' डोनाल्ड अमेरिकेला कुठे घेऊन जाईल? नव्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा आढावा – InMarathi

डोनाल्ड अमेरिकेला कुठे घेऊन जाईल? नव्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा आढावा

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

शेवटी ट्रम्प जिंकले. जगभरातील अंदाज, दावे खोटे ठरवत ट्रम्प जिंकले. ह्या विजया मागे ट्रम्प नी जी रणनीती आखली होती ती यशस्वी ठरली हे आश्चर्य कारक आहे.

अगदी सुरवातीपासूनच ठरवून, नियोजन करून डोनाल्ड ट्रम्प यांनी वादग्रस्त विधाने करण्याचा सपाटा लावला होता. अमेरिकन -मेक्सिको सिमेवर भिंत बांधायला हवी, अमेरिकेत मुस्लीमांना प्रवेश बंदी करावी…वगैरे त्यांची वक्तव्ये विशेष गाजली. या व यासारख्या त्यांच्या वक्तव्यांनी त्यांची प्रतिमा नकारात्मक बनवली खरी, पण याचा आपण दुसऱ्या बाजूने विचार करूयात. ज्याची कुठल्याही प्रकारची प्रतिमा जनमानसात नाही, ज्याला एका विशिष्ट परिघाबाहेर लोक ओळखत नाहीत – अशा व्यक्तीला आपल्या परिघाबाहेर ओळख मिळवायची असेल तर काहीतरी आगळवेगळ करणे क्रमप्राप्तच ठरते. तेच डोनाल्ड यांनी केले.

त्यांच्या समोर राष्ट्राध्यक्ष पदासाठी संभाव्य (तेव्हा) उमेदवार म्हणून हिलरी क्लिंटन होत्या. माजी राष्ट्राध्यक्ष यांची पत्नी, माजी फर्स्ट लेडी, अमेरिकन सरकारात सेक्रेटरी आँफ स्टेट (आपल्याकडील परराष्ट्रमंत्री) – एवढे मजबूत प्रोफाईल असणारी स्त्री उमेदवार म्हणून उभी होती. हिलरीच्या तुलनेत विचार करता डोनाल्ड तिच्यासमोर कुठेही थांबत नव्हते.त्यामुळे हिलरीचा मुकाबला करायचा असेल तर आधी मुकाबल्यात आपण आहोत हे सिद्ध करावे लागेल आणि नंतर मुकाबला…या नियमाप्रमाणे त्यांनी सुरवातीला वादग्रस्त विधाने करून स्वतःला नकारात्मकरित्या का होईना प्रसिद्ध (मुकाबल्यात आणले) करून घेतले.

america-election-2016-marathipizza02

विजयी झाल्यानंतर त्यांनी केलेले वक्तव्य बारकाईनं ऐकल्यास, उमेदवारी मिळविण्यासाठी करण्यात आलेल्या प्रचारकाळातील आपली वक्तव्य ही निव्वळ प्रचारकी थाटाची व स्वतःला या पदाच्या शर्यतीत टिकवून ठेवण्यासाठीच करण्यात आली होती असा अर्थ होतो. अर्थात, जिंकल्यानंतर असे बोलावेच लागते असा युक्तिवाद इथे करता येऊ शकेल आणि सध्या तोही बरोबरच असेल.

आता डोनाल्ड अमेरिकेचे अध्यक्ष झाले आहेत. आता ते काय निर्णय घेतात – यावर जगातील बर्याचशा गोष्टी ठरतील. अमेरिकन प्रभाव घटतोय असे रिपब्लिकनांना नेहमीच वाटत असते आणि अमेरिकेने कुठल्याही परिस्थितीत जगावरील आपली प्रभूसत्ता कायम राखायलाच हवी या मताचे हे असतात. यासाठी मग त्यांची कुठल्याही थराला जाण्याची तयारी असते. ओबामाच्या पूर्वाश्रमीचे राष्ट्राध्यक्ष – धाकटे बुश ह्याच पक्षातले.

george-bush-jr-marathipizza.

इराकमध्ये अमेरिकेने रिपब्लिकनांच्या याच वेडपटपणापायी तीन ट्रिलियन डाँलर्स खर्च केले. इराक, उ.कोरिया, इराण यांना धाकट्या बूश यांनी “दुष्ट-देश” असे जाहीरही केले होते. ओबामा होते म्हणून इराणबरोबर अणुकरार होऊ शकला, अन्यथा त्यांच्या जागी रिपब्लिकन राष्ट्रपती असता तर कदाचित् अमेरिका व इराण यांच्यात युद्धही झाले असते.

पण आता पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहे. आजची अमेरिका ही 2003 सालची अमेरिका तर राहीली नाहीच त्याचबरोबर जगही बदललेले आहे. चीन, रशिया यांच्याकडून तिला आव्हान मिळत आहेत. दक्षिण चीनी समुद्रात चीन कृत्रिम बंदरे, त्यावर धावपट्या तयार करून दावा सांगतोय तरीसुद्धा अमेरिका निषेधापलिकडे काही करू शकत नाही. सिरियात व युक्रेन मध्ये रशियाने अमेरिकेला शह देऊन आपल्याला हवे तेच केले आहे. यामुळे अमेरिकन वर्चस्वाला काहीप्रमाणात धक्का नक्कीच बसलेला आहे!

