Site icon InMarathi

माओवाद्यांच्या विळख्यातील एल्गार : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट (भाग ४)

Koregaon Bhima Report Featured Image 4 InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

संपादकीय निवेदन :

२०१८ ह्या वर्षाची सुरुवात महाराष्ट्रासाठी, आणि खरंतर देशासाठी अत्यंत निराशाजनक झाली. आपणा सर्वांना विमनस्क करणाऱ्या घटना नूतन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात घडल्या. आजही सदर घटनेचे पडसाद उमटत आहेतच. परंतु आजपर्यंत हे सर्व घटनाक्रम नेमके कसे घडत गेले, त्यामागे आधीच्या घटनांची कोणती पार्श्वभूमी होती ह्यावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला गेला नाही.

दंगलींसारख्या सामाजिक गुन्ह्यांच्या बाबतीत केवळ त्यावेळी दगडफेक करणाऱ्या गुन्हेगारांना अटक होणं पुरेसं नसतं. दंगल “घडविणाऱ्या” पडद्यागच्या सूत्रधारांपर्यंत पोहोचणं, त्यांचे चेहरे समोर आणणं आवश्यक असतं. हेच काम करण्याच्या उद्देशाने, सदर रिपोर्ट, विवेक विचार मंच तर्फे, तयार करण्यात आला आहे.

समाजात अभूतपूर्व दुही माजवणाऱ्या ह्या काळ्याकुट्ट घटनाक्रमांसाठी नेमके कोण जबाबदार आहेत हे महाराष्ट्रासमोर आणण्याच्या भूमिकेतून इनमराठी परिवाराने सदर अहवाल ५ भागांत प्रसिद्ध करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

टीम इनमराठी

===

रिपोर्ट प्रकाशक : विवेक विचार मंच, महाराष्ट्र

===

एकाच समाजाची समन्वय समिती नेमल्यामुळे पोलीस व गृह खात्याचा गोंधळ व समाजात रोष :

वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी कोरेगाव भीमा, सणसवाडी, वढू बुद्रुक परिसरातील व अन्य ठिकाणच्या दलित व मराठा समाजाच्या लोकांच्या स्वतंत्र बैठक घेतल्या. त्यांनी पोलीस तपासात मदत होण्यासाठी व पारदर्शक तपास होण्यासाठी दलित समाजाची एक समन्वय समिती स्थापन केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले.

मात्र या समितीने थेट सत्यशोधन अहवालच प्रसिद्ध केला, ज्यामध्ये भिडे व एकबोटे यांनीच पूर्वनियोजित कट रचून दंगल घडवली असा निष्कर्ष काढला. असे भासविले गेले की, पोलिसांनी तयार केलेल्या समितीनेच तपास करून हा अहवाल प्रसिद्ध केला.

मात्र असे वृत्त प्रसिद्ध होताच गृहखात्याने तातडीने खुलासा प्रसिद्ध केला की, पोलिसांकडून अशी कोणतीही समिती सत्यशोधन अहवाल तयार करण्यासाठी नेमली नव्हती. गृहखात्याचा खुलासा काही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला. मात्र या प्रकारामुळे समाजात, विशेषतः मराठा समाजात पोलीसांच्या एकांगी कारभाराबद्दल राग निर्माण झाला आहे. तसेच दलित समाजात ही समन्वय समिती स्थापन करूनही गृहखात्याने सत्यशोधन अहवाल नाकारल्याबद्दल रोष निर्माण झाला आहे.

दंगलीनंतर दोन समाजात निर्माण झालेली तेढ कमी करण्याची गरज असताना, पोलिसांनी दोन्ही समाजाच्या समन्वय समित्या तयार न केल्याने, किंवा एकाच समन्वय समितीत दोन्ही समाजाचे लोक समाविष्ट न केल्याने दोन्ही समाजात अधिकच गैरसमज पसरले आहेत.

