आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक : डॉ. उमेश मुन्डल्ये
===
ही कथा आहे माझ्या एक मित्राची, ३ वर्षांपूर्वीची. एक रोटरी कार्यक्रमात तो दुसऱ्या मित्राला सांगत होता, त्याचं बदलापुरजवळ फ़ार्म होतं आणि तिथे पाण्याचा काही प्रश्न होता.
एक बोरवेल आहे पण पाणी फक्त १०-१५ मिनिटं येतं आणि मग बंद पडतं. आता दुसरी बोरवेल करायची आहे, त्यासाठी माणूस येणार आहे. तेवढ्यात त्याने मला पाहिलं आणि तो मला म्हणाला की एकदा येऊन सांग ना काही करता येतंय का ते?
कामाच्या व्यापात ते राहून गेलं आणि एक दिवस त्याचा परत फोन आला की आज दुसरी बोरवेल करतोय कारण पहिली बोरवेल अजिबात पाणी देत नाहीये. मला वेळ होता म्हणून मी गेलो, तेव्हा बोरवेलचं काम चालू झालं होतं.
त्यामुळे त्याबद्दल काही न बोलता मी त्याला सांगितलं की ,काही अडचण आली तर सांग, मी आत्ता तुझ्या जमिनीचा सर्वे केलाय आणि माझ्याकडे अजुन १-२ मार्ग आहेत पाणी मिळवण्यासाठी.
रात्री त्याचा फोन आला की थोडं थोडं करत ४३० फुटांपर्यन्त खाली गेल्यावरही पाणी बिलकुल मिळालं नाही. शेवटी बोरवेल करणारा वाद घालून निघून गेला. तेव्हा तू काहीही कर पण उद्या ये.
मी दुसऱ्या दिवशी गेलो. सगळे हताश होते की ४०० फुट खाली जाऊन पाणी नाही मिळालं, आता पुढे काय? लावलेली झाडं मरणार का? पाणीच नाही मिळालं तर पुढे काय करायचं?
मी केलेल्या त्या जमिनीच्या अभ्यासाप्रमाणे मी त्यांना सांगितलं की तुम्ही इथे बोरवेल न करता विहीर करायला हवी होती. विहीरीला पाणी मिळेल इथे.
त्या सर्वांना हा मोठा धक्का होता. जिथे ४०० फुट खोल पाणी मिळालं नाही तिथे हा सांगतोय की विहीरीला पाणी मिळेल? त्यावर विचार करून आणि दुसरा मार्ग नसल्याने असेल कदाचित, त्यांनी माझ्या सल्ल्यावर विश्वास ठेवला आणि मी निश्चित करून दिलेल्या ठिकाणी विहीर खणायला सुरुवात केली.
दुसऱ्या दिवशी दुपारी त्या मित्राचा फोन आला, उमेश, १७ फुटांवर एक झरा मिळालाय आणि २ तासांनी परत फोन आला की १९ फुटांवर अजुन एक झरा लागलाय.
सकाळी मी जागेवर गेलो तेव्हा तिथे अंदाजे ४ फूट पाणी जमा झालं होतं. सगळ्यांच्या दृष्टीने हा चमत्कार होता कारण ४०० फूट खोल पाणी नाही आणि २० फुटांच्या आत आहे हे दिसत असलं तरी पटत नव्हतं. ही घटना २०१३ मधील आहे. तेव्हापासून त्या विहीरीला पाणी आहे. दोन वर्षांपूर्वी कमी पाऊस, जास्त तापमान या गोष्टी असूनही त्या विहीरीला पाणी होतं.
असे माझ्याकडे भरपूर किस्से आहेत विहिरींचे! अगदी भिवंडी मधेही १५-२० फुटांवर पाणी लागलंय (जिथे बोरवेल ७००-८०० फूट खोल जातात). हा नक्की काय प्रकार असतो? आपण आता त्यातल्या काही गोष्टींवर माहिती घेऊया.
–
हे ही वाचा – ६० फूट खोल विहीर एकटीच्या बळावर खोदणारी आधुनिक “लेडी भगीरथ”!
विहीर आणि बोरवेल यात फरक काय? म्हणजे त्या स्त्रोताला पाणी मिळतं कुठून?
