Site icon InMarathi

“I am Hindustan” : सहन होत नाही आणि सांगता येत नाही – भाऊ तोरसेकर

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

स्वत:वरचा विश्वास नष्ट झाला की त्या विश्वासाची जागा भरून काढण्यासाठी माणसे तथाकथित पवित्र कार्याच्या ‘होली कॉज’ च्या मागे लागतात. पवित्र कार्यावरचा विश्वास हा नष्ट झालेल्या स्वत:वरच्या विश्वासाचा बर्‍याच प्रमाणात एक पर्याय असतो. जेव्हा कोणाला स्वत:च्या हक्काने मोठेपणाची मागणी करता येत नाही, तेव्हा तो त्याच्या राष्ट्राच्या नावाने किंवा धर्माच्या, वंशाच्या, पवित्र कार्याच्या नावाने मोठेपणाची मागणी करू लागतो. स्वत:च्या अंगीकृत कार्यात जेव्हा रस वाटेनासा होतो तेव्हा तो कुणीतरी इतरांच्या कामात नाक खुपसू लागतो. हाती घेतलेले काम निरर्थक वाटू लागले, की त्या कामातून लक्ष लोक काढून घेतात आणि इतरांच्या कामात लुडबुड करून ती कसर भरून काढू पहातात.

स्वत:चे काम सोडून इतरांच्या कामात नाक खुपसण्याची प्रवृत्ती वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत असते. गावगप्पा, इतरांच्या व्यवहारात ढवळाढवळ, हे याप्रवृत्तीचे काही अविष्कार.

तशाच प्रकारे जातीय राष्ट्रीय, वांशिक बाबींमध्ये हिरीरीने भाग घेणे, हासुद्धा याच प्रवृत्तीचा अविष्कार होय. आपण जेव्हा स्वत:ला चुकवण्यासाठी स्वत:पासून दुर पळू पहातो, तेव्हा आपण शेजार्‍याच्या गळ्याला मिठी मारतो किंवा त्याचा गळा घोटण्याचा तरी प्रयत्न करतो. या दोन प्रतिक्रीयांवाचून तिसरी प्रतिक्रीया आपल्याला माहितच नाही. (‘झुंडीचे मानसशास्त्र’ पृष्ठ १०७)

 

ifehacker.com

झुंड किंवा कळपाची मानसिकता सांगणारे हे उपरोक्त विवेचन चमत्कारीक वाटू शकते. ते मोजक्या शब्दातले आहे आणि तपशीलवार समजावलेले नाही. पण बारकाईने त्याचे परिशीलन केले, तर आपल्याच इर्दगिर्द त्याची शेकड्यांनी उदाहरणे आपल्या अनुभवास येतील. कोपर्‍यावरचा समाजसेवक, नगरसेवक वा आपल्याच चाळवस्तीतला कोणी सार्वजनिक कामात गुंतलेला, यांच्यापासून थेट देशासाठी अहोरात्र चिंतातूर असलेला कोणीही बघितला तर त्याची मानसिकता नेमकी अशीच असते. आपल्याच जगण्यातील नैराश्य वैफ़ल्य वा नाकर्तेपणा त्याला सार्वजनिक जीवनात खेचून आणत असतो. तो समूहात आपले व्यक्तीगत जीवन लपवून ठेवायला धडपडत असतो.

कालपरवा जगातल्या सहाशे तथाकथित बुद्धीमंत वा मान्यवरांनी भारताच्या पंतप्रधानांना पत्र लिहून भारतात होत असलेल्या बलात्काराविषयी चिंता व्यक्त केली आहे.

कुठल्याही देशात वा समाजात होणारे बलात्कार, हा तिथली शासन व्यवस्था व समाजाचे धुरीण यांच्यासाठी नक्कीच चिंतेचा विषय असतो. त्यात अशा जगभरच्या कुणा शहाण्यांनी चिंता व्यक्त करण्याचे काही कारण असू शकते का? गेल्या दोन महिन्यापासून भारतातील कठुआ व उन्नाव येथील बलात्काराच्या घटनांना माध्यमांनी मोठी प्रसिद्धी दिली. त्यानंतर शेकड्यांनी मान्यवर त्याचा निषेध करायला पुढे सरसावले. त्याच्या आणखीनच बातम्या झाल्या.

