Site icon InMarathi

शरद पवारांना शिव्या घाला, पण त्यांच्यासारखी “विद्या”नगरी कुणीच उभारली नाही, मान्य करा!

sharad pawar vidya pratishthan

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखिका : अंजली झरकर
===

हा फोटो कुठला परदेशातला नाही. भारतातल्या कुठल्या बेंगलोर बिंगलोर सारख्या आय टी पार्क सारख्या शहरातला पण नाही. हा actually एका खेड्यातल्या फोटो आहे. जे काही दिसतंय त्याचा पसारा शेकडो एकरात पसरला आहे. हा फोटोही तसा पूर्ण नाही. फोटोफ्रेमच्या बाहेर देखील तितकच अफाट दर्शन आहे जितकं या फोटोत दिसतंय.

जे काही तुम्ही फोटोत पाहताय त्याला collectively “विद्यानगरी” असं म्हटलं जातं.

फोटोत मध्यभागी त्रिकोणी आकारात बांधलेलं जे आर्किटेक्चर आहे ते आहे “ विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय”.

हा फोटो आहे बारामती गावाचा.

 

 

बारामती म्हटलं की साहेब आठवतात. साहेबांबद्दल अनेक आक्षेप आहेत.

साहेब सत्तासुर्य आहेत आणि त्यांना आपल्या भोवती सर्वाना गोल गोल फिरवत ठेवायला आवडते. असते एकेकाची आवड. बीग्रेड च्या मागे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणणारे ते आधुनिक समर्थ आहेत.

बामणाच्या वळचणीला बसलेला इतिहास बाहेर काढून त्याला लक्ख घासून पुसून त्याचं नवीन “सर्वधर्मसमभाव आणि सेकुलर” रूप उजळवून आणणाऱ्या नवइतिहासकारांचे खंदे आश्रयदाते आहेत. पोशिंदे आहेत.

तोंडी लावायला शांफुआ आणि जेवणात फक्त सोशल इंजिनिअरिंग ची मशागत करून काढलेल्या सेकुलॅरीझम ची बिर्याणी खाणारे खरे लोकशाही नेते आहेत.

हे आहेत, ते आहेत, असे आहेत, तसे आहेत. साहेब लै काय काय आहेत. हर एक ठिकाणी आहेत. जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्यांचा वास असतो. चराचरातील हर एक गोष्टीमागे त्यांचा हात असतो. (हे लिहिताना सुद्धा दोन एक सेकंद सद्गदित झाल्यामुळे माझे लिहिते हात थांबले! असो.)

पण मी आजपर्यंत कुणालाही विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी बद्दल बोलताना ऐकल नाही. चांगल वाईट असं दोन्हीही. विद्यानगरी मध्ये रहाणं आणि शिकणं हा मोठा आनंदाचा काळ होता.

सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ७ , ८ , ९ वाजले तरी त्या कॅँपस मधून पाय निघायचे नाहीत. तोपर्यंत खुराड्यासारख्या शाळा पाहिल्या असल्याने विद्या प्रतिष्ठान म्हणजे धरतीवरचा स्वर्ग होता. तसा तो आहेच.

प्रशस्त ऐसपैस हवेशीर वर्ग, मोठमोठी ग्रंथालये, प्रचंड मोठी मैदाने, मोठमोठी जिमनॅशियम्स, कॉलेजची भली थोरली आवारे, सगळीकडे मुद्दाम जोपासलेली हजारो प्रकारची फुलझाडे आणि हिरवाई, एकदा बालवाडीत पोरगा घातला की डबल ग्रॅज्युएट होवूनच बाहेर निघेल इतका शैक्षणिक संस्थांचा अवाढव्य पण नेटका शिस्तशीर पसारा.

कळकळीने शिकवणारे शिक्षक आणि सगळ्या कॅम्पस भर कॉलेज सोडून उंडारणारी माझ्यासारखी मुले.

 

www.edunuts.com

 

डिग्रीचे शिक्षण पूर्ण करायला मला ३००० पेक्षा जास्त खर्च आला नाही. कदाचित तो त्याहीपेक्षा कमी असेल. परीक्षा फी सोडली तर बाकी कसली फी मी भरली नाही. कॉलेज च्या सगळ्या सुविधा वापरल्या.

फिरत फिरत ग्रंथालयात गेलं तर कुठल्याही सेक्शनमधून कुठलीही पुस्तकं काढून आरामात वाचत बस. कंटाळा आला पुस्तकं समोर घेवून मराठीचं इंग्रजी भाषांतर, इंग्रजीचं मराठी भाषांतर असले उद्योग कर.

