Site icon InMarathi

कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट : पडद्यामागचे सूत्रधार आणि घटनाक्रम (भाग १)

Koregaon Bhima Report Featured Image InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

संपादकीय निवेदन :

२०१८ या वर्षाची सुरुवात महाराष्ट्रासाठी आणि खरंतर देशासाठी अत्यंत निराशाजनक झाली. आपणा सर्वांना विमनस्क करणाऱ्या घटना नूतन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात घडल्या. आजही सदर घटनेचे पडसाद उमटत आहेतच. परंतु आजपर्यंत हे सर्व घटनाक्रम नेमके कसे घडत गेले, त्यामागे आधीच्या घटनांची कोणती पार्श्वभूमी होती ह्यावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला गेला नाही.

दंगलींसारख्या सामाजिक गुन्ह्यांच्या बाबतीत केवळ त्यावेळी दगडफेक करणाऱ्या गुन्हेगारांना अटक होणं पुरेसं नसतं. दंगल “घडविणाऱ्या” पडद्यागच्या सूत्रधारांपर्यंत पोहोचणं, त्यांचे चेहरे समोर आणणं आवश्यक असतं. हेच काम करण्याच्या उद्देशाने, सदर रिपोर्ट, विवेक विचार मंच तर्फे, तयार करण्यात आला आहे.

समाजात अभूतपूर्व दुही माजवणाऱ्या ह्या काळ्याकुट्ट घटनाक्रमांसाठी नेमके कोण जबाबदार आहेत हे महाराष्ट्रासमोर आणण्याच्या भूमिकेतून इनमराठी परिवाराने सदर अहवाल ५ भागांत प्रसिद्ध करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

टीम इनमराठी

===

रिपोर्ट प्रकाशक : विवेक विचार मंच, महाराष्ट्र

===

१ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा परिसरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार, जाळपोळ झाली. संत, समाजसुधारक, महापुरुषांच्या या भूमीत जातीय कारणांवरून दंगल होणे, हे अत्यंत खेदजनक आहे.

या सर्व घटनेच्या सत्यतेचा शोध घेण्याकरिता व हे सत्य प्रामाणिकपणे, पुराव्यांच्याआधारे समाजासमोर मांडण्याकरिता राष्ट्र सुरक्षा, सामाजिक क्षेत्रात काम करणारे अभ्यासक, कार्यकर्ते, वकील, प्राध्यापक अशा व्यक्तींनी एकत्र येऊन “कोरेगाव भीमा हिंसाचार – १ जानेवारी २०१८, सत्यशोधन समिती” तयार केली.

समितीतील सदस्य विविध विचार व विषयांमध्ये काम करणारे असून प्रत्येकाने कोरेगाव भीमा हिंसाचारासंबंधित माहिती स्वतंत्रपणे; तसेच काही वेळा एकत्रितपणे मिळविली.

कोरेगाव भीमा येथे दि. १ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या दंगलीचा घटनाक्रम व घटनेला कारणीभूत पार्श्वभूमी काय?

विविध व्यक्ती, गट, संस्था-संघटना यांची भूमिका ही घटना घडण्यात काय राहिली?

या एकूण घटनेत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी काय कारवाई केली?

– या सर्व प्रश्नांचा विचार सत्यशोधनात करण्यात आला. सत्यशोधनाअंती समितीने काही निष्कर्ष, निरीक्षणे नोंदविली आहेत व काही शिफारसी केल्या आहेत. प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट, सरपंच, पोलीस पाटील, संघटनांचे कार्यकर्ते, सामान्य ग्रामस्थ, पीडीत व्यक्ती, जखमी व्यक्ती, पोलीस अधिकारी, पत्रकार अशा अनेकांच्या भेटी घेऊन माहिती घेण्यात आली.

तसेच या घडामोडीदरम्यान वृत्तपत्रात आलेल्या बातम्या, नेत्यांच्या पत्रकार परिषदा, मुलाखती, चर्चा झाल्या, त्यांचा अभ्यास करण्यात आला. या घटनेशी संबंधित इतिहासाच्या वादासंदर्भात ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यासही केला गेला. या घटनेच्या संदर्भात ग्रामपंचायत, प्रशासन; तसेच विविध संघटनांनी वेळोवेळी प्रसिद्ध केलेली माहिती, पत्रव्यवहार यांचे संकलन करण्यात आले आहे.