 

 

जिग्नेश मेवानी, उमर खालिद, कबीर कला मंच व रिपब्लिकन पॅन्थरच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल:

कोरेगाव भीमा युद्धास २०० वर्षे पूर्ण होण्याचे निमित्त साधून विविध संघटनांनी एकत्र येऊन पुण्यातील शनिवारवाडा येथे एल्गार परिषद ३१ डिसेंबर रोजी आयोजित केली. या परिषेदच्या आयोजकांनी “नवी पेशवाई मसनात गाडा” असे आव्हान समाजाला केले होते. यामध्ये भाजप, आर.एस.एस.सह विविध हिंदुत्ववादी, संघटना, सोबतच मनसे, शिवसेना सह सीबीआय, एटीएस, रॉ या यंत्रणांनाही नव पेशवाई व त्याचे हस्तक असे संबोधून त्यांना विरोध करणारी पत्रके काढली गेली.

 

एल्गार परिषद समन्वय समितीने प्रसिद्ध व वितरित केलेले पत्रक

 

 

एल्गार परिषद समन्वय समितीने प्रसिद्ध व वितरित केलेले पत्रक

 

सदर परिषदेला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने, पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवे, तसेच मिलिंद एकबोटे यांच्यासह अन्य काही हिंदुत्ववादी लोकांनी विरोध दर्शविला. या परिषेदला पोलीस प्रशासनाने परवानगी देऊ नये अशी मागणी त्यांनी केली.

मात्र अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने नंतर सौम्य भूमिका घेत एल्गार परिषद आयोजकांना चर्चेचे आव्हान केले व संघटनेचे पुणे शहर प्रमुख आनंद दवे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेटही घेतली; तर पुणे शहर पोलिसांनी कोणतीही जातीय, धार्मिक तेढ निर्माण होणार नाहीअशा विविध अटींवर शनिवारवाडा येथे एल्गार परिषदेस परवानगी दिली.

 

एल्गार परिषदेला परवानगी देताना पोलिसांनी घातलेल्या अटींचे पत्र

या एल्गार परिषदेचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत अध्यक्ष होते व प्रकाश आंबेडकर यांच्यासह गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी, उमर खालिद (भारतीय सेनेच्या विरोधात भूमिका घेणारा व दहशतवादी अफझल गुरू व बुरहान वाणीचे उदात्तीकरण करणारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी), भीम आर्मीचे अध्यक्ष विनय रतन सिंग, सोनी सूरी, हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी व रोहित वेमुलाचा मित्र, तसेच आंबेडकर स्टुडन्ट असोसिएशनचा प्रशांत डोंथा, माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, उल्का महाजन, तसेच (तिहेरी तलाक प्रकरणात प्रतिगामी भूमिका घेणारे) ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना अब्दुल अझहरी व अन्य मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते.

रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला यांनी एल्गार परिषदेचे उदघाटन केले. पी. बी. सावंत ऐनवेळी उपस्थित न राहिल्याने प्रकाश आंबेडकर परिषदेचे अध्यक्ष झाले.

एल्गार परिषदेत जहाल व चिथावणीखोर भाषण केल्याच्या आरोपावरून आमदार जिग्नेश मेवानी व उमर खालिद यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला. तक्रारदार अक्षय बिक्कड यांनी सदर चिथावणीखोर भाषांणांचा

१ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराच्या अनुषंगाने तपास व्हावा म्हणून तक्रार अर्ज डेक्कन पोलीस स्टेशन येथे ४ जानेवारीला दाखल केला. ५ जानेवारी रोजी मेवानी व खालिद यांच्यावर विश्रामबाग पोलीस स्टेशनला भारतीय दंड संविधान कलम १५३ (अ), ५०५ व ११७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

अक्षय बिक्कड ह्यांची तक्रार

 

बिक्कड यांच्या तक्रारीनुसार मेवानी म्हणाले,

‘जाती निर्मूलन तो सडको की लडाई से होगा…एक वर्ग का दुसरे वर्ग के उपर जो शासन है, वो शासन सडको की लडाई करके ही खतम होगा।’ मेवाणी असेही म्हणाले की,

‘जाती अंताची लढाई असेम्ब्ली (संसदेत) नव्हे तर रस्त्यावरच्या लढाईतून होईल’.

