आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
हे ही वाचा : “पहिला दगड कुणी फेकला?” : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट : सूत्रधार आणि घटनाक्रम (भाग २)
===
संपादकीय निवेदन :
२०१८ ह्या वर्षाची सुरुवात महाराष्ट्रासाठी आणि खरंतर देशासाठी अत्यंत निराशाजनक झाली. आपणा सर्वांना विमनस्क करणाऱ्या घटना नूतन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात घडल्या. आजही सदर घटनेचे पडसाद उमटत आहेतच. परंतु आजपर्यंत हे सर्व घटनाक्रम नेमके कसे घडत गेले, त्यामागे आधीच्या घटनांची कोणती पार्श्वभूमी होती ह्यावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला गेला नाही.
दंगलींसारख्या सामाजिक गुन्ह्यांच्या बाबतीत केवळ त्यावेळी दगडफेक करणाऱ्या गुन्हेगारांना अटक होणं पुरेसं नसतं. दंगल “घडविणाऱ्या” पडद्यागच्या सूत्रधारांपर्यंत पोहोचणं, त्यांचे चेहरे समोर आणणं आवश्यक असतं. हेच काम करण्याच्या उद्देशाने, सदर रिपोर्ट, विवेक विचार मंच तर्फे, तयार करण्यात आला आहे.
समाजात अभूतपूर्व दुही माजवणाऱ्या ह्या काळ्याकुट्ट घटनाक्रमांसाठी नेमके कोण जबाबदार आहेत हे महाराष्ट्रासमोर आणण्याच्या भूमिकेतून इनमराठी परिवाराने सदर अहवाल ५ भागांत प्रसिद्ध करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
टीम इनमराठी
===
रिपोर्ट प्रकाशक : विवेक विचार मंच, महाराष्ट्र
===
आरोप-प्रत्यारोप
मिलिंद एकबोटे व मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हे दाखल :
दि. २ जानेवारी २०१८ ला पिंपरी-चिंचवडमध्ये मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली. २ जानेवारीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी या दंगलीमागे हिंदुत्ववादी असल्याचा आरोप केला. पुढे प्रकाश आंबेडकर यांनी भिडे-एकबोटे यांना अटक करण्याची मागणी केली.
२ जानेवारी रोजी पिंपरी पोलीस स्टेशनजवळ शेकडो आंबेडकरी दलित, मुस्लीम, डाव्या कार्यकर्त्यांचा जमाव आला व आक्रमक होऊन भिडे व एकबोटे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली गेली. काही तासानंतर वाढत्या दबावामुळे जमावाच्या मागणीनुसार पोलिसांनी शून्य नंबरने भिडे व एकबोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सदर गुन्हा अनिता रवींद्र सावळे, वय ३९, राहणार काळेवाडी, यांच्या तक्रारीनुसार दाखल करण्यात आला.
यामध्ये अनिता सावळे यांनी आपली मैत्रीण अंजना गायकवाड यांनी कोरेगाव भीमा शौर्यदिननिमित्त विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी गेले असता सदर घटना (दंगल) या संभाजी भिडे, शिवजागर प्रतिष्ठान प्रमुख, मिलिंद एकबोटे, हिंदू जनजागरण समिती प्रमुख व त्यांच्या सवर्ण साथीदारांनी घडवून आणलेला आहे हे आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पहिले आहे, असे म्हटले आहे.
यानुसार पोलिसांनी मिलिंद एकबोटे, हिंदू जनजागरण समिती प्रमुख व संभाजी भिडे, शिवजागर प्रतिष्ठान प्रमुख, यांच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०७, १४७, १४८ , १४९, २९५ (अ), ४३६, ४३५, आर्म ऍक्ट ३ (२५), अनुसूचित जाती जमाती अधिनियम १९८९ (अॅट्रॉसिटी कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल केला. कलम १२० ब काही दिवसांंनंतर लावण्यात आले.
मात्र, १ जानेवारी रोजी संभाजी भिडे स्वतः सांगलीत होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या आई कै. कुसुमताई पाटील यांच्या रक्षाविसर्जनाच्या कार्यक्रमावेळी इस्लामपुरात उपस्थित होते, असे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे.
तसेच एकबोटेही १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा परिसरात गेले नव्हते असे समजले आहे. एकबोटे यांना गेली अनेक वर्ष पोलीस संरक्षण आहे, त्यांच्या पोलीस रक्षकानेही ते १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा परिसरात गेले नाही, असे आपल्या जबाबात म्हटले आहे. यामुळे ते स्वतः उपस्थित राहून हिंसाचार करीत होते, असा जो दावा तक्रारदार यांनी केला आहे, तो पूर्णपणे चुकीचा व संशयास्पद ठरतो.