आपल्या सर्वांना जे गोड पाणी मिळतंय ते पावसाचं हे तर सगळ्यांना माहिती असेलच. हे पाणी जमिनीवर पडतं आणि काही जमिनीत मुरतं, काही जमिनीवरून उताराच्या दिशेने वाहून जातं. जमिनीत मुरणारे पाणी मातीच्या विविध थरांतून खाली जातं, मुरूम आणि दगडाच्या अनेक थरांतून खाली जातं आणि शेवटी बरचसं पाणी तळाच्या कातळापर्यंत पोहोचतं.
इथून, कातळाच्या काही ठिकाणी असलेल्या सूक्ष्म भेगांमधून जेमतेम १०-१२ टक्के पाणी अजून खाली जातं.
असं पाणी शेकडो वर्षं मुरून जमा झालेलं असतं. बाकी पाणी कातळावर जमून विविध थरांमध्ये पसरतं, ज्याला आपण भूगर्भातील पाण्याची पातळी म्हणतो. ही विविध ठिकाणी भूगर्भ, माती, उतार, पाऊस वगैरे गोष्टींवर अवलंबून असल्याने वेगळी असू शकते.
आपण जेव्हा विहीर खणतो, तेव्हा या कातळापर्यंत पोहोचलो की त्या साठून राहिलेल्या पाण्याला बाहेर पडायला मार्ग मिळतो, ज्याला आपण विहिरीचा “झरा” म्हणतो.
बोरवेल करताना जोपर्यंत कातळ लागत नाही, तोपर्यंत केसिंग पाईप टाकतात. आणि कातळ लागल्यावर त्यात ड्रील करून खाली गेलेल्या १०-१२ टक्के पाण्याचा शोध घेतला जातो. यात, कातळावर असलेलं भूगर्भामधील पाणी आपल्याला मिळत नाही कारण केसिंग पाईपमधे ते येत नाही.
म्हणजे, बरेचदा असं होतं, की पाणी ३०-४० फुटांवर असतं आणि आपण बोरवेल स्वस्त आणि पटकन होते म्हणून २००-८०० फूट खोल जातो आणि शेकडो वर्षं मुरलेलं पाणी काढून वापरतो.
जेवढं खोल जाऊ तेवढं पाणी आरोग्याच्या दृष्टीने घातक होण्याची खूप शक्यता असते. बोरवेल ही फक्त एक शोषनलिका आहे आणि त्यात पाणी साठवून ठेवायची क्षमता नसते.
त्यामुळे हा मर्यादित साठा कधीही संपू शकतो हे लक्षात घेऊन प्रत्येक बोरवेलचं योग्य पद्धतीने पुनर्भरण करणं आवश्यक असतं. त्याबद्दल नंतर लिहितो.
–
हे ही वाचा – कोरोनाच्या संकटातही खेड्यातील दाम्पत्याने आरंभलेला “हा” प्रकल्प पाहून त्यांच्या दूरदृष्टीची दाद द्यायलाच हवी
यावरून काय लक्षात ठेवायचं?
१. जमिनीचा प्रकार, उतार, मातीच्या थराची जाडी, मातीचा प्रकार, भौगोलिक परिस्थिती, पाऊस आदि गोष्टींचा अभ्यास करून योग्य प्रकारे जलसंधारण उपाय केले तर निश्चीत फायदा होतो.
२. पाण्याचा स्त्रोत कसा आहे, कुठे आहे, त्याची ताकद किती आहे हे कोणाला नक्की सांगता येत नाही. त्याचा फ़क्त अंदाज बांधता येतो.
३. हे काम योग्य अधिकारी व्यक्तिकडून करून घेणं चांगलं, त्यामुळे यश मिळण्याचं प्रमाण खूप वाढतं.
४. विहीरीला पाणी मिळालं म्हणजे बोरवेल पण पाणी देईल हा समज चुकीचा आहे.
५. जमिनीला कुठेही भोक पडून पाणी मिळत नाही, तर पाणी आहे तिथे भोक पाडावं लागतं तर पाणी मिळतं.
विहिरीला किंवा बोरवेलला पाणी लागणं आणि ते वर्षभर पुरणारं असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्यात आपल्याला काही कळत नाही, त्यामुळे योग्य व्यक्तीला विचारून त्याच्या सल्ल्याने काही करावं, हे सुद्धा बहुसंख्य लोकांना सांगायची तीव्र गरज निर्माण झाली आहे.
===
हे ही वाचा – या ‘रहस्यमय’ विहीरीमागची ‘दंतकथा’ वाचून तुम्ही नक्कीच अवाक व्हाल!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.