Site icon InMarathi

स्वतःच्या सौंदर्यामुळे रक्तपात होऊ नये म्हणून ती वेश्या झाली. बुद्धांनी केला उद्धार!

buddha-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ही गोष्ट आहे भारतीय इतिहासातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आम्रपालीची, जिला आपल्या सौंदर्याची किंमत वेश्या बनून चुकवावी लागली.

ती कोणाची पत्नी बनू शकली नाही पण संपूर्ण नगराची नगरवधू मात्र बनली. आम्रपालीने स्वतः या जीवनाची निवड स्वतःसाठी केली नव्हती.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

तर वैशालीनगरीत शांतता टिकून रहावी, गणराज्य अखंड राहावे यासाठी तिचे कोण्या एका पुरुषाशी लग्न लावून तिला नगराच्या स्वाधीन करण्यात आलं होतं.

 

 

तिने कित्येक वर्षं वैशाली नगरीतील धनाढ्य, श्रीमंत माणसांना रिझवलं होतं.

मात्र जेव्हा ती भगवान बुद्धांच्या संपर्कात आली तेव्हा सर्वाचा त्याग करून ती बौद्ध भिक्खीण बनली.

आम्रपालीचे खरे आई-वडील कोण होते ते माहीत नाही. पण ज्या लोकांनी तिचं पालनपोषण केलं त्यांना ती एका आम्रवृक्षाखाली सापडली.

म्हणून त्यांनी तिचं नाव आम्रपाली ठेवलं. ती सौंदर्यवती होती. तिचे डोळे टपोरे होते आणि मुलायम कांती होती. ती ज्या कोणाच्या दृष्टीस पडत असे तो आपली नजर तिच्यावरून हटवू शकत नसे. तो तिच्यावर मोहित होऊन जाई.

पण तिचं हेच सौंदर्य तिच्यासाठी शाप बनलं होतं. एका सर्वसामान्य मुलीप्रमाणे तिलासुद्धा आपलं जीवन आनंदात व्यतीत करायचं होतं. लग्न करून संसार थाटायचा होता. पण असं झालं नाही.

ती आपलं दुःख कधी सांगू शकली नाही. आणि शेवटी जे नियतीने लिहून ठेवलं होतं तेच झालं.

 

हे ही वाचा – जगण्यासाठी शरीराचा सौदा करणारी “ती” आणि तिच्या मुलाची गोष्ट

आम्रपाली जसजशी मोठी होत गेली तसतशा तिच्या सौंदर्याने देखणेपणाच्या सर्व कक्षा ओलांडल्या. यामुळे वैशालीतील प्रत्येक पुरुष तिला आपल्या वधूच्या रुपात पाहण्यासाठी उत्सुक होता.

लोकांमध्ये आम्रपालीबद्दलच्या प्रेमाने हद्द गाठली होती. तिला मिळवण्यासाठी ते वाटेल ते करायला तयार होते. आणि खरी मेख तर इथेच होती.

आम्रपालीचे आई-वडील हे ओळखून होते की आम्रपालीचं लग्न ज्या कोणाशी होईल ती व्यक्ती सोडून इतर सर्वजण त्यांच्याशी वैर पत्करतील आणि वैशालीनगरीत रक्ताचे पाट वाहतील. यामुळेच ते कोणत्याही निर्णयाप्रत पोहोचू शकत नव्हते.

या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी एक दिवस वैशाली नगरीत एक सभा आयोजित करण्यात आली. या सभेत उपस्थित सर्व पुरुष आम्रपालीबरोबर लग्न करू इच्छित होते. या समस्येच्या परिहारासाठी विविध विचार मांडले जात होते.

 

 

मात्र कोणताही विचार हा प्रश्न सोडवू शकत नव्हता. खूपच मोठा पेचप्रसंग उभा राहिला होता.

मात्र सगळ्या चर्चेअंती जो निर्णय घेण्यात आला त्याने आम्रपालीचे भविष्य अंधाराच्या खाईत लोटले गेले.

सर्वसंमतीने आम्रपालीला नगरवधू म्हणजेच वेश्या घोषित करण्यात आलं. असं करण्यात आलं कारण उपस्थित सर्वजण वैशाली राज्याचं प्रजासत्ताक राज्य असणं वाचवू इच्छित होते.

आणि जर कोणा एकाला आम्रपाली मिळाली असती तर त्याच्या एकतेत बाधा येऊ शकली असती.

