आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
लेखक : तन्मय केळकर
===
मुद्द्याला हात घालण्यापूर्वी अभिजात भाषा म्हणजे नक्की काय ? याबद्दल थोडी पार्श्वभूमी सांगणं गरजेचं आहे.
अभिजात भाषा कोणती हे कोण व कसं ठरवतं ?
1. High antiquity of its early texts/recorded history over a period of 1500-2000 years
(१५००-२००० वर्षे प्राचीन साहित्य)
2. A body of ancient literature / texts, which is considered a valuable heritage by generations of speakers.
(पिढ्यान् पिढ्या मौल्यवान ठेवा म्हणून जतन केले गेलेले प्राचीन साहित्य)
3. The literary tradition be original and not borrowed from another speech community
(अन्य भाषिकांकडून घेतली न गेलेली मौलिक साहित्य परंपरा)
4. The Classical language and literature being distinct from modern, there may also be a discontinuity between the Classical language and its later forms of its offshoots
(अभिजात भाषा/साहित्य हे त्या भाषेच्या आजच्या स्वरूपाहून भिन्न असू शकते व तिची अर्वाचीन स्वरूपातील साहित्य परंपरा प्राचीन परंपरेहून खंडित असू शकते.)
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे फायदे :
* त्या भाषेच्या अध्ययनासाठी Centre of excellence ची स्थापना
* त्या भाषेच्या अभ्यासक व विद्वानांसाठी वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार
* केंद्रीय विद्यापीठामध्ये त्या भाषांच्या अध्ययनासाठी स्वतंत्र विभाग
* त्या भाषेच्या संवर्धन व विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी
आत्तापर्यंत तमिळ २००४, संस्कृत २००५, कन्नड २००८, तेलुगू २००८, मल्याळम २०१३ & उडिया २०१४ या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आहे. त्यानंतर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी रंगनाथ पठारे समिती स्थापन केली गेली. त्यांनी मराठीला अभिजात भाषेच्या निकषांमध्ये बसवण्यासाठी अत्यंत अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला आहे. या मुद्द्यावर कोणतंही मत बनवण्यापूर्वी हा अहवाल प्रत्येकाने जरूर वाचावा.
शिवाय मराठी अभिजात भाषा समितीसुद्धा प्रा. डॉ. हरी नरके यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली आहे व त्यांची कायदेशीर/ राजकीय खटपट मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सुरू आहे. पण काही जणांचा मात्र अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळण्याला विरोध आहे.
‘अभिजात’ दर्जाला विरोध कशासाठी ?
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे एखाद्या भाषेचा झाला तर फायदाच होणार असेल तर विरोध कशासाठी असा प्रश्न विचारला जातो.
असा विरोध करणाऱ्यांमध्ये मुख्यतः संस्कृत प्रेमी/ संस्कृत तज्ञ व भाषाशास्त्राचे अभ्यासक असतात. याउलट, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं चुकीचं/ अशास्त्रीय आहे अथवा तो मिळून मराठीची विशेष प्रगती होणार नाही असं मत असलेले लोक म्हणजे गद्दार, ब्राह्मण-वर्चस्ववादी, मराठीचे हितशत्रू आणि आम्हीच काय ते मराठीचे एकमेव कैवारी अशा थाटात काही लोक वावरतात. पण अभिजात दर्जाला विरोध करण्यामागची कारणं सुद्धा तितकीच बळकट आहेत. ती खालीलप्रमाणे –
१ =. भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून हे अत्यंत हास्यास्पद वाटते. (या बाबतीत मी सहमत आहे.)
अभिजात भाषा (classical language) चे आंतरराष्ट्रीय स्तरावर मानले जाणारे आणि भाषाशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात शिकवले जाणारे निकष म्हणजे – an independent tradition that arose mostly on its own, not as an offshoot of another tradition, and it must have a large and extremely rich body of ancient literature.
काही भाषातज्ज्ञ वरील निकषांखेरीज dead language (वर्तमानात प्रचलित नसलेली) हाही निकष लावतात. हे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या भाषा म्हणजे – ग्रीक, लॅटिन, प्राचीन अरबी, प्राचीन चीनी, संस्कृत.
भारतात अभिजात दर्जाच्या मागणी मागे (फक्त) राजकीय व आर्थिक कारणे आहेत.
२. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मागणाऱ्या गटात खूपदा विखारी संस्कृतद्वेष व जातीय विद्वेष (कधी छुपा तर कधी उघड) असतो. संस्कृत = ब्राह्मणांची भाषा + ब्राह्मण वर्चस्ववादाचे प्रतीक हे गृहीतक यामागे असतं. (याही बाबतीत मी सहमत आहे.)
३. संस्कृत ही सर्व भारोपीय (Indo European) भाषांची जननी असूनही इतर एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळू शकतो? (या बाबतीत मी तरी पूर्णपणे सहमत नाही.)