जवळपास साडेतीन महिने कोरेगाव भीमा परिसरातील हिंसाचाराचा विविध अंगाने अभ्यास करून सदर अहवाल तयार केला. अहवालाच्या शेवटी काही महत्त्वाचे संदर्भ दिलेले आहेत.

=====

घटनेची पार्श्वभूमी :

दि.१ जानेवारी २०१८ ला पुण्यापासून २५ कि.मी.वर असलेल्या कोरेगाव भीमा गाव, सणसवाडी, शिक्रापूर, चाकण व आजूबाजूच्या परिसरात जाळपोळ, दगडफेक, हिंसाचार झाला आणि नंतर त्याचे पडसाद राज्य आणि देशभर उमटले. या सर्व प्रकरणाची पार्श्वभूमी व्यापक आहे. इ.स. १ जानेवारी १८१८ रोजी कोरेगाव भीमा या परिसरात इंग्रज-मराठा असे युद्ध झाले होते. या युद्धाच्या इतिहासाची मांडणी विविध अंगांनी लेखक करतात. प्रचारित इतिहास व वस्तुनिष्ठ इतिहास यात फरक असल्याने या लढाईचा इतिहास वादग्रस्त झाला आहे. काही लेखक, अभ्यासक म्हणतात हे युद्ध इंग्रज विरुद्ध मराठा होते.

मराठे हरले त्यामुळे इंग्रजांनी उभारलेला जयस्तंभ हा अभिमानाचे प्रतीक नाही वगैरे; तर दुसरीकडे काही लेखक, अभ्यासक अशी मांडणी करतात की, हे युद्ध पेशवे विरुद्ध ब्रिटीश असे असले तरी ब्रिटीश सैन्यातील शूर महार सैनिक यांनी पेशवाईकाळात झालेल्या जातीय अत्याचाराच्या विरोधात, सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी पेशव्यांच्या विरोधात युद्ध केले. हे युद्ध म्हणजे जातींअंताची लढाई होती; ज्यामध्ये ५०० महार सैनिकांनी २५००० पेशवाई सैन्याचा पराभव केला, अशी मांडणी काही लेखक करतात. १ जानेवारी २०१८ च्या अगोदर काही महिने सोशल मीडियावर वरील प्रकारची टोकाची मांडणी व वाद सुरू होते.

वढू बुद्रुक गावातील वाद :

वढू गावात समितीने गावचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, पोलीस पाटील जयसिंह भंडारे व पांडुरंग गायकवाड यांची भेट घेतली. त्यांनी व ग्रामस्थांनी गावातील वादाची व घटनेची माहिती दिली. एकूण घटनाक्रम पाहता हा हिंसाचार कोरेगाव भीमा पासून काही अंतरावर असणार्‍या वढू बुद्रुक या ऐतिहासिक गावातील वादातून निर्माण झाला अशी माहिती मिळते.

वढू बुद्रुक हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळासाठी प्रसिद्ध आहे. इ.स.१६८९ साली औरंगजेबाने संभाजी महाराज यांची हत्या केली व त्यांचे तुकडे वढू परिसरात फेकले. वढू परिसरातील लोक, विशेषतः शिवले परिवारातील लोकांनी हे तुकडे एकत्र करून संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार केले, असा इतिहास याठिकाणी प्रचलित आहे. गावात संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार करणारे शिवले देशमुख यांचे संबंधित स्मारक हे संभाजी महाराज समाधीच्या प्रवेशद्वाराच्या बाजूस बांधलेले आहे.

 

वढू बु. गावातील वीरपुरुषांचे स्मारक

 

मात्र, गेल्या काही वर्षांपासून गोविंद गोपाळ (महार) यांनी संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार केले, अशी संदर्भ नसलेली माहिती सांगितली जात आहे. ही माहिती दलित समाजात मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्याने विजयस्तंभास येणारे अनेक बांधव वढू बु. येथे गोविंद गोपाळ (महार) यांनीच संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार केले असे मानून भेट देतात (वढू व कोरेगाव भीमा-विजयस्तंभ यात ३ ते ४ कि.मी. अंतर आहे.) काही वर्षांपूर्वी वढू गावात गोविंद गोपाळ (महार) यांची समाधी राजेंद्र गायकवाड त्यांच्या वैयक्तिक मालकीच्या जमिनीवर बांधण्यात आली आहे.

