' बॉलिवूडला ऋणी करणारा, चिरंतन “सरफरोश” – InMarathi

बॉलिवूडला ऋणी करणारा, चिरंतन “सरफरोश”

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

काही चित्रपट सर्वच पातळीवर असे काही जमून येतात की ते कितीही वेळा पाहिले तरी अजिबात कंटाळवाणे वाटत नाही, याउलट प्रत्येक वेळेस आपण त्यांच्या अजूनच जास्त प्रेमात पडत जातो. ‘सरफरोश’ असाच एक चित्रपट. आज या चित्रपटाला १९ वर्षे पूर्ण होत असताना, त्याचा घेतलेला आढावा.

सामान्य मध्यमवर्गीय घरातला, कॉलेजवयीन, एकतर्फी प्रेम करणारा, थोडासा घाबरट, सरळमार्गी, गझलप्रिय, घरच्यांवर अतोनात जीव असणारा, आपल्या भावाचा मृत्यू आणि बापाची मरणासन्न अवस्था स्वतःच्या डोळ्यांनी पाहणारा हतबल अजय सिंग ते सुडाने (फक्त वैयक्तिक नव्हे, त्याचा ‘…क्यूँ की ये मेरे मुल्क का मामला हैं..’ डायलॉग आठवा) पेटलेला ‘हर मुजरीम को मैं कानून के सामने भिकारी की तरह खडा देखना चाहता हूँ’ असं ठणकावून सलीमला सांगणारा एसीपी राठोड आमिर खानने जबरदस्त उभा केलाय.

एसीपी राठोडसाठी आमिरच्या जागी दुसऱ्या कुणाची कल्पनाच करवत नाही.

त्या वर्षी ‘वास्तव’ साठी संजय दत्तला बेस्ट ऍक्टरचा फिल्मफेयर मिळाला होता, पण या पुरस्कारासाठी आमिरचा रोल जास्त पात्र होता, असं म्हटलं तर ती अतिशियोक्ती ठरणार नाही. अर्थात, पुरस्काराचे अप्रूप आमिर खानला कधीच नव्हते. असाच दमदार कॉप त्याने आशुतोष गोवारीकरच्या ‘बाजी’ मध्येही रंगवला होता, पण दुर्दैवाने तो चालला नाही आणि त्याच्या कामाची म्हणावी तितकी दखलही घेतली गेली नाही.

 

sarfarosh-inmarathi
lifeberrys.com

आमिर खानचा, ‘…क्यूँ की ये मेरे मुल्क का मामला हैं..’ हा डायलॉग जेवढा लक्षात राहतो त्याच्या कितीतरी पटीने सलीमचा ‘फिर किसी सलीम को ये मत कहना, ये मुल्क उसका घर नही हैं’ हा डायलॉग छाप पाडतो. शिवाय मुकेश ऋषीने तो इतक्या पोटतिडिकीने म्हटला आहे की त्यावर आमिरचं, ‘ठीक हैं, नही कहुँगा’ आलं नसतं, तर काहीतरी चुकल्यासारखं वाटलं असतं. या रोलसाठी मुकेश ऋषीची कास्टिंग करणे हा एक मास्टरस्ट्रोक मानायला हवा. मुकेश ऋषीने साकारलेला हिंदुस्तानातला मुसलमान सलीम हा सदैव त्याच्या करियरमधला टॉप रोल राहील.

नसीरचा गुलफाम हसन हा देखील एक सरप्राईज पॅकेज. सुरुवातीला, ‘होशवालोंको खबर क्या..’ मधून प्रेक्षकासमोर येणारा, नजाकतीत बोलणारा हा फनकार, हळूहळू त्याच्या व्यक्तीत्वाचे अनेकविध पदर उलगडत जातो.

मितभाषी, अजयला दोस्त म्हणणारा-मानणारा, आपल्या पूर्वजांचे, गुरूंचे उल्लेख ऐकताच कानाला हात लावणारा गुलफाम, ते त्याच्या किमती सामानाचं नुकसान केलं म्हणून बकरीचे कान चावणारा गुलफाम बघणाऱ्यांच्या भुवया उंचावतो. ‘मुहाजिर’ म्हणवून घेताना आतून तुटणारा, ‘गवय्योकें लिये सिपहियों को तो कुर्बान नही किया जाता’ असं म्हणत त्याच्यावर पिस्तूल रोखणाऱ्या ‘बेग’ला यमसदनी धाडणारा गुलफाम हुसेन नसिरने अप्रतिम साकारला आहे. शेवटच्या सीनमधली त्याची तडफड अस्वस्थ करते, तो गद्दार आहे हे माहित असूनही.

