अहमदनगर दुहेरी खून प्रकरण : पडद्यामागील सत्य, जसं घडलं तसं!
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
लेखक : विक्रांत जोशी.
===
अहमदनगरमध्ये खरोखर काय झाले? शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची हत्या का करण्यात आली? केडगाववर कोण राज्य करते? दिवसा उजेडी झालेल्या राजकारण्यांच्या दुहेरी खुनानंतर कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी काय करावे लागेल? या सगळ्या प्रकारामागे मास्टरमाइंड कोण आहे?
सुरुवातीला, आपल्याला तिथल्या स्थानिक राजकारणाची सर्व पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. या दोघांची हत्या राजकीय आहे आणि तो फक्त तत्कालीन संघर्ष नाही. शिवसेना नेते वसंत ठुबे आणि संजय कोतकर यांचे कौटुंबिक हाडवैर जुनेच आहे. जेव्हा शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी ठुबे व कोतकरांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी दिवाकर रावतेसह नगरला भेट दिली तेव्हा त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राचा बिहार होत आहे… असं म्हणण्याची वेळ का आली? जाणून घेऊया..
साधारण मुंबई आणि नवी मुंबई हे जेवढे अंतर आहे तेवढेच नगर आणि केडगाव मध्ये असेल. केडगाव हा नगरचाच भाग आहे. केडगावात दोन तीन व्यवस्थाबाह्य सत्ताकेंद्रे आहेत. त्यांची मसल पॉवर आहे. त्याच्या बळावर ही कुटुंबे पंचक्रोशीत आपला दबदबा राखून असतात.
त्यापैकीच एक कुटुंब म्हणजे भानुदास कोतकर. कोतकर कॉंग्रेसचा. बऱ्याच वर्षापासून काँग्रेस पक्षाचे नगर शहराध्यक्ष होता. त्याला तीन मुले आणि एक मुलगी. संदीप, सचिन आणि अमोल. त्यापैकी संदीप हा नगर शहराचा मानी महापौर. या प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मुलीशी संदीप कोतकर याचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले. तोही तिथला स्थानिक नगरसेवक आहे. यापैकी सर्वजण म्हणजे वडील आणि तिन्ही मुले अशोक लांडे नावाच्या एका लॉटरी व्यावसायिकाच्या हत्येच्या आरोपाखाली जन्मठेपीची शिक्षा भोगायला तुरुंगात जाणार होते. आता नगरसेवकाची जागा रिकामी होणार होती, आणि त्यासाठी प्रभागात पोटनिवडणूक होनात होती. नगर हत्याकांडाची सर्व सूत्रे या पोटनिवडणूकीच्या भोवती फिरतात.
केडगाव वर तीन नेत्यांचे वर्चस्व आहे. त्यातला पहिला नेता म्हणजे भानुदास कोतकर (काँग्रेस), दुसरा म्हणजे माजी राज्यमंत्री आणि आमदार शिवाजी कर्डिले (भाजप), आणि तिसरा म्हणजे संग्राम जगताप (राष्ट्रवादी). यापैकी भानुदास कोतकर याचा बेकायदा दारू विक्रीचा धंदा होता. शिवाजी कर्डिले हा सायकलवरून दुध विकायचा आणि जगताप हा देशी दारूच्या व्यवसायात होता. हे सगळे तिघे केडगावमधील नामचिन गुंड! तिघेही प्रबळ असल्याने तिघांमध्ये वाद आणि भांडणे होणे अपरिहार्यच होते. पूर्वी हे तिघेही माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे बगलबच्चे होते. आता त्यांनी तीन वेगवेगळ्या पक्षांशी संधान बांधले असले तरी तिघेही राधाकृष्ण विखे पाटील यांचे चेले आहेत. आता यांच्या तिघांमधील सुंदोपसुंदी काय आहे ते थोडक्यात लक्षात घ्या.. तिघांपैकी कर्डिले हा तेल लावलेला पैलवान.
आपल्याला स्थान टिकवून ठेवायचे असेल आणि वर्चस्व प्रस्थापित करायचे असेल तर काहीतरी वेगळे करावे लागणार हे कर्डिले याला चांगले ठाऊक होते.
त्याला दोन मुली, त्यापैकी एकीचे लग्न त्याने भानुदास कोतकर याच्या मोठ्या मुलाशी, संदीपशी लावून दिले. हा संदीप कोतकर सध्या तुरुंगात आहे. आणि लहान मुलीचे लग्न लावून दिले सध्या आमदार असलेले संग्राम जगताप यांच्याशी. म्हणजे एका दगडात कर्डिले याने अतिशय चालाखपणे दोन पक्षी मारले. एकतर त्याने त्याच्या दोन प्रतिस्पर्ध्यांमधील आपापसात असलेला द्वेष संपवला. आणि दुसरे म्हणजे त्याने सत्तेचा वापर करून घेण्याची स्वतःची क्षमता प्रचंड वाढवली. आता भानुदास कोतकर मागे कसा राहणार ! त्यालाही एक मुलगी होती. तिचे लग्न त्याने आमदार संग्राम जगताप याच्या मोठ्या भावाशी लावून दिले. अशा पद्धतीने केडगावमधील ही तीनही सत्ताकेंद्रे एकमेकांशी कौटुंबिकरित्या संबंधित होती.