परंतु, खरा इतिहास काय?

संभाजी महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार करणारे शिवले परिवार आहे की गोविंद गोपाळ (महार) आहे यावरून वढू बुद्रुक गावातील दलित (महार) व मराठा समाजात गेल्या काही वर्षांपासून मतभेद आहे.

वढू बु. ग्रामपंचायत व इतिहास लेखक जयसिंगराव पवार, सदाशिव शिवदे, वा.सी.बेंद्रे (संदर्भ पुढे देत आहोत) यांच्या पुस्तकात उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यानुसार संभाजी महाराज समाधीची देखरेख, दिवाबत्ती, स्वच्छता करण्यासाठी छत्रपती संभाजी राजांच्या मृत्यूनंतर ४३ वर्षांनी इ.स. १७३३ साली छत्रपती शाहू महाराज (संभाजी राजांचे पुत्र) यांनी गोंविंद गोपाळ ढेगोजी मेगोजी (महार), भिकाराम गोसावी व वासुदेवभट धर्माधिकारी अशा तीन व्यक्तींची नियुक्ती केली आणि त्यांना सनदा व जमिनीसुद्धा इनामही दिल्या. परंतु या व्यतिरिक्त अंत्यसंस्कार कोणी केले याचा उल्लेख मात्र नाही.

विश्वास पाटील यांनी त्यांच्या ‘संभाजी’ कादंबरीमध्ये गोविंद गोपाळ यांनी अंत्यसंस्कार केल्याचा प्रसंग चितारला आहे व काही संघटना अशा प्रकारचा इतिहास भाषणांतून मांडतात. तर गोविंद गोपाळ हे सेवेस होते हे मान्य आहे, परंतु त्यांनी अंत्यसंस्कार केले या इतिहासाला कोणताही पुरावा नसल्याने तो ‘खोटा इतिहास’ असल्याचे सांगितले जाते.

संदर्भ :

 

 

वा सी बेंद्रे, श्री छत्रपती संभाजी महाराज, पृ ६७२

 

पवार जयसिंगरावर, छ संभाजी स्मारक ग्रंथ, पृ ३७४

 

सदाशिव शिवदे, ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा, पृ ३७१

 

सदाशिव शिवदे, ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा, पृ ३६९

 

विश्वास पाटील, संभाजी, पृ ८२८

 

१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा युद्धाला २०० वर्ष पूर्ण होत असताना, असंख्य लोक विजयस्तंभास भेट देतील, त्या वेळी त्यापैकी काही जण वढू बु येथे आल्यावर वादग्रस्त इतिहास सांगण्यावरून व आक्षेपार्ह घोषणाबाजीवरून वाद चिघळून गावातील शांतता भंग होऊ नये म्हणून ग्राम पंचायत वढू बुद्रुकने १९ डिसेंबर २०१७ रोजी तहसलीदार (शिरूर) यांना पत्र लिहून ३१ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत संभाजी महाराज समाधीस्थळाजवळ सभा बंदी व पोलीस संरक्षण मिळण्याबाबत मागणी केली होती. (असेच पत्र मागील वर्षीही २८/१२/२०१६ ला ग्राम पंचायत वढू बुद्रुकने दिले होते). त्याप्रमाणे, पोलीस संरक्षण ३१ डिसेंबर २०१७ पासून मिळणे अपेक्षित होते.