तसेच, भिडे व एकबोटे यांचे नाव पोलीस तपासात पुढे आलेले नसून त्यांच्यावरील सदर गुन्हा केवळ जमावाच्या दबावाखाली येऊन, जमावाच्या मागणीनुसार पुणे शहर पोलीस हद्दीतील पिंपरी पोलीस स्टेशन येथे दाखल करून घेतला व नंतर पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतील शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तपासासाठी वर्ग करण्यात आला, हे समजून घ्यावे लागेल. सदर तक्रारीत भिडे व एकबोटे यांच्या संघटनांचे नाव चुकले आहे.
मिलिंद एकबोटे हे हिंदू जनजागरण समिती प्रमुख नाहीत. त्यांच्या संघटनेचे नाव समस्त हिंदू आघाडी असे आहे. भिडे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे प्रमुख असून शिवजागर प्रतिष्ठान नाव चुकले आहे. यावरून तक्रारदार याना भिडे व एकबोटे यांच्याबाबत पुरेशी माहिती नाही असे म्हणता येईल. म्हणून त्यांनी दाखल केलेली तक्रार अधिकच शंकास्पद वाटते.
पुढे, ३ जानेवारी रोजी दलित कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी भिडे व एकबोटे यांच्याविरोधात पुणे शहर पोलीस हद्दीतील येरवडा पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल केला. अंधारे यांचा जबाब शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यास जोडला आहे.
आपल्या जबाबात अंधारे यांनी भिडे व एकबोटे यांच्या संघटनांची नावे चुकवलेली नाहीत. या दोघांना भीमा कोरेगाव परिसरात झालेल्या दंगलीस त्यांनी कारणीभूत धरले आहे. मात्र, आपल्या जबाबात अंधारे म्हणतात की,
“भिडे व एकबोटे यांनी १ जानेवारी रोजी ‘भीमा कोरेगाव येथील स्थानिक योगेश नरहरी गव्हाणे व गणेश भाऊसाहेब फडतरे यांच्याकरवी मुद्दाम जाणीवपूर्वक भीमा कोरेगाव बंद पुकारून सुमारे ८०० ते १००० लोकांनी हातात भगवे झेंडे घेऊन जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देत “यांना सोडू नका याना अडवा” असे म्हणत भीमा कोरेगाव येथील शौर्य स्तंभाचे दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या असंख्य भाविक, महिला, लहान मुले व इतर लोकांवर दगडफेक करून त्यांना जखमी केले असून अनेक भाविकांच्या गाड्यांची तोडफोड करून जाळपोळ करून लाखो रुपयांच नुकसान केले आहे”
यामुळे संभाजी भिडे व एकबोटे यांच्यासोबत पोलिसांनी योगेश गव्हाणे व गणेश फडतरे या दोघांना सदर गुन्ह्यात गंभीर कलमाखाली आरोपी केले आहे.
मात्र, माहिती घेतली असता समजले की,
गणेश फडतरे हे कोरेगाव भीमाचे माजी उपसरपंच असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अशोक पवार यांचे समर्थक असून नोव्हेंबर महिन्यात या परिसरात गणेश फडतरे यांनी अशोक पवार यांच्या समर्थनात राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह असलेल्या घड्याळसह मोठे फ्लेक्स लावले होते. तसेच निवडणुकीत पक्षासाठी प्रचार ही केला होता. तसेच, त्याने काही दिवसांपूर्वी भाजप आमदार बाबूराव पाचारणे यांच्यासाठीही फ्लेक्स लावले असल्याचे ग्रामस्थ सांगतात. मात्र त्याची जवळीक अशोक पवार यांच्यासोबत होती, असे ग्रामस्थ ठामपणे सांगतात.
एकूणच फडतरे हे राजकीय आकांक्षा बाळगणारे असून त्यांचा कोणत्याच हिंदुत्व चळवळीशी, तसेच भिडे व एकबोटे यांच्याशी काहीही संबंध नाही व त्यांच्यावर खोटा आरोप ठेवण्यात आला आहे, असे त्यांचे नातेवाईक सांगतात.
तसेच, योगेश गव्हाणे हेही स्थानिक शेतकरी, व्यावसायिक असून भिडे व एकबोटे यांच्यासोबत त्यांचा काहीही संबंध नाही असे समजले.