आता, भानुदास कोतकर याचा मुलगा आणि नगरचा माजी महापौर संदीप कोतकर हा अशोक लांडे यांच्या हत्येचा आरोपाची शिक्षा भोगत होता, तीही त्याचे दोन भाऊ आणि वडील यांच्या सोबत. त्याची नगरसेवकाची जागा आता रिकामी झाली होती आणि त्या जागेसाठी पोटनिवडणूक लवकरच होणार होती. कोतकर याला घरातून इतरांचा कुणाचाच पाठींबा नसल्याने त्याच्या नगरसेवक बायकोने स्वतःच्या घरातल्या कुणालातरी निवडणुकीला उभे करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
आतापर्यंतच्या उपलब्ध माहितीवरून असे म्हटले जात आहे की, या तीनही कुटुंबात आपापसातील संगनमताने असे ठरले की मुख्य व्यक्तींपैकी कुणी कायदेशीर निर्बंधामुळे निवडणुकीला उभे राहू शकले नाही तर घरातील दुसर्या कुणालातरी उभे करावे. ज्याला उभे केले जाईल त्याचा विजय पक्का होता. पण घरातील कुणीच तयार नसल्याने आणि मुख्य प्यादे तुरुंगात असल्याने आमदार संग्राम जगताप याने प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली.
दुसऱ्या बाजूने केडगाव मध्ये अजूनही पाय रोवू न शकलेले शिवसैनिक निवडणुकीच्या पूर्वतयारीत प्रचंड व्यस्त होते. त्यांनी आपली पूर्ण ताकद यावेळी लावायचे ठरवले होते.
ज्या दोन शिवसेना पदाधिकाऱ्यांची हत्या झाली त्यांनी केडगावातील या तीन सत्ताकेंद्रांच्या वर्चस्वाला धक्का लागेल असा जोरदार प्रचार सुरु केला. तरी शिवसेनाचा उमेदवार या पोटनिवडणुकीत चारशे मतांनी पराभूत झाला. हा नगण्य फरक या तीन कुटुंबांच्या जिव्हारी लागला. विशेषतः कर्डिले आणि जगताप यांच्या. या फरकाकडे त्यांनी भविष्यातील स्वतःच्या सत्तेच्या समोरील आव्हान म्हणून पहिले. आणि सत्तेच्या नशेत बेहोष झालेल्या या दोघांनी शिवसेनेच्या दोन पदाधिकार्यांना संपवण्याचा निर्दयी निर्णय घेतला. कर्डिले याने या षड्यंत्राची आखणी संग्राम जगताप याच्यासोबत मिळून केली. या कटात विधानपरिषद सदस्य असलेले संग्राम जगतापचे वडील अरुण जगताप हाही सामील होता. त्याला लवकरच अटक करण्यात येईल.
निवडणूक प्रचारादरम्यान प्रत्येक सभेत संग्राम जगतापने एक वाक्य वापरले, “आम्ही त्यांचा बंदोबस्त करून टाकू.” पैकी एका सभेत तर राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सभेला उपस्थित असताना त्याच्यासमोर हे वक्तव्य केले. नंतरच्या भाषणात तो म्हटला, “त्यांचा बंदोबस्त करण्याची युमची पद्धत आम्हाला ठाऊक आहे संग्राम भाऊ!” या प्रकरणाशी संबंधित असे अनेक दुवे आधी घडले आहेत जे अजून रिपोर्ट केले गेले नाहीत, असेच यावरून म्हणावे लागेल. आता विचार करा, बिहार आणि अहमदनगर यांच्यात कितीसा फरक आहे?
आय. पी. एस. कृष्ण प्रकाश आणि विश्वास नांगरे पाटील यांची या प्रकरणातली भूमिका :
कृष्ण प्रकाश पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहत असताना त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या अनेक विषयांत भानुदास कोतकर याने हस्तक्षेप केला. कृष्ण प्रकाश यांना हे पटले नाही. ते कोतकर याच्यावर लक्ष ठेवून होते. काही दिवसांतच, अशोक लांडे यांच्या हत्येच्या आरोपाखाली प्रकाश यांनी भानुदास कोतकरला अटक केली. आता पूर्वीच्या हस्तक्षेपामुळे आणि कायद्याच्या सख्त अंमलबजावणी करण्याच्या स्वभावामुळे कृष्ण प्रकाश यांनी तुरुंगात भानुदास कोतकर याची नांगी आवळून टाकली. त्याला जामीन आणि तुरुंगात वाढीव सुविधा मिळू नयेत यासाठी जातीने लक्ष घातले. असेही म्हटले जाते की तेव्हा कोतकरचे आश्रयदाते असलेले महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री आर आर पाटील आणि कृष्ण प्रकाश या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी बसलेले असताना, कृष्ण प्रकाश हे कोतकर यांच्या अटकेवर आणि त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याच्या बाबतीत ठाम होते. त्यांनी बाळासाहेब थोरात यांना, ‘स्वतःची राजकीय प्रतिष्ठा प्रिय असेल तर या प्रकरणापासून अंतर ठेवून राहा’ असेही बजावले होते. थोरात यांनी प्रकाश यांचे म्हणणे तंतोतंत ऐकले आणि केडगावच्या या तीन गुंडांसोबत असलेले राजकीय संबंध हळूहळू कमी करत नेले.
माहितीकरिता : सध्या राष्ट्रवादी कडून आमदार असलेला संग्राम जगताप याला तेव्हाचे पोलीस अधीक्षक विस्श्वास नांगरे पाटील यांनी विनयभांगाच्या आरोपाखाली भर रस्त्यावर कपडे फाटेपर्यंत बेदम मारले होते.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.