Site icon InMarathi

आसिफा वरील अत्याचाराचं समर्थन का घडतं? : अम्मा पकोडा आणि धृवीकरण : भाऊ तोरसेकर

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

देशात इतके टोकाचे धृवीकरण कशाला होते आहे? ते बघून बहुतांश राजकीय विचारवंत अभ्यासक गडबडून गेले आहेत. पण कुणालाही त्याची योग्य कारणमिमांसा करून त्यावर उपाय शोधण्याची बुद्धी झालेली नाही. सहाजिकच आपापले कालबाह्य सिद्धांत तसेच पुढे रेटून, हे जाणकारच आणखी धृवीकरण होण्याला हातभार लावत आहेत. एकूण समाज नेहमी सोशिक असतो आणि त्याच्या सहनशीलतेलाच संस्कृती म्हटले जात असते. आपल्याला न पटणारे, न रुचणारेही सहन करण्याची क्षमता, म्हणजे सभ्यपणा असतो. पण समोरचा त्याचा गैरलागू फ़ायदा घेऊन अतिरेक करू लागला, मग त्याला रोखणे अपरिहार्य होऊन जाते आणि त्यात पुढाकार घेणार्‍याच्या मागे बहुसंख्य लोक उभे राहू लागतात.

वास्तवात अशा बहुसंख्य लोकांच्या मनात जी बोचरी भावना असते, त्याला उद्गार देण्यात कोणा एकाने पुढाकार घेतलेला असतो. म्हणूनच त्याला प्रतिसाद मिळू लागतो. त्यामागची धारणा समजून घेतली नाही आणि असा पुढाकार घेणार्‍यालाच चिथावणीखोर ठरवले, मग अधिकाधिक लोक त्या पुढार्‍याच्या मागे उभे राहू लागतात. पण जाणत्यांना मात्र त्याचा गंधही नसतो. कारण त्यांची वास्तवाशी नाळ तुटलेली असते आणि ते लोकभावनेपेक्षाही आपल्या सिद्धांतात मशगुल असतात. तिथे बुद्धीजिवी वर्ग आणि समाजाची फ़ारकत सुरू झालेली असते आणि ती दिवसेदिवस वाढतच जाते. आताही आसिफ़ा नामे बालिकेवर झालेल्या हिडीस बलात्कारानंतर समाजात उभी रहात असलेली दुही अंगावर शहारे आणणारी आहे.

 

ndtv.com

पण त्याची कारणमिमांसा करण्यापेक्षा बहुसंख्य समाजाच्या सोशिक भावनेलाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याची घाई झालेली आहे. त्याने ही दरी संपण्यापेक्षा अधिकाधिक खोल होत चालली आहे. त्या समाज विभागणीलाच धृवीकरण म्हणतात. यात क्रिया असते, तशीच प्रतिक्रीयाही अपरिहार्य असते.

चार दशकापुर्वी मेहमूद या विनोदी नटाने ‘बॉम्बे टू गोवा’ नावाचा चित्रपट काढला होता. त्यात मुक्री या नटाने दाक्षिणात्य मद्रासी पात्र रंगवले होते. तो त्याची पत्नी व धिप्पाड बाळ असे कुटुंब असते. पोराच्या उचापतींमुळे त्याचे तोंड बांधलेले असतात. बसप्रवासात वाटेत विश्रांतीसाठी गाडी थांबते आणि सगळे प्रवासी तिथल्या छपरातल्या हॉटेलात जातात. हॉटेलचा मालक मुक्रीवर चिडतो आणि पोराचे बांधलेले तोंड सोडायचा आग्रह धरतो. पित्याने आपल्या दिवट्या पोराची कथा सांगूनही हॉटेल मालकाचे समाधान होत नाही. तेव्हा मुक्री बजावतो, की यापुढे होईल त्याला तूच जबाबदार असशील.

