Site icon InMarathi

ही केस सलमान का हरला? वाचा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : समीर गायकवाड 

===

बिश्नोई म्हणजे बीस आणि नऊ यांचे मिश्रण. वीस आज्ञा आणि नऊ तत्वे. गुरु जांभेश्वर यांनी समाजास ह्या २९ बाबींचे पालन अनिवार्य केले आणि हा समाज बिश्नोई म्हणून ओळखला जाऊ लागला.

सलमान खानच्या काळवीट हत्या खटल्यात याच समाजाचे लोक फिर्यादी आणि साक्षीदार होते म्हणूनच तो ही केस हरला असे म्हणणे चुकीचे होणार नाही.

कारण हा समाज प्राण्यांना देव मानतो, त्यातही जे गवत, पानं खाऊन जगतात ते यांना पूज्य आहेत. निसर्ग रक्षण आणि पर्यावरण संतुलन ही यांची आद्य कर्तव्ये आहेत.

बिश्नोई समाजातील लोक हे प्रामुख्याने राजस्थानच्या थार वाळवंटाच्या परिसरात आढळतात. निसर्गाविषयी असलेल्या प्रेमासाठी त्यांची खास ओळख आहे.

 

indianexpress.com

 

झाडे वाचवण्यासाठी काही वर्षापूर्वी आपल्याकडे चिपको आंदोलन झाले होते, नुकतेच गुगलने त्याची दखल घेत डूडलही बनवले होते.

बिश्नोई समाजाने चिपको आंदोलनाहून श्रेष्ठ आणि गौरवशाली इतिहास अजमेरजवळील एका गावात घडवला होता.

अमृतादेवी बेनिवाल या महिलेने आपल्या तीन मुली आणि पतीसह झाडे तोडायला आलेल्या राजा अभयसिंहाच्या सैन्यास विरोध केला आणि त्याकरिता प्राणाचे बलिदान दिले.

३६३ लोकांनी झाडांची कत्तल अडवण्यासाठी आपला जीव दिला होता. असं जगाच्या पाठीवर कुठंही कधीही घडलं नाही. इतकं कमालीचं निसर्गप्रेम या समाजात होतं, आहे आणि भविष्यातही राहील.

इंटरनेटवर हरणाच्या पाडसाला आपलं दुध पाजणाऱ्या एका बिश्नोई स्त्रीचा फोटो व्हायरल झाला होता तेंव्हा समाजाने तिला नावं न ठेवता तिची पाठराखण केली होती. सलमानच्या प्रकरणात त्याने सगळे प्रयत्न करूनही हा समाज बधला नाही की फुटलाही नाही.

 

the awaz nation

 

१९९८ च्या सप्टेंबर-ऑक्टोबरमधील हे प्रकरण होते. तेव्हा सलमानसह सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे हे सर्व कलाकार ‘हम साथ-साथ है’ चित्रपटाच्या शुटिंगसाठी राजस्थानमध्ये आले होते.

 

news one

 

मुख्य आरोपी सलमान खान आणि इतर आरोपी घोडा फार्म हाऊस येथे थांबले होते.

भवाद गावात २७ – २८ सप्टेंबरच्या रात्री त्यांनी काळवीटांची शिकार केली होती. यानंतर कांकणी गावात १ ऑक्टोबर रोजी आणखी २काळवीटांची शिकार केल्याचा आरोप झाला होता.

 

the quint

 

याविरुद्ध बिश्नोई समाजातील लोकांनी तीव्र आवाज उठवला आणि सलमान खान आणि त्याच्या साथीदारांवर विविध ठिकाणी ५ काळवीटांची (ब्लॅक बक) शिकार केल्याचा आरोप दाखल झाला.

सलमान खानवर काळवीट शिकार प्रकरणी एकूण ४ गुन्हे दाखल झाले. तीन खटले काळवीट शिकारीचे होते तर चौथा खटला आर्म्स अॅक्टचा होता.