गव्हाणे १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे नव्हते हे स्पष्ट झाले आहे. तसेच त्यांचे स्वतःचे ‘जय भवानी’ नावाचे हॉटेल व महागड्या गाड्या दंगलखोरांनी जाळून टाकल्या आहेत. गव्हाणे स्वतः उपस्थित नव्हते व त्यांच्या गाड्या, तसेच हॉटेलचे मोठे नुकसान दंगलखोरांनी केले, असे असतानाही त्यांनाच या गुन्ह्यात आरोपी करणे म्हणजे गंभीर चूक असून मनस्ताप वाढविणारे आहे, असे त्यांचे निकटवर्ती सांगतात. गव्हाणे यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, तसेच कोणत्याच हिंदुत्ववादी संघटनेसोबत तसेच भिडे, एकबोटे यांच्यासोबत त्यांचे संबध नाहीत.
फडतरे व गव्हाणे स्थानिक मराठा आहेत. वढू बुद्रुक येथे खोटा इतिहास असणारा फलक लावण्यावरून जो वाद झाला त्याच्यावरून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये म्हणून १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा बंदचा निर्णय ग्रामपंचायतीने ग्रामसभेत घेतला व त्याबाबतचे ३० डिसेंबर दिनांक असलेले पत्र ग्रामपंचायत कोरेगाव भीमाने अधिकृतपणे शिक्रापूर पोलीस स्टेशनला दिले. या पत्रात सूचक म्हणून गणेश फडतरे व अनुमोदक म्हणून योगेश गव्हाणे यांचे नाव आहे. तसेच, गावच्या सरपंच रेखा कांबळे (ज्या स्वतः दलित आहेत) यांची सही व शिक्का आहे.
यामुळे भिडे व एकबोटे यांनी गव्हाणे व फडतरे यांच्या करवी गाव बंद पुकारला, असे तक्रारदार अंधारे यांचे म्हणणे खोटे व शंकास्पद ठरते. फडतरे तर गेली काही वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जवळीक ठेवून आहेत, मग ते हिंदुत्ववादी भिडे व एकबोटे यांचे ऐकून गाव बंद करून दलितांवर हल्ला करण्याच्या कटात सामील होतील का? असा प्रश्न ही पडतो.
या ठिकाणी अंधारे यांनी दिलेल्या जबाबात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित गणेश फडतरे यांचे नाव घेतल्याने दंगल हिंदुत्ववादी गटांनी घडवली हा जो दावा पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला, त्यावरही शंका उपस्थित होते. अशा प्रकारे, अनिता सावळे व सुषमा अंधारे या दोघांच्या तक्रारीत गंभीर शंकास्पद माहिती स्पष्ट दिसून येते.
प्रत्यक्ष कोरेगाव भीमा युद्धाबाबत व २०० वर्ष निमित्त जयस्तंभ येथे होणार्या कार्यक्रमाबाबत स्वतः संभाजी भिडे यांनी कोणतेही विधान केल्याचे सापडले नाही. भिडे यांच्या संघटनेशी संबंधित काहीं मोजक्या कार्यकर्त्यांनी वैयक्तिक पातळीवर १ जानेवारीला शिवछत्रपतींचे मराठा साम्राज्य संपले या भूमिकेतून काळा दिवस म्हंटले. मात्र भिडे व शिवप्रतिष्ठानची अशी कोणतीही भूमिका दिसून येत नाही.
भिडे हे मागील चार-पाच वर्षे वढू बुद्रुक अथवा कोरेगाव भीमा परिसरात फिरकले नाही व त्यांची याविषयी सभाही झाली नाही. स्वतः संभाजी भिडे यांनी पत्रकारांना सांगितले. आपण कोणत्याही चौकशीला समोर जायला तयार आहोत.
तसेच, सांगली येथे विविध समाजातील लोकांनी भिडे दलित विरोधी नाहीत व त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे अशी भूमिका मांडली. विशेष म्हणजे अभिजित इनामदार (कोरेगाव भिमा युद्धात शौर्य गाजविणारे सिदनाक महार यांचे वंशज) यांनीही संभाजी भिडे यांना पाठिंबा दिला.
माहिती घेतली असता समजले की, मिलिंद एकबोटे हे वढू गावात संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीला ‘बलिदानदिनाचा’ कार्यक्रम दर वर्षी करतात. त्यांचे मित्र, कार्यकर्ते गावात व आसपासच्या परिसरात आहेत. गावातील छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीचे ते अनेक वर्ष काम करतात.
वढू गावातील वादग्रस्त इतिहास असणारा फलक बेकायदेशीरपणे लावण्याच्या घटनेवरून २९ डिसेंबर २०१८ ला ज्या ४९ जणांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत केसेस दाखल झाल्या, त्या तक्रारीत मिलिंद एकबोटे यांच्या सांगण्यावरून सर्व प्रकार झाल्याचे म्हटले होते.