नगरवधू बनल्यानंतर प्रत्येक जण तिचा उपभोग घेण्यास पात्र होता. त्याच्या इच्छेने तिचा भोग घ्यायला प्रत्येकजण स्वतंत्र होता. अशा तऱ्हेने ती नगरवधू (वेश्या) बनली.

 

 

मात्र आम्रपालीची गोष्टं इथेच संपत नाही. आम्रपालीने नगरवधू बनून कैक वर्षं वैशाली नगरीतील लोकांचं मनोरंजन केलं. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. ती पुढे योगायोगाने भगवान बुद्धांच्या संपर्कात आली आणि अंतर्बाह्य बदलून गेली.

आणि सर्वकाही सोडून एक बौद्ध भिक्खीण बनली. तिची या परिवर्तनाची गोष्ट मनाला चटका लावून जाते.

आम्रपाली आणि बुद्ध

गौतम बुद्ध आपल्या एका प्रवासात वैशाली येथे आले. त्यांच्यासोबत नेहमी हजारो शिष्य असत. सगळे शिष्य दर दिवशी वैशालीनगरीच्या वस्त्यांमध्ये भिक्षा मागायला जात असत.

वैशालीनगरात आम्रपालीचा प्रशस्त महाल होता. ती वैशालीनगरीतील सर्वांत सुंदर स्त्री आणि नगरवधू होती. वैशाली नगरीतील धनाढ्य, श्रीमंत माणसांच्या गळ्यातील ताईत होती. एक दिवस तिच्या दारावर एक भिक्षूक भिक्षा मागण्यासाठी आला.

त्या भिक्षूकाला पाहताक्षणीच ती त्याच्या प्रेमात पडली. दरदिवशी ती राजा आणि राजकुमारांच्या सानिध्यात असायची. पण हाती भिक्षापात्र घेतलेल्या एका भिक्षूकाचं साधेपणातील सौंदर्य तिला भावलं, स्पर्शून गेलं.

ती आपल्या तटबंदीमधून धावत आली आणि त्या भिक्षूकाला म्हणाली “कृपा करून आत या. भिक्षा ग्रहण करा.”

 

 

त्या भिक्षूकासोबत इतरही भिक्षूक होते. त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. जेव्हा तो भिक्षू आम्रपालीच्या कक्षात भिक्षा घेण्यास गेला तेव्हा त्यांना त्याच्याबद्दल ईर्ष्या आणि असूया वाटली. त्यांचा राग अनावर झाला.

भिक्षा दिल्यावर आम्रपालीने युवा भिक्षूकाला म्हटले – “तीन दिवसांनी वर्षाकाळाची सुरुवात होणार आहे. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही चातुर्मासात माझ्या महालात राहावे.”

युवक भिक्षूने म्हटले –

“मला यासाठी माझ्या स्वामींची म्हणजेच भगवान गौतम बुद्धांची अनुमती घ्यावी लागेल. जर त्यांनी परवानगी दिली तरच मी इथे थांबेन.”

तो बाहेर पडल्यावर इतर भिक्षू त्याच्याशी बोलले. त्याने आत घडलेला प्रसंग कथन केला आणि आम्रपालीने केलेल्या विनंतीविषयी सांगितले. ते ऐकून इतर सर्व भिक्षू क्रोधित झाले.

तो एक दिवस भिक्षा मागायला गेला तर त्यांना इतका क्रोध अनावर झाला होता आणि आम्रपालीने तर त्याला चार महिने राहण्याची विनंती केली होती.

हे इतर युवक भिक्षू गौतम बुध्दांजवळ गेले आणि घडलेला वृत्तांत त्यात भर घालून त्यांना कथन केला आणि म्हणाले,

“ती स्त्री वेश्या आहे तर मग एका भिक्षूने चार महिनेे तिथे राहणे कसे योग्य ठरेल ?

गौतम बुद्ध म्हणाले –

“शांत व्हा, त्याला येऊ द्या. अजून त्याने तिच्या वाड्यात राहायचा निश्चय केलेला नाही ना ? तो मी अनुमती दिली तरच तिथे राहील असं सांगून आलाय ना ? मग तो आल्यावर, त्याच्याशी बोलून ठरवू.

 

हे ही वाचा – तिबेटी लोक ज्यांना गौतम बुद्धाचा अवतार मानतात, त्या दलाई लामांची निवड नेमकी कशी होते?