सलमान खानला अटक झाली तेव्हा त्याच्या रुममधून पोलिसांनी पिस्तूल आणि रायफल जप्त केली होती. या शस्त्रांचा परवाना संपलेला होता. यातील अन्य खटल्यांचा निकाल लागला होता.

घोडा फार्म हाऊस केस : १० एप्रिल २००६ मध्ये सीजेएम कोर्टाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात सलमान हायकोर्टात गेला होता. हायकोर्टात २५ जुलै २०१६ ला सलमान निर्दोष सुटला. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील केले आहे.

भवाद केस : सीजेएम कोर्टाने १७ फेब्रुवारी २००६ ला सलमानला दोषी ठरवले होते. यात त्याला १ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणातही हायकोर्टातून तो निर्दोष सुटला होता. या निर्णयाच्या विरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेले आहे.

आर्म्स अॅक्ट केस : १८ जानेवारी २०१७ ला कोर्टाने सलमानला निर्दोष सोडले होते. राज्य सरकारने सीजेएम कोर्टाच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले आहे.

 

mybataz.com

 

यातला काकाणी खटलाच उरला होता. त्याचा २०१८ मध्ये निकाल लागला. हा निकाल आपल्या मनासारखा यावा म्हणून सलमानने केलेल्या तोड्या लक्षात येण्यासाठी काही उल्लेख अपरिहार्य आहेत-

यात पहिला पोस्टमॉर्टम रिपोर्ट डॉ. नेपालिया यांचा होता. त्यांनी म्हटले होते की, एका काळवीटाचा मृत्यू श्वास गुदमरुन झाला तर दुसऱ्याचा खड्ड्यात पडल्याने आणि त्यानंतर कुत्र्यांनी त्याचे लचके तोडल्याने मृत्यू झाला होता.

त्यावर सलमानच्या वकीलांनी युक्तीवाद केला होता, की पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कुठेही म्हटले नाही की बंदुकीची गोळी लागून काळवीट मेले आहेत.

काळवीट गोळी लागून मेल्याचे सांगणारा प्रत्यक्षदर्शी असूनही डॉक्टरांनी उच्च प्रतीची तोडी करत अहवाल बदलला होता.

यावर टीकेची झोड उठताच यानंतर मेडिकल बोर्डची नियुक्ती करण्यात आली होती. मेडिकल बोर्डने दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार केला, त्यात दोन काळवीटांचा मृत्यू गन शॉटने (बंदुकीच्या गोळीने) झाल्याचे म्हटले होते.

याशिवाय या प्रकरणात दोन साक्षीदार आपल्या जबाबावर कायम राहिले, त्यांनी जबाब बदलला नाही. पण प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने मात्र कोर्टात त्याचा जबाब काही अंशी बदलला.

 

hindustantimes.com

 

काकाणी (कांकाणी) येथील शिकार प्रकरणात ठोस पुरावे सरकारी पक्षाकडे होते.

१ ऑक्टोबर १९९८ च्या रात्री जेव्हा बॉलिवूड स्टार्स कांकाणी येथील दुर्मिळ वन्यजीव दोन काळवीटांची शिकार करत होते, तेव्हा बंदूकीच्या गोळीचा आवाज ऐकून गावकरी घटनास्थळी आले.

त्यांनी बॉलिवूड स्टार्सचा बाइकने पाठलाग केला, मात्र ते पळून गेले. गावकऱ्यांना घटनास्थळी दोन काळवीटांचे मृतदेह सापडले होते. या प्रकरणी गोळीबार करण्याचा आरोप सलमानवर होता.

या शिकारीशी संबंधीत दोन्ही प्रकरणांमध्ये एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता, हरीश दुलानी. त्याने जबाब फिरवला होता.

त्याने सलमान शिवाय दुसऱ्या कलाकारांना ओळखत नसल्याचे म्हटले होते. याप्रकरणातील दुसरी कमकुवत बाजू होती, ती ही की यात काळवीटांचे मृतदेह सापडले नव्हते.