आधीच ‘अम्मा पकोडा’ म्हणून आक्रोश करणारे ते धिप्पाड पोर, मोकाट सुटते आणि भज्यांच्या परातीवर झेप घेते. धुमाकुळ घालते. त्याला आवरताना आईबाप व हॉटेलातील इतरांची तारांबळ उडून जाते. पुन्हा त्याचे तोंड बांधले जातात आणि धापा टाकत मालक म्हणतो, ‘इसका मुह क्या, हातपाव सब कुछ बांधके रखो.’ समाधानाने मुक्री त्याच्याकडे बघतो.

 

प्रत्येक बाबतीत तुमच्या समजुती कामाच्या नसतात, त़सेच तुमचे सिद्धांत लागू होत नाहीत. प्रत्येक मूल सारखेच निरागस नसते आणि प्रत्येक माणूसही सारखाच नसतो. म्हणूनच हिंसक होणार्‍यांच्या मुसक्या बांधून ठेवाव्या लागतात. ज्याला मानवी सभ्यतेनुसार वागता येत नसते, त्याचे मानवी अधिकार नावाखाली चोचले केले, तर त्याला धुमाकुळ घालण्याची मुभा मिळत असते. त्याच्या परिणामी इतर सभ्यपणे वागणार्‍यांना आपली सहनशीलता सोडून आक्रमक होणे भाग पडत असते. त्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याला पर्याय नसतो. कारण अशा धुमाकुळ घालणार्‍यांचे स्वातंत्र म्हणजेच इतरांच्या जीवाशी खेळ असतो. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण केली जाते, तेव्हा सभ्यता वाचवण्यासाठीच सभ्यतेला आवर घालून असभ्य उपाय योजावे लागत असतात.

मग त्या कथानकात इतर प्रवासी वा हॉटेलवाला अमानुष झाले होते काय? त्यांना मुलांशी कसे वागावे कळत नव्हते काय? ते सैतान होते काय? कुठल्या परिस्थितीत त्यांना असे उपाय योजावे लागले, त्याचे परिशीलन केले तरच उत्तरे मिळू शकतात. त्या पित्याने मुलाचे हात बांधले होते, ते सोडायला लावणारा गुन्हेगार असतो. कारण त्यानेच या पोराच्या अतिरेकी वागण्याला मोकाट करण्याची सक्ती केलेली असते. चुक तिथे असते. पुढले सर्व परिणाम असतात.

आपल्या देशात सिद्धांताच्या आहारी जाऊन मागल्या काही वर्षात वा दशकात कुठल्याही अतिरेकाला स्वातंत्र्य म्हणून जे मोकाट सोडण्यात आलेले आहे. त्याने बहुसंख्य शांतताप्रिय समाज विचलीत होत गेला आहे. त्याचे परिणाम बुद्धीमंतांना भोगावे लागत नसून सामान्य जनतेला भोगावे लागत असतात. रझा अकादमीच्या मोर्चाचे कोणते परिणाम झाले होते? त्यात विटंबना झालेल्या महिला पोलिसांचा त्यात काय गुन्हा होता? अशा मोर्चांना मुळातच परवानगी दिली नसती, तर पुढले परिणाम होत नसतात. चार दशकांपुर्वी काश्मिर अतिशय शांत गुण्यागोविंदाने नांदणारा प्रांत होता. तिथे भारतातल्या बहुतांश चित्रपटांचे निसर्गरम्य चित्रीकरण होत असे. आज तिथे पर्यटनाला जाण्यातही जीवाला धोका निर्माण झाला आहे. तेव्हा तिथे आझादी असा शब्द उच्चारण्यासाठीही तुरूंगात डांबले जात होते आणि तसे शब्द बोलायची बिशाद कोणापाशी नव्हती. पण त्यात ढिल दिली गेली आणि हळुहळू काश्मिर हाताबाहेर गेला.