सर्व युरोपीय व भारतीय भाषांचं मूळ एका भारोपीय आदिभाषेत आहे (proto Indo European language) असा एक सिद्धांत आहे. ती आदिभाषा म्हणजेच संस्कृत असं काही भाषातज्ज्ञ मानतात. याउलट काही भाषा तज्ज्ञ असं म्हणतात की संस्कृत भाषा ही तत्कालीन प्राकृत बोलींवर विशेष संस्कार करून बनवली गेली आहे. म्हणजेच प्राकृत बोली भाषा संस्कृतहून प्राचीन आहेत. पण या दोन्ही सिद्धांतात काही त्रुटी आहेत. त्याची चर्चा इथे नको.
४. आजची प्रत्येक आधुनिक भारतीय भाषा (उदा. बंगाली, गुजराती, पंजाबी इ.) ही किमान एका मध्ययुगीन प्राकृत भाषेपासून उत्क्रांत झालेले अपत्य असते. उदा. ‘मागधी’ प्राकृत पासून बंगाली, आसामी, उडिया इ. अपत्ये; शौरसेनी पासून हिंदी (खडी बोली), पंजाबी, हरियाणवी, अवधी, ब्रज इ.; ‘महाराष्ट्री’ प्राकृत पासून मराठी, गुजराती वगैरे.
सध्या गठित केलेली मराठी अभिजात भाषा समिती मध्ययुगीन महाराष्ट्री प्राकृत म्हणजेच मराठी भाषा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तो कितपत शास्त्रीय किंवा अशास्त्रीय आहे हे सांगण्याइतका खरं तर माझा अभ्यास नाही. पण हे मात्र खरं आहे की यांपैकी एका अपत्य भाषेला जरी अभिजात भाषेचा दर्जा दिला तरीही इतर सर्व अपत्य भाषांना त्याच न्यायाने तो दर्जा द्यावा लागतो. (याच कारणाने केंद्र सरकार हो-नाही करतंय.)
५. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे = मराठी संस्कृतहून प्राचीन आहे आणि संस्कृत ही मराठीची जननी नाही हे मान्य करणे असं चित्र निर्माण केलं जातं. (केंद्र सरकारच्या अभिजात भाषेच्या निकषांमध्ये या निकषाचा स्पष्ट उल्लेख नाही. पण दिलेल्या निकषांचा असा अर्थ निघू शकतो व काढला जातो). कोणती भाषा इतर कोणत्या भाषेची जननी हा थोडा गुंतागुंतीचा विषय आहे. पण विरोधामागे ही भाषिक वर्चस्वाची दोन्ही गटांमधली निरर्थक चढाओढ हे एक कारण आहे (संस्कृत श्रेष्ठत्ववादी विरुद्ध मराठी श्रेष्ठत्ववादी).
पण अभिजात दर्जाला विरोध करण्यामागे मराठीचं हितशत्रुत्व किंवा अन्य तत्सम कारण नाही हे महत्वाचं.
यावर माझं मत असं आहे की, अभिजात भाषेचा दर्जा हा नुसताच खेळखंडोबा बनून राहिला आहे. कुणीही उठसूट अभिजात भाषेचा दर्जा मागतंय आणि राजकीय समीकरणे लक्षात घेऊन त्या त्या राज्याच्या भाषेला तो दर्जा दिलाही जातो आहे. तमिळ किंवा कन्नडबद्दल एकवेळ समजूही शकतो. पण उडिया भाषेलाही जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला तेव्हाच ही गोष्ट पुन्हा एकदा दिसून आली की अभिजात भाषेचा दर्जा ही फक्त राजकीय रस्सीखेच आहे; त्यात भाषाशास्त्र नगण्य आणि राजकारणच प्रचंड आहे. आणि जर हा खेळ निव्वळ आर्थिक आणि राजकीयच असणार असेल तर मराठी भाषिकांनी त्यात अजिबात मागे राहता कामा नये.
जी काही दबावबाजी, झुंडशाही, धाक-दपटशा, blackmailing करावी लागणार असेल ती करून अभिजात भाषेचा दर्जा मिळवावा – मग ते किती का अशास्त्रीय/ हास्यास्पद असेना…. इस हमाम में सब नंगे हैं!
त्या दर्जामुळे गावोगावी, गल्लोगल्ली मराठीचा वापर वाढेलच असं नाही, मराठीत दर्जेदार साहित्य निर्मिती वाढेलच असं नाही, सर्वसामान्य मराठी माणसाला आपल्या मातृभाषेचा अधिक अभिमान वाटेलच असं नाही, मराठी शाळांना चांगले दिवस येतीलच असंही नाही. थोडक्यात, अभिजात भाषेचा दर्जा मराठीच्या प्रगतीसाठी किंचितसा सहाय्यक असला तरी पुरेसा नक्कीच नाही.
