' आसिफा बानो ला काय न्याय मिळवुन देणार तुम्ही ? – InMarathi

आसिफा बानो ला काय न्याय मिळवुन देणार तुम्ही ?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

९ वर्षाची बाला असेल असेल नाहीतर ९० वर्षाची जख्खड म्हातारी, पोटुशी असेल नाहीतर वयात पण न आलेली अनाघ्रत कळी, नवजात असेल नाहीतर तरणी असेल, आजारी असेल नाहीतर पाळी आलेली असेल. धडधाकट असेल नाहीतर शरीराने, मनाने अपंग असेल, तुला संधी मिळाली की तु झडप घालणार, हल्ला करणार. १ वर्षाच्या तान्ह्या पोरीच्या मांड्या बघून सुद्धा तुला इरेक्शन येतं. ऑफिस मध्ये कुठली गरीब ज्युनिअर जॉईन झाली की तुझं पुरुषत्व उसळ्या मारायला लागतं. रात्री अपरात्री ७० वर्षाची अपंग भिकारीण जरी कुठल्या रस्त्यावर सापडली तरी तिला भोगल्याशिवाय तुझ्या गांडूपणाची खात्री तुला पटवता येत नाही.

तुझी लायकी नाही मुलींना जन्म देण्याची आणि सांभाळण्याची. देवळात देवीला लाखो रुपयाच्या साड्या चोळ्या दान करणारा आणि तिच्या कडून स्वत:च्या वंशाला दिवा मागणारा तु स्वत:ला अभिमानाने पुरुष असं म्हणवतोस पण प्रत्यक्षात हिजडे सुद्धा तुझ्या पेक्षा लाख पटीने बरे.

त्या बिचाऱ्यांवर तर निसर्गाने अन्याय केलेला असतो. पण तु? फक्त एक लिंग काय वेगळ मिळालं तुला म्हणून स्वत:च्या पुरुषपणाचा अभिमान आणि आणि स्वत:च्या पुरुषत्वाची खात्री तुला बाई भोगल्या शिवाय द्यायची लाज वाटते?. जिच्या योनीतून जन्म घेतो त्याच आईच्या आणि तिच्या योनीच्या नावाने बिनदिक्कीत हजारो शिव्या देत राहतोस तू, जिच्या स्तनातलं दुध पिवून मोठा होतोस त्याच स्तनाविषयी अर्वाच्य भाषेत बोलल्या लिहिल्या शिवाय तुझं तरुणपण सरत नाही.

 

thenortheasttoday.com

रस्त्यात, शाळेत, कॉलेजमध्ये, रेल्वेत, बसमध्ये, घरी, दारी जिथे बाई दिसेल तिथे तिचा नजरेनं, स्पर्शानं, शब्दानं ज्या मार्गाने जमेल त्या मार्गाने तिचा कसा रेप करता येईल याची गणित तु जमवत राहतोस. तुझ्या मित्र मंडळात पोरी पटवण्याच्या पैजा लागत राहतात. भावनिक रित्या पांगळी बाई तुझ्या कचाट्यात सापडुन तिला उपभोगल्यावर तिचा पैजेसाठी कसा वापर केला हे तोंडावर तिला सांगताना सुद्धा तुझा पुरुषी गंड सुखावत राहतो. ह्याच पोरीची व्हर्जिनीटी मी तोडली.

इतकी मिजास करत होती करुन दाखवलं तिला नागडं अस चारचौघात त्या पोरीला बोलताना तुझ्या पुरुषी अहंकाराला चार चॉंद लागत राहतात. तुझ्या पुर्वजांच्या मसणात जळुन खाक झालेल्या छात्या तुझ्याविषयी अभिमानाने फुलुन येतात.

बाईच्या कर्तृत्वाचे तोंड देखले गोडवे गाणारा तु तिच्या पाठीमागे तिचे कपडे फेडून तिला धडा शिकवण्याची प्रतिज्ञा करत राहतोस. तिच्या परिस्थितीचा फायदा घेवून कधी एकदा तिला अंगाखाली झोपवता येईल या विचारात तुझ्या रात्री जळत राहतात. घरात बायको नाही तर तुझ्या वंशाचं ओझं धारण करणारी हमाल आणि घरची कामं करणारी मोलकरीण तुला हवी असते. जी पाळीव कुत्र्या प्रमाणे तु बस म्हणेल तेव्हा बसेल. तु उठ म्हणेल तेव्हा उठेल आणि तुझ्या लाथा खावून सुद्धा डोक्यावरचा पदर ढळू न देता तुझ्या खानदानाचं आणि घराण्याचं नाव समाजात मोठं करेल.

पोरगी नको म्हणून आधीपासूनच बायकोला धाकात घेवुन तिला मुलगा पैदा कर नायतर घर सोडायला तयार राहा म्हणून धमक्या देत राहतोस तु. पोरगी झाली तर तुझ्या खानदानच नासकं आहे. ही पोरगी माझी नाही असा बायको समोर तमाशा करतोस तु. विटाळशी विटाळशी म्हणून बायकोला हिणवणारा , तुला इच्छा झाली तर त्याच विटाळात सुद्धा तिचा जबरदस्तीने उपभोग घ्यायला मागं पुढं पाहात नाहीस.
दुसऱ्याच्या पोरीबाळींचा कधी भोग घ्यायला मिळेल म्हणून टपुन बसणारा तु आता तर तुझ्या हातुन तुझी सक्खी पोरगी सुद्धा सुटेना. दारुच्या नशेत स्वत:च्या पोरीला पण उध्वस्त करण्या इतकं तुझं पुरुषत्व प्रगत झालय. सार्वभौम झालय.

