न्यायाचा खून : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवरील गंभीर आरोपांना दाबण्याचं “सर्वपक्षीय” कारस्थान
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
लेखक : समीर गायकवाड
===
२८ फेब्रूवारी २०१७ मंगळवारच्या संध्याकाळी एक विधवा स्त्री तत्कालीन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या मौलाना आझाद रोडवरील शासकीय निवासस्थानी भेटून एक कैफियत देण्यास आली होती. तिच्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आणि वकील होते. महिलेने डोळ्यात पाणी आणून उपराष्ट्रपतींना एक निवेदन दिले. तिच्यासाठी हा न्यायाचा अखेरचा दरवाजा होता. उपराष्ट्रपतींनी तिचे म्हणणे शांततापूर्वक ऐकून घेतले. कारवाई करण्याचे तिला आश्वासन दिले गेले. दिल्लीपासून हजारो किमी दूर अंतरावरील तिच्या गावी ती परतली.
पण तिच्या निवेदनावर शून्य कारवाईही झाली नाही. त्या महिलेच्या पतीने आत्महत्या केली होती. मरणापूर्वी त्याने साठ पानी सुसाईड नोट लिहिली होती. त्यातल्या प्रत्येक पानावर त्याने स्वाक्षरी केली होती.
या नोटमध्ये काही अत्यंत उच्चपदस्थ लोकांच्या व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या पुराव्यानिशी नाव नोंदी होत्या. यातील कुणी कसे पैसे घेतले, कसे फसवले आणि कसा भ्रष्टाचार केला याचे बारकाईने वर्णन होते. भारतीय दंडविधान संहितेनुसार आत्महत्या करणारया व्यक्तीच्या सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावे असतात त्याची रीतसर एफआयआर दाखल करताना त्या सर्वांची नावे समाविष्ट करून त्यांची रीतसर चौकशी करणे अपेक्षित होते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही.
सुसाईड नोटमधील तपशील पोलिसांनी बरेच दिवस दडवून ठेवला. पण अखेर तो जनतेपुढे आलाच, पण त्याने फारसा फरक पडला नाही.
त्या व्यक्तीच्या पत्नीने त्यांच्या राज्यातील मुख्य पोलिस अधिकारयांचे उंबरठे झिजवले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावण्याचा प्रयत्न केला कुठेच दाद लागली नाही. अखेर ती मोठ्या उमेदीने उपराष्ट्रपतींच्या दारी आली पण तिथेही काहीच निष्पन्न झाले नाही. कुणाची नावे होती त्या सुसाईड नोटमध्ये ? जाणून घ्यायचंय ?
आताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जस्टीस दीपक मिश्रा यांच्यासह अन्य काही न्यायमूर्तींची नावे होती, विशेष बाब म्हणजे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे केंद्रीय मंत्री असतानाच्या एका प्रकरणाचा उल्लेख आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, कमल नाथ, सलमान खुर्शीद यांनी कसे व किती पैसे घेतले याचे उल्लेख आहेत. राष्ट्रपती राजवट टाळण्यासाठी न्याययंत्रणेच्या दलालांनी कसे सौदे केले याचेही उल्लेख आहेत. राज्यातील सरकार हाकणारे भाजपचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी किती भ्रष्टाचार केला आणि कसा घोडेबाजार केला याचे उल्लेख आहेत.. त्यांनी जमवलेल्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह लावले आहे.
या सर्व नावात एक उल्लेख वीरेंद्र खेहर या नावाचा होता पण तत्कालीन सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जस्टीस खेहर यांच्या मुलाचे नाव वीरेंद्र खेहर असे नव्हते.
२३ फेब्रुवारी २०१७ ला या विधवा महिलेला सर्वोच्च न्यायालयात दिलेला चौकशी अर्ज मागे घ्यावा लागला होता. जस्टीस आदर्श गोयल आणि जस्टीस उदय ललित यांच्या बेंचपुढे तिचे वकील दुष्यंत दवे हे अगदी हतबल झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या विरोधात अन्य न्यायमूर्ती पारदर्शक खटला चालवू शकतात का किंवा तशी कुठली प्रोव्हिजन आहे का याची विचारणा त्यांनी केली होती.
त्या महिलेने मुख्यमत्री पेमा खांडू यांच्याकडे विशेष तपास समिती नियुक्त करण्याची मागणी केली होती पण त्यांनी त्यावर ठोस आश्वासनही दिले नाही.
काँग्रेस, भाजपचे नेते आणि आताचे न्याययंत्रणेतील बिनीचे मोहरे या दिग्गजांचे नाव सुसाईड नोटमध्ये तपशिलासह असूनही कुठलीही एसआयटी नेमली गेली नाही की मोठ्या माशांवर कारवाई झाली नाही, नाही म्हणायला ज्या काही सरकारी अधिकारयांची नावे यात होती त्यांच्यातल्या काहींवर मात्र कारवाई- निलंबन झाले, चौकशीचे आदेश दिले गेले. पण मोठ्यांचे काय हा प्रश्न अनुत्तरीत राहिला.