 

 

तर उमर खालिद भाषण देताना म्हणाला,

कोरेगाव भीमा की इस लडाई को आनेवाला कल बना सकते है. उन्होने हमला किया, पालटवार की बारी है। लडाई को लडेंगे और ये लडाई जितना ही उन शहीदो को श्रद्धांजली रहेगी. और नवी पेशवाई का खात्मा ही भिमा कोरेगाव के शहिदो को श्रद्धांजली रहेगी।

या भाषणांचे व्हिडिओ पाहिले असता मेवानी व खालिद यांनी सदर वक्तव्य केल्याचे स्पष्ट झाले.

 

 

पुढे ९ जानेवारी रोजी पुण्यातील तुषार दामगुडे यांनी एल्गार परिषदेच्या आयोजनात सहभागी असेलेले व यापूर्वी नक्षलवादाशी संबंधित आरोपावरून कारवाई झालेले कबीर कला मंचचे कलाकार व त्यांचे सहकारी असे एकूण ६ जणांवर प्रक्षोभक भाषण व वैचारिक मांडणी करणारे सादरीकरण केल्याबद्दल विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.

यामध्ये कबीर कला मंचचे सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, दीपक ढेंगळे व त्यांचे सहकारी सुधीर ढवळे व हर्षाली पोतदार यांच्यावर भारतीय दंड संविधान कलम १५३ (अ), ५०५ व ११७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

तुषार दामगुडे ह्यांची तक्रार

मात्र, दीपक ढेंगळे एल्गार परिषदेत हजर होता; परंतु, आयोजन, संयोजन कशातही विशेष सहभागी नव्हता तरीही केवळ आकस बुद्धीने हा खोटा गुन्हा दाखल केला आहे असे कबीर कला मंच व त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आले.

मात्र, दामगुडे यांच्या तक्रारीनुसार सदर आरोपींवर यापूर्वीही पोलिसांनी ते माओवादी विचाराचे आहेत असा संशय असल्याने कारवाई केलेली आहे. तसेच, प्रतिबंधित सीपीएम (माओवादी) संघटनेचे असे धोरण आहे की, दलित समाजाची दिशाभूल करून त्यांच्यात माओवादी विचारांचा म्हणजेच संविधानिक नव्हे तर हिंसक मार्गाने परिवर्तन करण्याच्या विचारांचा प्रचार करणे.

या धोरणाचाच एक भाग म्हणून कबीर कला मंच, सुधीर ढवळे व त्यांचे कार्यकर्ते यांनी गेले काही महिने महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशा प्रकारे भडकाउ व जातीय तेढ निर्माण होईल असे चिथावणीखोर भाषण, दिशाभूल करणारा इतिहास, प्रक्षोभक गाणी व पथनाट्य सादर केले होते. तसेच पत्रके, पुस्तिका व भाषणे या माध्यमातून समाजात शत्रुत्व व तेढ निर्माण केले व त्याची परिणती १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा परिसरात जातीय हिंसाचार झाला.

दामगुडे यांच्या तक्रारीनुसार एल्गार परिषदेत सुधीर ढवळे आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले,

‘जब जुलम हो तब बगावत होनी चाहिये शहर मे, जब जुलम हो तब बगावत होनी चाहिये शहर मे,
और अगर बगावत ना हो, तो बेहेतर हो के ये रात ढलने से पहले ये शहर जलकर राख हो जाये’.

कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहता सुधीर ढवळे यांनी सदर वक्तव्य केल्याचे स्पष्ट झाले.

 

 

दामगुडे यांनी कबीर कला मंच प्रस्तुत गीत ‘उडवा ठिकर्‍या राई राई रे, गाडून टाका पेशवाई रे’ या गीतास प्रक्षोभक म्हटले आहे. दामगुडे यांच्यानुसार या गटावर पूर्वी नक्षलवादसंबंधी झालेली कारवाई पाहता त्यांची मांडणी व त्यामागील उद्देश याचा कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या अनुषंगाने तपास व्हायाला हवा.

सत्यशोधन समितीने माहिती घेतली असता शनिवारवाड्यावर ३१ डिसेंबरला एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात अनेक संघटना असल्या तरी त्यात कबीर कला मंच व रिपब्लिकन पँथर या जहाल डाव्या गटांनी सुरुवातीपासूनच पुढाकार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. १८१८ च्या भीमा कोरेगावच्या युद्धाच्या इतिहासाबाबत समाजात वाद आहेत.