तो युवा भिक्षूक आला आणि त्याने बुद्धांना वंदन करून घडलेला प्रसंग सांगितला.

तो म्हणाला,

“आम्रपाली येथील नगरवधू आहे. तिने चातुर्मासात मला तिच्या महालात राहण्याची विनंती केली आहे. आमच्यातले सगळेच भिक्षू या काळात कोणत्या ना कोणत्या घरात राहणार आहेत.

मी तिला सांगितले आहे की तुम्ही परवानगी दिलीत तरच मी तिच्या महालात राहू शकतो. ”

बुध्दांनी त्याच्या डोळ्यांत पाहिलं आणि ते म्हणाले,

“तू तिथे राहू शकतोस.”

हे ऐकून इतर अनेकांना दुःख झाले.

गौतम बुद्धांनी एक युवा शिष्याला एक वेश्येच्या घरात चार महिने राहण्याची परवानगी दिली ही गोष्ट त्यांना सहन होत नव्हती. तीन दिवसांनी तो शिष्य आम्रपालीच्या महालात राहायला गेला.

गावभर आम्रपालीच्या महालात एक युवा भिक्षूक चार महिने राहणार असल्याची चर्चा सुरू झाली.

बुध्दांनी सांगितले की तुम्ही तुमच्या दिनचर्येचे पालन करा. माझा माझ्या शिष्यावर पूर्णपणे विश्वास आहे.

आता त्याच्या मनात काही वासना उरल्या नाहीत हे मला त्याच्याशी बोलताना जाणवलंय. जरी मी त्याला तिच्या महालात राहण्याची परवानगी दिली नसती तरी त्याला या गोष्टींबद्दल काही खंत वाटली नसती.

मी त्याला परवानगी दिली तेव्हाही तो काहीच न बोलता निघून गेला. तो संयम बाळगेल याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. तुम्ही सगळे जण एवढे व्यथित होऊ नका.

जर तो खरा भिख्खू असेल तर आम्रपाली प्रभावित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तो नसेल तर तो स्वतः आम्रपालीसमोर समर्पित होईल.

हा त्याच्या कसोटीचा क्षण आहे. माझा माझ्या शिष्यावर पूर्णपणे विश्वास आहे. आपण चार महिने वाट पाहुयात. माझी खात्री आहे की तो कसोटीवर खरा उतरेल.

कित्येक भिक्षूंचा यावर विश्वास बसला नाही. त्यांना वाटले बुद्ध उगाचच त्याच्यावर इतका विश्वास ठेवत आहेत. भिक्षूसुद्धा तरुण आहे आणि आम्रपाली खूप सुंदर आहे.

ते आपल्या संघाची प्रतिमा पणाला लावत आहेत. पण ते त्यांच्या आज्ञेबाहेर जाऊन काही करू शकत नव्हते.

म्हणता म्हणता चार महिने झाले. युवा भिक्षूक विहारात परत आला – आणि –

त्याच्या मागोमाग आम्रपाली सुद्धा विहारात प्रवेश करती झाली.

तिने बुद्धांना वंदन केले आणि तिला भिक्षूणी गटात, म्हणजेच महिला गटात प्रवेश द्यावा अशी विनंती केली. ती म्हणाली,

“मी या भिक्षूकाला हरतऱ्हेने माझ्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न केले पण सगळे व्यर्थ ठरले. त्याच्या वागण्याने मला हे मानायला भाग पाडलं की तुमचे चरण हाच मुक्तीचा मार्ग आहे. मी माझी सगळी संपत्ती भिक्षू संघाला दान म्हणून अर्पण करत आहे.”

 

 

आम्रपालीच्या महालाचा उपयोग त्यानंतर चातुर्मासात सर्व भिक्षुकांना राहण्यासाठी केला जाऊ लागला. पुढे जाऊन ती बुद्धांच्या संघातील प्रतिष्ठित भिक्खीणींपेकी एक बनली.

म्हणतात ना, “परिसाच्या संगे लोह बी घडले, लोह बी घडले सुवर्णचि झाले ” तसंच आम्रपालीला बुद्धांच्या रुपात परिसस्पर्श झाला आणि तिचं अवघं जीवनच बदलून गेलं.

===

हे ही वाचा – गौतम बुद्धांच्या १० हस्तमुद्रांचा अर्थ सोप्या भाषेत समजून घ्या!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version