' असिफावरील “शिस्तबद्ध” बलात्काराचा घटनाक्रम अंगावर काटा आणि डोक्यात चीड आणतो – InMarathi

असिफावरील “शिस्तबद्ध” बलात्काराचा घटनाक्रम अंगावर काटा आणि डोक्यात चीड आणतो

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

जम्मू काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील एक मंदिर, तिथे एका आठ वर्षाच्या असहाय्य मुलीला अंमली पदार्थाचा डोस देऊन तिच्यावर कितीतरी वेळा निर्दयीपणे लैंगिक अत्याचार केले जातात. या अत्याचारात स्थानिक पोलीसही सामील होतो. तोही तिच्यावर बलात्कार करतो. तीन चार दिवस मरणासन्न अवस्थेत त्या निर्जन मंदिरात ती नुसती पडून असते. रोज अत्याचार. रोज बलात्कार, शारीरिक इजा. आणि हे झाल्यावर तिचे प्रेत जंगलात नेऊन पुरून टाकले जाते.

मानवाच्या निर्दयीपणाची शेवटची मर्यादा कुठपर्यंत असू शकते हे अशा प्रसंगात पाहिले की डोक्यात तिडीक जाते. आणि तपासांती समोर येणारी तथ्ये पहिली तर माणसाच्या माणूसपणावरचा विश्वास क्षणार्धात उडून जातो. खाडकन डोळे उघडले जातात.

माणसाच्या मोठेपणाचे रचलेले सर्व इमले गळून पडतात. आपण प्रगत झालो कि नाही यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहत. जम्मू मधली ही घटना आपण मानव समाज म्हणून अजून किती रानटी आहोत हे ध्यानात आणून देणारी आहे. कारण या घटनेत गुन्हा अनवधानाने, अभिनिवेशात घडलेला नाही. संपूर्ण थंड डोक्याने आणि शिस्तबद्ध, योजनाबद्ध पद्धतीने ठरवलेले काम नराधमांनी केले आहे.

 

asifa-kathua-jammu-rape-victim-inmarathi
www.ndtv.com

या घटनेला ‘शिस्तबद्ध गुन्हा’ असे का म्हणायला हवे ? ते या घटनेचा क्रम पाहिल्यानंतर लक्षात येईल.

पार्श्वभूमी :

या घटनेला तत्कालीन असे कुठले क्षुल्लक कारण वगैरे नाही. बर्याच काळापासून चालत आलेले दोन समुदायांतील वैर, धार्मिक तणाव आणि त्यातून स्वतःचे वर्चस्व सिध्द कारण्यासाठी या अमानुष कृत्याला पूर्णत्वास नेण्यात आले आहे. स्थानिक हिंदू लोक आणि बखेरवाल नावाची मुस्लीम विमुक्त जमात यांच्यात बर्याच काळापासून कोणत्या न कोणत्या कारणावरून वाद चालू असायचा.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, असिफावर केले गेलेले अत्याचार हे पंचक्रोशीत दहशत बसवण्यासाठी आणि तिथल्या ‘रसाना’ या खेड्यात राहत असलेले बखेरवाल लोकांच्या मनात भीती उत्पन्न होऊन त्यांनी तो भाग सोडून जावा यासाठी झाले आहेत.

या कटात आत्तापर्यंत, ज्याने ही सर्व योजना आखली तो स्थानिक माजी महसूल अधिकारी आणि त्या भागात दबदबा राखून असणारा सांझीराम नावाचा इसम, कॉलेज मध्ये शिकणारा त्याचा मुलगा विशाल कुमार, स्थानिक पोलीस अधिकारी दीपक खजुरिया, सांझीराम याचा अप्लवयीन पुतण्या (वय १६) आणि त्याचा मित्र परवेश कुमार अशा एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

असिफा ही स्थानिक बखेरवाल कुटुंबातली. तपासाच्या दरम्यान एक आरोपी विशाल याने मान्यही केले की बखेरवाल कुटुंबातली असल्याच्या एका कारणामुळेच तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी गेल्या डिसेंबर महिन्यापासूनच बखेरवाल लोकांना धडा शिकवण्याच्या तयारीत होते. यामागे वरचेवर जमिनीवरून, इतर कारणांवरून होत राहणाऱ्या नेहमीच्या वादाचे कारण होते.

पोलिसांच्या मते, सांझी याने डिसेंबर महिन्यात या घटनेची योजना बनवायला सुरुवात केली. त्या कटात त्याने साथीदार म्हणून त्याचा पुतण्या आणि स्थानिक पोलीस खजुरिया याला सामील करून घेतले. खजुरिया हा पोलीस सुद्धा अनेक दिवसांपासून बखेरवाल समुदायाच्या विरोधात होत असणार्या कारवायांमध्ये भाग घेत होता. त्यामुळे सांझी याला त्याला सोबत घेणे सोयीस्कर झाले. त्यातला सांझी चा पुतण्याला बखेरवाल समाजातल्या लोकांनी काही दिवसांपूर्वी मुलीची छेड काढली म्हणून बेदम मार दिला होता असेही वृत्त आहे. खजुरिया याच्या मालकीच्या जमिनीवरून या समाजातील लोकांची जनावरे चरायला वगैरे चुकून येत असत. त्याचाही राग होताच. त्यामुळे त्याने बखेरवालांच्या विरोधात बर्याच गोष्टी केल्या होत्या. थोडक्यात दोघांनाही बदल घ्यायचा होता आणि त्याला सांझी याने योजनाबध्ह रूप दिले.