 

ग्रामपंचायत वढू बुद्रुक यांचे तहसिदारांना पत्र – दि १९-१२-२०१७

 

ग्रामपंचायत वढू बुद्रुक यांचे तहसिदारांना पत्र – दि २८-१२-२०१६

 

मात्र, त्याआधीच २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ग्राम पंचायतीची परवानगी न घेता वढू बुद्रुक गावात सार्वजनिक जागेत गोविंद गोपाळ (महार) यांचा ‘वादग्रस्त इतिहास’ सांगणारा फलक गावातील व पुणे येथील काही दलित समाजातील बांधवांकडून लावण्यात आला. या फलकावर छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीरावर अंत्यसंस्कार करण्यास कोणीही धजावत नव्हता… व भीतीपोटी जागा देण्यास कोणीही गावकरी तयार होत नव्हता; अशा वेळी वढू गावातील गोविंद गोपाळ महार हा धाडसी तरुण पुढे आला व ‘माझ्या राजाची अशी विटंबना मी सहन करू शकत नाही’, असे म्हणून त्याने संभाजी राजांचे तुकडे गोळा केले व महारवाड्यात स्वतःच्या जागेत राजेंचा अंत्यविधी केला, अशा आशयाचा मजूकर लिहिलेला होता.

 

२८-१२-२०१७ रोजी वढू गावात लावलेला वादग्रस्त बोर्ड

 

सदर फलक लागत असतानाच म्हणजे २८ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ७.३२ मिनिटांनी गावातील पोलीस पाटील जयसिंग भंडारे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी अनिल जगताप यांना फोन करून फलकाविषयी कळवले होते.

 

वढू बु. पोलीस पाटील कॉल डिटेल्स

 

सकाळी ही वाद होण्याच्या अगोदर पोलिसांना कळविले होते. त्यावरून २९ डिसेंबर रोजी सकाळी वाद झाला व गावातील मराठा तरुणांनी हा फलक काढून टाकला. तसेच या वादात गोविंद गोपाळ (महार) यांच्या समाधीवर लावलेली छत्री तोडली गेली, (या संदर्भात पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केली असती तर वाद टळला असता) बाचाबाची झाली त्याचे पर्यवसन गावच्या सरपंच, उपसरपंचसह ४९ मराठा समाजातील व्यक्तींवर सुषमा ओव्हाळ यांनी अ‍ॅट्रॉसिटी कलमाअंतर्गत शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

मात्र मराठा समाजाचे असे म्हणणे आहे की, या ४९ जणांपैकी बरेच जण त्या वेळी घटनास्थळी उपस्थितही नव्हते; तरीही त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.

या अ‍ॅट्रॉसिटीच्या तक्रारीत मिलिंद एकबोटे यांचेही नाव घेण्यात आले व सदर प्रकार त्यांच्या सांगण्यावरून केला गेला असे तक्रारदाराने म्हटले.

मात्र, एकबोटेंचे नाव आरोपींच्या यादीत घेण्यात आले नव्हते. तसेच गावातील मराठा व्यक्ती रमाकांत शिवले यांनी दलित समाजाने ‘०१ जानेवारीला तुम्हाला बघून घेऊ’ अशी धमकी दिल्याबाबत गुन्हा दाखल केला.

 

वढू बु. सुषमा ओव्हाळ ह्यांची अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तक्रार

 

३० डिसेंबर रोजी ग्रामपंचायत वढू बुद्रुकने शिक्रापूर पोलीस ठाण्यात खोट्या अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाल्याने गावबंद निषेध व्यक्त करण्याबाबत’ पत्र दिले.

 

ग्रामपंचायत वढू बु. ह्यांचे पोलीस निरीक्षक शिक्रापूर ह्यांना पत्र, दि ३०-१२-२०१७

 

ग्रामपंचायत वढू बु. ह्यांचे पोलीस निरीक्षक शिक्रापूर ह्यांना पत्र, दि ३०-१२-२०१७

 

तसेच ३० डिसेंबर २०१७ रोजी ग्रामपंचायत वढू बुद्रुकने शिक्रापूर पोलीस ठाण्यात अजून एक पत्र दिले; ज्यामध्ये ‘छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळी संरक्षण देणेबाबत’ मागणी करण्यात आली. या पत्रात असे नमूद केले आहे की,

‘…१ जानेवारी या दिवशी बहुसंख्य दलित संघटना यामध्ये बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा व इतर संघटनेचे लोक श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे संभाजी महाराज समाधी स्थळी येतात. मागील वर्षाचा अनुभव पाहता समाधीस्थळी छेडछाड, संभाजी महाराज समाधी, तसेच कवी कलश व शंभूराजांचा पुतळा या महत्त्वाच्या समाधीस्थळी इजा व नुकसान, विटंबना करण्याची दाट शक्यता आहे. तरी आपणास नम्र विनंती आहे की, समाधी स्थळास जास्तीत जास्त संरक्षण द्यावे व जादा सुरक्षा रक्षक कुमक द्यावी ही नम्र विनंती.’