मात्र वादग्रस्त इतिहास असणारा फलक एकबोटे किंवा त्यांच्या समर्थकांनी लावलेला नाही. सदर फलक ग्रामपंचायतची परवानगी न घेता लावल्याने व त्यावरील खोटा इतिहास हा मराठा समाजाला मान्य नसल्याने, काढून टाकण्यात आला.
यामध्ये एकबोटे कुठेही सहभागी असल्याचे दिसून येत नाही. तरीही त्यांचे नाव तक्रारीत घेण्यात आले, ही बाब शंकास्पद आहे.
मात्र त्या वेळी पोलिसांनी एकबोटे यांना अटक केली नव्हती किंवा त्यांचे नाव आरोपीच्या यादीतही घेतले गेले नाही. यावरून पोलिसांनाही या प्रकरणात एकबोटे नसल्याचे दिसून आले, असे म्हणावे लागेल.
मिलिंद एकबोटे यांनी पुण्यात शनिवारवाड्यावर होणार्या एल्गार परिषदेत उमर खालिद व जिग्नेश मेवानी येणार म्हणून त्या परिषदेला पत्रकार परिषद घेऊन विरोध दर्शविला होता. या परिषदेस परवानगी देऊ नये असे पत्र त्यांनी महापौर मुक्ता टिळक व पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले.
तसेच, २९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना १ जानेवारी रोजी पेरणे गावातील विजयस्तंभ येथे पेशवाईचा पराभव झाला व ब्रिटिशांचा विजय झाला याचा उत्सव करू नये, त्यासाठी शासकीय सुविधा दिल्या जाऊ नये, म्हणून पत्र दिले.
या कार्यक्रमास वैचारिक विरोध दाखविणारी पत्रकार परिषद ३० डिसेंबर रोजी एकबोटे यांनी घेतल्या. एक पत्रकार परिषद पुणे श्रमिक पत्रकार संघात दुपारी १च्या दरम्यान घेतली व नंतर कोरेगाव भीमा जवळील सोनई हॉटेल येथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही पत्रकारांना बोलावून घेतले.
येथेही पत्रकार परिषद होणे अपेक्षित होते. मात्र याठिकाणी एकबोटे आले व पत्रकारांशी काही न बोलता गेले, केवळ त्यांचे पत्रक सोनई हॉटेल येथे जमलेल्या पत्रकरांना पत्रक वाटून निघून गेले.
पुढे या सोनई हॉटेल येथील १ जानेवारीच्या हिंसाचाराचा कट रचला असा आरोप केला जातोय. मात्र या सोनई हॉटेलला उपस्थित हिंदुत्ववादी कार्यकर्ते सोबतच पत्रकार व अन्य लोकांचे जबाब पोलिसांनी घेतले आहेत. पत्रकार व हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्यांच्यासमोर कोणताही कट रचला गेला नाही असे सांगतात.
विशेष म्हणजे एकबोटे यांना मागील अनेक वर्षांपासून पोलीस संरक्षण आहे. ते सोनई हॉटेलला त्यांचा पोलीस रक्षकासोबत गेले होते. या पोलीस रक्षकाचाही जबाब तपास अधिकार्यांनी घेतलेला आहे. या पत्रकाच्या आधारे कोणती बातमी वर्तमानपत्रात १ जानेवारीच्या आधी प्रसिद्ध झालेली नाही. तसेच स्थानिक ग्रामस्थ व अन्य नागरिकामध्ये या पत्रकाचे वाटप झालेले नाही.
१ जानेवरीच्या कार्यक्रमास केवळ वैचारिक विरोध दाखविणारे हे पत्रक म्हणजे हिंसाचार घडवून आणण्याचा कट रचणे असे होत नाही, असे एकबोटे यांचे समर्थक म्हणतात.
एकबोटे यांनी दि.२ जानेवारी २०१८ ला प्रेस नोटद्वारे अशा प्रकारे आपल्याच बांधवांवर हल्ले करण्याचा विचार स्वप्नात सुद्धा करणार नाही व स्वतः निर्दोष असल्याचे म्हटले. अनेक दलित संघटना व कार्यकर्ते, पैकी अण्णाभाऊ साठे यांचे कुटुंबातील सुशांत साठे, यांनी पत्रकार परिषद घेऊन एकबोटे यांना पाठिंबा दिला आहे व ते दलित विरोधी नाहीत असे मत मांडले.
(एकबोटे यांना अटक करण्यात आली असून प्रकरण न्यायप्रलंबित आहे.)
आरोपी अनिल दवे कोण?
शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल सदर गुन्ह्यात संभाजी भिडे, एकबोटे, योगेश गव्हाणे, गणेश फडतरे यांच्यासह अनिल दवे नामक व्यक्तीलाही आरोपी करण्यात आले आहे. औरंगाबाद येथे जयश्री सुदाम इंगळे यांनी दाखल केलेल्या तक्रारी वरून अनिल दवे नामक माणसाला आरोपी केले आहे.
मात्र सदर अनिल दवे यांचा नाव पत्ता काहीच नसून कोरेगाव भीमा दंगल संबंधित असा कोणी माणूसच अस्तित्वात नाही, असे समोर येत आहे. यामुळे अनिल दवेस आरोपी करणेही शंकास्पद ठरते.
दरम्यान, तक्रारदार इंगळे यांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांच्याविरोधात तक्रार द्यायची असावी, मात्र आनंद दवेबाबत विशेष माहिती नसल्याने त्यांनी अनिल दवे असे नाव आपल्या तक्रारीत घेतले, अशी शंका आहे. हे आनंद दवे, एकबोटे व भिडे यांचे कार्यकर्ते नाहीत, त्यांनी एल्गार परिषदेस केलेला विरोध ही केवळ वैचारिक होता व परिषद होण्याआधीच त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत अनौपचारिक भेटही घेतली होती.
यामुळे आनंद दवे यांचा कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी घडलेल्या हिंसाचारात कोणत्याही प्रकारचा संबंध नाही हे लक्षात येते व इंगळे यांनी औरंगाबाद येथे दाखल केलेल्या तक्रारीवरून व इंगळेना या गुन्ह्यात साक्षीदार करून, त्याआधारे अनिल दवे हे नाव आरोपी नंबर ५ म्हणून घेतल्याने पोलिसांच्या एकूण कारवाईवर व तपासावर मोठी शंका उपस्थित होते. (सदर गुन्ह्यात एकबोटे यांना अटक करण्यात आली, मात्र न्यायालयाने त्यांना जामिनावर मुक्त केले. अन्य कोणासही या गुन्ह्यात अद्यापपर्यंत अटक केलेली नाही.)
दरम्यान, कोरेगाव भीमा येथे दंगलीत जवळपास दहा पोलीस जखमी झाले. यापैकी एका पोलिसाने गुन्हा दाखल केला असून यामध्ये भगवे झेंडे घेऊन १ जानेवारीला वढू बुद्रुक येथे जाणारे, तसेच काही स्थानिक दलित व अल्पवयीन मुले असे ३० पेक्षा अधिक लोकांना पोलिसांच्या खूनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली. या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून गोव्यातून कोरेगाव भीमाचे माजी उपसरपंच गणेश फडतरे यांना मुख्य सूत्रधार म्हणून अटक केल्याचे वृत्त आहे.
अटक केलेल्या सर्वांची पुढे न्यायालयाच्या आदेशानुसार जामिनावर सुटका करण्यात आली. पुढे एकबोटे यांनाही या गुन्ह्यात सूत्रधार म्हणून अटक करण्यात आली, मात्र न्यायालयाने त्यांना जामिनावर मुक्त केले.
मात्र, गणेश फडतरे, भिडे व एकबोटे यांचे कार्यकर्ते नसून ते राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत हे स्पष्ट झाले आहे, तसेच सणसवाडी दंगलीमध्येही काही स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित व अन्य तरुण असल्याचे स्थानिक सांगतात व म्हणून या हिंसाचारालाला हिंदुत्ववादी षडयंत्र म्हणणे शंकास्पद आहे.
हिंसाचारात काही पोलीसही जखमी झाले. मात्र, स्थानिक ग्रामस्थांपैकी मग ते दलित असो वा भगवे झेंडे हाती घेतलेले मराठे किंवा अन्य लोक असो, कोणीही पोलिसांवर हल्ला केला नाही, असे कोरेगाव भीमा व सणसवाडीचे गावकरी सांगतात.
स्थानिक गावकरी व पोलिसांचे रोजचे संबंध असतात, तेव्हा पोलिसांवर हल्ला करणारे स्थानिक नसून हे पोलिसांवरील हल्ले बाहेरून आलेल्या सशस्त्र गटांनी केले आहे, असे कोरेगाव भीमा व सणसवाडीचे गावकरी, विविध व्हिडिओचा आधार घेऊन सांगतात. तसेच, या गुन्ह्यात हिंसाचारात सहभागी नसलेल्या काही लोकांनाही खोट्या पद्धतीने अटक केल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
===
हे ही वाचा : माओवाद्यांच्या विळख्यातील एल्गार : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट (भाग ४)
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.