नव्यानेच कोणी वर्तमानपत्र वाचू लागला असेल वा वाहिन्यांच्या बातम्या बघू लागलेला असेल, तर बलात्कार ही भारतातील नवी काही समस्या असल्याचा त्याचा समज होऊन जाईल.

जसा दहा वर्षापुर्वी बर्डफ़्लू स्वाईनफ़्लु नावाचे काही विषाणू नव्यानेच भारतात आले आणि त्यानी धुमाकुळ घातला होता. त्यावरचे उपाय कोणते आणि त्यापासून आपली सुरक्षा कशी करावी, ते डॉक्टरांना वा त्या विषयातील जाणत्यांनाही समजत नव्हते. जगभर त्याची फ़िकीर चाललेली होती. शोध संशोधनातून त्यावरचे उपाय शोधले जात होते. दरम्यान त्याची बाधा होऊ नये, म्हणून कोणती काळजी घ्यावी त्याचे मार्गदर्शन सुरू झालेले होते. कारण तो आजार व त्याचे विषाणू नवाच प्रकार होता. त्याचीच पुनरावृत्ती दुसर्‍या काही विषाणूंच्या वेळी झाली. अशा विषयात कोणी काही चिंता व्यक्त केली तर समजू शकते. पण बलात्कार ही जगाच्या आरंभापासूनची समस्या आहे आणि मोदी पंतप्रधान झाल्यावरच तिचा उदभव झालेला नाही.

मग अशा सहाशे विद्वानांनी आपले शहाणपण त्याच विषयात सांगण्याची काय गरज होती? मनमोहन सिंग सत्तेत असताना निर्भयाकांड झाले व लाखो लोक रस्त्यावर उतरले होते. तेव्हा यापैकी कोणाला चिंता कशाला वाटलेली नव्हती?

कालपरवा हॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनी आपल्यावर कसे बलात्कार झाले, त्याची कथने केलेली आहेत आणि ते अजून संपलेले नसल्याचीही ग्वाही दिलेली आहे. त्यासाठी मग यापैकी कोणी त्या व्यवसाय वा क्षेत्रातील जाणत्यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे काय? नसेल तर कशाला चिंता वाटलेली नाही? अशाच वर्गात प्रतिष्ठीत झालेले व नोबेल पारितोषिकाचे सामुहिक मानकरी ठरलेले महान पर्यावरणवादी पचौरी, यांच्यावर गंभीर आरोप झालेले आहेत. प्रतिष्ठीत ज्ञानविज्ञान संस्था़चे उच्चपद भूषवलेल्या पचौरी यांच्यावर असे आरोप झाले, त्यामुळे अशा संस्थामध्ये कार्यरत असलेल्या महिलांच्या चारीत्र्य व सुरक्षेला धोका निर्माण होतो, असे त्यांच्याच गोतावळ्यात वावरलेल्या जगभरच्या सहाशे लोकांना कशाला वाटले नाही?

 

emirates247.com

उदाहरणे शेकड्यांनी देता येतील. त्यावेळी कुठल्याही संवेदनाशील व्यक्तीला चिंता वाटायला हवी. पण नेमके त्याचवेळी गप्प बसणारे हे मान्यवर लोक, मोदींना दोन बलात्काराच्या विषयाचे अवडंबर माजवून पत्र लिहीतात, तेव्हा त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघणे भाग होते. ते खरोखरच मुली महिलांच्या सुरक्षेसाठी चिंतीत झाले आहेत, की आपल्या भोवताली असलेल्या भयंकर सत्यापासून पळण्याचा उद्योग करीत आहेत? ज्या सहाशे मान्यवरांनी असे पत्र लिहून बलात्कारावर चिंता व्य्क्त केली, त्यांची या बाबतीत काहीही जबाबदारी नसते काय? भारतातल्या अनेक चित्रतार्‍यांनीही चिंता व्यक्त केली. त्यांनी आपल्याच व्यवसाय उद्योगात महिलांवर कामासाठी वा रोजगार संधीसाठी बलात्कार होतात, त्यावर कधी आवाज उठवलेला होता काय?