मैदानावर मनसोक्त पळापळी कर नाहीतर नुसत सकाळपासून संध्याकाळपर्यंत नयनरम्य कॅम्पस फिरत राहा हा आमच्या सगळ्यांचाच आवडता उद्योग.

जवळजवळ ५००० मुली आणि तितकीच मुले राहू शकतील इतकी भव्य वसतिगृहे. एका रूम मध्ये एकाच ब्रांचला शिकणाऱ्या ४ किंवा ५ मुली राहण्याची सोय आणि रूमची जागा पाहिली तर जवळजवळ १५ माणसे आरामात लोळतील इतकी मोठी.

बाकीच्या सोयी वेगळ्या. बहुसंख्य मुलीना फुकट होस्टेल होत. बाकीच्यांकडून नाममात्र फी आकारली जात होती जी मिळत असणाऱ्या सुविधांच्या मानाने खूप कमी असायची. २००० साली आयटी कॉलेजचं उद्घाटन झालं.

देशभरातून दिग्गज नेते गोळा करून साहेबांनी आणलेले. प्रमोद महाजन, चंद्राबाबू नायडू, भुजबळ यांना एकाच व्यासपीठावर आम्ही त्यावेळी बोलताना पाहिलंय. असे अनेक कार्यक्रम तिथे आजही होत राहतात.

माझा प्रश्न असा आहे बारामती मध्ये ज्या प्रकारे विद्यानगर उभं केलं गेलं, तसं स्ट्रक्चर महाराष्ट्रात अजून कुठल्या गावात कुठल्या मंत्र्यांनी बांधून दाखवलंय? हा उपहास नाही माझा प्रामाणिक प्रश्न आहे.

बारामतीत मएसोची शाळा आणि टीसी कॉलेजचं दीर्घकाळ असलेलं वर्चस्व विद्या प्रतिष्ठानने मोडीत काढलं. ज्या मुलांची घरे दुर्गम अशा खेड्यात होती जिथून बारामती शहरात येवून शिकण ही त्यांना शक्य होत नव्हत अशा पंचक्रोशीतल्या अनेक खेड्यातल्या मुलांना विद्या प्रतिष्ठान ने शिकवलं.

रूई, जळोची , इंदापूर, फलटण, भिगवण, भवानीनगर, कळंब, सनसर, सांगवी, कटफळ, शेटफळ, शिरसुफळ, मोरगाव, माळेगाव, पंधारे, नीरा, कऱ्हा अशी गावे च्या गावे विद्या प्रतिष्ठान मध्ये येवून शिकून गेली. जशी विद्यानगरी बांधली तसच माळेगाव ला “शारदानगर” सुद्धा डेव्हलप केलं गेलंय.

लहानपणी आठवतंय एकदा शाळेत जायला निघालो असताना मैदानाच्या गेटवरच आम्हाला अजित दादा भेटले होते. तिथे पाहणी करत उभे होते.

आम्हाला थांबवून आमची चौकशी त्यांनी केली होती. इतकंच नाही, तर –

शाळेत कसं शिकवतात, तास व्यवस्थित होतात का, कुठले शिक्षक कसे आहेत, कोण जास्त मारतं अशी ही माहिती त्यांनी आमच्या कडून काढून घेतलेली.

असं म्हणतात की विद्या प्रतिष्ठानच्या आर्किटेक्चरचा जो कलात्मक सेन्स आहे तो अजित दादांमुळे आहे. त्यांनी इमारती बांधताना त्याच्यात जातीने लक्ष घातलंय. माझी माहिती खरी असेल तर अजित दादांची मुले ही विद्या प्रतिष्ठान मधेच शिकली आहेत.

पण १०-२० बुलेट धडधड करत कॉलेज मध्ये फिरतायत, raging चाललंय, “अय माहीतीये का माझा बाप कोण आहे ?” असली धमकी कुणी दिलीयेय असे प्रकार विद्यानगरी ने कधीच पाहिलेले नाहीत.

एकदाच फक्त ३० एक गाड्या कॉलेजच्या एका गेट मधून आल्या आणि कॅम्पस फिरून दुसऱ्या गेटनी बाहेर पडल्या होत्या. त्याच्यानंतर एका रात्रीत सूत्रे हालली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दर १०० मीटर वर एक एक असे बॅरिकेड कॅम्पस भर उभारले गेले.

काय परिस्थिती आहे सुशीलकुमार शिंदेंच्या सोलापूर ची? काय परिस्थिती आहे गोपीनाथ मुंडेंच्या बीड ची? काय परिस्थिती आहे विलासराव देशमुख यांच्या लातूर ची? काय परिस्थिती आहे राजकीय नेत्यांची भरमार असलेल्या सांगली, सातारा कोल्हापूर ची?