एल्गार परिषदेत कबीर कला मंच व रिपब्लिकन पॅन्थर या जहाल डाव्या गटांनी कोरेगाव भीमा शौर्यदिनाच्या २०० वर्षपूर्तीच्या निमित्त वादग्रस्त इतिहासाचा आपल्या सोयीने गैरवापर करून त्याआधारे वर्तमान लोकशाही व्यवस्थेला ‘नवी पेशवाई’ म्हणत तिला गाडण्याचे आव्हान करणारी वैचारिक मांडणी अत्यंत स्ट्रॅटेजिक पद्धतीने केली आहे, अशी शंका येते.

या जहाल डाव्या गटांनी अनेक दलित, पुरोगामी, डावे, मुस्लिम व हिंदुत्व विरोधी भूमिका घेणारे लहान मोठे संघ एकत्र करून, १ जानेवारीच्या जयस्तंभ मानवंदनेच्या मुख्य कार्यक्रमाआधी काही महिन्यापासून ‘भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियान’ राबवून त्या निमित्त राज्यभर बैठका, सभा, जलसे याद्वारे वरील मांडणीचा प्रचार प्रसार केला गेला.

या मोहिमेचा शेवटचा कार्यक्रम म्हणजे पुण्यातील एल्गार परिषद जी ३१ डिसेंबर रोजी शनिवारवाडा येथे आयोजित केली होती व पुढे १ जानेवारी रोजी पेरणे येथील जयस्तंभाला मानवंदना देण्याचेही कार्यक्रमाचे नियोजन होते.

“शनिवारवाडा हे शहरात मध्यवर्ती ठिकाण असले, तरी एकेकाळची ही पेशवा अथवा मराठा साम्राज्याची राजधानी आहे. पेशवे हे ब्राह्मण असल्याने व उत्तर पेशवाईतील वाढलेल्या जातीवादाबाबत विविध इतिहासकार, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रखर मांडणी केल्यामुळे पेशवाईबाबत समाजातील विविध घटकांत एक स्वाभाविक राग आहे. त्यात १ जानेवारी १८१८ रोजी केवळ ५०० महार सैनिकांनी ब्रिटिश सैन्यात येऊन २५००० पेशवाई फौजेचा पराभव करीत जातीवादी पेशवाई राज्याचा अंत केला”

– अशी मांडणी दलित समाजात प्रचंड जोर धरत असताना, एल्गार परिषद याच पेशव्यांचे एकेकाळचे मुख्यालय असणारे शनिवारवाडा येथे आयोजित केल्याने, वादग्रस्त वातावरण तयार झाले. “आपल्या कार्यक्रमास ब्राह्मणांनी विरोध केला आहे, तेव्हा मोठ्या संख्येने या” अशा प्रकारचे जातीवादी आव्हान करून दलित आंबेडकरी समाजाला एल्गार परिषदेत येण्याचे आव्हान कबीर कला मंचचे कार्यकर्ते करीत होते.

एल्गार परिषदेतही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आजची लोकशाही व्यवस्था व हिंदुत्व विचाराशी जवळीक असणारे सरकार, शासन, म्हणजे एक प्रकारे दलित, बहुजन व अल्पसंख्य यांवर अन्याय करणारी ‘नवी पेशवाई’ आहे व ती उखडून टाकली पाहिजे अशी मांडणी भाषणे, जहाल गाणी व नाट्य सादरीकरण, तसेच पुस्तकांच्या विक्रीतून केली गेली.

कोरेगाव भीमा शौर्यदिन प्रेरणा अभियानने प्रकाशित केलेले पुस्तक याठिकाणी विक्रीस होते. या पुस्तकात भडक जातीवादी मांडणी दिसून येते. यामध्ये कौटुंबिक वादातून झालेले जवखेडा (अहमदनगर) येथील तिहेरी हत्याकांड हे “दलित हत्याकांड”च आहे,  मराठा क्रांती मोर्चामध्ये आर.एस.एस.ने मेंदू व शक्ती लावली होती, मराठा क्रांती मोर्चामुळे प्रकाशात आलेल्या, आत्महत्येच्या खाईत लोटलेल्या कष्टकरी मराठ्यांच्या असंतोषाला असे चुकीचे वळण देण्यात आले, केवळ जातीच्या नावाखाली कष्टकरी – गरीब मराठ्यांची दिशाभूल करण्यात आली, मराठा मोर्चाने गावागावात दलित व बौद्धविरोधात जातीय ध्रुवीकरण केले, असे दलित व मराठा समाजात जातीय तेढ निर्माण करणारे, वादग्रस्त लिखाण केले आहे.