 

youtube.com

थूत. गटारात हिंडणारी डुकरं सुद्धा तुझ्यापेक्षा चांगली असतात. आपण टाकलेली घाण खावून आपलं नसलेलं ऋण फेडत राहतात. पण जातीच्या, धर्माच्या, घराण्याच्या, प्रतिष्ठेच्या, इभ्रतीच्या शुभ्र वस्त्राआड लपलेल्या तुझ्या अंगात तर आक्खा गटारखाना वास मारत असतो त्याला साफ करण्याइतकी डुकरे कुठून आणून नासावायची? एक वेळ गटारं साफ करणं सोपं. मसणवाटे पवित्र करण सोप पण सदासर्वकाळ वासनेच्या घाणीत लडबडलेलं तुझं अस्तित्व कुठल्या शस्त्राने पुसुन स्वच्छ करायचं?

रेप करण तुझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असते. बाई ला इभ्रत प्यारी असते म्हणून बाई गवगवा करणार नाही असा तुझा समज असतो. जरी रेप केला तरी काय कोण होतंय. पोलीस स्टेशन ला गेलं तरी तिथं तुझ्याच जातीचे लांडगे लाळ गाळत बसलेले असतात, जरी कोर्टात गेलं तरी तुझ्याच जातीची गिधाड असली नसली लक्तरं फाडून तिच्या नग्न देहाच्या चिंधड्या उडवायला बसलेली असतात.न्याय विकत मिळत असला तरीही तिच्यावर झालेल्या अन्यायाची कहाणी सांगायला ती जिवंतच राहिली नाही पाहिजे म्हणून तिला भोगून पण तुझं समाधान होत नाही. तिचा खून केल्यावर तुला तुझ्या पुरुषीपणाची खरी ओळख पटते.

पैसा फेकला की कुठलं ही पाप फेडता येत अशी मस्ती असा माज तुला असतो. भांडण धर्माची असतील, जातीची असतील, जमिनीची असतील, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या सूडचक्राची असतील पण तुझा बदला बाईला भोगून तिला हालहाल करून मारून टाकल्यावरच पूर्ण होतो. बाईच गर्भाशयच जर मिळाल नाही तर जन्म घेणं सुद्धा अशक्य असणारी झंड अवलाद तुझी! तुला अकड नक्की कुठल्या गोष्टीची आहे?

व्यर्थ आहे हा जन्म जिथे माझ्या बाईपणाची किंमत मला स्वत:ची हत्त्या करून चुकवावी लागते. नीच आहे हा देश, नीच आहे हा समाज जो मला नग्न करून माझ्या इज्जतीचा भर बाजारात लिलाव मांडतो. षंढ आहे इथला कायदा ज्याच्या न्यायाचा तराजू फक्त सत्ता आणि पैशाच्या राशीवर झुकतो.

या देशात मुलींचा जन्मच होणार नाही. मुलगी मिळावी म्हणून दाहीदिशा टाचा घासत भिक मागण्याची वेळ त्या हर एक घरावर येईल ज्यांच्या घराण्यात कधी काळी मुली हुंड्यासाठी जाळल्या होत्या. जातीचं सातत्य फक्त एक मुलगी टिकवू शकते याची जाणीव होवून जातीसाठी माती खाणाऱ्या हर एका माजोरड्या पुरुषांची तडफडून मौत होईल ज्यांच्या घरात मुलीचा जन्म झाल्यानंतर तिला कचऱ्यात ढिगात फेकलं होतं, मुलीविना घराण्याचे वंश खुंटतील, प्रजाती नष्ट होतील, सृष्टीचं सृजन संपेल, दीर्घ निद्रेत गेलेल्या भद्रकालीला जाग येईल आणि विनाशाचं तांडव सुरु होईल. ज्या बाईला सन्मानाने राहण्याचा अधिकार तिचा समाज तिच्यापासून छीनून घेत असेल अशा समाजाला जिवंत राहण्याचा हक्कच काय? इतिहासात बळी गेलेल्या लाखो अनामिकांपासून ते असिफा बानो पर्यंत च्या निष्पाप आत्म्याला तिलांजली देण्यासाठी अशा समाजाचं तर्पण होईल.

त्यामुळे एक लक्षात ठेव प्रत्येक वेळी जेव्हा बाईवर रेप करून तू तिचा खून करशील तेव्हा तू तुझ्या पुरुष प्रजातीचा विध्वंस करण्याच्या मार्गावर एक एक पाउल पुढे टाकत जाशील. ज्या दिवशी मी संपेल त्या दिवशी तुझं अस्तित्व सुद्धा जळून राख होईल.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Adv. Anjali Zarkar

Lawyer by profession. belletrist by heart!

anjali-zarkar has 11 posts and counting.See all posts by anjali-zarkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?