तरूण तेजपाल या शोधपत्रकारावर बलात्काराचा आरोप झाला, तेव्हा किती प्राध्यापक संपादक बकात्काराच्या मनोवृत्तीवर चिंता व्यक्त करायला पुढे आलेले होते? नसेल तर तेव्हा गप्प कशाला बसले? आताच त्यांना महिलांच्या सुरक्षेचा इतका उमाळा कशाला आला आहे? त्याचे उत्तर उपरोक्त एका परिच्छेदात सापडते.

आपल्या नित्यजीवनात वा व्यवहारी जीवनातील आपले अपयश वा नाकर्तेपणा अशा लोकांना अखंड बोचत असतो. त्यामुळे आपणच गुन्हेगार असल्याची ही जाणिव त्यांना शांत बसू देत नाही. पुर्वी गुप्तरोग वा तत्सम आजारावर भोंदू वैदू काही जालिम उपाय असल्याचे सांगून जाहिरात करीत, त्याची ओळ आठवते. ‘सहन होत नाही आणि सांगता येत नाही’. रोग अशा अवघड जागी झालेला असतो, की त्याची जाहिर वाच्यता करायची लाज वाटते. म्हणून कुणाला सांगावे, विचारावे ही समस्या असते. गुपचुप बसावे, तर त्याच्या वेदना सहन होत नसतात. ही चमत्कारीक स्थिती असायची.

आज लैंगिक आजाराविषयी खुप उघडपणे बोलले जाते. त्यामुळे त्या विषयातले जाणते डॉक्टर्स उपलब्ध असतात आणि त्यांच्याकडे जाता येते. जेव्हा तशी सुविधा नव्हती. म्हणून हा गुपचुप प्रकार बोकाळलेला होता.

उपरोक्त विद्वान वा जगातले आजकालचे शहाणे नेमके तशाच मानसिक आजाराने पछाडलेले आहेत. ते ज्या समाजात, देशात व युगात जगत आहेत, त्यातले आपले नाकर्तेपण त्यांना सहन होत नाही. अधिक आपले अपयश त्यांना जाहिरपणे बोलता येत नाही. म्हणून मग असे लोक आपल्या दुखण्यावर फ़ुंकर घालण्यासाठी सरकार वा अन्य कुठल्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती वा संस्थांवर कायम दुगाण्या झाडण्याचा उद्योग करीत असतात. त्यातून आपल्या दुखण्यावरचे लक्ष उडवण्याचा विरंगुळा त्यांना मिळत असतो.

 

timesnownews.com

शिवाय आपण समाजाचे मोठे हितचिंतक व काळजीवाहू पालक असल्याचा टेंभाही मिरवता येत असतो. प्रत्यक्षात ही माणसे निकम्मी व निरूपयोगी असतात. कर्तॄत्वहीन असतात आणि आपले स्वयंभू व्यक्तीमत्व, कर्तृत्व दाखवण्यापासून पळ काढत असतात. ती संधी त्यांना कळपात मिसळून मिळवता येत असते. अन्यथा आपले कामधंदे सोडून त्यांनी अशा कुठल्या बलात्कारासाठी भारताच्या पंतप्रधानांना पत्र कशाला लिहीले असते?

वेश्या व्यवसाय किंवा देहविक्रय हा जगातला सर्वात जुना व पहिला धंदा असल्याचे नेहमी बोलले जाते. तो व्यवसाय होऊ शकला, कारण पुरूषाची सैतानी अमानुष लैंगिक भूक हेच आहे. म्हणून तर कुठल्याही समाजात घरातून महिलांना सार्वजनिक जीवनात वावरण्यावर निर्बंध होते.