 

जवखेडा हत्याकांड बाबत खोटी, प्रक्षोभक व तेढ निर्माण करणारी माहिती

 

दोन समाजात तेढ निर्माण करणारी प्रक्षोभक मांडणी

 

एल्गार परिषदेत विनोद अनाव्रत लिखित ‘शिवाजीचे उदात्तीकरण पडद्यामागचे वास्तव’ या पुस्तकाचीही विक्री झाली. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. शिवाजी महाराजांना बहुजन विरोधी, खंडणीखोर असे चुकीच्या पद्धतीने या पुस्तकात रंगविण्यात आले आहे. या पुस्तकात दलित, बहुजन समाजात शिवाजी महाराजांच्या विरोधात मत तयार करण्याचा प्रयत्न असून, ब्राह्मण, मराठा समजाविरोधात तेढ निर्माण होईल अशी जातीवादी मांडणी आहे.

एल्गार परिषदेत विक्रीस असलेले विनोद अनाव्रत लिहीत सुगावा प्रकाशनाचे वादग्रस्त पुस्तक

 

एल्गार परिषदेत विक्रीस असलेले विनोद अनाव्रत लिहीत सुगावा प्रकाशनाचे वादग्रस्त पुस्तक

 

हे पुस्तक पुण्यातील “सुगावा प्रकाशन”ने प्रकाशित केले असून, या प्रकाशन संस्थेशी संबंधित विलास वाघ यांना एल्गार परिषदेच्या मंचावर विशेष निमंत्रित केले गेले व त्यांच्याहस्ते सत्कार घेण्यात आला, हे विशेष.

एल्गार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. संभाजी ब्रिगेड या परिषदेच्या संयोजकापैकी एक आहे. संभाजी ब्रिगेडशी संबंधित अमोल मिटकरी याने १ जानेवारी आधी व नंतर जहाल, भडक अशा पोस्ट कोरेगाव भीमा युद्ध व वढू बुद्रुक येथील वादाला धरून सोशल मिडियावर टाकल्याचे आढळून आले आहे. तसेच, वढू बुद्रुक संबंधित गोविंद गोपाल महार यांच्याबाबत खोटा इतिहासही ते आपल्या भाषणातून मांडतात. याचा तपास होण्याची गरज आहे.

अमोल मिटकरी ह्यांच्या वादग्रस्त प्रक्षोभक पोस्ट्स

 

 

एल्गार परिषदेचा तयारीसाठी व ‘कोरेगाव भीमा शौर्यदिन प्रेरणा अभियान’ अंतर्गत घेतलेल्या विविध बैठक व कार्यक्रमाच्या पत्रक व मेसेजेसमध्ये सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप तसेच, वि. रा. साथीदार यांची नावे प्रकर्षाने दिसून येतात. या सर्वांची पार्श्वभूमी अत्यंत संशयास्पद आहे. हे सर्व लोक स्वतःला आंबेडकरी, फुले, शाहू, शिवरायांचे विचार म्हणणारे कलाकार म्हणवतात. वास्तवात मात्र हे अत्यंत जहाल डावे आहेत.

सुधीर ढवळे यांना २०११ मध्ये नक्षलवादाशी संबंधित गुन्ह्यात गोंदिया येथे अटक झाली आणि ४० महिन्यांनी त्यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. आता ते ’रॅडिकल आंबेडकर’ नावाची चळवळ उभी करीत आहेत. मात्र, ढवळे यांचे लागेबांधे अत्यंत संशयास्पद आहेत व मांडणी संविधान विरोधी आहे.