प्रत्यक्ष गुन्हा :

पोलिसांच्या मते, असिफाचे अपहरण करणे हा कट करणार्यांचा पहिला प्लान होता. तिचे व्याही कमी होते. बलात्कार करणे हे पहिल्यांदा बनवलेल्या योजनेत अंतर्भूत नव्हते असे ओलीस म्हणतात. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ठरवल्याप्रमाणे, आणि खजुरिया व आपला पुतण्या यांना ठरवून दिल्याप्रमाणे काम होणार होते. असिफाला देण्यासाठी अंमली पदार्थांची व्यवस्था पोलीस अधिकारी खजुरिया हा करणार होता. आणि असिफाला अपहृत करण्याचे काम त्याचा पुतण्या करणार होता.

८ आणि ९ तारखेला असिफाचे अपहरण करण्याच्या संधीची त्याने वाट पाहिली, पण ते जमले नाही. शेवटी १० तारखेला त्याच्या घराजवळच कुणीतरी येत असल्याची त्याला चाहूल लागली. पाळलेले जनावर चरायला सोडले होते ते सापडत नव्हते म्हणून शोधाशोध करत आठ वर्षांची असिफा त्याच्या घरापर्यंत येऊन पोहोचली होती. ती आल्याचे पाहून त्याने मित्र परवेश कुमार याला मदतीसाठी बोलावले. दोघांनी तिला चुकीची दिशा दाखवली आणि त्या दिशेला ती जनावर शोधायला गेली. वाट चुकल्यानंतर बर्याच वेळाने या दोघांनी तिला गाठले. आणि बळजबरीने तिला भांग प्यायला लावली.

ती भांगेच्या नशेत असताना या दोघांनी तिच्यावर तिथेच जंगलात बलात्कार केला. हे झाल्यानंतर त्याच भागात असलेल्या ‘देवस्थान’ म्हणून ओळखल्या जाणार्या एका मंदिरात तिला घेऊन आले. या मंदिराचा ताबा स्वतः मुख्य आरोपी सांझी राम याच्याकडे होता. हे चालू असताना विशाल कुमार हा मिरतला परीक्षा देत होता, पान ही बातमी मिळाल्यानंतर ते सोडून तो थेट रसाना येथे आला.

 

rape-inmarathi
www.samaa.tv

११ जानेवारी रोजी, असिफाला क्लोनाझेपाम या अंमली पदार्थाचा जास्त ताकदीचा डोस देण्यात आला. या अंमली द्रव्यामुळे माणूस पूर्ण नशेत जातो. पण हा पदार्थ उच्च प्रतीचा नसल्यामुळे फार काळ असिफाला नशेत ठेवता आले नाही. पोलिसांच्या मते, या पदार्थामुळे ती दुसर्या दिवसापर्यंत बेशुध्द अवस्थेत राहिली. तोपर्यंत असिफा बेपत्ता असल्याने तिचा शोध घ्यायला घरच्यांनी आणि स्थानिक प्रशासनाने सुरुवात केली होती. त्या दिवशी तो अल्पवयीन मुलगा आणि त्याचा मित्र परवेश हे दोघेही त्या मंदिराकडे फिरकले नाहीत.

१३ जानेवारी रोजी पुन्हा, अल्पवयीन मुलगा आणि मीरतवरून नुकताच आलेला विशाल कुमार या दोघांनी मंदिर गाठले आणि असिफावर पुन्हा नृशंस लैंगिक अत्याचार केले. पोलिसांच्या सूत्राच्या मते, राम हा मुख्य आरोपी यावेळी मंदिराबाहेर होता. आत बलात्कार केला जातोय हे लक्षात आल्यानंतर त्याने आपल्या मुलाला बाहेर काढले. हे इथेच थांबले नाही. त्या हैवानंमाध्ला नीचपणा अजून बाकी होता. १४ जानेवारी या दिवशी पुन्हा तोच अल्पवयीन मुलगा आणि खजुरिया या पोलिसाने असिफावर बलात्कार केला.

त्यानंतर तिच्या अंगावर असलेल्या शालीत तिला गुंडाळले. याच वेळी तिच्या डोक्यावर दगडाने जबर इजा कारण्यात आली. तो दगड पोलिसांनी नंतर प्रत्यक्ष घटनास्थळावरून ताब्यात घेतला. एवढे झाल्यानंतर तिचा मृतदेह कारमध्ये टाकून ‘नुल्ला’ या गावात नेण्याची योजना होती. पण तिचा देह जवळच असलेल्या जंगलात पुरून टाकण्यात आला.