डोन्ट माईंड, पण सरफरोशच्या आधी सोनाली बेंद्रे, फक्त छान दिसते म्हणून आवडायची. पण यात ती फक्त छान दिसलीच नाहीये तर कामही उत्तम केले आहे.

‘होशवालों को मध्ये’ मध्ये ती प्रत्येकाच्या मनातल्या प्रेमाची प्रातिनिधिक मूर्ती दिसलीये, ‘जो हाल दिल का’ मध्ये मादक. कॉलेजच्या दिवसात भाव खाणारी आणि दिल्लीत अजय दिसल्यावर त्याच्या मागे धावणारी सीमा मस्त जमलीये.

बाकी सपोर्टींग कास्टची मोठी गर्दी असली तरी ती अनावश्यक वाटत नाही. बाला ठाकूर, सुलतान, मिरचीसेठ, फटका (आसमान में..) ही नावं कायमची लक्षात राहिली आहेत. प्रदीप सिंग रावत, वल्लभ व्यास, अखिलेंद्र मिश्रा, गोविंद नामदेव छाप पाडतात. नवाजची झलकही दिसते सुरुवातीच्या सीनला, तेवढ्यातही बाजी मारलीये पठ्ठ्याने. मराठमोळ्या लोकांची सुद्धा भली मोठी फौज आहे- स्मिता जयकर, सुकन्या कुलकर्णी, मनोज जोशी, जयवंत वाडकर, मकरंद देशपांडे, सुनील शेंडे इत्यादी.

 

umeandfilms.blogspot.in

१९९९ म्हणजे जतीन-ललितचं संगीत शिखरावर होतं. पूर्ण अल्बम एंटरटेनिंग आहे. रुपकुमार आणि सोनूच्या आवाजातलं ‘जिंदगी मौत ना बन जाये’ हा टायटल ट्रॅक चित्रपटाचा आशय खूप छानरीत्या चित्रपटाआधीच अधोरेखित करतो. निदा फजलींचं जगजीतच्या जादुई आवाजातलं ‘होशवालों को’ म्हणजे त्यावेळेसचं लव अँथम होतं, शिवाय अजूनही बऱ्याच प्लेलिस्टमध्ये लूपमध्ये ऐकलं जातं. ‘इस दिवाने’ आणि ‘जो हाल दिल का’ ही टिपिकल सिच्युएशनल सोंग्स पण छान जमली आहेत.

पण सर्वात चकित करतं ते, ‘ये जवानी हद कर दे’. नॉर्मली जेव्हा चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते तेव्हा आयटम सोंग्स येतात आणि एक नको असलेला ब्रेक आपल्याला घ्यावा लागतो, पण हे गाणं त्याला अपवाद आहे. विशेषतः कविता कृष्णमूर्तीने तिच्या आवाजाने चार चाँद लावलेत, अगदी तिच्या आवाजातलं सुरुवातीचं तू रु रु रु पासूनच तिची जादू जाणवते.

स्टोरी, स्क्रीनप्ले आणि दिग्दर्शन अश्या तीनही बाजू ‘जॉन मॅथ्यू मॅथन’ यांनी अत्यंत ताकतीने पेलल्या आहेत.

गांधी आणि आक्रोश (१९८०) साठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिल्यानंतर, स्वतः दिग्दर्शक म्हणून मैदानात उतरायला जॉनला १९९९ पर्यंतची वाट पहावी लागली. त्यातही या चित्रपटाची तयारी जॉन १९९२ पासून करत होता. ही कहाणी प्रत्यक्षात पडद्यावर उतरायला ७ वर्षे लागली. वेळ प्रचंड गेला असला तरी, चित्रपट, त्यातील अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहिले गेलेले कॅरेक्टर्स, कुठेही पकड न सुटलेला स्क्रिनप्ले आणि सर्व कलाकारांचे दमदार परफॉर्मन्सेस यांमुळे, गेलेल्या वेळेचं चीज झालं, असं म्हणायला हरकत नाही.

१९९९ च्या आसपास भारत-पाकिस्तान दरम्यान नेमकं कारगिलमुले वातावरण तापलेलं असल्याने, त्याचाही फायदा चित्रपटाला झाला. दुर्दैवाने ‘सरफरोश’ची जादू जॉन मॅथ्यू मॅथनच्या पुढच्या दोन चित्रपटात दिसली नाही, तरीही मनात अजूनही कुठेतरी वाटत राहतं की त्याने त्याच ताकदीचं पुन्हा कमबॅक करावं. असे होईल किंवा न होईल हे सांगणं कठीण आहे, परंतु सरफरोशसाठी बॉलिवूड कायम त्याच्या ऋणात राहील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?