साताऱ्याच्या लोकांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेलं कार्य सोडून जर दुसरं काय असेल तर त्यावर बोलावं अशी नम्र अपेक्षा. परत एकदा सांगते उपहास नाही, प्रामाणिक प्रश्न आहे. उत्तरे मिळण्याची अपेक्षा देखील आहे.

यात मी पुण्याचं नाव घेणार नाही. कारण पुण्यात आपल्यानंतर किमान १५० पिढ्या तरी आपल्या नावावर आणि आपल्या पुण्याई वर बसून (भाव) खातील इतकी तजवीज गोखले, आगरकर, टिळक, घारपुरे, गोरे, कर्वे, रानडे या महान हस्तीनी करून ठेवली आहे. त्यांच्या कष्टाची आणि पुण्याई ची फळे पुणे चाखतंय.

शिवाय पुण्यात कॉलेज पेक्षा कॉलेज मध्ये शिकणारी मुले त्या कॉलेजला मोठ बनवतात हे माझं व्यक्तिगत मत आहे. यावर स्वतंत्र लेख लिहिता येईल.

कुठलाही माणूस सुरुवात स्वत:च्या घरापासून करतो. हे तत्व विद्या प्रतिष्ठानलाही लागू पडतंय.

साहेब काही कर्मवीर भाऊराव पाटलासारखे कर्मयोगी नाहीत. ते राजकारणी आहेत आणि ते त्यांनी कधीच लपवलेलं नाही. त्यांची महत्वाकांक्षा ही लपलेली नाही.

एक माझं निरीक्षण आहे.

विद्या प्रतिष्ठान ची निर्मिती झाली साधारण १९९२ ते १९९८ च्या काळात. या काळात मराठी माध्यमिक शाळा, इंग्रजी माध्यमाची शाळा, कॉलेज, law कॉलेज, बी. एड. कॉलेज वगैरे बांधल गेलं.

१९९१ ला राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर साहेबांकडे पंतप्रधान पदाचा दावेदार म्हणून बोट दाखवलं जात होतं.

१९९१ ते १९९३ ते संरक्षण मंत्री राहिले. त्यानंतर १९९३ परत त्यांनी चौथ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. १९९४ पर्यंत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. विद्या प्रतिष्ठान च बहुतेक काम याच कालखंडात पार पडलं.

त्यानंतर १९९५ ला सीताराम केसरी कडून कॉंग्रेस ची अध्यक्षपदाची निवडणूक हरणं. आणि १९९९ ला सोनिया गांधींची झालेली एन्ट्री पाहून स्वत:च्या पंतप्रधान बनण्याच्या महत्वाकांक्षेला लागलेला सुरुंग.

याचा indirect परिणाम असू शकतो विद्या प्रतिष्ठानची रीप्लिका परत कुठे झाली नाही.

 

 

याला राजकीय नैराश्यवाद कारणीभूत असू शकतो.

त्याच्यामुळे विद्या प्रतिष्ठान हे आज सुद्धा आणि या पुढच्या काळात सुद्धा राजकीय इच्छाशक्ती असेल तर किती जबरदस्त constructive काम होवू शकत याच ज्वलंत उदाहरण बनून उभं आहे. तशी इच्छाशक्ती परत साहेबांनी दाखवली नाही आणि दुर्दैव की त्यांच्या इतर सर्व दुर्गुणांवर बोलणाऱ्या नेत्यांना स्वत:च्या मतदार संघात साहेबांचं विद्या प्रतिष्ठान च्या उभारणी सारखं कार्य करून दाखवायला ही जमलं नाही.

साहेबांचे ऑन द रेकॉर्ड एक आणि ऑफ द रेकॉर्ड हजारो “ राजकीय” पुतणे आहेत. जे त्यांच्यावर कायम (दात खावून) लिहित असतात.

चुका दाखवणं सोपंय. आणि आवश्यक सुद्धा. पण ज्याने ९०% पाप केलंय त्याच्या १०% पुण्याचा विचार गंगेत का सोडून द्यायचा? त्याबद्दल का नाही बोलायचं?

माझ्या मते साहेबांना या गोष्टीसाठी सकारात्मक क्रेडीट द्यायला त्यांच्या लाडक्या ऑफ द रेकॉर्ड पुतणे कंपनीची काय हरकत असणार आहे? तुमच्या हरकती तुम्ही अर्थात व्यक्त करू शकता.

पण आजही हा फोटो पहिला की काळजाचा ठोका चुकतो हे तितकंच खरं!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version