यातला “अम्मा पकोडा” कुठल्या जाणकाराने बघायचा प्रयत्न केला आहे काय? तेव्हा तिथे काश्मिरी पंडीत हिंदूही गुण्यागोविंदाने नांदत होते. जसे अधिक धार्मिक स्वातंत्र्य मिळाले, तसे तिथल्या हिंदूंना जीव मुठीत धरून पळायची वेळ आणली गेली आहे. यातला “अम्मा पकोडा” कधी विचारात घेतला गेला आहे काय? आज जम्मूतल्या आसिफ़ासाठी व्यथीत झालेल्या प्रत्येकाने जरा खोलवर दुखणे तपासून घेतले पाहिजे.

सगळा गदारोळ कुठून सुरू झाला?

आफ़िसाची घटना जानेवारी महिन्यातली आहे आणि आता तिच्यावरील बलात्कारात गुन्हेगार असलेल्यांचे समर्थन करायला तिथला हिंदू समाज व नेते उभे ठाकले म्हणून गदारोळ उठला आहे. त्यात भाजपाच्या दोन मंत्र्यांना समर्थनासाठी राजिनामे द्यावे लागले आहेत. पण असा पाठींब्याचा मोर्चा काढणारा वकिली संघटनेचा अध्यक्ष कॉग्रेसचा पाठीराखा आहे. याचा अर्थ भाजपा वा कॉग्रेस असा विषय नसून हिंदू तितुका मेळवावा असे काहीतरी घडलेले आहे. त्यात योग्य अयोग्य हा विवेक राहिलेला नाही. इतक्या टोकाला हिंदू कशाला गेले, त्याचा विचार करायचा नसेल तर विषय झुंडशाहीच्या हातीच सोपवला जाणार. भाजपा सोडून द्या. त्याच्यावर धार्मिक उन्मादाचा आरोप होतच असतो. पण –

आपल्या पक्षीय भूमिका गुंडाळून कॉग्रेसचे वकील व अन्य नेते त्यात सहभागी कशाला झाले? त्यांनीच पुढाकार कशाला घ्यावा? राजकीय विचार भूमिका सोडून असे लोक धर्माच्या नावाने हिंसा करायला एकत्र कशाला आले? एका कोवळ्या मुलीवर बलात्कार करण्यातून कुठली धर्माभिमानाची गोष्ट साध्य होत असते? असले प्रश्न शांत चित्ताने व संयमी मनाने विचारले जाऊ शकतात.

जेव्हा सूडबुद्धीने लोक पेटलेले असतात, त्यावेळी विवेक सुट्टीवर गेलेला असतो आणि कुठलीही चिथावणी पुरेशी असते. आजवर काश्मिरातून लाखो हिंदूंना परागंदा व्हायला लागल्यावर कोणी अवाक्षर उच्चारले नसेल, तर त्या मौनीबाबांचा हिंसा माजवणार्‍यांना पाठींबा असल्याचे गृहीत तयार होते. कायद्यापेक्षाही झुंडीने न्याय हिसकावण्याच्या मानसिकतेला खतपाणी घातले जात असते. जे हिंदूंवरील अत्याचाराच्या वेळी गप्प राहिले, ते आपल्याला न्याय देऊ शकत नाहीत. म्हणूनच आपले बळ सिद्ध करून हिंसेला हिंसेने उत्तर देण्याची उपजत प्रवृत्ती डोके वर काढत असते. त्यात कशालाही धरबंद रहात नाही.

दहशतवादी जिहादींचा बंदोबस्त करणार्‍या भारतीय सैनिकांवर काश्मिरातील पाकिस्तानवादी मुस्लिमांचे घोळके दगडफ़ेक करतात. भारतीय मुस्लिम पोलिसांचेही मुडदे पाडतात, तेव्हा यातला कोणी हरीचा लाल त्यातला धर्म बघू शकला आहे काय? सैनिक वा पोलिस मुस्लिम असूनही ते घोळके त्याचा मुडदा पाडतात, कारण त्या जमावाला तो मुस्लिमही गद्दार वाटतो. काफ़ीर वाटतो. कारण निकष धर्माचा आहे आणि धर्माच्या नावाखाली वाटेल ते गैरकृत्यही ग्राह्य धरले जाते आहे. त्यातून मग तिथे पिढ्यानुपिढ्या वास्तव्य केलेले हिंदू एकाकी पडत गेले आहेत. असहाय झालेले आहेत. मुस्लिमांपासून दुरावले गेले आहेत. त्यांच्यात मग मुस्लिमांविषयी तिरस्कार निर्माण होत गेला आहे.