अभिजात भाषेच्या दर्जाखेरीज इतर कोणकोणत्या गोष्टी मराठीच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत?
मुळातच एखादी भाषा ‘प्रगत’ केव्हा होते हे लक्षात घेणं आवश्यक आहे. इंग्रजीचंच उदाहरण घेऊ. इंग्रज व्यापार व युद्धानिमित्ताने जगभर पसरले व आपली भाषाही घेऊन गेले. मोठमोठी वैज्ञानिक संशोधने इंग्रजीत केली गेली. जगभरच्या भाषांमधे इंग्रजी शब्द गेले आणि इंग्रजीनेही लवचिकपणे त्यांचे शब्द घेतले. काळानुरूप बदलण्याचा प्रवाहीपणा इंग्रजीने दाखवला त्यामुळेच इंग्रजी जवळपास सर्व खंडांमध्येे पसरली.
भाषा प्रगत कशी होत जाते याबद्दल मराठीच्याच इतर भाषा-भगिनींची उदाहरणं देता येतील. दोन भारतीय भाषा अशा आहेत ज्यांनी भारतीय उपखंड बाहेर आपला ठसा उमटवला एक आहे तमिळ गेली दहा-बारा शतकं तमिळ व्यापारी मलेशिया, इंडोनेशिया वगैरे आग्नेय आशियाई देशांमध्ये व्यापारानिमित्त ये-जा करतात व स्थायिक होतात. यामुळे मलेशियामध्ये आज तमिळ भाषिक लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या तब्बल १५ टक्क्याच्या आसपास आहे. तमिळ ही मलेशियाची पाचपैकी एक अधिकृत भाषा आहे.
दुसरं उदाहरण घेता येईल पंजाबीचं. कॅनडामध्ये पंजाबी लोक 19 व्या शतकाच्या मध्यापासून उत्तर अमेरिकेत पसरले. व्यापारात व शेतीत प्रगती करता करता उत्तर अमेरिकेत त्यांनी बस्तान बसवलं व आपलं राजकीय बळ सुद्धा वाढवलं. आज कॅनडात पंजाबी ही 3 राजभाषांपैकी 1 आहे (फ्रेंच, इंग्रजी, पंजाबी). बॉलीवूड मध्ये सुद्धा पंजाबी भाषिकांनी खोलवर हातपाय पसरवले. फिल्म व गाण्यांमधून पंजाबी संगीताचा व जीवनशैलीचा इतका प्रचार केला की व ते इतकं लोकप्रिय केलं की आज urban cool dude म्हणजे पंजाबी असं समीकरण साधारणतः बनलेलं आहे.
सांगायचा मुद्दा हा की एखादा भाषिक समाज जेव्हा व्यापार, संशोधन, तंत्रज्ञान, युद्ध वगैरेमध्ये प्रगती करतो व जगभर पसरते तेव्हा त्याची भाषा समृद्ध बनत जाते. जेव्हा “महाराष्ट्र माझा” “दिल्लीचेही तख्त” राखत होता तेव्हा भारतभर मराठी भाषासुद्धा अशीच पसरली, प्रगत/ समृद्ध झाली व आहे सुद्धा.
मराठी एकमेव भारतीय भाषा आहे ज्यामध्ये विज्ञान कथा व वैज्ञानिक साहित्य नियमितपणे लिहिले जातं. मराठी एवढं विपुल कोष वाङ्मय इतर कोणत्याही भारतीय भाषेमध्ये नाही. इंग्रजपूर्व भारतामध्ये मराठी ही एकमेव स्थानिक भाषा होती जी राजभाषा म्हणूनसुद्धा वापरली जात होती. (इतरत्र राजभाषा फारसी होती.)
बाकी मराठी “धोक्यात” आहे का वगैरे चर्चा जशा महाराष्ट्रात होतात तशाच बंगाली धोक्यात आहे का अशा दोन चर्चा बंगालमध्येही होतात.
हिंदी धोक्यात आहे का अशा चर्चा (तथाकथित राष्ट्रभाषा असूनही) दिल्लीतही होतात. त्यामुळे बाकीच्या भारतीय भाषा प्रगत होत चालल्या आहेत आणि मराठीच मागे पडते आहे असं बिलकूल नाही.
त्यामुळेच मराठी भाषा दिनाच्या या सुमुहूर्तावर सर्व मराठी बांधवांना शुभेच्छा देत माझी विनंती आहे की मराठीचा न्यूनगंड टाकून द्यावा आपला व्यापार-उदीम वाढवावा, जगभर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवावा, आकांक्षांपुढती गगन ठेंगणे करावे आणि हे सगळं करताना आपल्या मातृभाषेमध्ये विपुल साहित्यनिर्मिती व ज्ञाननिर्मिती करावी व त्यायोगे भाषिक व आर्थिक उत्कर्ष साधावा….
जय महाराष्ट्र!
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.