Site icon InMarathi

आपल्याकडे ऑनर किलिंगला प्रसिद्धी मिळते आणि “असं” सकारात्मक कार्य दुर्लक्षित केलं जातं

ankit saksena-inmarathi01

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारताने विज्ञान तंत्रज्ञानात कितीही प्रगती करो ऑनर किलिंगच्या घटना वारंवार घडतातच. आपला समाज जातीयतेच्या दलदलीत किती खोलवर रूतलाय हेही यावरून कळते.

अशी काही घटना घडली की, सगळा समाज पेटून उठतो. कितीतरी चर्चा, निदर्शने, आंदोलने होतात. सगळी माध्यमे अशा घटनांना प्रसिद्धी देतात. अर्थात प्रसिद्धी देऊन समाजाला जागरूक करणे ही चांगलीच गोष्ट आहे.

पण एखाद्याच्या चांगल्या कृतीचा एवढा बाऊ कधी होत नाही. त्याला एवढी प्रसिद्धी मिळेलच असेही नाही. अशीच एक सकारात्मक पण फारशी प्रसिद्धीच्या झोतात न आलेली एक गोष्ट आम्ही सांगणार आहोत.

काही दिवसांपूर्वी अंकित सक्सेना मर्डर केस खूप गाजली होती. त्यावरून बरंच राजकारणही तापलं होतं. त्याला कारणही तसंच होतं.

एका “दुसऱ्या धर्मातील” मुलीच्या प्रेमात पडणेच अंकितच्या मृत्युचं कारण ठरलं. आज आपण कितीही आधुनिक जगात जगत असलो तरी आपले विचार हे अजूनही धर्म-जात-पंथ ह्यांच्या विळख्यात अडकलेले आहेत. त्यातून एवढ्या लवकर बाहेर येणं काही शक्य नाही.

ह्या पेटलेल्या आगीवर राजकारणी आणि मिडिया ह्या दोघांनीही आपआपल्या फायद्याची पोळी भाजून घेतली. पण ते तेवढ्यापुरतंच होतं.

 

outlookhindi.com

अंकीतचे एका मुलीवर प्रेम होते. ती मुलगी वेगळ्या धर्माची होती. पण अंकीतने त्यांचे धर्म मध्ये येऊ न देता तिच्यावरचे प्रेम कायम ठेवले.

पण त्या मुलीच्या  घरच्यांना त्यांचे संबंध पटले नाही. त्यांच्या दृष्टीने मुलीने पर धर्मियावर चुकीचे होते. त्याने त्यांच्या समाजातील प्रतिमेला तडा जाणार होता. त्यांच्या प्रतिष्ठेसमोर मुलीचे प्रेम ही किरकोळ बाब होती.

त्यांना कोणत्याही किमतीवर आपल्या मुलीचे प्रेम यशस्वी होऊ द्यायचे नव्हते. त्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्यास तयार होते. शिवाय अंकितच्या प्रती त्यांच्या मनात अत्यंत चीड होती.

 

jansatta.com

हाच राग बाळगून त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. प्रतिष्ठा जपण्याच्या हेतूने त्वेषाने पेटलेला हा जमाव अंकितची निर्घृण हत्या करूनच शांत बसला. त्यांच्या दृष्टीने त्यांनी प्रतिष्ठा जपली होती.

पण अंकित आपल्या घरचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे तो त्याच्या आई-वडिलांच्या खूप लाडका होता. त्याच्या जाण्याने त्यांना किती दुःख झाले याची आपण कल्पनाही करू शकत नाही. प्रेमसंबंध पटले नाही म्हणून मुलाचा जीव घेणे ही मानसिकता पटण्याजोगी नाहीच.

आपल्या मुलासोबत असे काहीतरी घडले म्हटल्यावर कोणत्याही आई वडिलांना राग येईल. अशा वैरातून बदला घेण्याच्या घटनाही काही कमी नाहीत. पण या दुःखातून सावरत असतानाच अंकितच्या आई-वडिलांनी एक वेगळाच निर्णय घेतला.

 

thehindu.com

द हिंदू’ ने दिलेल्या बातमीनुसार

अंकितच्या मृत्युच्या ३ महिन्यांनंतर त्याचे पालक त्याच्या आठवणीत एक संस्था सुरु करणार आहेत. ही संस्था अशा प्रेमी युगलांची मदत करणार आहे ज्यांचे नातेवाईक त्यांच्या प्रेमसंबंधांच्या विरोधात आहेत.

अंकितचे वडील यशपाल सक्सेना ह्यांनी सांगितले की,

एकुलत्या एक मुलाच्या आठवणींना जिवंत ठेवण्यासाठी आम्ही अंकित सक्सेना ट्रस्ट सुरु करण्याची योजना आखत आहोत. ही संस्था अशा प्रेमी युगलांची मदत करतील जे वेगवेगळ्या जाती-धर्मातील असतील. ही संस्था मुख्यकरून समाजात शांतता निर्माण करण्यासाठी काम करेल.

 

zeenews.india.com

अंकितच्या वडिलांना अंकितचं युट्युब चॅनल ‘आवारा बॉय’ ला पुन्हा पुनर्जीवित करायचे आहे. पण युट्युब चॅनल कसं चालवतात हे त्यांना माहित नाही. ह्यासाठी ते अंकितच्या मित्रांची मदत घेणार आहेत.

अंकित सक्सेना ला एका दुसऱ्या जाती/धर्माच्या मुलीवर प्रेम करण्याची एवढी मोठी शिक्षा मिळाली की, त्यात त्याला त्याचा जीव गमवावा लागला. आता त्याच्या पालकांची केवळ एकच मागणी आहे की, त्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या प्रत्येकाला फाशीची शिक्षा व्हावी.

अंकितच्या पालकांनी उचललेलं हे पाऊल त्या सर्व पालकांच्या विक्षिप्त मानसिकतेवर एक सणसणीत चपराक असेल.

जे जाती धर्माच्या नावावर समाजात विषमता निर्माण करण्याचं काम करत आहेत, जे जातीच्या नावाखाली स्वतःचे निर्णय आपल्या मुलांवर लादतात अशा सर्वांनी यातून बोध घ्यायला हवा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version