अशावेळी लोक कुठलातरी समान धागा पकडून एकत्र येऊ लागतात. तो राजकीय वा सामाजिक असू शकतो वा धार्मिक प्रादेशिक असू शकतो. इथे आपल्यावरील अन्याय अत्याचाराला धर्माचा रंग असेल, तर प्रतिकारही धर्माच्या छत्राखालीच होणार ना? जम्मू काश्मिरच्या मुस्लिमांना जोडणारा धागा धर्म असेल, तर त्याच्या प्रतिकाराला उभा रहाणार्‍या जमावाचा धागाही धर्माचाच होतो.

आसिफ़ावर झाला तो अत्याचार काश्मिरला नवा नाही. किंवा कुठल्याही मुस्लिमबहूल प्रदेशात जगणार्‍या बिगरमुस्लिमांसाठी नवा नाही. बांगला देश असो वा सिरीया-इराक असो. अगदी युरोपातही अशा घटना मुस्लिम घोळक्यांनी केलेल्या आहेत आणि सोशल मीडियातून त्या जगभर जात असतात. त्यातून जगभर मुस्लिम विरोधी धारणा एकवटत चालली आहे. त्याचेच पडासाद मग जम्मूत उमटले तर नवल नाही.

जम्मूतले वकील वा अन्य हिंदू नेते अशा बाबतीत एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या बुद्दी वा शिक्षणाचे मोजमाप दुर ठेवून मिमांसा आवश्यक असते. हेच त्यांनी इतकी वर्षे कशासाठी केले नव्हते आणि त्यांच्या संवेदना आज कशाला बोथट झाल्या? ते विचारात कोणी घ्यायचे?

दूर कुठे म्यानमारमध्ये मुस्लिमांवर अत्याचार झाला म्हणून मुंबईत धिंगाणा घातला जातो. भारतात राहूनही कुणा भारतीय हिंदूला काश्मिरात स्थान मिळू शकत नाही. पण म्यानमारहून परागंदा झालेल्या रोहिंग्यांना तिथे वसवण्याचा अट्टाहास धर्माचा धागा नसतो, तर कुठला संदर्भ असतो? ज्यांना हा पक्षपात दिसत नाही, बोलता येत नाही वा बोलण्याची हिंमत नाही, त्यांच्यावरून हिंदूंचा विश्वास उडत गेल्याचे हे परिणाम आहेत. मग त्याची प्रतिक्रीया म्हणून मुस्लिमद्वेष जन्म घेऊ लागतो. त्यातही पुन्हा अशा घटनांचे अवडंबर माजवताना हिंदूंवर शिंतोडे उडवले की काश्मिरच्या बाहेर असलेल्या हिंदूंनाही बोचू लागते. त्यात आसिफ़ा सारख्या कोवळ्या पोरीचा बळी जात असतो. कुठल्याही समाजात वा देशात महिला हे सर्वात सोपे लक्ष्य असते.

सुदानच्या डार्फ़ोर प्रदेशात मुस्लिम नसलेल्या लोकवस्तीवर हल्ले करून पुरूषांना ठार मारले गेले आणि त्यांच्या महिलांवर बलात्कार कशाला झालेले होते? नायजेरिया वा सोमालियात काय घडले? बंगलादेशातील रोहिंग्या निर्वासित छावण्यात हिंदू महिलांचा सन्मान राखला गेला काय? अशा बातम्यांचा भडीमार चालू झाला, मग अस्तित्वाची लढाई चालू होत असते आणि बुद्धी गहाण टाकून जमाव झुंडी तयार होऊ लागतात.

