आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
मागील काही दिवसांपासून म्हणजे कठूआ बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर मन खुप अस्वस्थ आहे. आपण ज्या समाजात, ज्या देशात राहतो आहे, ज्याच्या रक्षणासाठी आपले सैनिक तिकडे सीमेवर शहीद होत आहेत, त्याच देशातल्या मुली देशातल्याच नराधमांपासून सुरक्षित नाहीत. कितीही कोणाला दोष दिला तरी कधी कधी असं वाटत की, ही सर्व पुरुषी वर्चस्वी मानसिकता आपल्या घरातूनच येते, कारण आपल्या घरातूनच मुलगा आणि मुलगी ह्यांना वेगवेगळी वागणूक दिली जाते. ही मानसिकता आता बदलायची गरज आहे.
आज आपण त्यापैकीच काही अश्या गोष्टी बघणार आहोत ज्या आपल्याला लहानपणी पासून सांगितल्या जातात पण आज त्यात काही बदल अपेक्षित आहेत. जेणेकरून पुरुष उच्च आणि स्त्री दुय्यम ही भावनाच मुलांच्या मनात येणार नाही.
आपण आपल्या मुलांना केवळ त्याच्या आई आणि बहिणीचा आदर करायला शिकवतो. त्यापेक्षा त्यांना प्रत्येक स्त्रीचा आदर करायला शिकवले पाहिजे.
हे काम मुलांचे आणि हे काम मुलींचे, म्हणजेच घरातले सर्व काम मुलींचे आणि बाहेरचे काम मुलांचे हा फरक कमी व्हायला हवा. घरातली कामे ही सर्वांनाच यायला हवीत, तसेच बाहेरील व्यवहार हे देखील सर्वांना कळायला हवे.
सर्वात फेमस डायलॉग जो आपल्यात चित्रपटांमुळे रुजला आहे, “मर्द को कभी दर्द नही होता”… का त्रास होत नाही पुरुषाला. अरे तो पण हाडा-मासाचाच बनला आहे. त्रास त्यालाही होतो पण ह्या संस्कारामुळे तो स्वतःचा त्रास उघडपणे व्यक्त करू शकत नाही. रडू शकत नाही, कारण जर कुठला मुलगा रडला तर आपण लगेच बोलून मोकळे होतो की, काय मुलींसारखा रडतो आहे… इथूनच खरी ती मुलींना कमी लेखण्याची सुरवात होते.
जेव्हा मुलांच्या लग्नाची वेळ येते तेव्हा आपण हे बघतो की, जेव्हा तो मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहिल, जेव्हा तो जबाबदारी घ्यायला तयार असेल तेव्हाच त्याने लग्न करावे. मग असा विचार मुलींबद्दल का केला जाऊ नये.
आई वडील लहानपणीपासूनच मुलगा आणि मुलगी ह्यांच्यात फरक करायला लागतात. म्हणजे मुलीसाठी पिंक फ्रॉक तर मुलासाठी निळा टी-शर्ट इथून त्याची सुरवात असते. पण जर त्या मुलाला पिंक हा रंग आवडत असेल तर काय? तर त्याने तो कधीही घालू नये कारण पिंक हा तर मुलींचा रंग असतो ना? अरे मुलींचा रंग म्हणजे काय? ते रंग आहेत, कोणालाही कुठलाही आवडू शकतो.
आपल्या देशातील सर्वात कॉमन गैरसमज, म्हातारपणी आई-वडिलांची काळजी हा एक मुलगाच घेऊ शकतो कारण मुलगी तर काय म्हणे पराय धन… म्हणजे मुलगी कितीही सक्षम असली तरी ती तिच्या आई-वडिलांची काळजी घेऊ शकत नाही.
मुलांनी जास्त खायला हवं आणि मुलीने कमी, किंवा मुलांचा आहार जास्त असतो मुलींचा कमी. पण प्रत्येकाचा आहार हा त्याच्या शरीरावर अवलंबून असतो. किंवा मुलगा आहे म्हणून त्याला क्रिकेट आवडायलाच हवं ह्यासारख्या गोष्टी आपल्या मुलांवर लादणे कुठेतरी थांबवायला हवं…
ह्याने बलात्कार कमी होणार की नाही हे तर सांगू शकत नाही, पण कदाचित त्यासाठी मुलींना दोष देणे कमी होईल…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.