अमेरिकेत विदेशी धोरण हा निवडणुकीचा मुख्य मुद्दा असतो. आपल्याइकडच्या सारखे पाणी, रस्ते, आरोग्य हे सगळे प्रश्न जवळजवळ सुटलेले असल्यामुळे हा मुद्दा तिथे महत्त्वाचा असतो. यावरूनही तेथील मतदार आपली पसंत नापसंत ठरवत असतात. ओबामा हे अतिशय उमदे राष्ट्रपती होते. आपण ताकदवान आहोत म्हणून आपण लोकांना आपले मत मान्य करायला लावण्यापेक्षा बोलण्यातून, शांततेने, परस्परांचा आदर करून आपण मतभेदांच निवारण केले पाहिजे, या मताचे होते. पण या मताबरोबर एक समस्या असते. ती म्हणजे लोकांना तुम्ही नेभळट, घाबरट वाटण्याची शक्यता असते. ‘आली अंगावर तर घे शिंगावर’ दृष्टिकोन बाळगून असणाऱ्या युवा पिढीला हे अजिबात आवडत नाही.

त्यातून आपण जागतिक महासत्ता असणाऱ्या देशाचे नागरिक आहोत, ही भावना मनात घेऊन असणाऱ्या तरूणांनी या शांततेच्या मार्गाची हेटाळणी नं केली असती तर ते नवल ठरले असते. याठिकाणी नेमके तेच झाले असण्याची शक्यता आहे. ओबामाचेच नेभळट, कमजोर परराष्ट्रीय धोरण पुढे चालविण्याचे आश्वासन प्रचारात देणाऱ्या हिलरी या तरूणांना आवडण्याची सुतराम शक्यता नव्हतीच पण डोनाल्ड यांना निवडूनही त्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत.

कुठल्याही भक्कम व्यवस्था असणाऱ्या देशात व्यक्ती बदलली म्हणून रातोरात धोरणे व देशाचे हितसंबंध बदलत नाहीत. प्राधान्यक्रमात जरूर फरक पडतो पण धोरणांचा मुख्य गाभा कधीही बदलत नाहीत. आज डोनाल्ड जिंकल्यानंतर पाकिस्तानला व मुसलमानांना धडा शिकवतील अशी आस ठेवून डोनाल्डवर दाव लावणाऱ्या आपल्या येथील उजव्यांच्या पदरी लवकरच घोर निराशा पडेल. प्रचारात मारलेल्या गप्पा सरकारात गेल्यानंतर अधिकार्यांनी सांगितलेल्या कटू वास्तवात कुठल्या कुठे विरून जातील. पाकिस्तान व मुस्लीम दहशतवाद निदान दक्षिण आशियात तरी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे कार्टर नंतर आलेल्या अमेरिकेच्या प्रत्येक राष्ट्राध्यक्ष यांना माहिती आहे. आता यात नवीन डोनाल्ड यांची भर पडेल. ते याबाबतीत आपली काहीच मदत करू शकणार नाहीत. तोपर्यंत, जोपर्यंत अमेरिकन सैनिक अफगाणिस्तानात आहेत. त्यामुळे डोनाल्ड आल्यानंतर या आघाडीवर आपल्याला दिलासादायक काही घडेल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.

हीच गोष्ट मुस्लीम दहशतवादाबद्दल म्हणता येईल.

इराक, अफगाणिस्तान येथे अमेरिकेने आपले अवाढव्य लष्करी बळ वापरले. हजारो दहशतवादी मारले, शेकडो सैनिक गमावले, हजारो करोड फुंकून टाकले. दहशतवाद थांबला? नाही…! मग ज्या लोकांशी युद्ध केले त्यांच्याशीच शेवटी चर्चा करायची वेळ आली…! आता डोनाल्ड वेगळे काय करणार? दहशतवादाला संपविण्यासाठी अमेरिकेने आपल्या जवळ असलेले सर्वच पर्याय तर वापरलेत. त्यामुळे बळाचा वापर हा या समस्येवरील उपाय नक्कीच नाही. चर्चेचा, शांततेचा मार्ग दुरचा, वेळखाऊ व संयमाची परिक्षा पाहणारा आहे. पण हल्लीच्या लोकांना तो आवडत नाही. कळण्यासाठी खरं तर साधी गोष्ट आहे – जन्नत आणि हुरचे वेड असणाऱ्या आणि माणसाला ज्याचे सर्वोच्च भय असते त्या मृत्यूच्या भयालाही पार करणाऱ्या दहशतवाद्यांना शस्त्रबळावर संपवितो म्हणणे आणि त्यावर खुश होणे हे अज्ञानी मानसिकतेचे लक्षण आहे.

डोनाल्ड हे उद्योगपती आहेत. ते चांगले राष्ट्रपती आहेत काय? हे काही वर्षांनी कळेलच. पण डोनाल्ड अमेरिकेला फार दूर, फार वेगळ्या स्तरावर नेणार नाहीत, हे नक्की.

हां, सत्तेवर आपली पकड पक्की करण्यासाठी ते सुरवातीस काही धक्कादायक निर्णय जरूर करतील. पण एकदा खडा टाकून पाणी ढवळून टाकण्यापेक्षा ते अधिक नसेल. जग आणि अमेरिका आहेत तसेच राहतील…निदान पुढील काही दशके तरी…!

डोनाल्ड यांना भरपूर शुभेच्छा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Shivraj Dattagonde

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

shivraj has 25 posts and counting.See all posts by shivraj

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?