तरीही परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्ष याच्या आधारे मॅजिस्ट्रेट देवकुमार खत्री यांच्या कोर्टाने त्याला दोषी ठरवले आणि ५ वर्षे शिक्षा व १० हजार रुपये दंड ठोठावला.

याप्रकरणात सैफ अली, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रेही आरोपी होते. सहआरोपींनाही हीच शिक्षा लागू होते, मात्र या चारही सेलिब्रिटींना जोधपूर कोर्टाने संशयाचा फायदा देत निर्दोष सोडले आहे.

 

india.com

 

आपल्याकडे काही लोकांनी उच्च प्रतीचा गांजा ओढला असल्याने त्यांना काही लोक कायद्याहून मोठे वाटतात. अनेक फडतूस चित्रपट अभिनेते अनेक गंभीर गुन्ह्याखाली दोषी ठरवून कारावासात पाठवले जातात तेंव्हा त्यांच्या चाहत्यांना ते कायद्यापेक्षा मोठे वाटू लागतात.

हीच बाब खेळाडूंची ! राजकारण्यांचे तर नावच घ्यायला नको अशी परिस्थिती आहे. नोकरशाहीतही हीच बजबजपुरी आहे.

 

 

सलमानच्या हिट अँड रन केसमधे फिर्यादी आणि साक्षीदार काकाणी खटल्याप्रमाणे ठाम राहिले असते तर तिथेही निकाल कदाचित वेगळाच लागला असता.

पण आपल्याकडे सेलिब्रिटीना गुन्हे माफ असण्याचा एक अलिखित पायंडा आहे. शिवाय त्यांच्याकडून तपास यंत्रणांना दाबून मलिदा मिळतो.

 

 

मग खटले कमकुवत केले जातात, एक क्वार्टर पाजली की चार्जशीट बनवणारे पोलिस कंबरेचे काढून उभे राहतात, खेरिज राजकीय दलालांची निर्दोषत्वाची पोपटपंची सुरु असते. तिचाही दबाब येत राहतो. परिणामी धनदांडगा आरोपी सहज मोकाट सुटतो.

इथे तसे झाले नाही कारण इथे एका आगळ्या वेगळ्या समुदायाशी गाठ होती. जे लोक झाडं कापण्यासाठी जीव देऊ शकतात ते लोक आपल्या आवडत्या प्राण्याचा जीव घेणाऱ्याच्या बाजूने फितूर कसे होतील ?

पैशाने सगळं काही विकत घ्यायला सोकलेल्या व्यक्तीला अशी माणसं आयुष्यभराचा धडा शिकवतात. देव करो आणि प्रत्येक माजोरडया माणसास अशी माणसं आयुष्याच्या कुठल्या नं कुठल्या वळणावर गाठ पडोत…

 

blog-kiwi.com

 

काकाणी केसमध्ये सलमानची गाठ या लोकांशी होती म्हणूनच तो केस हरला.. हा निर्णय म्हणजे केवळ त्याचा पराभव नसून वन्यजीवांना आपलं अपत्य समजून जगणाऱ्या एका समुदायाच्या विलक्षण ममत्वाची आणि कायद्याची ही जीत आहे …

– समीर गायकवाड

(बिश्नोईंची एक वेगळी नोंद – संपूर्ण भारतातले शेतकरी बैलांच्या कामभावना जागू नयेत आणि त्यांनी कामावरच रुजू राहावं म्हणून बैलांची अस्ती बडवतात, हा अत्यंत क्रूर प्रकार असतो. पण सर्रास हे चालतं. थोडक्यात त्यामुळे बैल प्रजननक्षम राहत नाही.

स्वतःला पराकोटीचे शाकाहारी म्हणवून घेणारे अनेक गुजराती समुदायही असं करतात मात्र पूर्ण देशात फक्त बिश्नोई असे आहेत की जे बैलांना अधू बनवत नाहीत … बिश्नोईंचे २३ वे सूत्र यावर भर देते …यावरून ओळखा की हा समाज प्राण्यांकडे कोणत्या नजरेने पाहतो ! )

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version