त्याला महिला जबाबदार नव्हती, तर महिलेला भरीस घालून, आमिष दाखवून किंवा विश्वासघाताने तिचे शोषण पुरूष करणार, याची प्रत्येक पुरूषप्रधान समाजाला खात्री होती. पण या समाजातील धुरीण पुरूषांनी कधी स्वत:ला वेसण घालण्याचे नियम बनवले नाहीत. तर महिलांनाच भिंतीआड कोंडून ठेवण्याचे नियम बनवले. योनीशुचिता हे पावित्र्याचे प्रतिम बनवले. तिच्या गळ्यात मंगळसुत्र अडकवले. वास्तवात ह्या पावित्र्याला धोका कायम पुरूषापासून राहिलेला आहे आणि ते उघड्या डोळ्यांनी यातला प्रत्येक विद्वान बघत आला आहे. त्यापैकी कोणी याची जाहिर कबुली देणार नाही. कारण यापैकी अनेकजण स्वत:च असल्या अनैतिक कर्मात गुंतलेले असतात.

सार्वजनिक जीवनात आलेल्या महिलांचे कर्तृत्व किती मोजले जाते? त्यांच्या गुणवत्तेला किती संधी मिळू शकते? कुठल्याही क्षेत्रात गेलात तर गुणवत्ता व कर्तृत्व बाजूला ठेवून, त्या महिलेच्या देहाकडेच बघितले जात असते.

तिच्याकडून पराक्रम काम यापेक्षा लैंगिक अपेक्षा केल्या जात असतात. याची साक्ष आज जगभरच्या पुढारलेल्या सुसंस्कृत देशातल्या अनेक महिला उघडपणे देत आहेत. त्यात कलावंत साहित्यिक राजकारणी महिलांचाही समावेश आहे. हे जर अत्यंत उच्चभ्रू, सुशिक्षित व अभिजन वर्गात होते असेल, तर खेडोपाडी केवळ जगायची पाशवी धडपड करणार्‍या वर्गातल्या मुली महिलांची काय अवस्था असेल? उन्नाव वा कठुआ बघून वा ऐकून हे समजण्याची गरज नाही. धारावी, गोवंडी या मुंबईतल्या गलिच्छ वस्त्या व झोपडपट्टीमध्ये गेलात तरी दिसू शकते, ऐकू येते.

अशा गाव वस्त्यांमध्ये रोजच्या रोज किती निर्भया काय काय सोसत असतात? याचा थांगपत्ता नसलेल्यांना आजकाल समाजधुरीण मानले जाते. जवळपास प्रत्येक जागी संधीची प्रतिक्षा करणार्‍या पुरूषांची गर्दी लोटलेली असते. अश्विनी नावाच्या पोलिस अधिकार्‍याची एका जोडीदार पोलिस पुरूष अधिकार्‍यानेच केलेली हत्या कशातून झाली होती? भारतामध्ये प्रतिदिन काही हजार बलात्कार होत असतात आणि त्याची किती दखल घेतली जाते? याविषयी देश परदेशातील बुद्धीमंत इतके अनभिज्ञ आहेत काय? नसतील तर त्यापैकी कोणीही इतक्या दिवसात वर्षात भारताच्या पंतप्रधानाला सरकारला महिलांच्या लैंगिक शोषण वा गुन्ह्याविषयी कशाला पत्र लिहीले नव्हते? आताच त्याचे काय प्रयोजन होते?