सप्टेंबर २०१६ मध्ये मुंबईमध्ये बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचा म्होरक्या श्रीधर श्रीनिवासन याच्या प्रथम मृत्यूदिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर ढवळेने केले. या वेळी माओवादी नेता श्रीनिवासनविषयी पुस्तकाचे प्रकाशन करताना ढवळे मंचावर होते. श्रीनिवासन माओवादी आहे हे माहीत असतानाही सुधीर ढवळेच्या ‘रिपब्लिकन पँथर जातीअंताची चळवळ’ संघटनेच्या कलापथकाने या कर्यक्रमात क्रांतिगीत सादर केले.

बुद्धाला स्वीकारणार्‍या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन काम करणारे रिपब्लिकन पँथरचे कार्यकर्ते जहाल (देश विरोधी, संविधान विरोधी) माओवादी श्रीनिवासनचे उदात्तीकरण करीत होते. एल्गार परिषदप्रमाणे, या २०१६ च्या कार्यक्रमात “ही जातीअंताची लढाई संसदेत नव्हे तर रस्त्यावर लढावी लागेल” अशी मांडणी उघडपणे करण्यात आली. (१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा परिसरात अशाच प्रकारचा हिंसाचार दिसून येतो). या कार्यक्रमात क्रांतीगीत सादर करणार्‍या रिपब्लिकन पँथर संघटनेच्या कलापथकात हर्षाली पोतदार व तिचे साथीदार स्पष्ट दिसून येतात.

 

देशविरोधी संविधानविरोधी माओवादी संघटनेचा म्होरक्या श्रीधर श्रीनिवासचे उदात्तीकरण करणाऱ्या कार्यक्रमात एल्गार परिषद आयोजक सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार व टीम

या कलापथकाचा फोटो सदर बातमीत दिसून येतो. हर्षाली पोतदार सोबत या कलापथकातील व सदर कार्यक्रमात उपस्थित असणारे काही जहाल डाव्या विचारांचे लोक संशयास्पद असून त्यापैकी काहींना एटीएसने १२ जानेवारी रोजी केलेल्या कारवाईत बंदी घातलेल्या माओवादी पार्टी सोबत काम करीत असल्याचा आरोपाखाली अटक केली आहे. तसेच हे संशयित लोक १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे आले असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

एटीएसने या गुन्ह्यात एकूण सात जण अटक केले आहे. यामुळे एटीएसने दाखल केलेला गुन्हा व विश्रामबाग पोलीस ठाणे येथे सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार, कबीर कला मंच कलाकार यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांचा एकत्रित तपास होण्याची गरज आहे. एटीएसने अटक केलेले संशयित माओवादी व सुधीर ढवळे, हर्षली पोतदार, कबीर कला मंच, तसेच एल्गार परिषद व कोरेगाव भीमा दंगल या सर्वाचे एकमेकांशी काय लागेबांधे आहेत याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे.

दरम्यान, याच हर्षाली पोतदारची २०१३ साली गडचिरोली येथे माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून कसून चौकशी करण्यात आली होती. त्या वेळी तिला अटक न करता सोडून देण्यात आले, मात्र पुढे ती श्रीधर श्रीनिवासन या माओवादी नेत्याच्या उदात्तीकरणाच्या कार्यक्रमात गाणी सादर करताना दिसते. तेंव्हा ढवळे, पोतदार व त्यांचे रिपब्लिकन पँथर संघटन आंबेडकरी नसून जहाल डावे माओवादी विचाराने काम करणारा गट आहे, अशी शंका निर्माण होते.

हर्षाली पोतदार ह्यांचे माओवाद्यांशी संबंध असल्याची चौकशी

२०१४ साली अरुण भेलके व कांचन ननावरे हे माओवादी पुण्यात पकडले गेले. तपासात निष्पन्न झाले की भेलकेने भारिप बहुजन महासंघाच्या गोवंडी, मुंबई येथील तत्कालीन नगरसेवक अरुण कांबळे यांची दिशाभूल करून त्यांच्या ऑफिसच्या पत्त्यावर आदित्य पाटील या बोगस नावाने बोगस आधारकार्ड काढले. हा भेलके, सुधीर ढवळे यांच्या रिपब्लिकन पँथरच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात होता. हे अत्यंत संशयास्पद आहे.

