस. कुलकर्णी यांच्याकडे ‘विक्री करून पैसा वसूल करता येण्याजोगे अॅसेट’ बरेच आहेत. त्याची विक्री करून आर्थिक नुकसानीची व्याजासहीत भरपाई शक्य असते. पण त्यासाठी थोडी उसंत देणेही गरजेचे आहे.
पण या परिस्थितीत काही विशिष्ट हेतूने या दाम्पत्याचे असे फोटो प्रसृत करून त्या आडून सुरू असलेली डीएसके यांची आणि त्यांच्या पत्नीचीही (होय, त्यांच्या पत्नीचेही असे फोटो व्हायरल झालेले आहेत) होणारी अनुचित बदनामी थांबली पाहिजे आणि उद्योजकतेच्या स्वच्छ दृष्टीतून या प्रकरणाकडे पाहिले गेले पाहिजे.
मला फक्त एकच आवाहन करायचे आहे, ज्याचा दोष असेल त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा होऊ द्या. पण त्याच्यातील उद्योजकतेची वृत्ती मारू नका.
अशा अनुभवातून गेलेले उद्योजक पुढच्या पिढीसाठी मोलाचे मार्गदर्शकही ठरू शकतात. त्यांच्यातील दोषांची शिक्षा द्या पण गुणांचा वापर समाजाच्या, देशाच्या भल्यासाठी करून घ्या
आणि फोटोच व्हायरल करायचाय तर सोबतचा फोटो कॉपी करा…
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.