त्या विधवेचे नाव होते – डांगविमसाई पूल आणि आत्महत्या केलेल्या तिच्या नवरयाचे होते कालिखो पूल, अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री. ज्यांच्या मृत्यूनंतर नाट्यपूर्ण घडामोडी होऊन पेमा खांडू हे सीएम झाले होते. पेमा खांडू हे मुख्यमंत्री पदी आरूढ झाल्यावर पहिले ३० दिवस ते काँग्रेसमध्ये होते, नंतर अडीच महिने पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश मध्ये गेले, नंतर डिसेंबर २०१७ मध्ये ते भाजपमध्ये गेले पण सीएमपदी तेच राहिले ! एरव्ही एकमेकाविरुद्ध बाह्या सरसावणारे काँग्रेस भाजपाचे लोक कालिखो पूल यांच्या आत्महत्या प्रकरणातील सुसाईड नोटवर दातखिळी बसल्यासारखे गप्प आहेत आणि न्याययंत्रणेच्या सर्वोच्च व्यक्तींची विश्वासार्हता पणाला लागल्याने ते ही मुकाट आहेत !
एकूणच काय, “वेळ वाईट आली की सगळे समविचारी बदमाश एकत्र येतात आणि भल्या माणसांच्या जीवनमरणाच्या चेष्टा होऊ लागतात” अशा अर्थाचे एक प्रसिद्ध वाक्य अशा घटनातून ठळक होते.
कालिखो पूल हे सुरुवातीच्या काळात पोटाची खळगी भरताना एका शाळेचे चौकीदार म्हणून काम करायचे. रोज तिरंगा फडकवायचा आणि उतरवायचा हे काम जोडीला होते. या कामासाठी त्यांना दरमहा २१२ रुपये वेतन मिळत होते. कालिखो पूल यांच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करण्यासाठी या शाळेतील तिरंगा खाली घेतला गेला आता या घटनेला दीड वर्ष होत आले आहे. या शाळेचा झेंडा आता तितक्याच सच्चेपणाने आणि डौलाने फडकत असावा का या विषयी आता मला शंका आहे…
आपल्या देशातील जनतेची स्मरणशक्ती खूप कमजोर आहे, काल परवा झालेल्या घटना ती लगेच विसरून जाते कारण रोज नित्य नव्याने काही न काही घडत असते हे आपल्या राजकारण्यांना चांगले ठाऊक आहे. रोज काही न काही घडत असल्याचा हा त्यांचाच आणखी एक फायदा आहे आणि भोळसट, ध्येयरहित जनतेचा मोठा तोटा आहे. सुसाईड नोटमध्ये नाव असूनही एक माननीय व्यक्ती मुख्य न्यायमूर्ती पदी आरूढ होतात, एक राष्ट्रपती त्यावर व्यक्त होत नाहीत, एक उपराष्ट्रपती कार्यवाही करत नाहीत आणि त्यांच्या पक्षाशी उभा दावा असलेला सत्तेतला पक्ष तमाशबीन बनून बघत राहतो.
या सर्व मुद्द्यांचे आपसात संबंध आहेत ते सुज्ञ वाचकांनी ओळखून घ्यावेत.
त्या सुसाईड नोट मधील माहिती खोटी मानावी अशीही स्थिती नाही कारण त्या आधारे काही सरकारी नोकरांवर कारवाई केलीय, त्यातील प्रत्येक पानावर पूल यांची स्वाक्षरी आहे आणि ती त्यांचीच असल्याचे तपास यंत्रणांनी मान्य केलेय. या सर्व लोकांनी सत्य पुढे आणण्यात कुचराई केली असे एकवेळ मान्य केले तरी मिडियाचे सखेद आश्चर्य वाटते. या विषयाचा फॉलोअप एकाही वृत्त वाहिनीने घेतल्याचे माझ्या पाहण्यात नाही. एका छोट्या राज्याचा मुख्यमंत्री अकस्मात मरण पावला. त्याला वर्तमानपत्रांनीही छोटेसे कॉलम पोजिशन दिली. हे पुरेसे आहे. नाही का ?
मुळात खोलात जाऊन माहिती घेऊन मते बनवण्याची मुलभूत प्रक्रियाच आपण विसरत चाललो आहोत त्याचा हा परिपाक आहे. सर्व दोष राजकारणी वा सिस्टीमच्या माथी मारून लोक कर्तव्यापासून मागे हटू शकत नाहीत. ही कुठे तरी जनतेची गरज आहे हे जनतेला लक्षात यायला पाहिजे. हा दिवस उगवेल की नाही असं म्हणण्याइतपत आपण मुके, बहिरे आणि अंधळे झालेलो असल्याने एकंदर काळ मोठा वाईट आहे असेच म्हणावे लागेल.
या सर्व माहितीच्या आधारासाठी नेटवर सर्च केल्यास तुम्हाला पुष्कळ माहिती मिळेल. अनेक वर्तमानपत्राच्या नेट आवृत्त्या, काही वेब पोर्टल्सवर या लिंक्स अजूनही आहेत.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.