व्हायरल व्हिडीओ: ट्रान्सफॉर्मर्स सत्यात अवतरलाय! : साठ सेकंदात रोबोट होतो ‘स्पोर्ट्स कार’!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
रोबोट एक असं मशीन आहे ज्याने माणसाचं काम खूपंच सोप्प करून टाकलंय. जी गोष्ट करायला आपल्याला तासनतास झटावं लागेल ते काम रोबोट चुटकीसरशी करून टाकतो. म्हटलं तर दिसायला माणसाचं प्रतिरूप, पण त्याची गती, कामाचा वेग माणूस मॅच करू शकणार नाही इतका प्रचंड असतो.
रोबोटवर माणसाचं नियंत्रण असतं. माणूस आपल्या आवश्यकतेनुसार त्याचा वापर करतो.
जपानमध्ये नुकताच असा एक मानवीय रोबोट बनवण्यात आला आहे जो ट्रान्सफॉर्मर सीरीजच्या पिक्चरमध्ये दाखवतात तसा केवळ साठ सेकंदात कारमध्ये रूपांतरित होतो.
ट्रान्सफॉर्मर सिरीज ही सध्याच्या काळातील सर्वात यशस्वी व लोकप्रिय चित्रपट फ्रँचाइज पैकी एक आहे. जिवंत, चालतेफिरते “autobots” जेव्हा लेटेस्ट मॉडेल्सच्या चकचकीत गाड्यांमध्ये स्वतःला “transform” करतात तेव्हा थियेटरमध्ये शिट्ट्यांचा पाऊस पडतो.
आता हे असे robot प्रत्यक्षात अवतरलेत म्हटल्यावर म्हटल्यावर तर धमाल उडाली आहे.
जपानी वैज्ञानिकांचा शोध –
तुम्ही हॉलिवूडच्या ट्रान्सफॉर्मर सीरीजचे चित्रपट पहिलेच असतील ज्यामध्ये मुख्य जे पात्र असतं त्याचे सहकारी आणि शत्रू रोबोट जेव्हा वाटेल तेव्हा आपला आकार बदलत असतात.
कधी कार तर कधी ट्रक, तर कधी अजून काही, असे ते आपले आकार बदलत असतात. हल्लीच काही जपानी वैज्ञानिकांनी एकत्र येऊन एक असा अनोखा रोबोट तयार केला आहे जो केवळ ६० सेकंदात स्पोर्ट्स कारमधे परावर्तित होतो आणि पुन्हा सहजपणे रोबोटमधे सुद्धा बदलला जाऊ शकतो.
जपानमधील टोकियोमध्ये झालेल्या एका समारंभात या रोबोट कम कारचं अनावरण करण्यात आलं.
कार कम रोबोटची वैशिष्ट्ये:
खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही या रोबोटचं कारमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया पाहू शकता. या अनोख्या रोबोटच्या वैशिष्ट्यांचा खुलासा करताना याच्या निर्मात्यांनी सांगितलं की हा जवळपास ३.५ मीटर म्हणजे जवळजवळ १२ फूट लांबीचा आहे.
याचं नाव जे डाइट हॉफ असं ठेवण्यात आलंय. हा दोन पायांवर चालणारा रोबोट स्वतःला कारमध्ये सहज परावर्तित करू शकतो. एवढंच नाही तर तो कार म्हणून ६० किलोमीटर वेगाने धावू शकतो. रोबोट या स्वरूपातून स्वतःला कार मध्ये बदलण्यासाठी याला ६० सेकंद म्हणजेच एक मिनिट लागते.
याला बनवण्यासाठी “जपानी इंजिनियर्स आणि ब्रेव रोबोटिक्स” चे सीईओ केनजी इशिडा यांचे परिश्रम पणाला लागले होते. केनेजी यांना स्वतःला ऍनिमेशन मुव्हीजमध्ये ट्रान्सफॉर्मर पाहायला विशेष आवडत असे.
हा रोबोट एका २ सीटर र्स्पोटस कारमध्ये बदलू शकतो. हा रोबोट म्हणून प्रतितास १०० या वेगाने चालू शकतो. अजून फॅक्टरीच्या कार्गो एरियाच्या बाहेर याची चाचणी होणं बाकी आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कार या फॉर्म मधून रोबोट फॉर्म मध्ये परावर्तन होताना कारच्या सीट्स आणि हूड वरच्या दिशेला ढकललं जातं आणि रोबोटचं डोकं तयार होतं.
ह्या रोबोटचं प्रात्यक्षिक दाखवणारा विडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
कार म्हणून ही ४ मीटर म्हणजे जवळजवळ १३ फूट लांब आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये जेव्हा हा रोबोट पहिल्यांदा “prototype annual content expo” मध्ये सादर करण्यात आला होता तेव्हा याचं वजन ३५ किलो होतं. त्यांनंतर त्याच्या पुढची आवृत्ती २०१५ मध्ये समोर आली आणि त्याला आजच्या स्वरूपात आणण्यासाठी त्यानंतरची तीन वर्षें जावी लागली.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.