झुंडींना विवेक नसतो की विचार नसतो. तिथे मग सुबुद्ध वा निर्बुद्ध असा फ़रक रहात नाही. अजून त्रिपुरातील भाजपाच्या यशाचे मूल्यमापन कोणाला करावेसे वाटलेले नाही. बंगलादेशातून येऊन त्रिपुरात स्थायिक झालेल्या हिंदूंनी भाजपाला इतके मोठे यश दिले. त्या हिंदूंच्या भावना मार्क्सवादी वा कॉग्रेसने समजून घेतल्या असत्या, तर भाजपाला त्या टोकाला कशाला यश मिळाले असते? मुस्लिम धार्मिक आक्रमकता व त्याचे दुष्परिणाम भोगण्याची पुरोगामी सक्ती, यातून भाजपा हिंदू धृवीकरणाचा लाभार्थी होत चालला आहे. त्या झुंडीच्या मानसिकतेची जोपासना मुर्ख पुरोगामीत्वाने केलेली आहे.

कुठल्याही गंभीर समस्येच्या परिणामांवर चर्चा करून उपाय सापडत नाहीत. त्याच्या मुळाशी जावे लागते. एका बाजूने झुंडशाही बोकाळू दिली मग त्याच्यावर प्रतिक्रीया म्हणून दुसर्‍या बाजूला झुंड उभी राहू लागते. अस्तित्वाची लढाई त्यातून आकार घेऊ लागत असते. त्यात पहिल्या झुंडीच्या मुसक्या वेळीच बांधल्या गेल्या, तर दुसरी झुंड उभी रहाण्याची शक्यताच संपून जात असते. त्याच्या ऐवजी पहिल्या झुंडीचे चोचले पुरवले गेले, तर दुसर्‍या झुंडीला जन्म मिळत असतो आणि पुढल्या घटनांतून तिची आपोआप जोपासना होत असते.

आजवर जम्मू काश्मिरच्या हिंदूंनी बरे़च काही सहन केले आहे आणि ती सहनशीलता संपल्यावर प्रतिक्रीयेतली झुंड आकार घेऊ लागली आहे. त्यामागची धारणा समजून घेतली नाही तर उपाय मिळणार नाही. उलट तीच झुंड अधिक प्रभावी होत जाईल आणि अन्य भागातूनही तिला प्रतिसाद मिळू लागेल.

आज आसिफ़ाच्या प्रकरणानंतर सोशल मीडियात उमटणार्‍या कोरड्या प्रतिक्रीया त्याची चुणूक आहे. आजवर सहनशील सोशिक असलेला हिंदू धृवीकरणाने झुंडीचे रूप धारण करू लागल्याची ती साक्ष आहे. त्या झुंडीला रोखण्य़ासाठी पलिकडल्या झुंडीच्या मुसक्या बांधल्या जाताना दिसल्या पाहिजेत. अन्यथा कुणाला आवडो नावडो, अशा घटनांची पुनरावृत्ती होत राहिल. कारण विवेक, सोशिकता वा सहनशीलता यांचा अंत बघितल्यावर कोणी सुसंस्कृत प्रतिसादाची अपेक्षा करू शकत नसतो.

झुंडीला कायदा आवरू शकणार नसेल तर जे बळी होत असतात, त्यांनाही झुंड होऊन अस्तित्वाची लढाई करावीच लागत असते. ते करताना सिद्धांत कामाचे नसतात, कारण सुत्रे निर्बुद्धतेच्या हाती जात असतात. आसिफ़ाच्या बलिदानाने हाच धडा दिलेला आहे. तो शिकणे वा समजून घेणे दोन्ही बाजूच्या लोकांसाठी उपयुक्त ठरावे. अन्यथा म्यानमारच्या रोहिंग्यांबा शांतीप्रेमी बुद्धही वाचवू शकलेला नाही, हे सत्य आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version