 

माओवादी अरुण भेळके ह्याने भारिप नगरसेवकच्या पत्त्यावर बनावट नावाने पॅन कार्ड बनवले

गोध्रा दंगलीनंतर धार्मिक सलोखा निर्माण करण्यासाठी पुण्यातील काही मंडळीनी एकत्र येऊन कबीर कला मंच स्थापन केले. मात्र, श्रीधर श्रीनिवासन, सुधीर ढवळे व त्यांच्या जहाल डाव्या सहकार्‍यांनी कबीर कला मंचला हायजॅक केले असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. २०११ साली माओवादी अन्जेला सोनटक्केला अटक झाली.

ती व तिचा पती मिलिंद तेलतुंबडे पुणे, मुंबई व अन्य शहरात माओवादी विचार पसरविणे व शहरी तरुण माओवादी चळवळीत ओढण्याचे काम करीत होते. याच गुन्ह्यात कबीर कला मंचचे काही कलाकारही अटक झाले.

बंदी घातलेल्या माओवादी संघटनेसोबत संबंध असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या संपर्कातील संतोष शेलार व प्रशांत कांबळे हे पुण्याच्या वस्ती भागातील तरुण गायब असून आता जंगलातील बंदी घातलेल्या माओवादी पार्टीसोबत हाती बंदुका घेऊन लोकशाही व्यवस्था व सरकार विरोधात सक्रीय काम करीत आहेत, असे वृत्त आहे.

 

पुण्यातून गायब झालेल्या संतोष शेलार बाबत बातमी

आज कबीर कला मंचमधील सर्व संशयित आरोपी कलाकार जामिनावर सुटले आहेत. मात्र, जामीन देताना मुंबई उच्च न्यायालयाने कबीर कला मंचचे आरोपी कलाकार ‘नक्षल समर्थक’ (sympathizers of Maoist ideology) असल्याच्या माहितीत तथ्य असल्याचे म्हटले आहे. (संदर्भ लिंक)

तसेच गडचिरोली येथील शरणागत नक्षलवाद्यांनीही कबीर कला मंचच्या संशयित आरोपी कलाकारांनी त्यांच्यासोबत जंगलात प्रशिक्षण घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

 

कबीर कला मंच संदर्भात ATS

तसेच मागील वर्षी सर्वोच न्यायालयातून जामीन मिळताच जेलमधून बाहेर आल्यावर कबीर कला मंचच्या कलाकारांनी माओवादी श्रीनिवासनचे उदात्तीकरण करणार्‍या सुधीर ढवळेची भेट घेतली, त्यासोबत मुंबई येथे जलसा सादर केला आणि आता भीमा कोरेगाव शौर्यदिन अभियानापर्यंत अनेक प्रसंगी ढवळे व कबीर कला मंच एकत्रित काम करीत आहेत.

कबीर कला मंचची गाण्यांची सीडी – “ही गाणी आमुची, आमुचा गुन्हा काय?” ऐकावी. यामध्ये गाण्यांच्या सुरुवातीला छ. शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ, अमर शेख, विलास घोगरे यांच्यासह मार्क्स, लेनिनी, माओ यांच्या नावाचा उद्घोष केला आहे. यावरून कबीर कला मंचच्या वैचारिक भूमिकेवर संशय निर्माण होतो. हे कलाकार शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घेतात मात्र आपल्या कामातून जहाल डावा माओवादी विचार पसरवण्याचे काम नियोजित पद्धतीने करतात असे दिसून येते.

 

 

एल्गार परिषदेच्या आयोजनात कलाकार, लेखक व रिपब्लिकन पँथरचे जेष्ठ कार्यकर्ते वि. रा. साथीदार व जहाल डाव्या विचारांच्या शोमा सेनही उपस्थित होते. साथीदार ही एल्गार परिषदेच्या व कोरेगाव भीमा शौर्यदिन प्रेरणा अभियानाच्या कामात सक्रीय होते.

काही महिन्यापूर्वी शोमा सेन यांचे पती तुषारकांती भट्टाचार्य यांना माओवादासंदर्भातील गुन्ह्यात गुजरात पोलिसांनी अटक केली होती. त्या वेळी तत्काळ शोमा सेन सोबत वि. रा. साथीदार यांनी भट्टाचार्य यांच्या सुटकेच्या मागणीसाठी पत्रकार परिषद घेतली. मात्र, ज्या वेळी माओवादी जंगलात गरीब आदिवासी, दलितांची निर्घृण हत्या करतात, त्या वेळी साथीदार, शोमा सेन काहीही बोलत नाहीत. यावरून साथीदार, शोमा सेन यांच्याही वैचारिक भूमिकेबद्दल शंका निर्माण होते. हे दोघे आंबेडकरी नसून जहाल डावे असल्याचे दिसून येते.