हेच गुजरात दंगलीच्या निमीत्ताने झालेले होते. इथल्या व अन्य पुढारलेल्या देशातील शहाण्यांनी तिथल्या सरकारला प्रदिर्घ पत्रे लिहून मोदींना मारेकरी घोषित केले होते आणि त्यांना त्या देशाने व्हिसा देऊ नये अशी पत्रे लिहीलेली होती. हा सगळा बेशरम पलायनवाद नाही काय? त्यांना अशा पिडीता वा अन्यायाचे बळी झालेल्यांशी कुठले कर्तव्य नसते. तर आपले नाकर्तेपण लपवण्याची एक सामुहिक संधी घ्यायची असते. पर्यावरणाचे उत्तम काम केलेले पचौरी यांच्या पथकाला नोबेल पारितोषिक मिळालेले होते. त्याच माणसावर संस्थेतील एका महिलेने लैंगिक छळवादाचा आक्षेप घेतला व त्याला बाजूला व्हावे लागलेले आहे. तेव्हा जगातल्या किती नोबेल विजेत्यांनी त्याविषयी आपले पुरस्कार परत करण्याची तत्परता दाखवली होती? नसेल तर कशाला तिकडे पाठ फ़िरवली होती?

त्यांना आपल्याच अस्तित्वाची लाज वाटत असते आणि तेव्हा गप्प रहाण्याच्या पापाचे क्षालन, म्हणून असे लोक समुहाने कठुआसाठी पत्र लिहीतात. आपल्याला अशा महिला शोषणाची चिंता असल्याने नाटक रंगवू लागतात.

जगात कर्तृत्ववान नामवंत म्हणून प्रसिद्ध असलेल्या बहुतांश लोकांची नेमकी अशीच अवस्था असते. त्यातले जे मुठभर प्रामाणिक असतात, ते अशा गोष्टींपासून चार हात दुर रहातात. किंवा सर्वस्व झोकून देऊन मैदानात येतात. पण ज्यांना त्यापैकी काही जमत नाही, ते कळप बनवून तमाशा उभा करतात. चळवळीचा आंदोलनाचा झेंडा खांद्यावर घेऊन उभे रहातात. रोजच्या रोज विविध वाहिन्यांवर गुन्हेविषयक कार्यक्रम सादर होतात. क्राईम पेट्रोल नावाची एक मालिका आहे. त्यातले निम्मे भाग तरी मुली-महिला व बालकांच्या बलात्कार हत्येशी संबंधित असतात. महिलांवर होणार्‍या अत्याचाराचे इतके जबरदस्त प्रमाण असताना अशा शहाण्यांना आताच त्याचा शोध कसा लागला? तर त्यांना आपले पापाने माखलेले तोंड लपवण्याची एक नवी संधी त्यातून मिळाली. असे महान नामवंत ख्यातकिर्त लोक आपल्या जगात आणि समाजात असतात आणि अखंड समाजाला सुसंस्कृत बनवण्यासाठी झटत असतात. तर एकविसाव्या शतकातही कोवळ्या बालिका व एकाकी महिलांना अशा गुन्ह्याचे बळी होण्याची स्थिती अबाधित कशाला राहिलेली आहे?

सरकार कायद्याचा बडगा उगारू शकते. पण समाजाला सुसंस्कृत व संस्कारीत करण्याची जबाबदारी आपोआपच अशा नामवंतांनी आपल्या शिरावर घेतलेली असते ना? पंतप्रधानाला पत्र लिहीण्यापुर्वी अशा शहाण्यांनी यासाठी काय व कोणते प्रयास केले, त्याचा तपशील कुठे दिला आहे काय? सरकार गुन्हा करणार्‍याला शिक्षा देऊ शकेल. पण त्यामुळे गुन्हे थांबत नाहीत. समाजाच्या मनोवृत्तीमध्ये रुजणार्‍या गुन्हेगारी प्रवॄत्तीची वेळोवेळी छाटणी करून समाजाला सुदृढ राखण्याचे काम बुद्धीमंत जाणत्यांचे आहे व असते. त्यात आपण अपयशी नाकर्ते ठरलो, हे सत्य बोलायचे सोडून असे शहाणे सामुहिक पत्र लिहीतात. तेव्हा ते कळपात शिरून आपला असली चेहरा लपवित असतात. स्वत:च्या वास्तविक जगण्यापासून धुम ठोकत असतात.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version