आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
संवाद साधताना आपण गाक्त शब्दांनी तो साधत नसतो. त्यात शरीराची भाषा, हावभाव, अभिनिवेश या गोष्टी महत्वाच्या असतात. या सर्व गोष्टी एकत्रितपणे जमू लागल्या की आपल्याला संवाद कौशल्य आहे असे म्हणायला हरकत नसते.
आपले हावभाव आणि शरीराची भाषा आपल्या मनात नक्की काय चालले आहे याचा आरसाच आपल्या चेहऱ्यावर ठेवत असतात.
त्यावरून आपल्या जवळच्या व्यक्तींशी बोलत असताना अनेकदा ते आपल्या मनात काय चालले आहे हे अगदी बिनचूक ओळखतात. याचे कारण म्हणजे त्यांचे आपल्या हावभावांवर विशेष लक्ष असते. त्यावरून ते आपले अंतरंग जाणण्याचा प्रयत्न करतात.
याच हावभावांचे निरीक्षण करून तुम्ही समोरची व्यक्ती तुमच्याशी खरे बोलत आहे कि नाही हे ओळखू शकता. त्यासाठी काही गोष्टींवर बारीक लक्ष द्यावे लागते.
एक खोटं बोलल्यावर ते लपविण्यासाठी शंभर वेळा खोटं बोलावं लागतं.
हे करताना आपलंच मन आतल्या आत कुठेतरी आपल्याला चुकीची जाणीव करून देत असतं किंवा आपण समोरच्याला फसवतो आहोत आणि पकडले गेलो तर आपलं काही खरं नाही… ह्या भीतीने आपण खोटं बोलताना अधिक सावधगिरी बाळगतो.
हे सगळं करताना सामान्य माणसाचे हावभाव, त्याची बॉडी लँग्वेज बदलते.
जो अट्टल खोटारडा असतो, त्याला पकडणे अत्यंत कठीण असते पण जाणकार त्याचेही खोटे अगदी बरोबर पकडतात. अट्टल गुन्हेगार खरं बोलतोय की खोटं हे समजणं अतिशय कठीण असतं.
पण जर तुम्ही बारीक निरीक्षण करायला शिकलात, तर अशी खोटारडी व्यक्ती तुम्ही बरोबर ओळखू शकता त्या गोष्टी कोणत्या आहेत, पाहूया!
१ – डोळे-
आपण ज्या गोष्टी शब्दात सांगू शकत नाही किंवा सांगायला असमर्थ असतो त्या गोष्टी आपले डोळे सांगत असतात असे म्हणतात.
बोलताना जर समोरची व्यक्ती तुमच्या डोळ्यात डोळे घालून न बघता आजूबाजूला बघत असेल तर ती खोटे बोलत असणे शक्य आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे बोलताना डोळे झाकणे.
या गोष्टी जर ती व्यक्ती करत असेल तर ती तुमच्याशी खोटे बोलत असावी असे म्हणता येईल.
२ – हातांच्या हालचाली-
जेव्हा एखादी व्यक्ती खोटे बोलत असते तेव्हा तिच्या हाताच्या साधारण हालचाली लगेच ओळखू येण्यासारख्या असतात. बोलताना ती व्यक्ती अस्वस्थ होत असते. बोलताना आपल्या हाताने तोंड किंवा डोळे वारंवार झाकणे ही सगळ्यात जास्त आढळली गेलेली सवय आहे.
कुठल्यातरी मार्गाने तुमच्याशी चालू असलेला संवाद लवकरात लवकर कसा संपेल याचाच प्रयत्न ती व्यक्ती करत असते.
३ – शारीरिक हालचाली-
बोलताना विनाकारण शरीराची हालचाल करणे खोटे बोलत असल्याचे लक्षण मानले जाते. गरज नसताना कपडे सावरणे, केसांना हात लावून ते ठीक करणे इत्यादी गोष्टींवर बारीक लक्ष ठेवा. बऱ्याचदा ते कानांना हात लावतात.
त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचे लक्षण म्हणजे विनाकारण ओठ किंवा जीभ चावणे. असाधारण शारीरिक हालचाली असल्या की ती व्यक्ती खोटे बोलत असल्याचा अंदाज बांधायला हरकत नाही.
४ – मौखिक संकेत-
बोलताना थोडे उत्साहित होणे, आवाज वरच्या पट्टीतला असणे या गोष्टींकडे पण लक्ष द्या. अशा वेळी संशय आल्यास एक करा- त्या व्यक्तीला फिरून प्रश्न विचारा.
प्रश्न विचारल्यानंतर त्याचे उत्तर काय द्यावे हा विचार करताना जो वेळ लागतो त्या दरम्यान घसा खाकरणे, जांभई देणे असे प्रकार झाले तर ती व्यक्ती तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे हे नक्की समजा.
५ – दुजोरा देणारी कथा-
व्यक्ती खोटे बोलते तेव्हा त्या असत्याला काहीतरी आधार देण्यासाठी त्याने एखादी कथा आधीच बनवून ठेवलेली असते. त्या गोष्टीबद्दल गरज नसलेली आगाऊ माहिती देणे, कथा रचणे, आपण एखादी गोष्ट करू शकलो नसेल तर त्याला नुसती कारणे देत सुटणे ही खोटे बोलत असल्याची खुण आहे.
हे करताना ती व्यक्ती “आपण किती उघडपणे आणि भीडभाड न ठेवता बोलत आहोत” असे भासवण्याचा प्रयत्न करत असते.
खोटे बोलणे ही एक कला आहे. आणि समोरच्याने बोललेले खोटे ओळखणे ही त्याहून सरस कला आहे.
असेही गमतीने म्हटले जाते की जी व्यक्ती खोटे बोलत असते त्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीने बोललेले खोटे ओळखायला फारसा वेळ आणि कष्ट लागत नाहीत. कारण आपण खोटे बोलताना जे प्रयोग करतो ते त्या व्यक्तीच्या लक्षात असतात.
पण स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याला खोटी माहिती पुरवणे हे चूक आहे.
खोटे बोलणारी व्यक्ती तुम्हाला त्याच्या शाब्दिक कौशल्याने प्रचंड प्रभावित करू शकते. पण या गोष्टींकडे लक्ष असेल तर समोरची व्यक्ती तुमच्याशी खोटे बोलत आहे हे ओळखायला फारसा वेळ लागणार नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.