रिपब्लिकन पँथर व कबीर कला मंचसारख्या संशयास्पद जहाल डाव्या गटांनी भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियानाची सूत्र आपल्या हाती घेतली. कोरेगाव भीमा २००व्या शौर्यदिन – १ जानेवारी २०१८ या दिवसाचे निमित्ताने या मंडळीनी चळवळ उभी केली, ३१ डिसेंबर रोजी एल्गार परिषेदत घेतली.

मात्र नेमकं १ जानेवारीलाच हे सर्व संशयित लोक व एल्गार परिषदेतील मुख्य वक्ते उमर खालिद, आमदार जिग्नेश मेवानी, बी. जी. कोळसे पाटील व अन्य मंडळी कोणीच जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी गेले नाहीत, हे अत्यंत संशयास्पद आहे. कारण, दर वर्षी कबीर कला मंच व रिपब्लिकन पँथर व अन्य काही डाव्या विचारांचे गट १ जानेवारीला दिवसभर जयस्तंभ परिसरात विविध कार्यक्रम घेतात, पथनाट्य सादर करतात, पत्रक वाटतात.

कबीर कला मंच व रिपब्लिकन पँथरने एकत्र येऊन २०१५ साली एक पत्रक जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या दलितांमध्ये वाटले. या पत्रकात ‘आजच्या पेशवाईचा मुकाबला करण्यासाठी कंबर कसू या’ असे आव्हान करीत पुढे शस्त्र, भीषण युद्ध अशी वाक्य असणारा प्रक्षोभक मजकूर जाणीवपूर्वक मांडल्याचे समजते.

 

कबीर कला मंच ने १ जानेवारी २०१५ रोजी जयस्तंभ जवळ वाटलेले पत्रक

यावरून २०१५ पासून, म्हणजे देशात व राज्यात भाजपचे हिंदुत्ववादी विचाराशी जवळीक असणारे सरकार आल्यापासून माओवादी विचारांच्या संशयित गटांनी, हिंदुत्ववादी विचार हा दलित, बहुजन व अल्पसंख्य विरोधी असून या विचारांचे सरकार म्हणजे ‘नवी पेशवाई’ अशी संकल्पना व विचार समाजात हळूहळू पद्धतशीरपणे रुजविण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते.

आता एल्गार परिषदेनिमित्त तयार केलेल्या पत्रकात भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना, मनसे यांसह अन्य हिंदुत्ववादी व राजकीय विचारांच्या पक्ष संघटनांना ‘नवी पेशवाई’ म्हणून, सोबत एटीएस, सीबीआय, रॉ अशा पोलीस तपास यंत्रणांनाही ‘नवी पेशवाई’चे पोशिंदे म्हंटले आहे व या ‘नव्या पेशवाई’ला मसनात गाडण्याचे आवाहन केले आहे.

तसेच या ‘नव्या पेशवाई’ विरोधातील (रस्त्यावरच्या) लढाईसाठी प्रतीक म्हणून १८१८ साली इंग्रज मराठा युद्धाच्या इतिहासाचा आपल्या सोयीने गैरवापर करून आजच्या काळात जातीय तेढ वाढविण्यासाठी कोरेगाव भीमा युद्धाच्या विजयस्तंभावर या फुटीरतावादी गटांकडून लक्ष केंद्रित केले असण्याची शक्यता आहे.

याबाबत पोलिसांनी १ जानेवारीच्या हिंसाचाराच्या अनुषंगाने सखोल तपास करण्याची गरज आहे. तसेच, सर्व समाजाने एकत्र येऊन फुटीरतावादी गटांचे मनसुबे हाणून पडण्याची गरज आहे.

===

हे ही वाचा – आणखी काही धक्कादायक धागेदोरे, निष्कर्ष आणि ठोस मागण्या

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version