पुरावे नष्ट करणे :

यात सगळ्यात चीड आणणारी गोष्ट नुकत्याच झालेल्या तपासात समोर आली. ती म्हणजे आरोपींना वाचवण्यासाठी तपास करत असलेल्या पोलिसांनी सुद्धा पोस्टमार्टेम रिपोर्ट मधल्या अनेक स्लाईड नष्ट केल्या. हे सदर केस सीबीआय कडे सोपवण्याच्या आधी करण्यात आले. यामध्ये हिरानगर पोलीस स्टेशनचे तिलक राज आणि आनंद दत्त हे दोन पोलीस अधिकारी दोषी आढळले आहेत. याच पोलीस ठाण्यात आधी खजुरिया हा आरोपी काम करायचा.

फोरेन्सिक तपासणीच्या आधी पिडीतेचे रक्ताने माखलेले कपडे धुकून पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली या दोन पोलिसांना अटक करण्यात आली. सूत्रांच्या मते, पुरावे नष्ट कण्यासाठी मुख्य आरोपी राम याने दोनदा चार लाखांची रक्कम या पोलिसांना दिऊ केली होती.

आणखी काही फोरेन्सिक रिपोर्ट येण्याची पोलीस वाट पाहत आहेत. त्यानंतर या प्रकरणात अनेक गोष्टी नव्याने पुढे येण्याची शक्यता आहे. पण याहून शरमेची बाब ही आहे की या आरोपींना अटक होणार असताना त्याच्या विरोधात बीजेपी-पीडीपी सरकारमध्ये मंत्री असणारे लाल सिंग चौधरी आणि चंद्रप्रकाश गंगा हे दोन निर्लज्ज मंत्री त्यांच्या अनुयायाना घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना ‘हिंदू एकता मंच’ नावाच्या एका संघटनेने पाठींबा दिला आहे. आणि या प्रकरणात आरोपिंवरच अन्याय होत असल्याचा वल्गना करत ही नीच झुंड रस्त्यावार उतरली आहे.

 

hindu-ekata-manch-inmarathi
www.ndtv.com

एकंदर हे वास्तव सगळ्या सभ्यतेच्या, आधुनिकपणाच्या संकल्पना विस्कळीत करणारे आहे. याच्यावर कडी म्हणजे हा सगळ्या प्रकाराकडे धार्मिक अंगाने पहिले जाते. काहीच वर्षांपूर्वी दिल्लीत निर्भायाला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरलेली गर्दी आज कुठे आहे? की निर्भया “आपली” आहे म्हणून आपण किती स्त्रीस्वातंत्र्य वादी होते हे पटवून देण्यासाठी केलेले निव्वळ नाटक होते ते? ते जे असेल ते असो. असिफाचा धर्म वगैरे कोणता असेल तो असो. या देशात पिडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी तिचा धर्म विचारात घेतला जाणार असेल आणि त्यावर व्यवस्था चालवण्याची जबाबदरी असणारे बेशरमपणे मौन धारणार असतील तर आम्हाला असली व्यवस्था नको.

हे उलथून टाकण्याची ताकद अजून भारतात राहणार्या लोकांकडे आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे.

काही क्षणाचे राजकारण, पोळ्या भाजून घेण्याचा निर्लज्जपणा सगळ्याच बाजूंनी होत असल्याचे आपण पहिले. या आधीही कित्येकदा पहिले. पण माणूस म्हणून याच्या विरोधात उभे राहण्याची जबाबदारी आपण स्वतःच्या खांद्यावर घेण्याची तयारी आपण दाखवत नाही तोपर्यंत याच्या विरोधात बोलण्याचा आणि टिपे गाळण्याचा तिळमात्र अधिकार नाही आपल्याला. बहात्तर साली आलेल्या गुरुदत्त च्या प्यासा मधल्या.

ये कुचे, ये नीलम घर दिलकशी के
ये लुटते हुए कारवा जिंदगी के
कहा है कहा है, मुहाफिज खुदी के
जिन्हें नाज है हिन्द पर वो कहा है

या ओळी कित्येक वर्षानंतर तथ्य राखून आहेत हे भारतीय समाज म्हणून आपले दुर्दैव आहे. त्याहीपेक्षा आपल्या नाकर्तेपणाचे उत्तम उदाहरण आहे. आता आणखी आपण काय करायला हवे असे प्रश्न येतील? आपण काय केले परिस्थिती सुधारण्यासाठी नक्की ? हा प्रतिप्रश्न आहे. एकदा स्वतःला विचारून काय उत्तर मिळते ते पहा !

===

टीप : या लेखात सांगितलेली तथ्ये ही, आरोपीची चौकशी झाल्यानंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी जी चार्जशीट सीबीआय समोर दाखल केली, त्या चार्जशीट वर आधारलेली आहेत. द प्रिंट ने ही तथ्य समोर आणणारा लेख प्रकाशित केला आहे. तो या लिंकवर वाचता येईल. 

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?