 

ग्रामपंचायत वढू बु. ह्यांचे पोलीस निरीक्षक शिक्रापूर ह्यांना तक्रारीचे पत्र, दि ३०-१२-२०१७

या दरम्यान वढू गावात पोलिसांच्या गाडीवर दलित तरुणांनी हल्ला केला होता. काहीजणांवर या विषयी गुन्हा दाखल आहे. सदर वाद प्रशासन व ग्रामस्थांनी पोलिसांच्या मध्यस्थीने सामंजस्याने मिटविण्याचा प्रयत्न केला व ३१ डिसेंबर २०१७ रोजी गावातील दोन्ही समाजबांधवांनी तक्रारी मागे घेऊन वाद संपविण्याचे निश्चित केले.

वढू बुद्रुक गावचे पोलीस पाटील यांनी वाद मिटला असून शांतता राखण्याचे आव्हान करणारे मेसेज व्हाट्सअपवर प्रसारित केले होते.

 

वढू गावचे पोलीस पाटील जयसिंग भंडारे ह्यांची शांतता राखण्यासाठी प्रसारित केलेला मेसेज

 

वढू बुद्रुक गावातील पांडुरंग गायकवाड व इतर दलित समाजबांधवांनी वादग्रस्त बोर्ड लावला. त्यापैकी आम्ही पांडुरंग गायकवाड यांना भेटलो व चर्चा केली. ते म्हणाले,

‘गावात आम्ही आनंदाने व सहकार्याने राहतो. आमचा बंगला व प्रगती पाहून लोक जळतात. २८ डिसेंबरला तो बोर्ड आम्हीच लावला. राजेंद्र गायकवाड यांनी तो तयार केल्याचे म्हटले. दि.२९ ला समाधीवरील छत्री तोडली. त्यामुळे वाद वाढला.’

संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी ऐतिहासिक माहिती देणारा एक फलक सध्या आहे. तो काही वर्षांपूर्वी लावलेला आहे. जुना जो बोर्ड होता त्यात वृन्दावनाच्या तीन सेवेकरी पैकी एक जण गोविंद गोपाळ हा महार जातीचा होता हे लक्षणीय आहे, असा उल्लेख होता. तो उल्लेख नवीन बोर्डमधून गाळण्यात आला असा आरोप त्यांनी केला.

 

छ संभाजी महाराज समाधीस्थळाची माहिती देणारा जुना व नवीन फलक

 

तसेच गोविंद गोपाळ यांची मोठी समाधी बांधू असे म्हटले. गोविंद गोपाळ यांनी अंत्यसंस्कार केले का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी विश्वास पाटील यांच्या कादंबरीचा उल्लेख केला. रेखा नामदेव गायकवाड यांनी म्हटले की,

‘आम्हाला फार इतिहास माहीत नव्हता. गोविंद गोपाळ यांची सध्याची समाधी साधारण तीन वर्षापूर्वी बांधली. नाशिक, नागपूरहून काही लोक आले होते, त्यांनी समाधीवर छत्री लावल्याचे म्हटले.’

 

 

दरम्यान, दोन्ही समाजातील वाद मिटलेला असताना ३१ डिसेंबर रोजी आमदार जोगेंद्र कवाडे यांनी वढू बुद्रुक येथे भेट देऊन प्रक्षोभक विधाने केली, असे स्थानिक गावकरी सांगतात. याची सत्यता पडताळण्यात यावी. वढू बु. ग्रामपंचायतीने मागणी केली आहे की, शासनाने इतिहास संशोधकांची समिती नेमून गोविंद गोपाळ महार यांचा खरा इतिहास जाहीर करावा.

===

पुढील भाग : “पहिला दगड कुणी फेकला?” : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट : सूत्रधार आणि घटनाक्रम (भाग २)

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुपin

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version